Tuesday, January 17, 2023

छोट्या पडद्याची गरज बड्या स्टार मंडळींना

चित्रपटाचे प्रमोशन असो किंवा कोणतीही नवीन घोषणा असो, चित्रपटातील कलाकारांना छोट्या पडद्याचा आधार घ्यावा लागत आहे. रिअॅलिटी शोपासून ते फिक्शन शोपर्यंत, मोठे स्टार्स त्यांच्या चित्रपट आणि वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. इतकंच नाही तर अमिताभ बच्चनपासून सलमान खानपर्यंत आणि रेखापासून माधुरी दीक्षितपर्यंत सगळ्यांनाच छोट्या पडद्याशी जोडल्याचा आनंद वाटतोय. कोविड-19 दरम्यान ओटीटीचा डंका वाजला. चित्रपटगृहे बंद असल्याने प्रेक्षकांनी ओटीटीला पसंदी देत त्यावरील सिनेमा, वेबसिरीजची मजा लुटली. आता छोटा पडदा मागे पडेल असे लोकांना वाटले, पण त्याने लोकांच्या हृदयात असे स्थान निर्माण केले आहे की टीव्ही मालिका आणि रिअॅलिटी शो आजही लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर आहेत.आता 2023 मध्येही छोट्या पडदा मोठा धमाका करणार आहे. छोट्या पडद्यावरील अनेक हिट मालिकांच्या आमूलाग्र बदलाची बातमी आली आहे. 2023 मध्ये अनेक नवीन चॅनेल्स सुरू झाली आहेत आणि त्याचबरोबर अनेक नवीन मालिका सुरू झाल्या आहेत.

2023 मध्ये प्रसिद्ध मालिकांमध्येही काही नवे बदल आणि नवा अंदाज दिसून येणार  आहे. निर्माता असित मोदी यांच्या मते यावर्षी 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये काही नवीन बदल पाहायला मिळतील. ही मालिका गेली कित्येक वर्षे पेक्षाकपसंदीच्या टॉप 10 मध्ये आहे. या मालिकेतून बाहेर पडणाऱ्या कलाकारांची जागा लवकरच नवे कलाकार घेतील. यासाठी असित मोदी खास पत्रकार परिषद घेऊन नव्या कलाकारांची ओळख करून देणार आहेत. 2023 मध्ये पोपटलालचे लग्न आणि दयाबेनची एंट्री  होण्याची शक्यता आहे. मात्र दयाबेन दिशा वाकानी आहे की नवीन अभिनेत्री, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चांगला टीआरपी  असलेल्या 'अनुपमा' मालिकेमध्येही बरेच काही नवीन बदल दिसणार आहे.  'अनुपमा'मध्ये नवीन रोमँटिक ट्रॅक देखील पाहायला मिळणार आहे. त्याच वेळी 2023 मध्ये 4000 भाग पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर असलेली 'ये रिश्ता क्या कहलाता है' ही मालिका नवीन नात्याची सुरुवात करणार आहे. त्याचबरोबर 'भाभी जी घर पर है' या अँड टीव्हीवरील  सर्वात हिटमालिके मध्ये नवीन पात्रांची एन्ट्री पाहायला मिळणार आहे.  त्याचे शूटिंग दुबईत नवीन ठिकाणी केले जाऊ शकते.  यामध्ये हॉरर कॉमेडीही दाखवण्यात येणार आहे. 

2023 मध्ये अनेक नवीन शो प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. अनेक सुरुही झाले आहेत. जसं की, 'वागले की दुनिया' (ही मालिका 1988 मध्ये आली होती.) ही मालिका 2023 मध्ये नवीन पद्धतीने सादर केली जात आहे. याशिवाय बॅरिस्टर बाबू भाग 2, दुर्गा आणि चारू याआधीपासूनच प्रसारित होऊ लागले आहेत. 'धर्मपत्नी'चेही प्रसारण होत आहे. देव जोशी अभिनीत सब चॅनलचा प्रसिद्ध शो बालवीर सीझन 3 नव्या वर्षात 2 जानेवारीपासून प्रसारित होऊ लागला आहे. टीव्ही क्वीन एकता कपूर ब्युटी अँड द बीस्ट या हॉलिवूड चित्रपटावर आधारित मालिका घेऊन येत आहे ज्यात कुशल टंडन मुख्य भूमिकेत आहे. करण कुंद्रा, गश्मीर महाजनी आणि रिम शेख यांचा हॉरर रोमँटिक शो 'भेडिया' लवकरच कलर्स वाहिनीवर येणार आहे. स्टार प्लसवर 'तेरी मेरी डोरिया', झी टीव्हीवर 'मैत्री', सोनी सबवर 'ध्रुव तारा' लवकरच येणार आहेत. सुष्मिता मुखर्जी आणि काजल चौहान अभिनीत 'मेरी सास भूत है' रिलीजसाठी सज्ज आहे.

अग्निसाक्षी एक समझौता आणि त्रिकोणी प्रेमकथा इश्क में घायलं लवकरच कलर्स वाहिनीवर दिसणार आहे. मास्टर शेफ सीजन 7 स्टार प्लसवर शरारत 2 आणि थोड़ा जादू थोड़ी नजाकत, स्टार भारतवर मन की आवाज प्रतिज्ञा 2, स्टार प्लसवर रुद्रकाल, जी टीवी वर रब से दुआ, शेमारू उमंग चॅनलवर राजमहल दाकिन्न का रहस्य, सोनी टीवीवर कथा अनकही, सब टीवीवर दिल दिया गल्ला ,स्टार भारतवर आशाओं का सवेरा धीरे-धीरे 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.जुनून चित्रपटावर आधारित बाघीन या मालिकेव्यतिरिक्त मोलकी सीझन 2 रिलीजसाठी सज्ज आहे. या व्यतिरिक्त 2023 मध्ये प्रसिद्ध रियलिटी शो कपिल शर्मा शो, बिग बास 17, डांस दीवाने, झलक दिखला जा, डांस प्लस इत्यादी रियलिटी आणि डांस शोदेखील नव्या अंदाजात प्रदर्शित होणार आहेत. छोट्या पडद्याची ही नवीन तयारी आणि त्याची प्रचंड लोकप्रियता बघता असा निष्कर्ष निघतो की मोठ्या पडद्याचा दबदबा असो की ओटीटीचा, परंतु प्रत्येक घराघरात पोहोचलेला छोटा पडदा, त्याची प्रतिष्ठा आणि त्याची क्रेझ कधीच संपणार नाही. छोटा पडदा लहान असला तरी त्याचा प्रेक्षकवर्ग मात्र प्रचंड आहे.

No comments:

Post a Comment