Friday, January 6, 2023

शब्दसंपतीचे मालक व्हा

आदिम अवस्थेपासून आधुनिक मानवापर्यंतच्या विकासाच्या प्रवासाचं रहस्य काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? बहुतेक लोक याचे उत्तर देतात की इतर प्राण्यांच्या तुलनेत माणसाचा विकसित मेंदू या संपूर्ण प्रगतीच्या आणि संस्कृतीच्या मुळाशी आहे. तसं हे उत्तर अपूर्ण आहे. याचं पूर्ण उत्तर असं आहे- माणसाने प्रगती केली, कारण या मेंदूने भाषा शोधली. सर्व प्रगतीच्या मुळाशी भाषा आहे. जगातील ज्ञानाच्या सर्व शाखा विकसित झाल्या आहेत - त्या भाषेमुळे! 'भाषा' म्हणजे अर्थपूर्ण शब्दांचे व्यवस्थित-क्रमबद्ध संयोजन!

शब्दांची ही दुनिया फार विचित्र आहे. शब्दांच्या सामर्थ्याकडे आपलं कधीच लक्ष जात नाही. शब्दच माणसाला ज्ञानाशी जोडतात. शब्दच माणसाला माणसाशी जोडतात आणि शब्दच माणसाला माणसापासून तोडतात. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून, अक्षरे ध्वनीचे प्रतीक आहेत, ते निर्जीव आहेत. माणूसच त्यांना अर्थ देतो, जिवंत करतो. शब्द जिवंत झाले की मग माणसाचे विविध स्वभाव आणि गुण त्यांच्यात येऊ लागतात. मानवी स्वभावाचे जेवढे वेगवेगळे नमुने आहेत तितकेच शब्दांच्या स्वभावाचेही नमुने आहेत. जसे काही लोक इतरांना हसवण्याचे काम करतात, त्याचप्रमाणे काही शब्द देखील लोकांना हसवतात. जसे काही माणसे इतरांना नेहमी त्रास देतात;  तसे काही शब्दांच्या उच्चाराने समोरच्याला अस्वस्थ करतात. 

कधी कधी तर असे शब्द ऐकून ते रडायलाही लागतात. काही लोक खूप प्रिय असतात;  त्याचप्रमाणे काही शब्दही खूप प्रिय असतात.  त्यांना पुन्हा पुन्हा ऐकण्याची, त्यांना गुणगुणण्याची इच्छा होते. एकीकडे काही शब्द फसवे, काही अर्थहीन, तर काही शब्द अत्यंत सौम्य, सात्विक, सभ्य आणि सुसंस्कृत असतात. काही शब्द आपल्याला निष्क्रीय करतात. 'काहीही करू नकोस, जे काही तुझ्या नशिबात आहे ते तुला नक्कीच मिळेल. नाही तर मिळणार नाही.' न्यूटनने म्हटले आहे की, कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी ९०% (नव्वद टक्के) मेहनत, ५% (पाच टक्के) बुद्धिमत्ता आणि ५% (पाच टक्के) योगायोग आवश्यक असतो. शब्द जे आपल्याला निष्क्रिय ठेवतात;  आपण त्यांना आपल्या जीवन व्यवहारातून फेकून दिले पाहिजे. काही भाषांमधील शब्द इतर कोणत्याही भाषेशी मैत्री करतात आणि त्यातीलच एक बनतात. जसे तुमचे काही मित्र असे असतात की;  जे सर्वांमध्ये मिसळू शकतात. काही असे असतात की ते इतरांशी मैत्री करू शकत नाहीत.  शब्दांचाही असाच स्वभाव असतो;  विशेषतः, इंग्रजी भाषेतील बरेच शब्द ते ज्या प्रदेशात गेले त्या भाषेत मिसळून गेले. जसे 'बस, रेल्वे, कार, रेडिओ, स्टेशन' इत्यादी. तमिळ भाषेतील शब्द मात्र त्यांच्या द्रविड कुटुंबापुरतेच मर्यादित राहतात, असे म्हटले जाते. त्यांना कोणामध्ये मिसळायचे नसते. हिंदी शब्द  लगेच मिसळणारे असले तरी सर्वच नाहीत,  काही शब्द आपले स्वतंत्र अस्तित्व शेवटपर्यंत टिकवून ठेवतात. त्यांच्या मूळ स्वरूपातच ते इतर ठिकाणी जातात. काही शब्द इतर भाषांशी अशा प्रकारे मिसळून जातात की त्यांचे स्वतंत्र रूप, अस्तित्वच हरवून जातात. काही शब्द हिंदीतही आढळतात जे दोन वेगवेगळ्या भाषांमधील शब्द एकत्र करून बनवले जातात. आता ते शब्द फक्त हिंदीचे बनले आहेत. हिंदी-संस्कृत पासून वर्षगाँठ, माँगपत्र; हिंदी-अरबी /फारसी पासून थानेदार, किताबघर ; अंग्रेजी-संस्कृतपासून रेलयात्री, रेडियो तरंग ; अरबी /फारसी-अंग्रेजी पासून बीमा पॉलिसी इत्यादी.हिंदीचे शब्दविश्वही या शब्दांमुळे समृद्ध झाले आहे. काही शब्द आपल्या आईला इतके प्रिय असतात की ते आपली मातृभाषा सोडून इतरांसोबत जात नाहीत. काही शब्द खूप छान असतात, ते कोणत्याही भाषेत स्वतःसाठी जागा बनवतात. 

