मला कामाचा, अगदी वाचन्या-लिहिण्याचाही कंटाळा आला की मी जुन्या कात्रणसंग्रहाच्या फाईली चाळत बसतो. त्या चाळत असताना सध्याच्या घडामोडींवर भाष्य करायला संदर्भ मिळून जातात. काही विस्मरणातून गेलेल्या माहितीला,ज्ञानाला उजाळा मिळतो. आज दुपारी असाच कंटाळा आलाय म्हणून कात्रणसंग्रहांच्या फाईली चाळत असताना दहा-बारा वर्षांपूर्वी 'लोकसत्ता'त प्रसिद्ध झालेल्या एका बातमीचे कात्रण दिसले. चंद्रशेखर कुलकर्णी यांनी लिहिलेल्या बातमीचे शिर्षक होते,'हेडमास्तरांस लिहिलेले 'ते' प्रसिद्ध पत्र लिंकनचे नव्हेच!' ती बातमी ज्यावेळी प्रसिद्ध झाली होती त्यावेळेलाही मला जिज्ञासा होती आणि आजही आहे, ती म्हणजे खरेच 'ते' पत्र लिंकनचे नाही का? कारण त्यावेळचा 'लोकसत्ता' मी नियमित वाचत होतो आणि त्याचा नियमित वर्गणीदारही होतो. ( तालुक्याच्या ठिकाणी जे काही दहा-वीस वर्गणीदार होते, त्यातला मी एक) त्यानंतर त्या बातमीचा फॉलोअप काही येईल का? अथवा कुणाचे प्रतिक्रिया देणारे पत्र येईल का? जेणे करून 'ते' मुख्याध्यापकांना लिहिलेले पत्र लिंकनचे पत्र नव्हे, यावर शिक्कामोर्तब होईल. मात्र त्यानंतर काही बातम्या-प्रतिक्रिया आल्या नाहीत. त्यामुळे आजही मी या पत्राबाबत संभ्रमित आहे. कारण आजही शाळा-कॉलेजांमध्ये हे पत्र मुख्याध्यापक अथवा प्राचार्यांच्या केबिनमध्ये दिमाखात लटकलेलं असतं. त्या पत्राचे संदर्भ आजही दिले जातात, तेव्हा अब्राहम लिंकनचा उल्लेख आवर्जून होतो.
'लोकसत्ते'त पहिल्या पानावर प्रसिद्ध झालेल्या बातमीची फारशी कुणी घेतली नाही, असे मला आजही वाटते आहे. मात्र बातमीदार चंद्रशेखर कुलकर्णी यांनी त्या बातमीत अनेक जिज्ञासू अभ्यासकांचा संदर्भ दिला आहे. यात त्यांनी ते पत्र लिंकनचे नव्हेच, हे ठामपणे सांगितले आहे. 'प्रिय गुरुजी, सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात. नसतात सगळीच सत्यनिष्ठ. हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र त्याला हेदेखील शिकवा-जगात प्रत्येक बदमाषागणिक असतो एक साधुचरित पुरुषोत्तमही...' अशी सुरुवात असलेले हे पत्र अमेरिकेचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी त्यांच्या मुलाच्या हेडमास्तरांस उद्देशून कधी लिहिलेच नव्हते तर मग ते पत्र नेमके कुणाचे? आणि ते पत्र शाळांमध्ये लिंकनच्या नावावर का खपवायचे? असा प्रश्न मला आजही सतावतो आहे. त्या पत्रातील गर्भितार्थ कितीही समुचित आणि प्रभावी असला तरी ते पत्र असे कुणाच्याही नावावर खपविण्यात अर्थ नाही. हे पत्र भारतात विशेषतः महाराष्ट्रात फारच प्रसिद्ध आहे. त्याचा नेमकेपणाने छडा लागण्याची आवश्यकता आहे.
