Sunday, September 9, 2012

बालकथा पेरूचे झाड

     सोनूच्या अंगणात पेरूचं झाड होतं. बारमाही पेरू. पहिल्यांदा पांढरी पांढरी फुलं उमलायची. काही दिवसांनी मोठ- मोठी फळं दिसायची. गोड गोड, कच्चे-पक्के पेरू. पाहिल्यावर सोनूला कोण तो आनंद व्हायचा.
     सोनूचे अंगण गजबजलेले असायचे. किती तरी प्रकारचे पक्षी अंगणात यायचे. खेळायचे, बागडायचे. झाडावर मस्ती करायचे. अशात बुलबुल पक्षाने झाडाच्या शेंड्यावर घरटे बांधलेले. पेरूच्या सुगंधी दरवळीने कुठले कुठलेसे पोपट यायचे. पिकल्या पेरूचा शोध घ्यायचे. ताव मारायचे. कोकिळाचा 'कुहू... कुहू' नाद त्याला भारी वाटायचा. पक्ष्यांचा खेळ तो तास न तास बसून पाहात राहायचा. दंग हो ऊन जायचा. मग सोनूचं मनही मोरासारखं नाचू लागायचं.
     चिमण्या अंगणात खाली उतरल्या की सोनू त्यांना पकडायला धावायचा. त्यांच्याशी दोस्ती करायला उतावीळ व्हायचा. पण बहाद्दर चिमण्या त्याला चकमा द्यायच्या. त्याच्याशी लपंडाव खेळायच्या. पण सोनूला त्यात गंमत वाटायची. तो आनंदाने उड्या मारायचा. चिमण्या त्याच्याशी खेळायच्या. त्याला दमवायच्या आणि भुर्रकन उडून जायच्या.
     पेरूच्या झाडावर एक चिमुकली खारुताईही यायची. इवल्या इवल्या कांचेची, झुपकेदार शेपटीची मात्र मोठी धटिंगण होती. ती चक्क सोनूच्या अंगाखांद्यावर खेळायची. श्रीरामाचा आशीर्वाद लाभलेल्या या धटिंगण खारुताईच्या अंगावरून सोनूसुद्धा सावकाशीने हात फिरवायचा. तिचे मऊमऊ केस त्याला ऊशीसारखे भासायचे. तिला तो खाऊ-पिऊ घालायचा. तीही त्याच्या डोक्यावर चढून त्याचा माथा कुरवळायची. जणू म्हणायची, 'थँक यू'.
     शाळेत तो मित्रांशी आपल्या या सवंगड्याविषयी बोलायाचा. त्यांच्या नवनव्या कहाण्या सांगायचा. पण तो अंगणातल्या पेरूला धन्यवाद द्यायला विसरायचा नाही. त्याच्यामुळेच तर त्याला सवंगडी मिळाले होते. तो दररोज पेरूच्या झाडाला धन्यवाद द्यायचा. 'धन्यवाद पेरूवृक्षा, धन्यवाद!'  

No comments:

Post a Comment