शब्दांच्या बाहेर जाण्याच्या आणि इतर अनेक भाषांमधून शब्द येण्याच्या या मार्गाने आपली भाषा समृद्ध झाली आहे. विशेषत: ते शब्द ज्यासाठी आपल्याकडे पर्यायी शब्द नाहीत. इंग्रजी, पोर्तुगीज, अरबी, पर्शियन भाषेतून आलेले हजारो शब्द आले आहेत;  त्यांना येऊ द्या. जसे ब्रश, रेल्वे, पेन्सिल, रेडिओ, कार, स्कूटर, स्टेशन इ. परंतु ज्या शब्दांसाठी आपल्याकडे सुंदर शब्द आहेत, त्या शब्दांसाठी इतर भाषेतील शब्द वापरू नयेत. आमच्याकडे 'आई'- वडिलांसाठी अनेक सुंदर शब्द आहेत. जसे- माई, अम्मा, बाबा, अक्का, अण्णा, दादा, बापू.आता त्यांना मम्मी-डॅडी म्हटणे म्हणजे आपल्या भाषेतील सुंदर शब्दांचा अपमान आहे. 

आपल्या तोंडून बोललेले शब्द आपले चारित्र्य, बुद्धिमत्ता, समज आणि मूल्ये दर्शवतात, म्हणून आपण शब्द उच्चारण्यापूर्वी विचार केला पाहिजे. कमीत कमी शब्दात अर्थपूर्ण बोलणे आणि लिहिणे ही एक कला आहे. ही कला मेहनतीने आणि विविध पुस्तके वाचून साध्य करता येते. पण फक्त एका चुकीच्या शब्दाच्या उच्चारामुळे अनेक वर्षांच्या मैत्रीला तडा जाऊ शकतो. आता कोणत्या वेळी, कोणाच्या समोर, कोणते शब्द वापरावेत, हे अनुभवातून, मार्गदर्शनातून, वाचनाने आणि संस्कारातूनच कळते. परीक्षेत जी वाक्ये सुंदर, समर्पक आणि अर्थपूर्ण शब्दांनी लिहिली जातात, त्यामुळे चांगले गुण मिळतात. अपशब्द वापरणे नेहमीच हानिकारक असते. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची अशी शब्दसंपत्ती असते. हा शब्दसंग्रह वाढवण्यासाठी साहित्याचे वाचन आवश्यक आहे. शब्दांचे वेगवेगळे अर्थ जाणून घेण्यासाठी  शब्दकोशाचीही गरज असते. शब्दकोषाचे रोज एक पान एकाग्रतेने वाचले तर शब्दसंपत्तीची ताकद कळून येईल. तर, आता तुम्ही ठरवूनच टाका की  तुम्हाला तुमचा शब्दसंग्रह वाढवायचा आहे.  आणि त्यासाठी वाचन संस्कृती वाढवा. वाचायला सुरुवात करा.मग  तुम्ही शब्दांच्या संपत्तीचेही मालक व्हाल. - डॉ. सूर्यनारायण रणसुभे (अनुवाद- मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली) 


No comments:

Post a Comment