मध्यंतरी मी लोकसत्तेत फोन लावला होता आणि चंद्रशेखर कुलकर्णी यांच्याबाबत विचारपूस केली होती. ते 'मटा' त गेल्याचे सांगण्यात आले. पण त्यांच्या आजपावेतो संपर्क झाला नाही. मला त्यांच्याकडून बातमीवर आलेल्या प्रतिक्रियांबाबत विचारायचे होते. ते राहून गेले. पण माझ्या मते त्यांनी दिलेल्या संदर्भीय पुराव्यावरून राज्य शासनाने तरी किमान याबाबत 'ऍक्शन' घ्यायला हवी होती आणि शाळांमधील ही पत्रे उतरवायला सांगायला हवी होती. पण तसे काहीच झाले नाही. हे मला थोडे दुर्दैवी वाटते. हे पत्र असंख्य प्रतींद्वारे प्रसार आणि प्रचाराद्वारे अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवादीत झाले आहे. आणि हे पत्र लिंकन यांनीच लिहिल्याची लाखो भारतीयांची धारणा झालेली आहे. चंद्रशेखर कुलकर्णी यांनी मात्र हे पत्र कित्येक वर्षांनी या धारणेला सत्याचा आणि ऐतिहासिक साधनांचा आधार नसल्याचे स्पष्टपणे म्हटले होते. हे पत्र नेमके कोणी लिहिले आहे, हे जरी स्पष्ट झाले नसले तरी ते लिंकनचे खचितच नाही, याबाबत आता तिळमात्र संदेह उरलेला नाही. पत्राच्या प्रसाराप्रमाणेच हे मूळ इंग्रजी पत्र कोठे आहे, या कुतुहलापोटी केल्या गेलेल्या प्रयत्नांची कहाणीही विलक्षण असल्याचे त्यांनी आपल्या बातमीत म्हटले होते.
लोकव्यवहाराचे ज्ञान देतानाच मानवी जीवनातील शाश्वत मूल्ये आपल्या मुलाच्या मनावर बिंबवण्याची, त्याची दीक्षा त्याला देण्याची विनंती करणारे 'ते' पत्र भारतात अजरामर झाले आहे. अनेक पाठ्यपुस्तकांमध्ये त्याचा समावेशही झाला आहे. हजारोंना ते मुखोदगत आहे. शाळा-कॉलेजांच्या भिंतीवर रेखाटलेले आहे. ते पत्र प्रसिद्ध कवी वसंत बापट यांनी मराठीत अनुवादीत करून आणले आहे. बातमीदारानेही या पत्राच्या मुळाशी जाताना प्रत्यक्ष वसंत बापट यांच्याशी साधलेला संवाद बातमीत जशाच्या तसा दिला आहे. बापट यांनी सांगितले आहे की, मी काही रॉयल्टीसाठी हा अनुवाद केलेला नाही. मूळ इंग्रजीवरूनच अनुवाद केला आहे. मात्र ते इंग्रजी पत्र कोठे प्रकाशित झाले होते, याची त्यांना माहिती नव्हती. त्यांनी ते एकनाथजी रानडे यांनी काढलेल्या कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद केंद्राच्या एका स्मरणिकेत प्रसिद्ध झालेल्या इंग्रजी पत्राचा अनुवाद केला होता.
यापुढील माहितीसाठी श्री. कुलकर्णी यांनी कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राचे तत्कालिन प्रमुख वासुदेव घारपुरे तथा जी वासुदेव यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र त्यांना त्याची कल्पना नव्हती. त्यांनी आठवड्याभरात सर्व स्मरणिका चाळून नेमकेपणाने सांगेन, असे म्हटले होते (मात्र बातमीदाराने त्याची प्रतीक्षा केली नाही) मात्र जी. वासुदेव यांनी हे पत्र इंग्रजीत दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये पाहावयास मिळते, असे म्हटले होते. विशेष म्हणजे काही जिज्ञासू अभ्यासकांनी लिंकन यांचे सर्व साहित्यिक लेखन चाळून पाहिले, पण त्यात त्यांना ते पत्र अजिबात आढलून आले नाही.
श्री. कुलकर्णी यांनी आपल्या बातमीत मेधा तासकर यांनी थेट अमेरिकेतल्या राजधानीतल्या 'लायब्ररी ऑफ कॉंग्रेस'शी ई-मेलने संपर्क साधल्याचा उल्लेख केला आहे, यातील धक्कादायक बाब त्यांनी उघड केली आहे. ते पत्र अमेरिकेतही प्रसिद्ध असणार, सर्वज्ञात असणार अशी श्रीमती तासकर यांची धारणा होती. पण त्यांना 'कुठले पत्र?' अशीच उलटपक्षी पृच्छा करण्यात आली. कारण असे कोणतेही पत्र या संस्थेला लिंकन यांच्या प्रकाशित साहित्यात आढळून आले नाही.
त्यामुळे 'त्या' पत्राबाबतची अभ्यासकांची जिज्ञासा आणखी वाढली. श्रीमती तासकर यांनी तर एवढ्या उत्तरावर समाधान मानता त्याचा पाठपुरावा लायब्ररी ऑफ कॉंग्रेस'कडे चालू ठेवला. शिवाय आपल्याकडील भित्तीपत्राची छायाप्रतही त्यांना पाठवून दिली. कालांतराने तिथल्या ब्रॅडली गर्नाड या ज्येष्ठ पुराभिलेखकाने श्रीमती तासकर यांना पत्र पाथवले. त्यात ते म्हणतात, 'लिंकन यांना एडी, रॉबर्ट,टॅड आणि विल्यम अशी चार मुले होती. त्यापैकी तिघांच्या शालेय जीवनाच्या संदर्भात लिंकन यांनी लिहिलेली अनेक पत्रे उपलब्ध आहेत. परंतु, आपणास हवे असलेले 'ते' पत्र नेमके कुणाला उद्देशून लिहिलेले आहे., हे कळले तर पुढील शोध घेणे सोपे होईल.' शिवाय या पत्राशी साधर्म्य सांगणारे पत्रदेखील उपलब्ध नाही. या उत्तरानंतरही पाठपुरावा सुरूच राहिला आणि अखेरीस लिंकन यांनी असे कोणतेही पत्र कधी लिहिलेच नव्हते, असे सत्य अमेरिकेतूनच उजेडात आले, असे श्री. कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
लायब्ररी ऑफ काँग्रेसमधील अब्राहम लिंकन व त्यांचे साहित्य या संदर्भातले विशेषज्ज्ञ असलेल्या डॉ> जॉन सेलर्स यांच्या मतानुसार ते पत्र कालविपर्यस्त आहे. शिवाय त्यातील सूर लिंकन यांच्या लिखाणाशी जुळणारा नाही. त्यामुळे गफलतीने अथवा लबाडीने लिंकन यांच्या नावे हे पत्र खपविण्यात आले आहे, असा त्यांचा दावा आहे.
या सगळ्याचा विचार करता व या बातमीनंतर कुणाची प्रतिक्रिया न आल्याने या ठामपणाला कुणाचाच अक्षेप नाही, असा त्याचा अर्थ होतो. आणि अक्षेप नसेल तर ते मान्य करून त्या पत्राला जी प्रतिष्ठा दिली गेली आहे, अथवा त्याला लिंकनच्या नावाशी जोडले गेले आहे, त्याचा खुलासा होण्याची आवश्यकता आहे. कोणीही, काहीही कुणाच्याही नावावर टाकत, खपवत असेल तर ते खपवून घेता कामा नये, जिज्ञासू अभ्यासकांमुळे असे प्रश्न बाहेर येतात, त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. पण त्यांच्या संशोधनाला राजमान्यता, समाजमान्यताही मिळण्याची गरज आहे. राज्य शासन आनि केंद्र शासनाने या पत्राच्या आणखी मुळाशी जाऊन त्यातील वास्तवता जगापुढे आणली गेली पाहिजे, असे मला वाटते. म्हणून हा पत्रप्रपंच!
ha changli mahiti ..khup prassidha ahe he patra
ReplyDelete