1995 मध्ये झी वाहिनीवरून 'हम पांच' नावाची एक विनोदी मालिका प्रसारित होत होती. यात बहिऱ्या आणि जाड भिंगाचा चष्मा आणि ढगळ कपडे घालणाऱ्या तिसऱ्या बहिणीची भूमिका विद्या बालनने केली होती. पाचजणींमध्ये यथातथाच दिसणारी, अजिबात ग्लॅमरस नसणारी व्यक्तिरेखा तिने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच साकारली होती. ही मालिका प्रचंड गाजली. यातल्या सर्वच व्यक्तिरेखा घराघरात पोहचल्या. इथे महत्त्वाचा मुद्दा असा की, व्यक्तिरेखा कुठलीही असली तरी आपल्या व्यक्तिमत्त्वात ती व्यक्तिरेखा साकारण्याची क्षमता आहे, असा विश्वास विद्याच्या ठायी होता,हे महत्त्वाचे. त्यामुळेच ती विविध छटेच्या भूमिका करूनही ती प्रत्येक वेळी नव्या रुपात चाहत्यांसमोर येते. वेगळ्या रुपात आधीच्या भूमिकेची छाप तिच्यावर नसते.
म्हणूनच उत्तम अभिनेत्री म्हणून विद्याने आज हिंदी चित्रपट सृष्टीत आपली स्वतःची ठाशीव मोहोर उमटवली आहे.
आतापर्यंत आपल्या फिल्मी करिअरमध्ये विद्याने बहुविध अशा भूमिका साकारल्या आहेत. रेडिओ जॉकी, प्रोजेरियाने पिडित असलेल्या 12 वर्षाच्या मुलाची आई आणि याशिवाय प्रेमिका ते फिजिकली चॅलेंज्ड गर्ल अशा किती किती तरी भूमिका तिने केल्या आहेत. आपल्या प्रत्येक नव्या चित्रपटात ती नव्या रुपात दिसली आहे. आपल्या अभिनयाची वैविधतता दाखवली आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक वेळा तिचा अभिनय सहजसुंदर आणि विश्वसनीय वाटतो. कदाचित हाच खरा अभिनय आहे, हीच कलाकारी आहे, असे म्हटले पाहिजे. या काळातल्या दुसर्या कुठल्याच अभिनेत्रीने इतक्या अनेकविध भूमिका साकारल्या नाहीत.
'हम पांच' नंतर विद्याने अभिनय हेच करिअर म्हणून निवडले. वडिलांच्या सांगण्यानुसार तिने पहिल्यांदा सेंट झेवीयर्स महाविद्यालयातून बी.ए. व मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आणि या काळात ती अभिनय क्षेत्रातही धडपडत होती. या काळात तिनं गौतम गलदर दिग्दर्शित 'भालो' (2003) या बंगाली चित्रपटात काम केलं होतं.अभिनयासाठी विद्याला 'आनंदलोक' पुरस्काराने गौरविण्यात आले. काही जाहिरात केल्या. त्याकाळात विद्याची एक स्कुटर ची जाहिरात गाजत होती. याचदरम्यान विधू विनोद चोप्रा आणि प्रदीप सरदार 'परिणिता' (2005) साठी मुख्य नायिकेच्या शोधात होते. त्यांनी हा चेहरा हेरला. परिणिता' प्रचंड गाजला. करिअरच्या प्रारंभी विद्याने ऍडवरटायजिंग, सिरिअल, रीजनल चित्रपट, म्युझिक व्हिडिओ अशा विविध क्षेत्रात नशीब अजमावले आहे. बराच स्ट्रगल केल्यावर मग कुठे तिला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. चित्रपटातील आतापर्यंतचा प्रवास विद्यासाठी सोपा नव्हता. कित्येकदा तिला रिजेक्टही करण्यात आले. पण विद्याने हार मानली नाही. खरं तर विद्या चांगले काम मिळावे यासाठी प्रार्थना करायची म्हणे! कठीण काळात मनापासून केलेल्या प्रार्थनेचा परिणाम होतो, यावर तिचा विश्वास आहे. त्यानुसार तिला चांगले दिवस आले आहेत. ‘परिणीता’ चित्रपटाद्वारे चंदेरी दुनियेत पदार्पण करून पदार्पणातच पुरस्कार मिळविल्यानंतर विद्या बालनने ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘भूलभुलय्या’, ‘इश्किया’, ‘पा’ यांसारख्या चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. 'परिणिता' चित्रपटात ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातील स्वाभिमानी मुलीच्या भूमिकेत होती. विद्याने विचारसुद्धा केला नव्हता की, हा चित्रपट मोठे यश मिळवेल. आणि आपल्या कामाची प्रशंसा होईल. पण या चित्रपटात काम केल्याचा तिला खूप आनंद वाटतो. यानंतर विद्याने 'लगे रहो मुन्नाभाई' मध्ये रेडिओ जॉकी बनली. यात 'गुड मॉर्निंग मुंबई' म्हणण्याच्या तिच्या विशिष्ट अंदाजाने तर तिने प्रेक्षकांना घायाळ करून टाकले. यानंतर आलेल्या 'गुरू' मध्ये विद्याचा रोल छोटा असला तरी पायाने अपंग, आणि व्हीलचेअरवर बसलेल्या मुलीची भूमिका निभावून तिने पुन्हा प्रेक्षकांना आपल्या अभिनयाचे नवे रुप दाखवले. 'सलामे इश्कः द ट्रिब्यूट ऑफ लव' , ' एकलव्यः द रॉयल गार्ड', ; हे बेबी' पासून विद्या आपली टिपिकल इंडियन ब्युटी' वाली इमेज बदलण्याचा प्रयत्न केला.
