Wednesday, September 19, 2012

प्रचंड ऊर्जेचं गावः रावळगुंडवाडी

     दुष्काळी जत तालुक्यातलं रावळगुंडवाडी गाव सध्या राज्यात झळकतं आहे. याच वर्षी मे महिन्यात गावाला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात राज्यात पहिला क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. याअगोदर गावाने स्वच्छता अभियान, यशवंत पंचायत, तंटामुक्त अभियान, आमच्या गावात आम्ही सरकार, निर्मल ग्राम अशा अनेक योजनांची तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्य स्तरावरची बक्षीसं पटकावली आहेत. गाव नवनव्या योजना राबवायला अजिबात थकत नाही की दमत नाही. गेली सात- आठ वर्षे हे गाव 'सिस्टिमेटिकली' चाललं आहे. इथे कुणाच्यात थकवा दिसत नाही. दमणं जाणवत नाही. गाव अविरत राबतंय. प्रचंड ऊर्जा असलेलं गाव प्रगतीची एक एक शिखरे पादाक्रांत करत आहे. प्रचंड क्रयशक्ती, बक्षीसं यामुळे गावात विकासाची गंगा वाहते आहे. 'स्वावलंबनाचा पाठ' देणारे हे गाव खर्‍या अर्थानं महात्मा गांधीजींच्या स्वप्नातला गाव ठरला आहे. सध्या ऐन पावसाळ्यात जत तालुका दुष्काळाने होरपळत आहे. गावे तहानली आहेत. शेती उद्वस्त झाली आहे, असे असताना रावळगुंडवाडी मात्र दुष्काळातले 'ओआसिस' ठरले आहे. शिवकालीन पाणी साठवण योजनेमुळं गाव हिरवाईने नटले आहे. लोकांच्या ऊशाला पाणी आहे.
     आठ वर्षातला गावाचा कायापालट चकीत करणारा, थक्क करणारा आहे. गाव तसं शांततेचं भोक्तं आहे. गावातला भांडणतंटा आजपावेतो कधी पोलिस ठाण्यापर्यंत पोहचला नाही. गावातला तंटा गावातच सोडवला जायचा आणि आजही सोडवला जातोय. इतकंच नव्हे तर ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून म्हणजे १९६६ पासून गावात कधी निवडणुका झाल्या नाहीत. एकोप्याने गावाचा राज्यकारभार चालला. गावातल्या ग्रामदैवत श्री. महादेवाचे कृपेनं आजही कसं सारं गुण्यागोविंदानं आणि आनंदानं चाललं आहे. म्हणून तर इथली सोसायटी असो किंवा शिक्षण संस्था श्री. महादेवाच्या नावानंच चालल्या आहेत.  असं हे गाव २००४- ०५ पूर्वी मात्र इतर गावांप्रमाणे दुष्काळाला, पाणी टंचाईला तोंड देत होतं. सांगली जिल्ह्यातल्या पूर्वेकडेच्या टोकाला असलेल्या जत तालुक्यावर सदा निसर्गाची अवकृपा राहिली नाही. दुष्काळी पाचवीला पुजलेला. त्यात राजकारण्यांनीही तालुक्यातल्या जनतेला आश्वासनाच्या हिंदोळ्यावर झुलवत ठेवलं. कृष्णेच्या पाण्याची आस लागून राहिलेल्या लोकांना केवळ पाण्याचा मृगजळच दाखवला. त्यामुळे इतर गावांप्रमाणे ऐन उन्हाळ्यात गावाला पाण्याचा टँकर लावलेला असायचा. नेमकी हीच नस पकडून नवख्या ग्रामसेवक कामेश्वर ऐवळे यांनी २००४-०५ मध्ये गावातल्या सरकारी इमारतींवर शिवकालीन पाणी साठवण योजना राबवली. ८० हजाराचा हा प्रकल्प गावातल्या शाळा, ग्रामपंचायत, मंदिर यांच्या इमारतींवर पडणारे पावसाचे पाणी अडवून गावाला पाणी पुरवठा करणार्‍या विहिर आणि हातपंपांच्या पायथ्याशी सोडून दिले. याचा परिणाम असा झाला की, गावाला २००५-०६ मध्ये पाण्याचा टँकरच लावावा लागला नाही. तेव्हापासून २००९-१० पर्यंत गावाला पाणी कधीच कमी पडले नाही. केवळ चार सरकारी इमारतींवरील पडणार्‍या पावसाच्या पाण्याची अडवणूक करून ही किमया साध्य झाली होती. पण या जोरावर दरम्यानच्या काळात गावाने विकासाची घोडदौड सुरू केली. अनेक योजना गावात साकारल्या. बक्षिसांची खैरात झाली.
     २००६-०७ मध्ये निर्मल ग्राम यशस्वी करून दाखवून २ लाखाचे बक्षीस मिळवले. याच काळात जलस्वराज्य योजनेत गावात पाण्याची टाकी आणि जलवाहिनीचे काम पूर्ण झाले. २००८-०९ मध्ये 'आमच्या गावात आम्हीच सरकार' ही योजना आली. यातून गावाने १० लाखाचे बक्षीस पटकावले. यातून ग्रामपंचायत सक्षमीकरणाच्या हेतूने ट्रॅक्टर खरेदी केला. १७ ठिकाणी सौरऊर्जेची पथदिवे उभारली गेली. महादेव मंदिरात २४ तास वीज उपलब्ध करून देण्यात आली. यातून सण्-उत्सवाला बहार आला तर गावातल्या शाळकरी मुलांना रात्रीच्या अभ्यासिकेची मोठी सोय झाली.
