बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1957 रोजी मुंबईतील वाळकेश्वर येथील तीन बत्ती परिसरात झाला. जॅकी आज 66 वर्षांचे होत आहेत. 80 च्या दशकात जॅकी अॅक्शन आणि रोमँटिक हिरो म्हणून ओळखले जात होते. जॅकी यांनी आतापर्यंत जवळपास 250 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र जॅकी यांच्या आयुष्याची गोष्ट ही कोणत्याही सिनेमाच्या कथेपेक्षा वेगळी नाही. चाळीत राहणारा टपोरी एक दिवस सुपरस्टार होईल याची कोणीच कल्पना केली नव्हती.
जॅकी यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झालेला. असे म्हटले जाते की जॅकी यांनी आपल्या चाळीतील लोकांना नेहमीच मदत केली आणि म्हणूनच त्यांचे नाव जग्गू दादा ठेवण्यात आले. चाळीतले सगळे त्यांना याच नावाने हाक मारायचे. गरिबीमुळे जॅकींना अकरावीनंतर शिक्षण सोडून नोकरी शोधावी लागली. त्यांना स्वयंपाकाची खूप आवड होती, त्यामुळे ते ताज हॉटेलमध्ये नोकरीसाठी गेले होते पण तिथे त्यांना नोकरी मिळाली नाही.
अनेक दिवस नोकरीच्या शोधात भटकल्यानंतर एक दिवस जॅकी बस स्टँडवर बसची वाट पाहत उभे होते, तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने त्यांची उंची पाहून, 'तुला मॉडेलिंगमध्ये रस असेल का?' असे विचारले. प्रत्युत्तरात जॅकी म्हणाले की, 'तुम्ही पैसे द्याल का?' जग्गू दादाहून जॅकी श्रॉफ होण्याचा प्रवास इथून सुरू झाला. अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर त्यांना सुभाष घई यांच्या 'हिरो' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला आणि जॅकी रातोरात सुपरस्टार झाले.
आज जॅकी श्रॉफ यांचे बॉलीवूडमधल्या निवडक अभिनेत्यांमध्ये नाव घेतले जाते.त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांमध्ये आपलं वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. जॅकी श्रॉफने हिंदी चित्रपटांशिवाय गुजराती, तामिळ, बंगाली, मल्याळम, कन्नड, मराठी, पंजाबी आणि उडिसा अशा नऊ भाषेतल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. जॅकी श्रॉफचे मूळ नाव जयकिशन काकूभाई श्रॉफ आहे. त्यांच्या वडिलांचे नाव काकूभाई श्रॉफ आणि आईचे नाव रिटा श्रॉफ आहे.
1986 मध्ये जॅकीला पुन्हा एकदा सुभाष घईंच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट दिलीप कुमार यांच्याच भोवतीच फिरत असला तरी प्रेक्षकांनी या चित्रपटातल्या जॅकीच्या कामाचे कौतुक केले.या चित्रपटातील जॅकी आणि अनिलकुमार यांच्या जोडीला बेहद पसंद केले.1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'काश' या चित्रपटाचा खास करून उल्लेख करावा लागेल. जॅकी केवळ मारधाड चित्रपटांमध्ये उठून दिसतो, अशी काही लोकांची धारण होती. मात्र या चित्रपटात त्यांनी भावनिक शेडचे काम उत्तमरित्या केले. 1989 साल जॅकीसाठी महत्त्वपूर्ण राहिले. या सालात त्रिदेव, राम लखन आणि परिंदासारखे सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाले. सुभाष घईंच्या रामलखन चित्रपटातल्या जॅकी आणि अनिल कपूर यांच्या जोडीने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली.
1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या '1942 ए लव स्टोरी' आणि 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रंगीला' चित्रपटासाठी जॅकीला सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्याचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला. जॅकीच्या कारकिर्दीत मीनाक्षी शेषाद्री आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबतची जोडी खूपच पसंद केली गेली. त्यांनी आतापर्यंतच्या चार दशकातील कालावधीत सुमारे तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. स्वामी दादा, हीरो, अंदर बाहर, युद्ध, तेरी मेहरबानियां, पाले खां, अल्लाह रख्खा, कर्मा, जवाब हम देंगे, काश, राम लखन, परिंदा, मैं तेरा दुश्मन, त्रिदेव, वर्दी, दूध का कर्ज, सौदागर, किंग अंकल, खलनायक, गर्दिश, त्रिमूर्ति, रंगीला, बंदिश, अग्निसाक्षी, बॉर्डर, बंधन, रिफयूजी, मिशन कश्मीर, फर्ज, यादें, लज्जा, देवदास, ऑन-मेन एट वर्क, हलचल, क्योंकि, भूत अंकल, भागमभाग, किसान, वीर, शूटआऊट एट वडाला, धूम 3, हैप्पी न्यू ईयर, डर्टी पॉलीटिक्स ही काही उल्लेखनीय चित्रपटांची नावे आहेत.
जॅकी यांनी त्यांची दीर्घकाळची मैत्रीण आयशा दत्तशी लग्न केले, जी नंतर चित्रपट निर्माता बनली. हे जोडपे सध्या जॅकी श्रॉफ एंटरटेनमेंट लिमिटेड नावाची मीडिया कंपनी चालवते. त्यांना दोन मुले आहेत. टायगर श्रॉफ (हेमंत जय) नावाचा मुलगा बॉलिवूड मध्ये सक्सेस तरुण अभिनेता आहे. आणि त्यांना कृष्णा नावाची मुलगीही आहे. दिग्दर्शक सुभाष घई यांनीच श्रॉफला 'जॅकी' हे नाव दिले. 1990 नंतर ते मुख्य भूमिकेपेक्षा सह-अभिनेता म्हणून सशक्त भूमिकेत दिसू लागले. जॅकीला 'परिंदा' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला, तर 'खलनायक' चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. याशिवाय त्यांना अनेकवेळा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 2007 मध्ये, जॅकीला भारतीय चित्रपटातील उत्कृष्ट योगदानाबद्दल विशेष न्यायाधीश ज्युरी पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment