भारतीय दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या चित्रपट 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटु नाटु' या लोकप्रिय गाण्याने जगभरात धुमाकूळ घातला आहे, त्यात सध्या त्याचा कोरिओग्राफर प्रेम रक्षित खूप चर्चेत आहे.'नाटु नाटु' या गाण्यात अभिनेते रामचरण आणि ज्युनियर एनटीआर या दोघांनी केलेल्या उत्कृष्ट नृत्याने या गाण्याच्या लोकप्रियतेत मोठा हातभार लावला आहे. यामुळेच चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते, गीतकार आणि संगीतकार यांच्यासोबतच नृत्य दिग्दर्शक प्रेम रक्षितही सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या या शानदार नृत्यदिग्दर्शनाने भारतीय चित्रपटसृष्टीचा सातासमुद्रापार डंका वाजवला आहे. या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. आता या चित्रपटाला ऑस्करसाठी विविध श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे.
प्रेम रक्षित यांचा जन्म 14 डिसेंबर 1977 रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला. त्यांच्या कुटुंबात आई-वडिलांशिवाय त्यांना एक लहान भाऊ आहे. त्यांच्या पत्नीचे नाव राजलक्ष्मी आणि मुलाचे नाव परीक्षित आहे. तेलुगू आणि तमिळ भाषेतील ७० हून अधिक चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शन करणाऱ्या प्रेम रक्षित यांचे कुटुंब एकेकाळी खूप श्रीमंत होते. त्यांचे वडील हिरे व्यापारी होते आणि आई गृहिणी. 1993 मध्ये, काही कारणांमुळे, त्यांच्या वडिलांना त्यांच्या कौटुंबिक व्यवसायातून वेगळे व्हावे लागले आणि तेथून त्यांच्या कुटुंबाचे वाईट दिवस सुरू झाले. कुटुंब चालवण्यासाठी वडिलांनी चित्रपटांमध्ये नृत्य दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. प्रेम रक्षितदेखील एका शिंपीच्या दुकानात छोटी मोठी कामं करू लागला. प्रेम रक्षितच्या म्हणण्यानुसार, वडिलांच्या कमाईत घर चालवणे मुश्किल होते.
त्यांचे वडील डान्स युनियन फेडरेशनचे सदस्य होते. कधी कुठे काम नाही मिळाल्यास ते खूप निराश व्हायचे. कुटुंबाच्या विवंचनेमुळे व्यथित होऊन त्यांनी एकदा आत्महत्या करण्याचाही विचार केला होता, कारण त्यांना वाटले की जर आपण आपला जीव दिला तर फेडरेशन नियमानुसार त्यांच्या कुटुंबाला 50,000 रुपये देईल, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाला मोठी मदत होईल. रक्षित सांगतात की, आत्महत्या करण्याच्या उद्देशाने त्यांनी कोणाकडून तरी सायकल मागून घेतली आणि चेन्नईच्या मरीना बीचकडे निघाले, पण तिथे पोहोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की ज्याची सायकल त्यांनी आणली होती ती व्यक्ती त्यांच्या कुटुंबाकडे सायकल मागायला गेले तर काय होईल? उधार घेतलेल्या सायकलने रक्षित यांना आत्महत्या करण्यापासून रोखले. जेव्हा रक्षित घरी पोहोचले तेव्हा त्याच्या वडिलांना सांगितले की त्यांना एका चित्रपटात बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम मिळाले आहे.
2004 मध्ये 'विद्यार्थी' या तेलुगू चित्रपटामधून त्यांनी नृत्य दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आणि 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या राजामौली यांच्या 'छत्रपती' चित्रपटाने त्यांना मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. 'विद्यार्थी' चित्रपटानंतर त्यांना फारसे काम मिळत नव्हते आणि अशा कष्टाच्या दिवसात त्यांनी राजामौली यांच्या मुलांना नृत्यही शिकवले. तोपर्यंत राजामौली यांना हे माहीत नव्हते की रक्षितने 'विदयार्थी' चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. एके दिवशी त्यांनी राजामौलींना सत्य सांगण्याचे धाडस केले. यानंतर राजामौली यांनी त्यांच्यावर 'छत्रपती' चित्रपटाच्या कोरिओग्राफीची जबाबदारी सोपवली. 'छत्रपती'मधून रक्षितच्या कामाचे सर्वत्र कौतुक होऊ लागले. पुढे अनेक चित्रपटांमध्ये नृत्य दिग्दर्शनाचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. 'छत्रपती'च्या माध्यमातून त्यांचे राजामौली यांच्याशी असलेले नाते आजतागायत कायम आहे. या दोघांच्या मेहनतीमुळेच आता त्यांना ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत आणले आहे.
हे गाणं कोरियोग्राफ करण्यासाठी लागले दोन महिने लागले आणि शूटिंग पूर्ण व्हायला 20 दिवस लागले. प्रेम सांगतात की, मी हे गाणं एक आव्हान म्हणून स्वीकारलं. खरंतर, एका स्टारसोबत काम करणं सोपं असतं पण मी या गाण्यात दोन सुपरस्टारसोबत काम केलं आहे. दोन सुरपरस्टार्सची डान्सिंग स्टाईल आणि एनर्जी वापरून गाण्याची कोरियोग्राफी करणं एक आव्हान होतं. या गाण्याच्या कोरियोग्राफीसाठी दोन महिने लागले. तुम्हाला जाणवेल की ते दोघं जेव्हा चालतात तेव्हा त्यांच्या चालीतील समानता, पर्फेक्शन यावर खूप काम करण्यात आलं आहे. दोघांसाठी 110 मूव्स तयार केल्या होत्या. गाण्याच्या शूटींगविषयी ते सांगतात की. या गाण्याच्या शूटींगसाठी 20 दिवस लागले होते. तसेच 43 रीटेक्सनंतर शूटींग पूर्ण झालं.या 20 दिवसांमध्ये रिहर्सलसोबतच आम्ही गाण्याचं शूटींग पूर्ण केलं. कोरियोग्राफीसाठी 2 महिने लागले होते. जेव्हा राजामौली सर माझ्याकडे हे गाणं घेऊन आले तेव्हा मी घाबरलो होतो. दोन सुपरस्टार्सना एकाच वेळी नाचवणं सोपी गोष्ट नाही. माझ्यावर या गोष्टीचं प्रेशर होतं की दोन सुपरस्टार्सपैकी कुणीही एकमेकांपेक्षा कमी वाटायला नको. दोघांना इक्वल एनर्जीमध्ये दाखवणं हे माझं ध्येय होतं. या गाण्याचं शूटिंग युक्रेनमध्ये झालं आहे.
-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली