Friday, November 13, 2015

गुन्हेगारी रोखण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा


      अलिकडच्या काळात गुन्ह्यांची टक्केवारी वाढत आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे.गुन्हेगारांवर कायद्याचा धाक राहेलेला नाही. पोलिसांचा वचक नाही. शिवाय गुन्हेगारांना मिळणारा राजकीय आश्रय यामुळे दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. त्यामुळे आपल्या राज्याची प्रतिमा खराब होत चालली आहे. ही गोष्ट राज्याला भूषणावह नाही.
      गुन्हे घडतात. पोलिसी तपास सुरू राहतो. काही गुन्हे उघडकीस येतात , काही नाही. घटना उघडकीस आणण्याचे काम पोलिस करतच असतात, मात्र अशा प्रकारच्या घटना, गुन्हे होऊ नयेत,घडू नयेत, यासाठी सामुदायिक प्रयत्न व्हायला हवेत. गुन्हेगारी रोखण्यासाठी कायदे आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ते कायदे परिपूर्ण आहेत, असे ग्रहीत धरले तरी तपास परिपूर्ण व्हायला हवा. कायद्याला पळवाटा आहेत. गुन्हेगारांना या पळवाटा सापडू नयेत, याची खबरदारी पोलिसांची आहे.
      गुन्हेगारी सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणारी अशा दोन प्रकारची असते.पोलिसांना कायदा-सुव्यवस्था धोक्यात येऊ नये, याची खबरदारी घ्यावी लागते, यासाठी दक्ष राहावे लागते. समाजाला घातक ठरणारी घरफोड्या, दरोडे, गुंडगिरी, खून अशा प्रकारची गुन्हेगारी असते. ती समाजाला विघातक आणि परिणामकारक ठरते. या दोन्ही प्रकारची गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस दलाकडून प्रयत्न होणे गरजेचे असते. यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असते. शिवाय गुन्हेगारी नियंत्रित करण्यावरही भर द्यायला हवा. खूनाच्या घटना या वैयक्तिक वादातून घडत असतात. पण गुन्हा घडल्यानंतर त्या तातडीने उघडकीस आणण्याची जबाबदारी पोलिसांची असते. या कामात कुचराई झाली तर पोलिसांच्या निष्क्रियतेवर ठपका ठेवला जातो. राज्यात अशा अनेक केसेस आहेत की, त्यांचा अद्याप तपास लागलेला नाही.
     वाढती गुन्हेगारी पोलिस यंत्रणेबरोबरच समाजाच्या दृष्टीनेही चिंताजनक बाब आहे. हे नाकबूल करून चालणार नाही. गुन्हेगारी रोखण्यासाठी कायदे परिपूर्ण आहेत, असे म्हटले तरी त्याची अंमलबजावणी कडक, काटेकोरपणे  व्हायला हवी. यासाठी संबंधित सर्वच घटकांचा हातभार लागायला हवा. उदाहरण द्यायचेच झाले तर गुंडांचा बंदोबस्त व्हावा म्हणून वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते; पण तो गुंड काही तासांतच जामिनावर मुक्त होतो. म्हणून सर्वच पातळ्यांवर कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होण्याची गरज आहे.
      केवळ कायद्याने गुन्हेगारी रोखता येणे शक्य नाही. तशी स्थिती सध्या नाही. यासाठी लोकांचा सहभाग वाढवण्याची गरज आहे. सामाजिक दवाबही निर्माण होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे समाजविघातक प्रवृत्तीला सहजपणे आळा बसू शकतो. केवळ पोलिसांचेच सर्व काम आहे ही भावना दूर होण्याची आवश्यकता आहे. कारण पोलिसही एक नागरिक आहे., माणूस आहे. प्रत्येक नागरिकाने आपण साध्या वेशातील पोलिस आहोत, या जाणिवेने काम केल्यास सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही.
      पोलिस आणि नागरिकांमध्ये सुसंवाद वाढायला हवा. त्यांच्यात समन्वय निर्माण व्हायला हवा, यासाठी पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकायला हवे. पोलिस यंत्रणा लोकाभिमुख झाल्यास बर्‍याच गोष्टी साध्य होऊ शकतात. पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी हेलपाटे घालायला लागू नयेत, तक्रारीचे निवारण तातडीने व्हायला हवे, यासाठीची व्यवस्था व्हायला हवी. किरकोळ गुन्ह्यांची संख्या किंवा प्रमाण अधिक असते. ते कमी करण्याच्यादृष्टीने पोलिसांकडून प्रयत्न व्हायला हवेत. महिलांवर अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. या गुन्ह्यांच्या तपासासाठी जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
      कायदा-सुव्यवस्था आबाधित राखणे, गुन्ह्यांचा तपास व गुन्हेगारी नियंत्रणाबरोबरच पोलिसांना अन्य स्वरुपाची कामेही करावी लागतात, ही वस्तूस्थिती आहे. शिवाय पोलिसांची अपुरी संख्या यामुळे पोलिस यंत्रणेवर ताण पडतो, यासाठी शासनाने वेळोवेळी पोलिस भरती, बढत्या केल्या पाहिजेत. पोलिसांचे स्वास्थ्य बिघडू नये, पोलिस- अधिकार्‍यांमध्ये ताण-तणाव वाढू नये, यासाठीही प्रयत्न व्हायला हवेत. 


