गेल्या आठवड्यात पुण्यातल्या मुंढवा येथे झालेल्या 'चिल्लर पार्टीत' अल्पवयीन मुलं मद्यपान करून झिंगताना सापडली. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली. मुलांचा हा प्रताप पाहून पालकही बिथरली. आता हीच पालक मंडळी मुलांच्या तक्रारी सांगताना दिसत आहेत. वास्तविक पालक काय करतात, त्याचेच अनुकरण मुले करीत असतात. मुलांच्या डोळ्यादेखात सिगरेट, मद्यपान करत असतील तर मुलांना त्याचे कुतुहल राहणारच! त्यामुळे पहिल्यांदा पालकांनीच सुधारले पाहिजे. स्वतः वर काही बंधने घालून घ्यायला हवीत. मुलांकडे लक्ष देण्यासाठी वेळ काढायला हवा. त्यांच्याशी संवाद साधायला हवा. तरच मुले त्यांच्या आवाक्यात राहणार आहेत.
हल्लीचे पालक 'मधुर' म्हणजे, मद्यात व धुरात रमलेले आहेत. मुलांना वाईट व्यसनापासून दूर रहा, असे सांगताना काही पालक त्यांच्यापुढे स्वत:च सिगारेटचे झुरके घेऊन दारू पितात. पालकांनी हा दुटप्पीपणा सोडला पाहिजे. 'पिअर प्रेशर' व 'बिअर प्रेशर' याचाही मुलांवर परिणाम होतो. पालकांच्या या वर्तनामुळेच मुले मित्रांच्या संगतीत व्यसनाच्या आहारी जातात. पालकांचा मुलांशी संवाद होत नसेल तर मुले मित्र शोधत असतात. मित्रांच्या संगतीत काही चांगल्या काही वाईट गोष्टी घडत राहातात. मैत्रीखातर, उत्सुकतेपोटी मुले वाईट मार्गाला लागतात. त्यामुळे पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. किशोरवयीन मुलांनी किती उमलायचे व फुलायचे हे पालकांच्याच हाती असते. कुतुहलापोटी मुले वाईट व्यसनांच्या आहारी जाऊ नयेत म्हणून त्यांच्या मित्र-मैत्रिणींची माहिती घ्यायला हवी, त्यांच्यापुढे व्यसने करू नये, मुलांसाठी वेळ काढून त्यांच्याशी संवाद साधावा, एकंदरीत पालकांनीच त्यांचे चांगले 'रोल मॉडेल' बनायला हवे.
पालक जे सांगतात मुले ते कधीच करीत नाही. याउलट आपल्या पालकांसारखेच वागून मुले प्रत्यक्ष कृती करतात. त्यामुळे मुलांच्या देखत सिगारेट, दारूचे व्यसन करू नये. या वाईट कृतीचा मुलांच्या मनावर परिणाम होतो. मादक पदार्थांमुळे मुलांच्या मेंदूतील 'सिरेटॉनिक'मध्ये बदल होतात. हळूहळू त्यांच्या मेंदूची क्रयशक्ती कमी होते. व्यसनाशिवाय आपण जगूच शकत नाही, अशी भावना निर्माण होऊन ही मुले पराधीन होतात. मुलांना अद्याप बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यांना स्वतः च्या पायावर उभे राहायचे आहे. त्याला समाजाचे काही ऋण फेडायचे आहे. या सगळ्या गोष्टीची जाणीव पालकांनी करून द्यायला हवी आहे.
खरे तर या 'चिल्लर पार्टी'ने पालकांना विचार करायला भाग पाडले आहे. पण सगळेच पालक यातून बोध घेतील, यातला भाग नाही. कारण काही पालकांची ही संस्कृतीच झाली आहे. काही पालक आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी राबराब राबतात. पैसा साठवून ठेवतात. यासाठी भ्रष्टाचार, लबाडीचाही अवलंब करतात. पालक काय करतात, हे आजच्या मुलांना सहज कळत असतात. हरामाच्या पैशांमुळे मुलेही हट्टी बनतात. पैसे कमविण्यासाठी काय दिव्ये पार पाडावी लागतात, याची त्यांना कल्पना नसते. मुले बिघडू नयेत, यासाठी पालकांनी घरातले वातावरण खेळीमेळीचे, संस्कारी ठेवायला हवे. आपणही त्याप्रमाणे वागले पाहिजे.'चिल्लर पार्टी' हा प्रकार काही एका दिवसात घडलेला नाही. या पाटर्य़ांबद्दल तक्रार करत बसण्यापेक्षा पालकांनी आपल्या मुलांवर योग्य संस्कार करून समाजातील चांगले व वाईट निवडण्याची क्षमता निर्माण करण्याची गरज आहे. .
No comments:
Post a Comment