भूलभुलैया' मध्ये मंजुलिका बनलेली विद्या 'डीसोसिएटीव आयडेंटिटी डिसऑर्डर' या एक प्रकारच्या मानसिक आजाराने पिडित होती. या चित्रपटात विद्याचा डांस आणि ड्रामाने पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपल्या नव्या पैलूची ओळख देऊन गेला.
बेबी', 'किस्मत कनेक्शन', 'हल्लाबोल' चित्रपट चालले नाहीत. बालकी दिग्दर्शित 'पा' (2009) चित्रपट केला. अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारणारी ही आजच्या जमान्यातील पहिली अभिनेत्री. त्यातली तिची सहजता वाखाणण्यासारखी होती. तिने 'इष्कीया'(2010) मध्ये जी अदाकारी साकारली ते पाहताना प्रेक्षक अक्षरशः खल्लास झाले. नंतर तिने यु टर्न घेत 'नो वन किल्ड जेसीका'(2011) सारखा वेगळा चित्रपट केला. या सोज्वळ, देखण्या,ग्लॅमरची नवी बाजू दाखवणाऱ्या अभिनेत्रीला आपण हिरोईन आहोत, त्यामुळे पडदयावर परफेक्टच दिसलं पाहिजे, या गोष्टीची कधीच फिकीर नव्हती. तिचा एखादा चित्रपट प्रचंड ग्लॅमरस तर दुसऱ्या त त्याचा लवलेशही नाही. कधी तिचा वावर स्वप्नवत वाटतो तर त्याचवेळी दुसऱ्या एखाद्या चित्रपटात ती आपल्याच घरातील वाटते. आणि हे सगळे शक्य झालं ते तिच्या ठायी असणाऱ्या अभिनय क्षमतेमुळेच! विद्या म्हणते की, प्रत्येकवेळा काही तरी नवीन करण्याची मनीषा बाळगून असते. स्वतः ला रिपीट करायला तिला आवडत नाही. कामात, भूमिकेत स्वतः ला झोकून द्यायला विद्याला आवडते. एक ऍक्टर म्हणून माझ्यात काही नवीन करण्याची ऊर्मी आहे. कदाचित या कारणामुळेच तिला प्रत्येकवेळेला काही तरी नवीन करण्याची संधी मिळत असावी.
'पा' मध्ये विद्याने एका अशा मुलाच्या आईची भूमिका केली आहे, जो 12 वर्षाचा मुलगा आहे. व तो 'प्रोजेरिया' नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. अशा मुलाच्या आईची भूमिका करणं काही सोपी गोष्ट नाही. पण विद्याने या भूमिकेलासुद्धा न्याय दिला. विद्या सांगते की ही भूमिका जगण्याची प्रेरणा तिला आईकडून मिळाली. तिची आई पाच वर्षाची होती, तेव्हा तिच्या आजीचं निधन झालं होतं. एक चांगली आई बनणं तिच्या आईचे तिच्या आयुष्यातले मिशन होते. आईने तिचा चांगल्या प्रकारे सांभाळ केला. ती म्हणते की, या चित्रपटातला अभिनय पाहून एका महिलेने फोन केला होता. त्यात ती तुमच्यासारखी आई बनू इच्छिते, असे म्हणाली होती. इतक्या चांगल्याप्रकारे आईची भूमिका साकारायला मिळाले, हे माझे भाग्यच , असे विद्या सांगते.