Thursday, November 12, 2015

कथा ती रहस्यमय अंगठी


      किल्ल्याच्या भव्य राजप्रासादातल्या भिंतीवर टांगलेल्या त्या तैलचित्राकडे पाहता-पाहता कधी डोळा लागला, हे मला कळलंच नाही. कुणास ठाऊक किती वेळ झोपलो होतो, पण पैंजणांच्या त्या मधुर आवाजांनी मला जाग आली. अर्धवट उमललेल्या डोळ्यांनी मी पाहात होतो, एक रुपसुंदरी आपल्या पैंजणांचा आवाज करत आणि मागे वळून पाहत मला इशारा करत होती. भव्य अशा दालनात टांगलेल्या शाही झुंबरांमधून रंगबिरंगी  मंद पण मोहक किरणे सगळीकडे  पसरली होती. ती भव्य दालनातून पैंजणांचा आवाज करत निघाली होती.  तिच्या त्या मादक डोळ्यांमध्ये एक मौन असं निमंत्रण होतं. मी मंत्रमुग्ध, संमोहित हो ऊन तिच्या मागे मागे खेचला जात होतो. मी तिच्या जवळ गेल्यावर कळलं की, तीच ही सौंदर्यवती, जिचे भव्य दालनातले  तैलचित्र पाहता-पाहता  माझा डोळा लागला होता. प्रासादातल्या एका मोठ्याशा बोळातून गेल्यावर ती एका शाही दरवाज्यासमोर जाऊन थांबली. मी विचारात होतो, तिच्या मागे जावं की नको. पण तिने मागे वळून तिरक्या नजरेनं चितवल्यासारखा इशारा केला , ती जणू म्हणत होती,माझ्या मागे मगे या.
      मी तिच्या मागे मागे एका अदृश्य अशा दोरीने बांधल्यासारखा खेचला जात होतो. पायर्‍या उतरून आम्ही एका मोठ्या  शानदार  अशा दालनात पोहचलो. खाली किंमती असा हस्त कलाकुसरीचा गालिचा अंथरलेला होता. छतावर टांगलेल्या झुंबरांमध्ये लावलेल्या मेणबत्त्यांमधून रंगबिरंगी प्रकाश चोहोबाजूला पसरून  वातावरण अगदी जादूमय झाले होते.तिथे एका भिंतीला चिकटकून  एक  मोठा  किंमती पलंग होता. तो चांगला सजवला होता.  समोरच एकापेक्षा एक असे किंमती सोफे लावलेले होते. ती अचानक माझ्या दिशेने वळली आणि जवळजवळ ओढतच तिने मला पलंगाच्या दिशेने नेले. आणि बघता बघता  पलंगावर ढकलतच माझ्यावर चुंबनाचा वर्षाव सुरू केला. माझ्या ओठांच्या आणि गालांच्या चुंबनाबरोबरच तिच्या मादक गंधाने मीही मोहवून गेलो. मीही तिला माझ्या बाहुपाशात घेत घट्ट आवळत गेलो. मग काय आगीचा डोंबच उसळला. असा किती तरी वेळ आम्ही एकमेकांच्या शरीरात विरून गेलो होतो.
      आता आम्ही शांत एकमेकाच्या बाहुपाशात पहुडलो होतो. माझा हात बाजूला सारत ती हळूच उठली. आपल्या बोटातली अंगठी माझ्या बोटात घालत मधुर आवाजात म्हणाली, “ ही तुम्हाला माझी आठवण देत राहील. तुमच्या  भेटीसाठी मी किती जन्माची वाट पाहात होती. मी किती  भटकलेय तुमच्या शोधासाठी! “  यौवनाची मादक मस्ती आणि गरम श्‍वासांच्या लाटांमध्ये आम्ही कधी वाहत गेलो आणि एकमेकांच्या बाहुपाशात कधी झोपेच्या अधीन झालो, हे कळलंच नाही.
      फक्त मला एवढंच आठवतं आहे, कुणी तरी मला त्या दाट, मस्त  झोपेतून  जोरजोराने हलवून उठवण्याचा प्रयत्न करतंय. हां, मला आठवलं, तो व्यंकटेश आणि अर्जूनचा आवाज आहे. मी डोळे उघडले आणि त्यांच्याकडे  काहीशा रागाने, पण  तक्रारीच्या नजरे पाहिलं. कारण त्यांनी मला एका बेधुंद अशा झोपेतून उठवलं होतं. व्यंकटेश म्हणाला,          ‘ धूळ-मातीने भरलेल्या या तळघरात आणि तेही भयाण अशा सुनसान जागेत काय करायला आला होतास? रात्री मी उठलो तेव्हा तू आपल्या अंथरुणात नव्हतास. मी अर्जूनला उठवलं. आम्ही बाहेर जाऊन आजूबाजूला पाहिलं. पण तुझा कुठेच पत्ता नाही. आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.  काही गडबड घोटाळा तर झाला नसेल? तू संकटात तर सापडलास नसशील? मग आम्ही  तुझा शोध घेतला. पहिल्यांदा तुझाच  शोध घेण्याची गरज होती. भूत-प्रेतात्मांचा शोध ( ज्यासाठी आम्ही सुनसान अशा या पडक्या महालाच्या ठिकाणी डेरा टाकला होता.) नंतरदेखील घेतला असता.  ‘
      आम्हाला तुझ्या सुरक्षेची मोठी फिकीर लागली  होती. या काळ्याकुट्ट अंधारात फक्त  बॅटरीच्या आणि मोबाईलच्या उजेडात आम्ही सगळीकडे शोधत होतो. कित्येकदा तुला आवाज दिला. पण तो या सुनसान पडक्या -भग्न वाड्याला थटून माघारी येत होता. इतक्यात अर्जूनने तुझ्या पावलांचे ठसे पाहिले, जे या तीन-चार इंच धूळ आणि मातीमध्ये स्पष्ट दिसत होते. आम्ही पावलांच्या निशाणांना फॉलो केला.पाहतोय तर तू या पडक्या वाड्याच्या पायर्‍या चढून परत खाली तळघरात आला आहेस.
