Sunday, September 2, 2012

बालकथा विशाल बदलला

     विशाल सातवी इयत्तेत शिकत होता. तो अभ्यासात हुशार होता. पण त्याला एक खोड होती. तो शिक्षकांना नावे ठेवत असे. आणि वर्गातले त्याचे मित्र मिळून त्यांची टिंगल करायचे. त्याने शाळेतल्या प्रत्येक शिक्षकाला एकेक नाव ठेवले होते. तास चालू असला की, मधे मधे त्या नावावरून चिडवत. टिंगलटवाळी करत. छायाबाईंणी त्याची ती खोड ओळखली होती. पण त्याला अशाप्रकारे रागवण्यापेक्षा संधी पाहून समजवण्याचा निर्णय घेतला होता.
     विशालची शाळा सातवीपर्यंतच होती. काही दिवसांवर शिक्षक दिन येऊन ठेपला होता. शाळेत शिक्षक दिनाची जय्यय तयारी चालली होती. सातवीचा वर्ग त्यादिवशी शाळा सांभाळणार होता. विद्यार्थी शिक्षक बनून खालच्या वर्गांना शिकवणार होते. विशालही त्या दिवशी गणित विषय शिकवणार होता. गणित त्याच्या आवडीचा होता.
     शिक्षक दिन उजाडला. तो सहावीच्या वर्गात गेला. त्याला पाहताच वर्गातली मुले मोठमोठ्याने हसायला लागली. विशाल अवघडून गेला. पण तरीही स्वतः ला सावरत फळ्यावर पाठाचे नाव लिहिण्यासाठी वळला. तो पाठमोरी होताच कोपर्‍यातून आवाज आला," ये ठेंगणा गुरुजी!" त्यावर सगळी मुले जोरजोराने हसू लागली. मुलांचे शब्द ऐकून तो नाराज झाला. तशी त्याची उंची कमी होती. पण आजपर्यंत त्याला ठेंगणा म्हणून पुकारले नव्हते. त्याचा मूड गेला, पण नियमानुसार त्याला पाठ घेणे भाग होते.
     घंटा झाल्यावर तो पाचवीच्या वर्गात गेला. तिथेही त्याचे तशाच प्रकारे स्वागत झाले. आता मात्र तो पार हिरमसून गेला. त्याच्या डोळ्यांत पाणी आले. तो चटकन वर्गाबाहेर आला. छायाबाई बाहेरच थांबल्या होत्या. त्यांनी विचारलं," विशाल काय झालं? कुणी काही म्हटलं का?''
     छायाबाईंना पाहिल्यावर त्याच्या दु:खाचा बांध फुटला. तो हमसून हमसून रडू लागला. तो म्हणाला," बाई, व्यक्तिमत्वापुढे गुणाला काहीच किंमत नसते का? माझी उंची कमी आहे, मला मान्य आहे. पण यात माझा काय दोष? मुलं मला ठेंगणा, बुटका म्हणून चिढवताहेत. ते मला अजिबात आवडलेलं नाही." तो हातांनी डोळे झाकून रडतच राहिला.
     छायाबाईंनी त्याला जवळ घेतलं. त्याच्या पाठीवरून हात फिरवला. आणि हात धरून त्याला स्टाफरूममध्ये नेले. त्याला खुर्चीवर बसवून डोळे पुसले. आणि म्हणाल्या," मुलांनी तुला दु:ख देण्याच्या किंवा तुझ्या व्यंगावर हसायचे म्हणून हसले नाहीत. तुला तुझ्या कर्माची जाणीव व्हावी, म्हणून ते म्हणाले. तू नाही का शिक्षकांना नावे ठेवतोस. सगळे मित्र मिळून त्यांना चिडवता. येव्हा त्यांच्या मनाला काय वाटले असेल, याचा कधी विचार केलास का? आता तुला मात्र बोलल्यावर वाईट वाटले. डोळ्यांत पाणी आले. तसे शिक्षकांच्या मनालाही ठेस पोहचत नाही का?"
     छायाबाईंचे बोलणे ऐकून विशाल चकीत झाला. आणि पश्चातापही वाटू लागला. तो म्हणाला," आता मला कळलंदुसर्‍याला नावं ठेवल्यावर काय होतं ते!" आता यापुढे कधीही कुणाच्या दोषावर, व्यंगावर बोलणार नाही. माझी चूक झाली. मला माफ करा."
     छायाबाईंनी प्रेमाने त्याचा गालगुच्छा घेतला. आणि वर्गात पाठवून दिले.              

No comments:

Post a Comment