Thursday, January 12, 2023

ऐतिहासिक चित्रपटांची परंपरा यंदाही कायम

हिंदी सिनेमाची सुरुवात पौराणिक, धार्मिक बरोबरच ऐतिहासिक पार्श्वभूमीवर मूकपटाने झाली होती.याचं कारण हे की जनमानसात यांच्याशी जुडलेल्या गोष्टी, किस्से,कथा-कहाण्या आणि घटना माहीत होत्या,लक्षात होत्या आणि भाषेशिवाय सिनेमा समजून घ्यायला सोपे पडत होते. नंतर सिनेमा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर बनण्याचा काळ सुरू झाला. शिवाय ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले सिनेमे प्रत्येक दशकात बनू लागले. आजदेखील सिनेनिर्मात्यांना त्यात स्वारस्य असल्याचे आगामी चित्रपटांच्या घोषणांवरून दिसून येत आहे. मूकपटाच्या काळात लोकप्रिय पौराणिक कथांवर सिनेमे बनवण्याचा एकप्रकारे पूरच आला होता. रामायण आणि महाभारत संबंधित सिनेमे मोठ्या प्रमाणात बनले. 'कंस वध', 'लव कुश', 'कृष्ण सुदामा', 'महाभारत', 'वीर अभिमन्यू', 'राम रावण युद्ध', 'सीता वनवास' सारखे सिनेमे मोठ्या प्रमाणात पसंद केले गेले. याचबरोबर ऐतिहासिक पार्श्वभूमीवर बनलेल्या ‘सम्राट अशोक’, ‘कालिदास’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘छत्रपति संभाजी’, ‘राणा प्रताप’ आदी  मूकपटांना सिनेरसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. नंतर सामाजिक सिनेमांचा काळ आला. 

मूकपट लोक मोठ्या चवीने पाहत होते कारण, लोकांसाठी पडदयावरच्या हालत्या-डुलत्या सावल्या त्यांच्यासाठी आश्चर्याचा विषय होता. ऐतिहासिक सिनेमांना लोकांनी पसंद केल्याने मोठ्या संख्येने अशा सिनेमांची निर्मिती व्हायला लागली. बहुतांश सिनेमे राजा-महाराजा,प्रसिध्द योद्धे आणि संतांच्या जीवनावर बनत होते. ऐतिहासिक सिनेमे प्रत्येक काळात बनले आणि आजदेखील बनत आहेत. स्वातंत्र्यानंतर ऐतिहासिक चित्रपटांचा जोर वाढला. या काळात सशक्त दावेदार होते सोहराब मोदी आणि त्यांची कंपनी मिनर्वा मूविटोन.त्यांनी 'पुकार', 'सिकंदर', 'पृथ्वीवल्लभ', 'मिर्झागालिब' सारखे सिनेमांची निर्मिती केली. 1952 मध्ये त्यांनी 'झांशी की रानी' चित्रपटाची निर्मिती केली, ज्यात झांशीच्या राणीची भूमिका त्यांची पत्नी मेहताब यांनी साकारली.

यानंतर दोन वर्षांनी मिर्झा गालिब यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती झाली,ज्याचे लेखन राजेंद्र सिंह आणि सआदत हसन मंटो यांनी केले. या काळात कोणी मुगल सम्राटांच्या जीवनावर आधारित तर  कुणी शिवाजी महाराज आणि मराठा शासकांवर चित्रपट बनवत होते. स्वातंत्र्यानंतर एका बाजूला ‘सलीम अनारकली’ ‘मुगले आजम’, ‘जहांगीर’, ‘ताजमहल’ सारखे काही भव्य चित्रपट बनले, तर दुसऱ्या बाजूला देशभक्तीवर आधारित ‘हकीकत’, ‘हिंदुस्तान की कसम’, ‘शहीद’ सारखे काही यशस्वी पीरियड चित्रपटदेखील पाहायला मिळाले. हिंदी सिनेमा क्षेत्रातील त्रिमूर्ती- राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंद-यांच्या दशकांनंतर जेव्हा बॉलीवुडमध्ये आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान या तिकडीचा दबदबा वाढला तेव्हाही ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती सुरूच राहिली. अलीकडेच काही वर्षांत बनलेल्या ऐतिहासिक चित्रपटांमध्ये  कंगना रानौत अभिनीत आणि दिग्दर्शित ‘मणिकर्णिका’, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह अभिनीत ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पदमावत’, ऋत्विक रोशन अभिनीत ‘मोहेनजोदड़ो’ आणि ‘जोधा अकबर’.आमिर खान अभिनीत ‘मंगल पांडे’ आणि शाहरूख खानचा ‘अशोका’ आदी चित्रपटांनी हिंदी सिनेमा क्षेत्रात आपले स्थान बनवले.