 भारी कोंदटलेल्या वासाने तर आमची हालत पुरती बेकार झाली. आम्हाला गुदमरल्यासारखे हो ऊ लागले. अशा ठिकाणी कशाला तू येशील? असं एकदा वाटलंही! पण अर्जून म्हणाला की, पायांचे ठसे जातानाचेच आहेत, येतानाचे नाहीत. त्यामुळे तू इथेच कुठे तरी असशील, अशी खात्री झाली.   आम्ही तुला या धुळीने माखलेल्या फरशीवर झोपलेला पाहिला. इतक्यात अर्जून म्हणाला,   ङ्ग व्यंकटेश, त्याच्या बाजूला बघ, काय आहे? ङ्ग अरे देवा, हा तर हाडांचा सांगाडा , जो कुठल्या तरी एका स्त्रीचा होता. कारण किंमती सोन्या-रत्नांनी मढवलेले दागिने अजूनही सांगाड्यावर होते. तुला या भयाण आणि सुनसान अशा तळघरात एका हाडाच्या सांगाड्यासोबत रात्र घालवताना तुला कसलीच भीती वाटली नाही?
      मी माझ्या आजू-बाजूला पाहिलं, तर इथल्या फरशीवर किंमती गालिच्यांच्या जागी तीन-चार इंचाची मोठी धूळ-मातीचा स्थर साचला होता. वर छताला तुटल्या-फुटल्या अवस्थेत  लटकत असलेले झुंबर जुन्या वैभवाची आठवण करून देत होते.एक तुटका-फुटका  पलंग की ज्याला वाळव्यांनी जवळजवळ खाऊन खत्म फस्त केला  होता. प्रकाशदाण्यांमधून काही वाघळं आत तळघरात आली होती. त्यांनी स्वत:ला त्या तुटक्या-फुटक्या  झुंबराला उलटी टांगून घेतली होती. इथे अत्तराच्या फवार्‍यांमध्ये आणि किंमती मद्याच्या धुंदीमध्ये  सुंदर ललनांचा नृत्यांच्या बार्‍या होत असाव्यात.पण आता हे सगळं उजाड, वैराण बनलं होतं. म्हणजे मी झोपेत एखादे स्वप्न पाहात या तळघरात आलो होतो? मला काहीच  कळत नव्हतं.
      व्यंकटेश, अर्जूनसह मी त्या तळघरातून आणि बोळातून पुन्हा आम्ही त्या भव्य दालनात आलो, जिथे आम्ही रात्री डेरा टाकला होता. दुसर्‍याच भव्य दलनात  ते तैलचित्र लटकावले होते. आम्ही तिकडे गेलो.  त्या चित्राकडे पाहिल्यावर माझा अजूनही विश्‍वास बसत नव्हता की, हे स्वप्न आहे. रात्री झोप ये ईना म्हणून मोबाईलच्या उजेडात मी या दालनात आलो होतो. त्या चित्राकडे पाहून मी दोघांनाही सांगितलं की या सौंदर्यवतीच्या मागे मागे लागून मी त्या तळघरात पोहचलो होतो. आणि रात्री तिच्या बाहुपाशात पहुडलो होतो. तिच्याशी संभोगदेखील केला होता.  हा काही माझ्या मनाचा खेळ नाही. ही बघा अंगठी, जी या सुंदर तरुणीने माझ्या बोटात स्वत: घातली होती. नक्कीच हा मनाचा खेळ हो ऊ शकत नाही. हात लावून पहा. व्यंकटेश आणि अर्जून तर हे सगळे पाहून हतबल  झाले. एवढ्या मोठ्या किंमतीची अंगठी माझ्याकडे कोठून आली, यावर त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हते. आणि या अंगठीची डिझाईन अलिकडची किंवा आधुनिक नव्हती. ती जवळपास अडीचशे वर्षांपूर्वीची असावी. तेव्हाच्या राजेरजवाड्यांच्या राण्या अशा प्रकारच्या अंगठ्या  वापरायच्या.
      मग हे नक्की काय होतं? स्वप्न की मनाचा खेळ? पण ही अंगठी मनखेळ असू शकत नाही. मग ही माझ्याजवळ आणि माझ्या बोटात कशी आली?का मग हा सगळा खेळ प्रेतात्माचा होता? आमचं  अजून आपसात बोलणं चाललं होतं,तेवढ्यात कुणाचा तरी आवाज आला. नाही, ही सगळी वस्तुस्थिती आहे. सत्य आहे. ही तरुणीदेखील खरी आहे.ही एका राजाची राजकन्या होती, जी राजपुत्र माधवराववर बेहद्द प्रेम करायची.पण या महालाच्या दरबारी लोकांच्या षडयंत्राची शिकार बनली आणि या तळघरात कैद झाली.तिला बेड्यांनी जखडून टाकलं होतं. कारण त्या राज्याचा सामंत माधवरावाशी आपल्या मुलीचा विवाह लावून देऊन या राजवाड्याची संपत्ती हडपू पाहू इच्छित होता. त्याच्या मार्गात ही अडथळा ठरत होती. दुसर्‍या राज्यातल्या या  राजकन्येला फसवून इथं आणून कैद करण्यात आलं होतं. तिने आत्महत्या केली. ङ्ग लांबून एका हातात काठी आणि दुसर्‍या हातात कंदील घेऊन येणार्‍या एका दाट दाढी-मिशा असलेल्या एका वृद्ध माणसाने सांगितलं. बहुतेक तो इथला रखवालदार असावा.
     आपल्याला कसं माहित, बाबा? मी विचारलं.
हे सगळं माझ्या डोळ्यांदेखत घडलं होतं.ङ्घ त्याने उत्तर दिलं.
ही कधीची घटना आहे? किती वर्षे झाली असतील या गोष्टीला? 
झाली असतील  काही दोन-अडीच एक  वर्षं! तो म्हणाला.
      आपण तर म्हणता की, ही घटना तुमच्या डोळ्यांदेखत घडली आहे. मग आपलं आता वय काय आहे?

प्रेतात्म्यांना काही वय नसतं.  आणि असं म्हणून तो म्हातारा एकदम अदृश्य झाला. 

Wednesday, November 11, 2015

दु:ख, अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराचा नायनाट करा


      दिवाळीचा सण दरवर्षी येतो आणि प्रत्येकजण आपापल्यापरीने आनंदाने, उत्साहाने साजरी करतो.तसं पाहायला गेलं तर आपण भारतीय माणसं उत्सवप्रिय आहोत. आणि या उत्सवप्रियतेला खतपणी घालण्याचं काम करणार्‍यांची दुकानदारी बिनबोभाट ङ्गोङ्गावत चालली आहे. पण हीच दुकानदारी आणि उत्सवप्रियता नकळत समाज जीवनाच्या र्‍हासाला कारणीभूत ठरत आहे. याचाही विचार प्रत्येकानं याच दिवाळीच्या आनंदाच्या क्षणाच्या निमित्ताने करायला हवं. उत्सवप्रिय असणं, यात काही गैर नाही.पण त्याला सामाजिक बांधिकलकीची जोड असायला हवी.
       दिवाळीपुरता विचार करायचा म्हटले तर या सणाच्या निमित्ताने किती लोकांना व त्यांच्या मुलांना नवे कपडे परिधान करायला मिळतात. किती लोकांच्या घरी गोडधोड, ङ्गराळाचे पदार्थ बनवले जातात. किती लोकांच्या घरी दिव्यांची रोषणाई असते.याचा कधी आपण विचार केला आहे का? सारा देश बाहेर उत्सव साजरा करित असतो, पण आपल्या मुलांना नवे कपडे लेवू, गोडधोड खाऊ घालू शकत नाही, म्हणून डोळ्यांतून दु:खाश्रू वाहवत बसलेल्या आई-वडिलांना मदत नाही ते नाहीच पण आपण धीर देण्याचं काम तरी केलं आहे का? ते दु:खाश्रू पुसण्याचं कार्य म्हणजेच सर्वात मोठा दीपोत्सव आहे. हे काम महत्त्वाचं आहे. आपल्या पाठीशी समाज आहे, ही जाणिव त्यांच्यात निर्माण करून देण्याचं काम आपण करायला हवं.
     वीटभट्ट्यांवर, ऊसाच्या ङ्गडात रात्रंदिवस खपणारी, पोटासाठी पडेल ते काम करणारी, प्रसंगी मागून खाणारी माणसं इथे कमी नाहीत. त्यांच्याही डोळ्यांत प्रकाश उजळायला हवा. यानिमित्तानं दुसर्‍याचाही विचार करायला शिकलं पाहिजे. त्यांनाही या आनंद सोहळ्यात आपापल्या परीनं सामावून घ्यायला हवं. आपण मोठ्या आनंदानं, उत्साहानं सण साजरा करत असतो. या नादात आपला दुसर्‍याला त्रास होतो का, याचा विचार केला पाहिजे. आपण आपल्याच मस्तीत राहून चालत नाही. पण आजच्या जमान्यात ङ्गारच थोडी माणसं विचार करताना दिसतात. त्यांना आपल्या आनंदात सामावून घेताना दिसतात. इतरांची दु:खे दूर करून आनंद साजरा करण्यात ङ्गार मोठा आनंद आहे.
 काही माणसं सगळ्याच गोष्टीकडे उदासिनदृटीने पाहात असतात. सतत डोक्यावर मोठं ओझं घेऊन वावरत असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद-दु:ख, समस्या, अडचणी असतात.प्रत्येकाला कौटुंबिक, वैयक्तिक, सामाजिक प्रॉब्लेम असतात. म्हणून काय ती डोक्यावर वाहायची असतात का? सुख जवापाडे, दु:ख पर्वताएवढे, असे म्हटले जात असले तरी ते आपण माणण्यावर अवलंबून आहे. दु:ख करत बसल्याने सुख आयते येत नाही.दु:खालाच सुख मानून आनंदाने जगायचे असते. आणि तसं जगलं पाहिजे. नाही तर विरस जगण्याला अर्थ तरी काय आहे? सण आपल्यात उत्साह आणतात. त्यात मोठ्या आनंदानं सामिल व्हावं.
      आजकाल आजूबाजूला बर्‍याच काही आपल्याला नको असलेल्या गोष्टी घडत असतात. आपल्या देशात भ्रष्टाचार शिष्टाचार झाला आहे. दिवसाढवळ्या आपल्या माता-भगिनींवर अत्याचार होत आहेत आहेत. रोज कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी मुडदे पडत आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. रोज कोणावर ना कोणावर अन्याय घडत आहे. या गोष्टी थांबवता येणं शक्य नाही, पण कमी जरूर करता येतील. त्यासाठी एका विचाराच्या माणसांनी एकत्र येऊन तोडगा काढला पाहिजे. यावर निव्वळ भाषणे देऊन चालणार नाही. संयमाने या समस्यांच्या मुळाशी जायला हवे. हे करताना आपल्या स्वत:लाही बदलायला हवे. आपल्या आवडी-निवडींना, स्वभावाला मुरड घालावी लागणार आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो, असा विचार करून समाजासाठी काही केले पाहिजे. की बांधिलकी जोपासली पाहिजे. मन संवेदनशील असलं पाहिजे. सहिष्णु असलं पाहिजे.
      समाज अनेक कारणांनी प्रदुषित होत आहे. तसं माणसाच्या कृपेनं निसर्गदेखील प्रदूषित होत आहे. जल, हवा,ध्वनी प्रदूषणाने माणूस माणसाचंच जिणं हराम करत आहे. सांडपाणी,रसायन मिश्रित कारखाण्याची मळी नद्यांमध्ये मिसळत आहे. त्यातल्या पाण्याच्या सेवनानं आरोग्य बिघडत चाललं आहे. जमिनीत रासायनिक खताचा बेसुमार वापर करून तिला नापिक करत आहोत. कारखान्यांच्या धुरंड्यांमधून, वहनंमधून निघणारा विषारी वायू माणसाचंच आयुष्य कमी करत आहे. त्यातच करू नये ते माणूस करू लागल्याने स्वत:च स्वत:च्या शरीराची नासाडी करून घेत आहे. दारू, मावा-गुटखा, बिडी-सिगरेट याची लत माणूस हकनाक लावून घेत आहे. सरळ जीवन जगण्याचा मंत्र आपल्या साधू-संतांनी दिला असताना माणूस वाकड्यात शिरत आहे. यावर समुहाने आवर घालता ये ईल. गाव करी तिथे राव काय करील, अशी एक म्हण आहे. त्यामुळे सगळ्यांनी मिळून वाईटाचा नाश करण्याचा चंग बांधला तर सर्व काही शक्य आहे. सध्या आपण दिवाळी साजरी करतो आहे. प्रदूषण करणार्‍या ङ्गटाक्यांचा जपून वापर कराच, पण त्याचा अतिरेकही होऊ देऊ नका. 

Monday, November 9, 2015

प्राचीन आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेला जत तालुका


   जत तालुक्याला प्राचीन काळापासूनचा इतिहास आहे. अगदी चालुक्य घराण्यापासूनच्या राजांच्या अनेक पाऊलखुणा तालुक्याच्या अंगाखाद्यावर आजही दिमाखाने मिरवीत आहेत.सांगली जिल्ह्यात अनेक संस्थानिक हो ऊन गेले. सांगली, मिरज तासगाव येथील पटवर्धन घराण्याबरोबरच जतच्या ळे घराण्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. या संस्थानिकांच्या अनेक महत्त्वाच्या वास्तू आजही आपणास पाहावयास मिळतात.


