Tuesday, September 18, 2012

एका वर्षाने मला पुष्कळ दिले...

      माझ्या 'ब्लॉग'ला आज एक वर्ष पूर्ण झाले. दिवस कसे गेले कळले नाही. एवढ्या कालावधीत लेखनही भरपूर झाले. तीनशेच्यावर लेख 'ब्लॉग' पडले. हे सगळे पाहिल्यावर माझे मलाच आश्चर्य वाटते आहे. एवढे असूनही खास 'ब्लॉग'साठी म्हणून मुक्त स्वच्छंदी लिहिता आले नाही. किंवा नंतर ते टाळण्याचाच मी प्रयत्न केला. कारण माझ्या 'ब्लॉग'वर जे काही विविध विषयांवर लेखन आहे, ते मी खास वृत्तपत्रांसाठी केलेले आहे. आणि त्या कोषातून मी बाहेर पडू शकलो नाही. मलाही हलकं-फुलकं, दैनंदिन व्यवहारातलं लिहावं, एखाद्या विषयावर चर्चा करावी असं वाटत होतं. पण वृत्तपत्रीय लिखाणात गुंगून गेल्यानं ते राहूनच गेलं. त्यामुळेच 'ब्लॉग' वर प्रसिद्ध झालेले लेखन वृत्तपत्रीय टाईपचे झाले आहे. आणि ते साहजिकच आहे. गेल्या २० वर्षांपासून वृत्तपत्रांशी संबंधीत असल्याने त्यांच्यासाठीच लिखाण होत गेले. 'ब्लॉग' वर प्रसिद्ध झालेले लेख किंवा बालकथा, कथा किंवा विनोदी चुटके कुठल्या ना कुठल्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले आहेत.
      मुळात माझ्या 'ब्लॉग'चा जन्मही त्याचदृष्टीकोनातून झाला. लिहिलेले लिखाण कुठे तरी शाबूत राहावे, या हेतूने ते 'ब्लॉग' वर टाकले गेले. मात्र हे होत असताना वाचकांनी कुठली तक्रार न करता ते वाचले आणि आनंदाने प्रतिक्रियाही दिल्या. कदाचित वाचकांचा माझा वृत्तपत्रीय 'टोन' लक्षात आला असावा. पण त्यांचा प्रतिसाद हुरुप देणारा ठरला. एका वर्षात वाचकांनी कल्पनेपलिकडे प्रतिसाद दिला. विविध वृत्तपत्रांनी आम्ही हा लेख आमच्या दैनिकात घेतोय किंवा मासिकात घेतोय, असे सांगून घेतला. वापरला. मी लिहिलेले लेखन वाचकांसाठी असल्याने तो अधिकाधिक वाचकांपर्यंत जावा, या हेतूने विचारणार्‍यांना सहज होकार देत आलो.
      माझ्या 'ब्लॉग'मुळे माझ्यापासून दूर असलेले माझे मित्र, विद्यार्थी, हितचिंतक भेटत पुन्हा यानिमिताने जवळ आले. आम्ही एकमेकांच्या लांब असलो तरी विविध विषयांवर चर्चा होत आली. त्यामुळे मला लिखाणाला स्फुरण चढले पण ते शेवटी वृत्तपत्राच्या ढंगानेच गेले. शेवटी माझाही नाईलाज होता. कारण मला वृत्तपत्रांसाठीच लिहायचे होते. आता मात्र वळून पाहताना 'ब्लॉग' म्हणून काही लेखन व्हावे, असे मनोमनी वाटत आहे. आणि तसा प्रयत्न यापुढील काळासाठी करणार आहे.
      माझ्या 'ब्लॉग' वर फार दिवस (म्हणजे तीन -चार दिवस) काही नवे दिसले नाही की, औरंगाबादच्या मनीषा चौधरी- वाघ यांच्याकडून हमखास विचारणा होते. त्याचप्रमाणे अनिल निकम (इस्लामपूर), जी. एम. ऐवळे (दरिबडची) ही मंडळीही सतत लिहिण्याविषयी हमखास दरडावयाची. आता तुझ्या 'ब्लॉग' ची सवय लागलीय, म्हणायचे. तर असो. या माझ्या मित्रांना धन्यवाद देण्यापेक्षा त्यांच्या ऋणातच राहायला आवडेल. वृत्तपत्रीय लिखाण असताना त्या माध्यमातून तर प्रतिसाद मिळतच असतो. पण या माध्यमातून मिळणारा प्रतिसादही माझ्यासाठी फारच आश्चर्यकारक आहे. कारण इतका मोठा प्रतिसाद मिळेल, असे वाटले नव्हते. यातून आणखी एक जाणवते, ते म्हणजे संगणकाचा, मोबाईल नेटचा वापर अगदी खेड्यापाड्यात मोठ्या प्रमाणात वाढला आहे, हेच खरे! आणि माणसाने संगणक साक्षर व्हायलाच हवे. मीही एका खेड्यातला , दुष्काळी भागातला! जिथे औद्योगिकता नाही, रोजगार नाही. 'आयटी'सारख्या प्रशिक्षण संस्था  नाहीत. पण संगणकाने आपल्याला जवळ केले. हा खेड्यातला, शहरातला, देशातला किंवा परदेशातला असा कुठलाही निर्बंध राहिला नाही. जग 'एका हाकेच्या' अंतरावर असल्यासारखे भासते. कुठलीच सीमा आता राहिलेली नाही. घरबसल्या जग पाहता येतं, अनुभवता येतंयातून मला शिकागोतून मित्र मिळाला, तसाच अचकनहळ्ळीसारख्या खेड्यातून मिळाला, हे काय कमी आहे?

No comments:

Post a Comment