ऐतिहासिक सिनेमांची निर्मिती करणं जितकं कठीण तितकंच रिलीज दरम्यान विवादावरून टीकाकारांना सामोरं जाणं कठीण असतं. खासकरून भारतात चित्रपटांच्या रिलीज दरम्यान दुखावलेल्या भावनांना वाट मोकळी केली जाते. खरं तर प्रत्येक दुसऱ्या ऐतिहासिक चित्रपटाला वाद विवादाचा सामना करावा लागतो. संजय लीला भसांळी यांच्या ‘पद््मावत’ चित्रपटाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. इतकंच काय या वादामुळे चित्रपटाच्या नावात बदल करावा लागला. त्यानंतर  ‘मणिकर्णिका’, 'सम्राट पृथ्वीराज' दरम्यानदेखील  अनेक वाद समोर आले. आमिर खानच्या ‘मंगल पांडे’ मधील एक चुंबन दृश्य आणि काही अन्य दृश्यांबाबत चित्रपटावर विवाद उभा राहिला. अशाच प्रकारे संजय लीला भंसाळी यांचा ‘बाजीराव मस्तानी’ देखील वादाच्या भोवऱ्यात अडकला. ‘जोधा अकबर’ मध्ये ऐतिहासिक भूमिकांमध्ये  छेडछाड केल्याप्रकारणावरून विवाद उभा राहिला. अशा चित्रपटांसाठी 200 ते 300 कोटी रुपये लागलेले असतात,त्यामुळे निर्मात्यांवर मोठा ताण येतो.

गेल्या वर्षभरात आलेल्या बहुचर्चित चित्रपटांवर नजर टाकल्यास वेगवेगळ्या बायोपिक आणि इतिहासपटांचंही त्यात नाव दिसतं. पण सत्य इतिहास आहे तसा मांडण्याऐवजी या दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा कल वास्तव घडामोडींना सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली अतिरंजित कल्पकतेने मांडण्याकडे दिसून आला. त्यातून बरीचशी राजकीय, सामाजिक आणि पर्यायाने आर्थिक गणितही साधली गेली.  गेल्या वर्षी अशा धाटणीचे बरेच सिनेमे  आले, त्यातल्या काहींना चांगलं यश मिळालं तर काही दणकून आपटले. त्यातल्या फ्लॉप सिनेमांची यादी करायची तर यशराज फिल्म्सच्या 'सम्राट पृथ्वीराज' चं नाव आधी घ्यावं लागेल. अक्षय कुमारने यात सम्राट पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारली होती. आशुतोष राणा, संजय दत्त, साक्षी तन्वर, सोनू सूद अशी तगडी स्टारकास्ट असूनही हा सिनेमा चालला नाही. त्यानंतर ब्रिटिश सत्तेच्या कालखंडातील गोष्ट घेऊन आलेल्या 'समशेरा' लाही अपयशाचं तोंड पाहावं लागलं. 2015 ला घडलेल्या दोहा- कोची विमान दुर्घटनेवर आधारित 'रनवे 34' हा सिनेमाही फारसा चालला नाही. 

एकीकडे बॉत्लीवूड यशापयशाच्यया  गर्तेत गटांगळ्या खात असताना, प्रादेशिक सिनेमांनी मात्र वेगवेगळ्या इतीहासपटांच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर वर्चस्व राखण्यात यश मिंळ्ठवलं.  यातलं  सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे 1000 कोटींहून अधिक कमाई करणारा ‘आरआरआर’ हा तेलुगू सिनेमा. या सिनेमात अल्लूरी सीताराम राजू आणि कुमारम भीम या स्वातंत्र्ययोखद्ध्यांच्या जीवनातल्या एका कालखंडाचं कल्पकतेने सादरीकरण केलं गेलं होतं. दिग्दर्शक मणिरत्नमचा बहुप्रतिक्षित तमिळ सिनेमा 'पे पेन्नीयीन सेल्वनप 1 "ही याच वर्षी रिलीज झाला. चोल राजवटीवर आधारित असलेल्या या सिनेमाने 500 कोटींहून अधिक कमाई करत तिकीटनबारीवर आपलं वर्चस्व राखलं. एप्रिल 2023 मध्ये या सिनेमाचा दुसरा भागही येतोय. 