      जत हे संस्थानिक डळेंच गाव.या तालुक्यावर चारशे वर्षे राज्य करणार्‍या डळे संस्थांनच्या स्पष्ट खाणाखुणा आजही पाहायला मिळतात. डळे संस्थानचा अगदी 1930 मध्ये बांधण्यत आलेला सुंदर राजवाडा आजही अत्यंत दिमाखात उभा आहे. ब्रिटिश वास्तूशास्त्रज्ञांनी त्याची उभारणी केली आहे. तसाच आणखी एक छोटेखनी वाडा अनिलराजे डङ्गळे यांचाही अहे. अनिलराजे यांनी संस्थानकालीन ऐतिहासिक वस्तूंचा एक प्रचंड संग्रह आपल्या वाड्यात जतन करून ठेवला आहे. आज अनिल्रजे हयात नाहीत, पण त्यांचे चिरंजीव शार्दूलराजे त्याची देखभाल करीत आहेत.
      जतचा जुना राजवाडा सतराव्या शतकात बांधला आहे. पूर्ण माती व दगडाने बांधलेल्या वाड्यात सागवानी लाकडाचा भरपूर वापर केला आहे. ते लाकूड आजही चारशे वर्षांनंतरही चांगल्या स्थितीत आहे. जुन्या कमानी, बुरुज आजही डळापूर, उमराणी, जाडरबोबलाद, बिळूर आदी गावांमध्ये दिसतात. उमराणी गावातला वाडा आजही वापरात आहे. हे गाव म्हणजे इतिहासाचा चालता बोलता साक्षीदार आहे. या गावात हेमाडपंथी शैलीतील अनेक मंदिरे आहेत. अत्यंत सुंदर रचना असलेली ही मंदिरे हजार वर्षाच्या इतिहासाच्या साक्षीदार आहेत. शेड्याळ,कोळगिरी गावातदेखील अशी मंदिरे आहेत. वाळेखिंडी गावात तत्कालिन कोरलेल्या शिळा एका मंदिरात संग्रही आहेत.
      जत शहरापासून पश्‍चिमेला किल्ले रामगड हा प्राचीन किल्ला आहे. शिवकालीन पूर्व किल्ल्यात त्याचा समावेश होतो.या छोट्याशा पण दुर्गम किल्ल्याची आज दुरवस्था झाली आहे. या किल्ल्यावरून किल्ल्याखली वसलेल्या गावाला रामपूर असे नाव पडले आहे. हे गावही आता राज्यात विकासाच्याबाबतीत आघाडीवर आहे. या गावात अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. स्वच्छता,हागणदारीमुक्त आदी योजनंची या गावाने बक्षीसे पटकावली आहेत.
      जत तालुक्यात काही ऐतिहासिक किल्ले, वाडे आहेत, तशी मंदिरेदेखील आहेत. ही सगळी सुप्रसिद्ध आहेत. लिंगायत धर्माचे जागतिक तीर्थस्थळ या ठिकाणी आहे.लिंगायत धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या धानम्मा देवीचा जन्म या तालुक्यातल्या उमराणी गावी झाला. त्यांचे वास्तव्य गुड्डापूर या गावी होते. या ठिकाणी धानम्मादेवीचे मंदिर आहे. गुड्डापूरला त्यामुळे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.या ठिकाणी कर्नाटक व आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. इथे फार मोठी यात्रा भरते. दररोज इथे अन्नदान होत असते. गुड्डापूरपासून काही अंतरावरच श्रीक्षेत्र संगतीर्थ आहे. याठिकाणी श्री. धानम्माचा विवाह झाला होता. त्यामुळे या क्षेत्रालाही भाविकांमध्ये महत्त्व प्राप्त झाले आहे.
      जत शहराजवळ ऐतिहासिक यल्लमादेवीचे मंदिर आहे.इथे महाराष्ट्रासह अन्य राज्यातूनही लाखो भक्त येत असतात. मार्गशीर्ष महिन्यात देवीची मोठी यात्रा भरते. जतच्या दक्षिणेला डोंगररांगा आहेत. यातला एक डोंगर अंबाबाईचा डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे. यावर श्री अंबाबाईचे मंदिर आहे. अलिकडच्या काळात या मंदिराला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रभाकर जोग, अशोक शिंदे, राजन जाधव, सुभाष कुलकर्णी आदींचा या मंदिराला महत्त्व प्राप्त करून देण्यात मोलाचा वाटा आहे. सभोवताली वनीकरण विभागाची हिरवीगार झाडी आहेत. शासनाने या परिसराला पर्यटन दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी निधीदेखील दिला आहे.
     याशिवाय कोळगिरी सिद्धेश्‍वर, उमराणी येथील मल्लिकर्जून मंदिर, बिळूर येथील काळभैरव, बसवेश्‍वर मंदिर, बनाळी येथील बनशंकरी, उमदी येथील मल्लिकार्जून, भाऊसाहेब महाराज आदी मंदिरे प्रसिद्ध आहेत. डफळापूर येथील एकविरा मंदिर प्रसिद्ध आहे. धनगर  कुलाळवाडी येथील म्हातारबा मंदिर धनगर समाजाचे श्रद्धास्थान आहे. इथली भाकणूक प्रसिद्ध आहे. असा हा जत तालुका अनेक अमूल्य ठेव्यांनी संपन्न आहे.


Wednesday, October 14, 2015

शाळांमध्यल्या कवितांचं सुरेल गायन हरवलं


     कवितेच्या गळ्यात सुरांनी हात गुंफले  की तिचं गाणं होतं. कवितेचा असं गाणं होण्याचा एक काळ होता. शाळा- शाळांच्या वर्गा-वर्गातून कवितांच सामूहिक सुरेल गायन चालायचं. मात्र आता हे शाळांमधलं सुरेल लोप पावलं आहे. आता वृत्तांच्या लयबद्ध  आवर्तनात गिरक्या घेणार्‍या कविता पाठ्यपुस्तकातून गायब झाल्या आहेत. कवितेला चाली लावता न येणार्‍या निरस अवजड आणि  मुक्त छंदातल्या कवितांनी त्यांच्या जागा घेतल्या आहेत.
      पूर्वीच्या काळी केशवसुताम्च्या,भा.रा. तांबेंच्या, गोविंदाग्रजांच्या,कुसुमाग्रजांच्या कविता असायच्या. त्या कवितांना वृतांच्या लयबद्ध आवर्तने असायची. आणि त्या कवितांची गाणी व्हायची.काही लोकांच्या जीभेवर आजही त्या कविता रेंगाळतात.आता कवितांमधला सुरेलपणा लोप पावत चालला आहे. चाल लावण्यात अडचणी येऊ लागल्या. अशैक्षणिक कामाचा ताप शिक्षकांच्या माथी असल्याने त्यांच्या मराठी, हिंदी, इंग्रजी कवितांना चाली लावण्याच्या क्षमता कमी झाल्या, अपुर्‍या पडल्या. छंदबद्ध कवितांचा भडिमार झाला. इयत्ता पहिलीच्या वर्गातल्या कवितांना चाली लावण्याच्या अडसरी येऊ लागल्या. पण काही गायनाचा. चाली लावण्याचा छंद असलेले शिक्षक मात्र अशा कवितांना चाली लावण्यात यशस्वी होतात.
     मात्र अशा शिक्षकांची संख्या कमी  म्हणजे  मूठभरच आहे.संगीताची जाण, संगीत शिकलेल्या शिक्षकांची संख्या फारच कमी आहे. शाळांमध्ये तबला-पेटी  आदी वाद्य साहित्य आहे. मात्र संगीत कला अवगत असलेले शिक्षक नाहीत, त्यामुळे ही वाद्ये शाळा-शाळांमध्ये अडगळीत पडले आहेत. त्यांची वाट लागलेल्या आवस्थेत ती आहेत. मग शिक्षक कुठली तर चाल लावून मोकळे  होतात. काही चाली लक्षात राहाव्यात अशाही नसतात.शिक्षक कुठली तरी सिनेमातल्या गाण्याच्या  चाली लावून मोकळे होतात. बहिणाबाईंच्या कवितांना, इंद्रजीत देशमुखांच्या माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा... अशा कवितांना पारंपारिक उभ्या जगाचा क कुठली तरी सिनेमातल्या गाण्याच्या चाली  लावून मोकळे   होतात. बहिणाबाइा क्षमता कमी झाल्या, त्याच त्या चाली सगळ्याच कवितांना लावतात. काही म्युझिक कंपन्यांनी कवितांच्या ओडियो, व्हिडियो काढल्या आहेत. मात्र त्यांच्या चाली फारच जड आहेत. लक्षात राहतील अशा त्यांच्या चाली नाहीत. त्यामुळे शिक्षक एक-दोन कवितांना कुठल्या तरी चाली लावून मोकळे होतात. मराठी कवितांची ही तर्‍हा तर हिंदी, इंग्रजी कवितांची काय तर्‍हा असेल. मुलांकडून  कविता गायला सांगितल्या तर सरळधोपट वाचून दाखवल्या जातात. प्राथमिक शाळांमध्ये काही कवितांना चाली तरी लावतात. मात्र आठवी ते दहावी वर्गातल्या कवितांना चाली लावण्याच्या फंदातच शिक्षक पडत नाहीत. त्यामुळे भाषा विषय अवघड, नीरस होत चालला आहे.
      आता  मुक्तछंदातल्या कवितांची पाठ्यपुस्तकात मेजॉरेटी दिसते. त्यांची चाल कोण ठरवणार अन कशी ठरवणार? कही शाळांमधल्या मुलांना कविता चालीत म्हणायची असते. वर्गा-वर्गात एका सुरात गायची असते. हे ठाऊकच नाही. त्यामुळे कवितांचं गाणं होता होत नसतं. आता छंदांचं बंद नाही म्हटल्यावर ओळींनी कुठेही, कसंही भरकणं आलं. मग सूर तरी ओळींशी गट्टी कशी करणार, असा प्रश्‍न आहे.
     कवितेचं गाणं होतं तेव्हा अर्थातच त्या कवितेच्या अनुभवाला आणखी नवं परिमाण लाभतं.म्हणून गेय कवितेंच्या परंपरेचं जतन करणं आवश्यक आहे.  त्यासाठी शाळा-शाळांमधून बाळ-गोपाळांना या परंपरेचा संथा देण्याचा उपक्रम व्हायला हवा.

