Friday, January 6, 2023

बिमल रॉय : हिंदी चित्रपटसृष्टीला नवी दिशा देणारे दिग्दर्शक

ज्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये धार्मिक आणि ऐतिहासिक विषयांचे वर्चस्व होते, तेव्हा बिमल रॉय यांनी स्वत:ला सामाजिक आणि उद्देशपूर्ण चित्रपटांपुरते मर्यादित केले.शेतकरी, मध्यमवर्ग आणि महिलांचे प्रश्न त्यांनी आपल्या चित्रपटांतून मांडले. ते त्यांच्या काळातील ज्वलंत प्रश्नांपासून कधीही दूर गेले नाहीत.  बिमल रॉय यांनी प्रसिद्ध साहित्यकृतींवर अप्रतिम चित्रपटही बनवले. तगडी कथा-पटकथा-संवाद, उत्कृष्ट चित्रीकरण आणि सुरेल गाणी-संगीत ही त्यांच्या सर्वच चित्रपटांची ओळख आहे. बिमल रॉय यांच्याशिवाय हिंदी सिनेमाची कल्पनाच करता येत नाही, हे एक सत्य आहे. बिमल रॉय हे खरंच हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नक्षत्र आहे, ज्याची चमक कधीच फिकी पडणार नाही. फिल्मी दुनियेत त्यांचा सिनेमा 'बिमल रॉय स्कूल' या नावाने ओळखला जातो. ज्यांच्याकडून अनेक पिढ्या प्रशिक्षित होत राहतील.  भारतीय चित्रपटसृष्टीत असे वेगळे स्थान फार कमी चित्रपट दिग्दर्शकांनी मिळवले आहे.