     विविध विकास योजनांमध्ये हिरीरीने सहभाग घेतानाच बक्षीस पटकवायचेच, ही जिद्द, ईर्षा ऊरात ठेवली. माणसे अविरत काम करत राहिली. भांडण तंट्यांपासून अलिप्त असलेल्या गावाला २००८-०९ मध्ये तंटामुक्त अभियानातून २ लाखाचे बक्षीस मिळाले. यातून गावातले रस्ते, गटारी व अन्य सोयी करत गावाचा कायाकल्प चालला असताना गाव हिरवाईचा शालू नेसून नटलेल्या नवरीसमान दिसू लागले. गावाचा विस्तार, लोकसंख्या वाढ म्हणा किंवा गावाला 'ग्रीन टच' देण्याच्या प्रयत्नात गावाला पाणी कमी पडू लागले. मधल्या काळात आर्थिक, सामाजिक सुबत्तेकडे वाटचाल सुरूच होती. त्यामुळे पाण्याच्या वाढत्या गरजेकडे दुर्लक्षच झाले. पण २००९-१० मध्ये गावाला भीषण पाणी टंचाईची झळ बसली तेव्हा गावाचे त्याकडे लक्ष गेले. पुन्हा सगळे पाण्यासाठी काही करण्याचा बेत करू लागले. तेव्हा २००४-०५ मध्ये राबवण्यात आलेला शिवकालीन पाणी साठवण प्रकल्प संपूर्ण गावासाठी राबवण्याची योजना आखली गेली. आणि गावातल्या प्रत्येक घरावर पडणारे पावसाचे पाणी अडवण्याचा प्रकल्प २०१०-११ ला प्रत्यक्षात साकार झाला. सगळ्या घरांवर पाणी अडवून ते पाईपलाईनद्वारा गावातल्या विहिर, कुपनलिकेच्या जवळ भूगर्भात सोडण्यात आले. कुपनलिकेजवळ दहा बाय दहा फुटाचे खड्डे काढून त्यात शोषपद्धतीने पाणी सोडणे आणि शुद्ध पाणी उचलणे असा प्रकल्प राबवला गेला. यासाठी १३ लाखाचा निधी खर्ची पडला. सरकार द्यायला दमत नाही आणि गावही घ्यायला कचरत नाही, असे चित्र राज्यात केवळ रावळगुंडवाडीत पाहायला मिळते. आता त्यामुळे गावाला पाणी कमी पडत नाही. विहिरी आणि कुपनलिकांना पाणी वरच्या पातळीवरच मिळते आहे. तालुक्यात पाण्याचा दुष्काळ आहे. १२० पैकी ९० टक्के गावे टँकरच्या पाण्यावर जगताहेत. तर काही गावातल्या लोकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. पण रावळगुंडवाडी मात्र या कटकटीतून मुक्त आहे. केवळ पावसाचे पाणी अडवल्याने आणि ते मुरवल्याने ही किमया घडली आहे.  गावाची लोकसंख्या २ हजार ३१० आहे. गावासह वाड्यावस्त्यांवर नऊ कुपनलिका आहेत. एक विहिर आणि एक आड आहे. या सगळ्यांजवळ पावसाचे पाणी सोडण्यात आले आहे.
     गाव शंभर टक्के शौचालये आहेत. रस्ते चकचकीत आहेत. सध्या गाव 'इको- व्हिलेज' मध्ये आहे. गाव आणि गावाभोवतीचा परिसर हिरवाईने नटला आहे. सांडपाण्याच्या निचर्‍यातून बागा फुलवण्यात आल्या आहेत.  गावातील रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड, सांडपाण्यावर परसबागकचऱ्यापासून खत निर्मिती आणि गावांत सतरा ठिकाणी सौरउर्जा दिवे उभारण्यात आलेत. ग्रामविकासाच्या या कामांमुळे या गावाला अनेक बक्षिसांची अक्षरशः लयलूट केली आहे.  दारूबंदी आणि व्यसनमुक्त असलेल्या या गावानं आठ उताऱ्यात पती -पत्नीची संयुक्त नोंद केलीय.
     जलसंधारणाच्या कामांमुळे रावळगुंडवाडी गावातील शेतीही संमृद्ध आहे. १८७३ हेक्टर क्षेत्रफळ असणाऱ्या या गावात शाश्वत पाण्याची सोय झाल्यानं ९३ हेक्टरवर फळबागा उभ्या आहेत. शेततळ्यामुळे शेती पिकली आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तरही उंचावलाय. या गावात १९ बचत गट आहेत. बचत गटांमुळे विकासाच्या कामाला जास्त गती मिळालीय.
     दुष्काळातल्या वाळवंटातला हा ओआसिस आता पर्यटकांच्या आकर्षणाचाही केंद्रबिंदू ठरला आहे. यशवंत पंचायत आणि ग्रामस्वच्छता अभियानात विभागीय स्तरावर प्रथम क्रमांकाची धडक मारून आलेल्या या गावाने याच वर्षी स्वच्छता अभियानात राज्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. गावाच्या प्रचंड ऊर्जेची आणि सातत्यपणाची ही पावतीच म्हणावी लागेल. खरे तर अनेक गावे बक्षीसं घेऊन फुल मुरझावे तसे मुरझून गेली पण या गावाने प्रत्येक बक्षीसामागे नवी ऊर्जा धारण केली. आणि नव्या कामाला लागत गेले. गावाला मिळालेलं यश इथल्या लोकांच्या प्रचंड ऊर्जेत आहे, असे खात्रीने म्हणावे लागेल.                                                                                                            - मच्छिंद्र ऐनापुरे, जत 

No comments:

Post a Comment