Thursday, September 10, 2015

धोक्याची घंटा

     ब्रिटनमधला हा सर्व्हे आपल्या सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. आपल्या देशात ज्या शिक्षणाचं मॉडेल स्वीकारलं जात आहे, त्याच्याबाबतीत खरोखरच पुनर्विचार व्हायला हवा. मुलांना आपल्या आजूबाजूच्या जगाची माहिती जाणून-समजून घेण्याची आवड निर्माण व्हायला हवी आपण ज्या पाश्‍चात्य देशांचे अनुकरण करायला निघालो आहोत, त्या देशांच्या मुलांचे ज्ञान ऐकल्या-वाचल्यानंतर गड्या आपला देशच बरा, असे क्षणभर वाटल्यावाचून राहत नाही. इंग्लंडमध्ये अलीकडेच एक सर्व्हे झाला. या सर्व्हेमध्ये मुलांना रोजच्या खाण्यात असणार्‍या फळांविषयी काही प्रश्‍न विचारण्यात आले. त्या प्रश्‍नांची त्यांनी दिलेली उत्तरे थक्क करणारी तर आहेतच. शिवाय त्या प्रगत म्हणवणार्‍या देशाची कीव करावी अशी वाटणारी आहे. स्ट्रॉबेरी फ्रिजमधून मिळते तर चॉकलेटस् झाडावर लगडतात अशी तिथल्या मुलांचे उत्तरे आहेत. इंग्लंडमधल्या मुलांना बहुतांश फळे ही झाडांवर नव्हे तर कारखान्यात तयार होतात, असे वाटते. यावरून त्यांचे परिसरातील ज्ञान किती सखोल (?) आहे याचा अंदाज येतो.
       प्रसिद्ध मफिन फर्मच्या ‘द फेबुलस बेकर्स’ने सहा ते दहा वयोगटातील मुलांचा सर्व्हे केला त्यात ही बाब उघड झाला आहे. सर्व्हेनुसार प्रत्येक दहापैकी एका मुलाला सफरचंद झाडावर लागत नाही असे वाटते. चारपैकी एका मुलाचा स्ट्रॉबेरी जमिनीखाली उगवते, असा समज आहे. मध गायीपासून मिळते, हे सांगणार्‍या या मुलांना केळी कुठे लगडतात याची माहितीच नाही. द्राक्षे वेलींवर नव्हे झाडावर लगडतात. हे दहापैकी एका मुलाचं उत्तर आहे. मुलांचा सगळ्यात अधिक संभ्रम दिसतो तो टरबुजाविषयी! पाण्यानं भरलेलं हे फळ जमिनीखाली, झाडावर आणि झुडुपांमध्ये लागतं, अशी इंग्लंडमधील मुलं सांगतात. सर्व्हे वाचल्यावर आपल्याला हसू येणं स्वाभाविक आहे. पण क्षणभर. अधिक विचार केल्यावर मात्र डोक्याचं दही व्हायला होतं. आपण कुठल्या प्रकारचं शिक्षण देत आहोत, असा प्रश्‍न पडतो. फळं कारखान्यात नाहीत तर झाडांवर लागतात. या साध्या गोष्टी माहीत नसाव्यात हे आश्‍चर्यकारकच आहे. ही तर्‍हा फक्त इंग्लंडमधील शिक्षणाची नाही तर आपल्या देशातल्या शिक्षणाची देखील हीच तर्‍हा आहे. मुलांना ग्लोबल बनवायच्या धुंदीत आपण त्यांना आसपासच्या गोष्टींपासून दूर नेत आहोत. ज्या प्रकारचं कथित कान्व्हेंटी शिक्षणाचं प्रचलन हिंदुस्थानात वाढत चाललं आहे. त्यामुळे आसपासची दुनिया जाणून समजून घेण्याच्या त्यांच्या संधीवर आपण कुर्‍हाड मारत आहोत. मुलगा सकाळी उठतो. बसने किंवा कारने शाळेला जातो. तिथे पाठ्यक्रमाशी झटत राहतो. घरी आल्यावर गृहपाठाच्या दबावाखाली वावरतो आणि उरलेला वेळ कॉम्प्युटर किंवा टीव्हीपुढे बसून घालवतो. शिक्षण पूर्ण करताना कुठली तरी एखादी डिग्री किंवा पुढे जास्तीत जास्त कुठलं तरी एखादं पॅकेज अशा बंदिस्त वातावरणात त्यानं जग समजून घेण्याचा प्रश्‍नच येत नाही. मुलांनादेखील त्याची आवश्यकता वाटत नाही. आई-वडिलांना त्यांची मुलं अमेरिकेतल्या राज्यांची नावं जाणतात, याचाच काय आनंद वाटतो. जगातला सर्वात मोठा धबधबा कोठे, मायकल जॅक्सनच्या जीवनात काय घडलं, असले ज्ञान त्याच्या डोक्यात भरवले जाते. मुलांच्या मनात जे ग्लोबल ज्ञान कोंबलं जात आहे, त्यानुसारच त्यांची स्वप्नाची दुनिया ग्लोबल होत चालली आहे. हे शिक्षण व्यवस्थेचे दुष्परिणामच म्हणावे लागतील. जस-जसा मुलगा उच्च शिक्षणाची पायरी चढायला लागतो, तस-तसा त्याला आपल्या देशाचा वीट यायला लागतो. आपल्या देशात त्याला उणिवा दिसायला लागतात आणि देशाबद्दल कमीपणा वाटायला लागतो. आपल्या देशातल्या सगळ्यात गोष्टींची त्याला दुर्गंधी यायला लागते. मग शेवटी त्याचं विमान अमेरिका, कॅनडा आदी देशाच्या दिशेनं टेक-अप घ्यायला लागतं. जे पेरलं आहे, तेच शेवटी उगवणार.
      ब्रिटनमधला हा सर्व्हे आपल्या सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. आपल्या देशात ज्या शिक्षणाचं मॉडेल स्वीकारलं जात आहे, त्याच्याबाबतीत खरोखरच पुनर्विचार व्हायला हवा. मुलांना आपल्या आजूबाजूच्या जगाची माहिती जाणून-समजून घेण्याची आवड निर्माण व्हायला हवी असं शिक्षण मिळायला हवं. मोबाईल फोनमुळे माणसांमधील अंतर वाढत चाललं आहे. तसं शिक्षण पद्धतीमुळे सभोवतालचा परिसर दूर होत चालला आहे. हे सगळं थांबवायचं असेल तर पहिल्यांदा परिसराचं ज्ञान आवश्यक आहे. चार भिंतीच्याबाहेर मुलाना काढायला हवं. आई-वडिलांनीदेखील कामातून थोडा वेळ काढून मुलांना शेत-शिवरात न्यावं. नद्या, तलावात, विहिरीत मनसोक्त डुंबायला लावावं. त्याची निसर्गाशी मैत्री घट्ट करावी. त्याचं मातीशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं की भारतमातेलाच काय, पण जैविक मातेलादेखील तो अंतर देणार नाही. - See more at: http://www.saamana.com/utsav/6/9/2015

Friday, September 4, 2015

विद्यार्थी-शिक्षकांमधला नातेसंबंध


     पूर्वीच्या आणि आजच्या गुरु-शिष्यामधील नातेसंबंधांमध्ये फार मोठा बदल झाला आहे. पूर्वीच्या गुरुकूल पद्धतीमध्ये राजा आणि प्रजा यांची मुले एकत्रितपणे गुरुच्या आश्रमात राहून शिकत होती. गुरुच्या सानिध्यात राहिल्यामुळे शिष्यांचे आचार-विचार, वर्तन आणि आहारदेखील समानतेने होत असे. पुढे हळूहळू गुरुकुलाची जागा शाळांनी घेतली. आपोआपच शिष्याचे रुपांतर विद्यार्थी आणि गुरुचे रुपांतर सर, मॅडममध्ये झाले. आजचे विद्यार्थी आता काही तासच शिक्षकाच्या सान्निध्यात असतात. त्यामुळे त्याच्या आचार-विचारात आहारात भिन्नता दिसू लागली.
     एकवीसाव्या शतकात वावरत असताना ज्ञानाचा ज्या प्रकारे विस्फोट होत आहे, त्याचा परिणाम निश्‍चितपणे विद्यार्थी- शिक्षकाच्या नातेसंबंधावर झाला आहे, होत आहेत. एकलव्यासारखा आपल्या शरीराचा भाग तोडून गुरुला देणारा शिष्य आजच्या घडीला कुणालाच मान्य होणार नाही. खुद्द शिक्षकालादेखील नाही. पूर्वीच्या गुरुजींप्रमाणे विद्यार्थ्यांना अधिक वेळ देऊन ज्ञानार्जनाबरोबरच त्यांच्यावर अधिक योग्य संस्कार करुन एक सुजाण व संवेदनशील नागरिक बनेल, असा विचार करणारे शिक्षकही फार थोडे मिळतील. आज समाजामध्ये शिक्षकांच्या प्रतिमेची उंची मोजली जाते, तीच मुळी त्याच्या गुणवत्ता यादीत येणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येवरुन आणि निकालाच्या टक्केवारीवरुन. मात्र संवेदनशील व सुजाण नागरिक मिळवून देणार्‍या शिक्षकाचा विचारच केला जात नाही.
     आजचा विद्यार्थी व्यवहारी बनत चालला आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या नातेसंबंधांमध्ये आता पालकाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. अर्थार्जनासाठी घराबाहेर पडणारे नोकरदार दाम्पत्य -पालक पाल्याची संवेदनशीलता हळूहळू कमी करत आहेत. ते पाल्याशी जशी व्यवहारी भूमिका ठेवतात, तशीच भूमिका तो शिक्षक आणि समाजाशी ठेवताना दिसतो.
     गुरु शिष्याच्या नातेसंबंधात बदल व्हायला आणखी एक कारण आहे, ते म्हणजे  वर्गातील विद्यार्थी संख्या. विद्यार्थ्यांच्या गर्दीमुळे शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्याकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शंका त्याच्याजवळच राहातात. खासगी शिकवण्यांमुळे तर संवेदनशीलता आणखी बोथट झाली आहे. पैसे देऊन शिक्षण घेण्यामुळे शिक्षकाच्या प्रतिमेला किंमत उरली नाही.
     पाठ्यपुस्तकामध्ये असणारे त्रोटक आणि कालबाह्य ज्ञान. हेदेखील गुरु-शिष्याच्या नातेसंबंधाच्या बदलला कारणीभूत आहे. आज मध्यमवर्गीय घरांमध्ये संगणक आला आहे, स्मार्टफोन अवतरला आहे. यातून विद्यार्थ्याला घरबसल्या ज्ञान मिळत आहे. शाळेत मात्र शिक्षक कालबाह्य शिक्षणाचं रतीब घालतो आहे. त्यामुळे शाळेतलं शिक्षण निरुत्साही होत आहे. प्रचलीत शिक्षणपद्धतीमुळे विद्यार्थी आणि पालकांना कमी वेळेत, कमी श्रमात अधिक गुण मिळवून देणारं परीक्षा तंत्र हवं आहे. हे तंत्र वापरुन अध्यापन करणारा शिक्षक विध्यार्थ्यांना आणि पालकांना हवा आहे. विध्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाचे धडे देणारे, समाजमूल्यांची रुजवण करणारे शिक्षक अप्रिय वाटत आहेत.
     शिक्षक-विध्यार्थ्यांमधले नातेसंबंध दृढ करायचे असेल तर पहिल्यांदा शिक्षणपद्धती बदलली पाहिजे. परीक्षा तंत्राला दुय्यम स्थान असायला हवे. पाठ्यपुस्तके त्रोटक असू नयेत. नव्या तंत्रासह , ज्ञानासह विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. नवी साधने शाळांमध्ये अवतरली पाहिजे. शिक्षकांनी आपल्या अध्यापन विषयांबद्दलचे ज्ञान अद्ययावत ठेवले पाहिजे. त्याचबरोबर इतर विषयांचे ज्ञानदेखील आत्मसात केले पाहिजे.वेळेच्या चौकटी मोडून  विद्यार्थ्यांशी ज्ञानार्जन, हितगुज करणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांतील गुण हेरुन, त्याचा कल पाहून त्याप्रमाणे त्याला मार्गदर्शन देण्याच्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत.तरच विद्यार्थी-शिक्षकांमधील अपेक्षित नातेसंबंध पाहायला मिळेल.

Friday, August 21, 2015

लोकसंख्येचा विस्फोट आणि साधनांची घट     १९७०-७१मध्ये देशात वाढत चाललेल्या लोकसंख्येची मोठी चिंताजनक चर्चा होती. त्यावेळची लोकसंख्या जवळपास ५७ कोटी होती. पण लोकसंख्येचा वाढता वेग लोकांच्या लक्षात येत होता. वृत्तपत्रांमध्ये, नियतकालिकांमध्ये मोठेच्या मोठे रकाने भरून येत होते. लोकसंख्येच्या विस्फोटाच्या धोक्याचा लोकांनी धसका घेतला होता. विद्वान मंडळी येत्या दशकांमध्ये आपल्याला किती धान्य, कपडे, घरे आणि रोजगार लागणार याची हबकी भरवणारी आकडेवारी सांगत होते. असेही सांगितले जात होते की, लोकसंख्या अशीच वाढत राहिली तर माणसांना घोड्यासारखी उभ्याउभ्याच झोप घ्यावी लागेल.
     आपण सुदैवी आहोत. विज्ञानाची आपल्याला साथ मिळाली आहे. आज देशाची लोकसंख्या सवा कोटी आहे, पण त्यावेळी जितकी कल्पना केली होती तितकी काही वाईट परिस्थिती आपल्यावर ओढवली नाही. आपल्याकडे सगळं काही भरभरून आहे असं नाही, पण आपली अवस्था इतकी वाईटदेखील नाही. पण यावरून मोहरूनही जायचं नाही. लोकसंख्येचा भस्मासुर आपल्याला गिळंकृत करायला समोर उभा ठाकला आहे. वाढत्या लोकसंख्येला साधनांची कमतरता भासत आहे.
     आपली लोकशाही जगातली जुनी आणि सर्वात मोठी आणि तितकीच श्रेष्ठ आहे. आता तर आपल्याला हेदेखील मानावे लागेल की, जनतादेखील परिपक्व झाली आहे. ती सरकारवरच नव्हे तर विरोधकांवरसुद्धा लक्ष ठेवून आहे. प्रसारमाध्यमांचा तिसरा डोळा अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहाचला आहे; परंतु खेदाची बाब अशी की वादळाच्या गतीने घोंगावत येत असलेला लोकसंख्येचा विस्फोट थोपवायला कुणीच पुढे येताना दिसत नाही. देशव्यापी फक्त निरव शांतता आहे.
     १९७५-७६ मध्ये लोकसंख्यावृद्धी हा कळीचा मुद्दा बनला होता. पुढच्या निवडणुकीत विरोधकांसह सार्यांनी कॉंग्रेसला चीतपट केले. त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले, पण दुसरं अधिक दु: असं की, त्यानंतर राजकीय पक्षांनी लोकसंख्या नियंत्रणाचं नाव घेणंही बंद करून टाकलं. भीतीपोटी एका आवश्यक सरकारी कायद्याला ऐच्छिक करून टाकलं.
     शास्त्रज्ञ सांगतात की, हिंदुस्थान २०३० मध्ये १४५ कोटींचा जगातला सर्वात मोठ्या लोकसंख्येचा देश होईल. म्हणजे लोकसंख्येबाबतीत चीनपेक्षा पुढे जाईल. २०५० मध्ये हिंदुस्थानची लोकसंख्या १६० कोटींच्या आसपास असेल. सध्या १२५ कोटींमध्ये जगातला प्रत्येक सहावा माणूस हिंदुस्थानी आहे. सध्या कुठेही जा गर्दीच गर्दी. बाजार, बसस्टॅण्ड, रेल्वे स्टेशन, हॉटेल्स-रेस्टॉरण्ट, शाळा-कॉलेजेस अशा सगळ्या ठिकाणी गर्दीचं साम्राज्यच पाहायला मिळेल. प्रवासात तर नरकयातनाच सोसाव्या लागतात. हे सगळं पाहिल्यावर अशी चिंता वाटतेय की, उद्या आपण आपल्या मुलाबाळांसाठी कोणतं जग सोडून जाणार आहोत. १९४७ मध्ये जेव्हा आपण स्वतंत्र झालो होतो तेव्हा लोकसंख्या फक्त ३५ कोटी होती. ही गोष्ट सगळेच विसरले आहेत. चीनने आपल्या लोकसंख्येच्या नियंत्रणासाठी कठोर पावले उचलली. एक कुटुंब, एक मूल असा कायदा केला. आता त्यांची लोकसंख्यावाढ नियंत्रणात आहे. जेव्हा आपला भर    अप्रत्यक्षरीत्या लोकसंख्या वाढवण्यावर होता तेव्हा त्यांचा भर त्यांची ताकद वाढवण्यावर होता. आता चीन अमेरिकेनंतर दुसरा महाशक्तिशाली देश बनला आहे. आमच्या सगळ्या राजकीय पक्षांनी देशाच्या हितासाठी एक सामूहिक निर्णय घेऊन लोकसंख्या नियंत्रणाचा मजबूत असा कायदा करावा. तरच आपला देश खर्या अर्थाने महाशक्तिशाली बनेल. - See more at: http://www.saamana.com/lekh  21/08/2015