'इश्किया'मध्ये विद्याने पुन्हा एकदा जरा हट के काम केले. अपशब्द वापरण्यापासून चुंबनपर्यंतची दृश्ये या चित्रपटात होती. पण विद्या स्वतः ला यासाठी तयार केले. दिग्दर्शक अभिषेक चौबे यांनी तिला 'इश्किया'ची स्क्रिप्ट ऐकवली, तेव्हा ही भूमिका करू शकू की नाही, या विषयी विश्वास नव्हता. परंतु आव्हान पेलण्याची ताकद तिच्यात आहे. त्यामुळे तिने ही भूमिका सहज पेलून नेली. कामाचे प्रचंड कौतुकही झाले. विविध प्रकारच्या भूमिका करणे मला आव्हानात्मक वाटते. त्यामुळे ‘किस्मत कनेक्शन’मधील भूमिकेपेक्षा ‘इश्कियाँ’मधील भूमिका अधिक जवळची वाटते. चरित्र अभिनेत्री म्हणवून घेण्यापेक्षा विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री म्हणवून घेणे मला अधिक भावते , असे तिने एका मुलाखतीत म्हटले आहे. 'इश्किया' नंतर 'नो वन किल्ड जेसिका' मध्ये विद्याने सबरिना लालच्या डिग्लॅमरची भूमिका स्वीकारली. या चित्रपटातही विद्याच्या कामाचे कौतुक झाले.
आपली पूर्वीची सोज्वळ अभिनेत्रीची प्रतिमा संपूर्णपणे बदलून टाकण्याचे आव्हान पेलून आपल्या सहजाभिनयाची उत्कृष्ट झलक विद्या बालनने आताच्या 'डर्टी पिक्चर' चित्रपटामध्ये दाखवली आहे. तिच्या यापुढील अभिनय कारकीर्दीला वेगळे वळण देणारा हा चित्रपट आहे, असे म्हणायला हरकत नाही. ती अभिनेत्री तर उत्कृष्ट आहेच; पण त्याशिवाय ती प्रयोगशीलही आहे. हिरोईनपणाचं ग्लॅमरही वेळप्रसंगी बाजूला ठेवत भूमिकेला न्याय द्यायचा ती शंभर टक्के प्रयत्न करते. अलिकडे तिला डोळ्यांसमोर ठेऊन संहिता लिहिली जात आहे, यासारखे तिचे आणखी दुसरे ते यश कोणते? भूमिकेसाठी वाट्टेल ती मेहनत घ्यायला ती तयार आहे.
सिल्क स्मिता या बोल्ड अभिनेत्रींच्या जीवनावर आधारित असलेल्या 'डर्टी पिक्चर्स' (2011) केला. तिच्या बोल्ड रूपाने सगळेच अचंबित झाले. त्यावर्षी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पुरस्कार मिळाला. यापूर्वी तिला 'परिणिता' साठी पदार्पणाचा, 'पा'मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाच होता. नंतर ही तिला 'कहानी'(2012), 'तुम्हारा सुलू'(2017) या चित्रपटांसाठीही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. फक्त पुरस्काराने तिच्या अभिनयाचे मोजमाप करणे चुकीचे आहे. पण तिचा स्वतःच्या अभिनय क्षमतेवर असलेला विश्वास आणि वेगळं काही तरी करण्याची धडपड यामुळे तिच्या अभिनयाचा साक्षात्कार पाहायला मिळाला.'कहानी' (2012) या सुजॉय घोष दिग्दर्शित चित्रपटात तर तिने अख्खा चित्रपट आपण सहज पेलू शकतो, हे दाखवून दिले. एका अभिनेत्रींच्या बळावर चित्रपट चालू शकतो, 'कहानी' पाहताना पटतं. बऱ्याच कालावधी नंतर ती मार्च 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जलसा' द्वारे प्रेक्षकांसमोर आली. तीही हटके भूमिका घेऊनच. यातील तिच्या कामाचे कौतुक आहेच.या चित्रपटात विद्या बालनने भूमिका उत्तम प्रकारे साकारली आहे. तिने महिला पत्रकाराची भूमिका साकारताना बारकावे अचूक टीपलेत. स्पष्टवक्तेपणा तिच्या देहबोलीमधूनच दिसून येतो. त्यामुळे तिच्या अभियानाचे नेहमीप्रमाणे कौतुक होत आहे. आता ती सिद्धार्थ रॉय यांच्याशी लग्न करून संसारात रममाण झाली असली तरी तिने अभिनय क्षेत्र सोडलेले नाही. अर्थात तिचे अजून चित्रपट येणार आहेत.भारत सरकारने तिला पद्मश्री (2014) पुरस्कार देऊन तिचा गौरव केला आहे. 'अपयश हा यशाकडे जाण्याचा मार्ग असतो.' हा तिचा आपल्यासाठी संदेश आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment