Friday, September 28, 2012

'बंद'ची व्याख्या बदलतेय! भाग 2

     बंदच्या यशापयशाच्या दाव्या-प्रतिदाव्यात काँग्रेस व विरोधक दंग असले तरी यातल्या जनसहभागाचा, न सहभागाचा फारसा विचार केला जाणार नाही. त्याचे आकलन केले जाणार नाही. पण रिटेल व्यापारात परदेशी गुंतवणूक झाल्यास भारतातल्या व्यापारावर त्याचा विपरीत परिणाम होईल, या भीतीने व्यापारी संघटनांनी मात्र बंदला साथ दिल्याचे दिसते. त्यामुळे दुकाने बंद राहिली. वास्तविक राजकीय दिशेमुळे बंद किंवा हरताळ निश्चित होत नाहीत. ते दुसर्‍याच पातळीवर ठरतात. बंद यशस्वी होण्याला कारणेही स्थानिक पातळीवरची असतात.

     सध्या केंद्रीय पातळीवर राजकीय चित्र कमालीचे अनिश्चित आहे. काय घडेल याची कुणीच खात्री देऊ शकत नाही. डिझेल, गॅस व एफडीआय लागू करण्याच्या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारला समर्थन देणार्‍या ममता बॅनर्जीनी पाठिंबा काढून घेतला आहे, पण ममतांच्या बाहेर पडण्याने काँग्रेस आघाडीचे काही बिघडणार नाही हे स्पष्ट आहे. मात्र खरी मदार मुलायमसिंग यादवांच्या 'सपा' आणि मायावतींच्या 'बसपा'वर अवलंबून आहे. तूर्तास सपाचा केंद्राला बाहेरून पाठिंबा आहे, तर मायावतीही आपले पत्ते 10 ऑक्टोबर रोजी खोलणार आहेत. मुलायमसिंग यादव कमालीचे चतूर आहेत. लालकृष्ण अडवाणी यांनी या पुढचा पंतप्रधान आघाडीचा असणार आहे, असे म्हटल्यापासून मुलायमसिंग यांची इच्छा उफाळून आली आहे. सर्वाधिक संख्येने खासदार असलेल्या उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या वाटय़ाला 40 जागा आल्यास आघाडीच्या कडबोळ्य़ात पंतप्रधानपदाची माळ त्यांच्या गळ्य़ात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते अगदी सावधपणे कुणालाही न दुखवता राजकीय गणित मांडण्याच्या कामाला लागले आहेत. त्यामुळेच त्यांचा 'वेट अँण्ड वॉच'चा पवित्रा आहे. आज जरी ते काँग्रेससोबत असले तरी निवडणुकीत किंवा निवडणुकीत त्यांच्यासोबत राहतील असे नाही. मात्र त्यांनी काँग्रेस विरोधकांनाही दुखवायचे नाही, असे ठरवले आहे. काँग्रेसचा लाभ तर घ्यायचा आणि उत्तर प्रदेशात जास्तीत जास्त जागा आणायच्या यावर मात्र त्यांचा भरवसा असल्याने आपले मन साशंकता निर्माण करणारेच ठेवायचे असा त्यांचा पवित्रा आहे. सध्या ते तिच भूमिका पार पाडत आहेत.

     महागाई, भ्रष्टाचार यामुळे जनता काँग्रेसविरोधात असली तरी त्याचा उचित लाभ भाजपाला घेता येईना. तिकडे तिसर्‍या आघाडीची मोट बांधण्याचे धाटत असले तरी तिथे मुलायमसिंह यादवांचीच प्रतीक्षा अधिक आहे. पण ते तर 'वेट अँण्ड वॉच'च्या भूमिकेत आहेत. त्यामुळे तिसर्‍या आघाडीची घडी बसते का? की विस्कटते याचा अंदाज बांधणे सध्यातरी शक्य नाही. भाजपा उसळी मारण्याच्या प्रयत्नात आहे. पण त्यात ताकदच उरली नाही. त्यांच्यातल्या अंतर्गत वादामुळे ताकद क्षीण झाली आहे. भाजपाचा पंतप्रधानी चेहरा 'मोदीं'ना दाखवण्यावरून तिथे घमासान आहेच, पण एनडीएच्या घटक पक्षांनाही मोदींचा पंतप्रधानी चेहरा नको आहे. सध्या भाजपाच विस्कटलेली असल्याने त्यांना आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेता येईनासा झाला आहे. म्हणजे काँग्रेस आघाडी सरकारला जनता विटली असली तरी त्यांची जागा घ्यायला सक्षम पक्ष-आघाडी कोणीच नाही. अशा अवस्थेत मध्यावधी निवडणुका कोणाला हव्या आहेत. कारण भाजपाही पूर्ण क्षमतेने निवडणुकीला तयार नाही. या सगळ्य़ाचा अंदाज घेऊनच कदाचित काँग्रेस आघाडीने आर्थिक विकास धोरणांचे पत्ते फेकले असावेत, अन्यथा चारी बाजूंनी घेरलेल्या या पक्षात एवढी ताठरता, खंबीरपणा कसा आला, हे न उमजणारे कोडे आहे. बंद, हरताळपासून सामान्यजन लांब होत चालला आहे. यात त्यांचेच नुकसान आहे. त्याला महागाई, भ्रष्टाचार याची प्रचंड चीड आहे. पण ती व्यक्त करण्यासाठी वेळ नाही किंवा हवा तसा प्लॅटफॉर्म नाही. त्यामुळे भाजपाला बंद वगैरेच्या मागे न लागता सामान्यजनांना आपलेसे करताना त्यांना त्रास होणार नाही, त्यांची गाडी सुटणार नाही, असे काही हिताचे निर्णय घ्यावे लागतील.

No comments:

Post a Comment