या वर्षात ऐतिहासिक सिनेमांचीही मोठी लाट उसळणार आहे.  दिग्दर्शक-निर्माता करण जोहरने दिल्लीतल्या मुघल राजवटीवर आधारित 'तख्त'  या सिनेमाची घोषणा केलीय. या सिनेमात विकी कौशल औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता बॉबी देओलही यावर्षी 'हरी हरा वीरा मल्लू' या तेलुगू सिनेमात औरंगजेबाचं पात्र रंगवताना दिसणार आहे. कुतुबशाहीतल्या एका अनाम वीराची शोर्यगाथा सांगणार्‍या या सिनेमात “पॉवर स्टार' पवन कल्याण प्रमुख भूमिका साकारणार आहे. 1818 मध्ये लढली गेलेली भीमा - कोरेगावची लढाई महाराष्ट्राच्या इतिहासातली एक महत्त्वाची लढाई मानली जाते. या लढाईत महार 'योद्ध्यांच्या मदतीने इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केला. पेशवाईत अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीचं लढवय्या स्वरूप या लढाईमुळे समोर आलं. यावर आधारित 'द बॅटल ऑफ भीमाकोरेगाव' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. या ऐतिहासिक लढाईच्या नायकाची म्हणजेच सिदनाक इनामदाराची भूमिका अभिनेता अर्जुन रामपाल साकारतोय. गेल्या काही वर्षांत देशाच्या वैचारिक वर्तुळात गांधी विरुद्ध गोडसे आणि गांधी विरुद्ध सावरकर या राजकीय वादांनी थैमान घातलंय. त्याचे पडसाद वेळोवेळी साहित्यातून, नाटकांमधून उमटलेत. आता पुन्हा मोठ्या पडद्यावरही हा वाद नव्याने जिवंत केला जाणार असून, त्यांच्या निर्मिती आणि तिकीटबारीवरच्या व्यवसायात होणारा राजकीय हस्तक्षेप हा एक कळीचा मुद्दा ठरणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'स्वातंत्र्यवीर सावरकर'मध्ये अभिनेता रणदीप हुडा मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहे सप्टेंबर 2022 मधे रणदीपने मांजरेकरांच्या ऐवजी आपण हा सिनेमा दिग्दर्शित करणार असल्याचं जाहीर केलंय. 'गांधी गोडसे - एक युद्ध' हा राजकुमार संतोषी दिग्दर्शित सिनेमा या प्रजासत्ताक दिनाला प्रदर्शित होतोय. महाभारतातील कर्ण याच्या जीवनावर आधारित ‘महावीर कर्ण’, ज्यात अभिनेता विक्रम आणि मल्याळम अभिनेता सुरेश गोपी दिसणार आहेत. हा पौराणिक चित्रपट कन्नड़, हिंदी, मल्याळम, तामिळमध्ये रिलीज होणार आहे.500 कोटी रुपये खर्च झालेला 'आदिपुरुष' चित्रपट भारतीय महाकाव्य रामायणावर आधारित आहे आणि जून 2023 मध्ये रिलीज होणार आहे. - मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

1 comment:

  1. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या 'शाकुंतलम' 17 फेब्रुवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. समंथा यात राजकन्येच्या भूमिकेत दिसणार आहे. ही शाकुंतला आणि दुष्यांत यांची प्रेम कहाणी आहे. राजा दुष्यंत भूमिका अभिनेता देव मोहन साकारत आहे. अल्लू अर्जुनची मुलगी अरहा लहानग्या शकुंतलाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 1975 सालच्या आणीबाणीवर आधारित कंगना राणावतचा'इमर्जन्सी' येणार आहे. कंगना यात इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत आहे.

    ReplyDelete