बिमल रॉय यांनी खूप सुंदर चित्रपट भारतीय प्रेक्षकांना दिले. जीवनाच्या वास्तवतेला कलात्मकता आणि काव्यात्मकतेचं सौंदर्यलक्ष्यी परिणाम देऊन रुपेरी पडद्यावर एखाद्या उत्कट कवितेसारखं चितारणाऱ्या , भारतीय जीवनशैलीचं हृद्य दर्शन घडवणाऱ्या , साहित्यकृती, अमर व्यक्तिरेखा यांचं प्रतिबिंब ज्यात आहे अशा श्रेष्ठ चित्रपटांची देणगी भारतीय रसिकांना दिली.  निर्माता, दिग्दर्शक, कॅमेरामन बिमल रॉय यांचा जन्म 12 जुलै 1909 रोजी पूर्व बंगालमधील ढाक्क्याजवळच्या सौपूर या गावचे जमीनदार हेमचंद्र रॉय यांच्या संयुक्त विशाल अशा कुटुंबात झाला. अत्यंत संवेदनशील, पण बुद्धिमान असलेला हा मुलगा निसर्गाचा वेडा होता.
ब्रिटिश शाळेत त्याचं शिक्षण झालं. पेंटिंग काढण्यात , व्हायोलिन वाजवण्यात तर तळ्याकाठी , आमराईत रमणारा हा मुलगा मितभाषी होता. ढाक्क्याच्या जगन्नाथ महाविद्यालयात इंटरला असताना वडिलांचं निधन झालं. भावंडं इंग्लंड, कोलकाता येथे शिकत होती. आईजवळ बिमल एकटा होता. त्यानंतर घरातल्या मुनिमनं सर्व संपत्तीचा अपहार केला. जमीनदारी एका रात्रीत गेली. घर, जमीन, शेत, तलाव सर्व गेलं. दक्षिण कोलकात्यात शिक्षण सोडून आणि आईला घेऊन ते राहायला आले. त्या वेळी कोलकात्यात 'न्यू थिएटर्स' ही नामवंत चित्रनिर्मिती संस्था उदयास येत होती. लहानपणी दुर्गापूजेत सर्वांना जमवून 'यहुदी की लडकी' किंवा ' मिसर कुमारी' सारखी नाटकं बसवणारे बिमलदा , कॅमेरा चालवण्यात तरबेज होते. न्यू थिएटरमध्ये दिग्दर्शक- कॅमेरामन नितीन बोस यांचे सहायक कॅमेरामन म्हणून रुजू झाले. न्यू थिएटर्सच्या मीरा, गृहदाह, देवदास, माया, मुक्ती, अभिनेत्री अशा चित्रपटांतून हे नाव चमकू लागलं. पोस्टरवर प्रमुख अभिनेत्यांच्या जोडीला बीमलदाचं नाव प्रकाशित होत असे. ते स्टार कॅमेरामन झाले. प्रत्येक अभिनेत्री त्यांच्याकडून फोटो काढून घेण्यास उत्सुक असत. तरुण बिमलदांवर शरत साहित्याचा प्रभाव होता. प्रथमेश बारुआबद्दल , नितीन बोसबद्दल आकर्षण होतं. 1937 मध्ये मनोबिनासारख्या सुविद्य , प्रगल्भ पत्नीमुळे त्यांच्या जीवनात नवीन पर्व सुरू झालं. बीमलदांना आता स्वतंत्रपणे काम करण्याची इच्छा होती. तशी संधी चालून आली. त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट एक सप्टेंबर 1944 रोजी 'चित्रा' सिनेमा गृहात प्रदर्शित झाला. 'उदयेर पाथे' नवसिनेमाचा, नवविचारांचा संदेश घेऊन आला. बंगाली तरुणांत त्यांची खूप चर्चा होई. 'उदयेर पाथे' च्या हिंदी आवृत्तीच्या - हमराहीच्या निमित्तानं बिमलदा प्रथमच मुंबईत आले. पण काही काळ कोलकात्यात अस्थिर वातावरणात काढल्यानंतर ते मुंबईस राहायला आले. शाळेतल्या मित्राने हितेश चौधरीने त्यांना मुंबईत आणलं. येताना ऋषिकेश मुखर्जी, असीत सेन, नझीर हुसेन अशी गुणी माणसंहि त्यांच्याबरोबर होती. हितेन चौधरी यांनी ' माँ' चित्रपटाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. माँ चांगला चालला. देविकारणीच्या बंगल्यात बिमलदांचे वास्तव्य होते. मनोबीना सर्वांची - सहकारयांची जातीनं देखभाल करीत . त्यातूनच 'बिमल रॉय प्रॉडक्शन' उभे राहिले. सलील चौधरी ' रिक्षावाला' ही त्यांची कथा घेऊन आले आणि ' दो बिघा जमीन' ही अजोड कलाकृती प्रेक्षकांसमोर आली. बलराज साहनी यांनी शंभू महातो या गरीब शेतकऱ्याची अविस्मरणीय भूमिका केली आणि हिंदी चित्रपट सृष्टीत बंगाली खादीचा पेहराव घातलेले मितभाषी बिमल रॉय दाखल झाले. त्याच सुमारास 1953 मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेला  'परिणिता' आला आणि बिमलदांनी अनेक पारितोषिक जिंकली. चित्रपटाच्या इतिहासात बिमल रॉय युग सुरू झाले.
'देवदास', 'मधुमती', 'बंदिनी', ' सुजाता', 'परख' मधून बिमलदांनी वास्तवता, जीवनाचे गहिरे रंग, व्यक्तिरेखा, निसर्ग, संगीत यांचे रंग भरले. त्यांच्या आवडत्या शरच्चंद्र यांच्या कादंबऱ्यांवर हळुवारपणे 'बिराज बहु' , देवदास, परिणिता सारखे चित्रपट केले. त्यांचे सहकारी, चाहते, मित्र असलेले ऋषिकेश मुखर्जी , असीत सेन, बासू भट्टाचार्य आदी दिग्दर्शकांनी बिमल रॉय स्कूलची परंपरा पुढे चालू ठेवली. संयत अभिनय, वास्तवता, आणि कलात्मकता यांचं भान बिमलदांची देणगी आहे.
अविश्रांत काम करणाऱ्या बिमलदांना अर्ध्या वाटेत फुफ्फुसाच्या कर्करोगाने गाठलं. डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. पण युनिटमध्ये कुणीही विनावेतन राहिलं नाही. वांद्र्याच्या 'गोदीवाला' बंगल्यात अखेरपर्यंत भाडेकरू म्हणून राहिले. 8 जानेवारी 1966 रोजी बिमलदांनी अखेरचा श्वास घेतला.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment