देशाच्या अनेक भागांतील लोक अनेक प्रसंगी आणि विशेषतः मकर संक्रांतीच्या दिवशी मोठ्या उत्साहाने पतंग उडवण्याचा आनंद घेतात. मकर संक्रांतीला पतंग उडवण्याच्या राजस्थान, गुजरातेतला खेळ आता महाराष्ट्रातही लोकप्रिय जोर धरू लागला आहे. पण, पतंग उडवण्यामुळे दरवषीर् अनेक पक्ष्यांना प्राणाला मुकावे लागते, याकडे आपले दुर्लक्षच होते. याचे कारण आहे, ग्लास कोटेड मांजा. या काचऱ्या मांज्यामुळे दिवसा आकाशात विहार करणाऱ्या पक्ष्यांना इजा होते. हा मांजा त्यांच्या गळ्यात, पायात किंवा पंखांमध्ये अडकला जाऊन कापल्याने त्यांचा हकनाक बळी जातो. अनेकदा, पतंग मांज्यासहीत झाडाला लटकतात. मांजा सहजासहजी डोळ्यांना दिसत नसल्याने मांज्याच्या गुंत्यामध्ये पक्षी अडकले जातात आणि त्यांना जखमा होऊन प्राण गमवावे लागते. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये ग्लास कोटेड मांज्यांवर बंदी आणण्यासाठी 'पेटा' (पीपल फॉर द एथिकल ट्रिटमेण्ट ऑफ अॅनिमल्स) ने प्रयत्न केले होते पण, त्याला यश मिळू शकले नाही. या मांज्यामुळे केवळ पक्षीच नाही, तर दुचाकीचालकांचाही मृत्यू ओढावतात. बंदी असूनही हा दोरा बाजारात कसा उपलब्ध होता, हा एक गहन प्रश्नच आहे.
बंदी असलेल्या नायलॉन मांजामुळे नागपुरातील एका 5 वर्षीय मुलीचा गळा कापल्याची घटना दोनच दिवसांपूर्वी घडली. तिच्या गळ्याला 26 टाके पडले. ही मुलगी मरता मरता बचावली आहे. पुण्यात मकरसंक्रांतीच्या दरम्यान दरवर्षी सरासरी 80 पक्षी जखमी होतात तर 20 पेक्षा अधिक पक्ष्यांचा मांज्यात अडकून तडफडून मृत्यूही झाल्याचे समोर आले आहे.या जीवघेण्या मांज्यामुळे नाशिक आणि नागपूरमध्ये अनेक दुर्घटना घडल्या आहेत. यातच आता मुंबईतही एका पोलीस अधिकाऱ्याचा मांजामुळे गळा कापल्याची धक्कादायक महिती समोर आली आहे. मांज्यामुळे पक्षी जखमी होण्याचे प्रमाण अधिक आहे.
वास्तविक, आपल्या आनंदासोबतच आपण मुक्या पक्ष्यांबद्दलही संवेदनशील असायला हवे. आपला तो आनंद सर्वात बेढब असतो, जो दुसऱ्यासाठी जीवघेणा किंवा वेदनादायक ठरतो. आपला जीव गमावलेला कोणी मुका प्राणी किंवा पक्षी असेल, ज्याला आपल्या वेदना व्यक्तही करता येत नसेल, तर ही शोकांतिका आणखीनच भयानक होते. गेल्या काही वर्षांपासून विविध सणांच्या दिवशी पतंग उडवल्याने हजारो निष्पाप पक्ष्यांचा बळी जातो. गेल्या वर्षी एकट्या अहमदाबाद शहरात 141 आणि 15 जानेवारी 2022 म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पतंग उडवताना 500 हून अधिक पक्षी जखमी झाले होते, अनेकांचा तात्काळ मृत्यूही झाला होता.
समाधानाची बाब म्हणजे अहमदाबादमध्ये पतंगाच्या दोरींमुळे जखमी झालेले बहुतांश जखमी पक्षी वाचले, कारण केवळ अहमदाबादमध्येच नाही तर संपूर्ण राज्यात गुजरात सरकारने 'संवाद पक्षी आणि प्राणी' या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून 'करुणा अभियान कार्यक्रम' सुरू केला होता. हेल्पलाइन चालवली होती. या मोहिमेअंतर्गत मकर संक्रांती आणि दुसऱ्या दिवशी राज्यभरात 600 हून अधिक पक्षी निदान केंद्रे उभारण्यात आली, ज्यामध्ये 620 हून अधिक डॉक्टर आणि 6,000 हून अधिक स्वयंसेवकांनी आपली सेवा दिली. एकट्या अहमदाबाद शहरात 11 आणि 15 जानेवारी 2022 रोजी आयोजित केलेल्या एका मोठ्या शिबिरात 12 डॉक्टर आणि 85 स्वयंसेवकांनी रात्रंदिवस आपली सेवा दिली. अशा उपक्रमाचे कौतुक कराल तितकं कमीच आहे.
या प्रकरणातील खेदाची बाब म्हणजे देशातील बहुतांश भागात पक्ष्यांबाबत लोकांमध्ये संवेदनशीलता दिवून येत नाही. कदाचित त्यामुळेच मकर संक्रांतीसह इतर प्रसंगी पतंगबाजीमुळे हजारो मुके पक्षी जखमी होतात आणि शेकडो पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. सर्वात चिंतेची बाब म्हणजे कायद्याने बंदी असतानाही चीनमधून आयात केलेल्या काच मिश्रित पतंगाचा दोरा म्हणजेच मांझा पक्ष्यांचा सर्वाधिक बळी घेतो आहे. पक्षीच नाही, तर हा धोकादायक मांजा दरवर्षी अनेक माणसांचाही बळी घेत आहे. ऑगस्ट 2022 मध्ये राजधानी दिल्लीतील बदरपूर भागात एका डिलिव्हरी बॉयचा वेदनादायक मृत्यू झाला होता. ही काही वेगळी घटना नाही. गेल्या काही वर्षांत राजधानीत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार या चायनीज मांजामुळे अर्धा डझनहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
धोकादायक मांजासह केली जाणारी पतंगबाजी मुक्यासाठी दिवसेंदिवस धोकादायक बनत चालली आहे. दोन वर्षांपूर्वी राजधानी दिल्लीतही पतंगबाजीमुळे हजाराहून अधिक पक्षी जखमी झाले होते, त्यात 90 टक्क्यांहून अधिक पक्ष्यांना खोल जखमा झाल्या होत्या. अनेकांची मान पूर्णपणे कापण्यात आली होती. यावरून पक्ष्यांसाठी किती हे धोकादायक आहे याचा अंदाज येतो. हा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने 2017 मध्ये चायनीज आणि धातूच्या मांजावर बंदी घातली होती, पण ना मांजा विकणारे दुकानदार आणि ना तो खरेदी करून पतंग उडवण्याचा आनंद लुटणारे लोक या कायद्याचे पालन करताहेत. याचा परिणाम असा होतो की,इकडे आपण सण साजरा करत असतो, तेव्हा तिकडे आपल्या निष्काळजी कृत्यांमुळे हजारो पक्ष्यांचा जीव धोक्यात येतो. गेल्या वर्षी गुजरात सरकारने लोकांना संक्रांतीच्या दिवशी पतंग न उडवण्याचे आवाहन केले होते आणि पतंग उडवलेच तरी बंदी असलेला चीनी आणि मॅटेलिक धागा वापरू नये. पण सर्व लोकांमध्ये संवेदनशीलता जागृत झाली नाही आणि हजारो पक्षी मारले गेले. आणि आता अशी वेळ आली आहे की, या घटनांमधून धडा घ्यावा आणि काही तासांच्या आनंदासाठी पक्ष्यांचे आयुष्य संपवू नये. म्हणूनच या वेळी मकर संक्रांत किंवा इतर कोणत्याही प्रसंगी पतंग उडवण्याचा आनंद घेताना, या मुक्या पक्ष्यांच्या जीवनाचा जरा विचार करा. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment