Wednesday, January 4, 2023

अफाट प्रतिभेचा उपेक्षित संगीतकार सी. रामचंद्र

'ऐ मेरे वतन के लोगों...' हे गाणे 59 वर्षांपासून देशातल्या नसानसांमध्ये सळसळते आहे. या गाण्याने राजा आणि रंक दोघांच्याही डोळ्यांत पाणी आणले आहे. शहिदांचा सन्मान करताना सरकारे आपल्या पद्धतीने मदत करतात. सैन्य दल तोफांची किंवा बदुकांच्या फैर्‍यांची सलामी देऊन शहिदांना शेवटचा निरोप देतात. जनता शहिदांचा सन्मान करताना डोळ्यांत अश्रू आणून त्यांना आपल्या हृदयात जागा देतात. चित्रपटसृष्टीने शहिदांच्या सन्मानाच्या रुपात  'ऐ मेरे वतन के लोगों...' सारखे गाणे दिले.

ऐ मेरे वतन के लोगों...  हे गाणे शहिदांच्या हौत्माम्याचे स्मरण करण्यासाठी रचले गेले होते. पण या गाण्याचा उद्देश होता, 1962 मध्ये मिळालेल्या पराभवाने खचून न जाता त्यांचे मनोबल वाढवण्याचे! गाण्याचा शेवट आहे, 'जय हिंद,जय हिंद की सेना... ' गाण्याच्या काही अंतर्‍यांमध्ये सैन्याच्या रेजिमेंटांचा हवाला होता आणि सांगितले गेले होते की, आमच्या एका एका वीर जवानांनी दहा-दहा शत्रू सैन्यांना मारले.

ज्यावेळेला सरकारने चित्रपटसृष्टीकडे मदतीची अपेक्षा केली, तेव्हा सगळ्याच संगीतकार, निर्मात्यांनी आपापल्या परीने मदत केली. काहींनी आपलीच जुनी गाणी सादर केली. मात्र त्यावेळेला महबूब खान एक दिवस कवी प्रदीप यांच्या घरी पोहचले. आणि त्यांना आपल्या देशाच्या सैनिकांच्या मदतीसाठी एक गाणे लिहिण्याची विनंती केली.  हे गाणे सरकारच्या विनंतीनुसार लिहिले गेले असल्यामुळे यासाठी कवी प्रदीप यांना कसलाही मोबदला मिळाला नाही. प्रदीप यांची इच्छा होती की, हे गाणे लता मंगेशकर यांनी गावावे. त्यावेळेला लता मंगेशकर आपल्या कामात व्यस्त होत्या, त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा नकार दिला. अधिक विनंती केल्यावर या गाण्याचे दोन भाग करण्याचे ठरले. एक भाग लता मंगेशकर आणि दुसरा भाग आशा भोसले यांच्या आवाजात 27 जानेवारी 1963 रोजी दिल्लीच्या नॅशनल स्टेडिअमवर पहिल्यांदा गायले जाणार होते. वर्तमानपत्रांमधल्या जाहिरातींमध्ये आशा भोसले यांच्याही नावाचा या गाण्याची एक गायिका म्हणून उल्लेख केला जात होता. आशा भोसले यांनी या गाण्याच्या रिहर्सलमध्येही भाग घेतला होता.

या गाण्याच्या संगीताची जबाबदारी सी. रामचंद्र यांच्याकडे सोपवण्यात आली होती. संगीतकार सी. रामचंद्र यांच्या दिग्दर्शनाखाली लता मंगेशकर यांनी अनेक गाणी गायली होती आणि त्यांच्यातला ताळमेळ चांगला जुळला होता. पण काही कारणांमुळे 1958 पासून लता मंगेशकर आणि सी. रामचंद्र यांच्यातील बोलणेच बंद होते. अण्णा म्हणजेच सी. रामचंद्र यांनी 26 जानेवारी 1963 रोजी लता मंगेशकर यांना या गाण्याची टेप दिली. पण शेवटच्या वेळी आशांनी लता यांना आपण दिल्लीला जाणार नसल्याचे सांगितले.लता मंगेशकर यांच्यासह अनेक संगीतकारांनी आशा यांची खूप मनधरणी केली.पण त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. शेवटी 26 जानेवारी 1963 रोजी मुंबईतून एक फ्लााइट पकडून लता, दिलीप कुमार, महबूब खान, राजकपूर, शंकर जयकिशन, सी. रामचंद्र यांचे सहाय्यक मदन मोहन आदी मंडळी दिल्लीला रवाना झाली. फ्लाइटमध्ये  लता मंगेशकर यांनी ते गाणे ऐकले, जे सी.रामचंद्र यांनी टेपमध्ये दिले होते. 27 जानेवारी रोजी ते गाणे त्यांनी नॅशनल स्टेडिअमवर गायले. गाणे संपल्यावर स्टेजच्या पाठिमागे असलेल्या लता यांना महबूब खान यांनी त्यांना पंतप्रधान पंडित नेहरू बोलावत असल्याचा निरोप दिला.  नेहरू यांनी लता मंगेशकर यांचे कौतुक केले आणि तुमच्या गाण्याने माझ्या डोळ्यांत पाणी आणले, असे सांगितले.

हे गाणे दिल्लीत ज्यावेळेला गायले गेले, त्यावेळेला तिथे ना या गाण्याचे संगीतकार सी. रामचंद्र होते, ना कवी प्रदीप! नंतर ज्यावेळेला नेहरूंना मुंबईला जाण्याची संधी मिळाली, त्यावेळेला त्यांनी आवर्जून कवी प्रदीप यांची भेट घेतली. मात्र अण्णा शेवटपर्यंत उपेक्षितच राहिले. ऐ मेरे वतन के लोगों... या गाण्याने इतिहास रचला. या गाण्याने भारतरत्न लता मंगेशकर यांच्या करिअरला नवी उंची दिली. या गाण्याचे गीतकार प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. या गाण्याची एक ओळ आहे, तुम भूल न जाओ इनको... इसलिए कही ये कहानी. पण दुर्दैवाने या गाण्याचे संगीतकार सी. रामचंद्र मात्र शेवटपर्यंत उपेक्षित राहिले. अण्णा यांनी शास्त्रीय संगीत, लोकसंगीत यांचा मेळ घालत जी गाणी रचली होती, ती खूपच लोकप्रिय ठरली. ऐ मेरे वतन... पूर्वीही अण्णा यांनी 'आना मेरी जान संडे के संडे...' (शहनाई, 1947),  'मेरे पिया गये रंगून... '(पतंगा,1949) सारखी लोकप्रिय गाणी दिली होती.

सी.रामचंद्र  यांचे वडील नागपूरला रेल्वेत स्टेशन  मास्तर होते. धाकट्या रामचा अभ्यासापेक्षा संगीताकडे असलेला ओढा पाहून त्यांनी  तेथील सप्रे गुरुजीकडे काही वर्षे शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी ठेवले, तेथून पुण्यातही  काही काळ संगीत विद्यालयात जाऊन त्यांनी संगीताचे धडे घेतले. त्यांचे ध्येय इन्स्पेक्टर किंवा सिनेनायक होण्याचे होते. देखणा चेहरा व 6  फुटापर्यंतची उंची नि मधूर आवाज यामुळे आपणास नायकाचे काम सहज मिळेल, असे त्यांना वाटले.यासाठी त्यांना खूपच स्ट्रगल करावे लागले. 

अखेर त्यांना बी. व्ही. राव यांच्या 'नागानंद' चित्रपटात नायकाचे काम  मिळाले, पण तो चित्रपट आपटला.  पुढे रामचंद्र सोहराव मोदींच्या मिनर्व्हा मुव्हीटोनमध्ये एक्स्ट्रा म्हणून नोकरीस लागल्यावर “सैदे हवस' या चित्रपटात त्यांना एक छोटीसी भूमिका मिळाली. मोदींचे संगीतकार तेव्हा मीरासाब होते. रिकाम्या वेळात राम चितळकर मीरसाबच्या ताफ्यातील वाद्ये वाजवत रहात, ते पाहून एकेदिवशी मोदी म्हणाले, “तुला अभिनय काही जमत नाही, तुझा ओढा संगीताकडे आहे, तू तिकडे लक्ष दे! मग त्यांनी मीरासाबचा सहाय्यक म्हणून अण्णांना नेमले.  त्यांच्या हाताखाली चितळकर नोटेशन करण्यात तरबेज झाले. नंतर ते स्वतंत्रपणे आण्णासाहेब या नावाने संगीत देऊ लागले. सिनेनिर्माते व दिग्दर्शक जयंत देसाईनी त्यांचे सी. रामचंद्र असे नामकरण केले. 

अण्णानी संगीत साज चढवलेला फिल्मीस्तानचा “सफर” (1947)खूप गाजला. त्यातील अमीरबाई कर्नाटकीने म्हटलेले “मारी कटारी मर जाना” हे ठसकेबाज गीत रेडिओ सिलोनवर लागते  तेव्हा काळजात कट्यार घुसते! रफीलाही यात ‘कह के भी न आये तुम अब छुपने लगे तारे', “अब वो हमारे हो गये, इकरार करे या न करे? अशासारखी माधुर्याने भरलेली गाणी दिली.  गेल्या पिढीतील दिग्गज नायकांसाठीही अण्णांनी पार्श्वगायन केले होते. 1. अशोककुमार 'संग्राम, शतरंज' मीनाकुमारी नायिका असलेल्या या चित्रपटात अण्णानी अशोककुमारसाठी एक गझलही गायली होती. 2. राजकपूर, 'सरगम, शारदा', 3. देवआनंद बारीश, अमरदीप, सरहद्द, 4. दिलीपकुमार 'नदिया के पार, इन्सानियत, समाधी, पैगाम, आझाद. लताचा अण्णांच्या संगीतात उदय होण्यापूर्वी ललिता देऊलकर (नंतरच्या सौ. सुधीर फडके) शमशाद बेगम, सुरिंदर कौर, बिनापानी मुकर्जी, मिनाकपूर, सरस्वती राणे, जोहराबाई अंबालावाली, अमिरबाई कर्नाटकी, मोहनतारा अजिंक्य, गीता दत्त व 'दुनिया'त  सुरैय्या आदींना घेऊन आपले संगीत लोकप्रिय केले होते.  1. 'ठुकराके ओ जानेवाले. 2. दिल को भुल दो तुम हमें. या पतंगाच्यावेळी गीतकर राजेंद्रकष्णचा अण्णांच्या संगीताल प्रथम प्रवेश झाला. राजेंद्रची गाणी अण्णांचे संगीत दोघांनी मिळून अनेक चित्रपट हिट केले! 

पूर्वी हिंदी सिनेसंगीतांत पंजाबी व उत्तर  हिंदुस्तानी वादकांची मोनॉपाली होती, ती मोडून काढीत अण्णांनी आपल्या वाद्यवृंदात महाराष्ट्र व गोव्यातील वादकांचा समावेश  केला. तमाशातील ढोलकीपटू लाला गंगावनेला आपल्याकडे घेतले. 'नदीया के मार'मधील 'दिल  दे के भागा दगा देके भागा' हे गाणे अण्णासह ललित देऊळकरने ठसक्यात म्हटले होते. यात अण्णानी जोगतीणींच्या ताफ्यात वाजविल्या  जाणाऱ्या चौंडक या तालवाद्याचा वापर हिंदी  सिनेसंगीतात प्रथमच केला! अण्णानी बेन या ख्रिश्चन तरुणीशी लव्ह मॅरेज केले होते. बेनचे - पहिले मूल डिलिव्हरी दिवशीच दगावल्यावर 'आता यांना परत मूल होणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितल्यावर काही काळाने त्यांनी दुसरे लग्न करून घेतले. या दुसऱ्या पत्नीपासून त्यांना एक मुलगा, एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली. पुढे पत्नीच्या जाण्याने खचलेले अण्णा आपल्या दोन मुलांच्या वात्सल्याने बरेचसे सावरले. आपल्या भरल्या संसारातील शेवटच्या कालखंडात सुखी झालेले अण्णा शांतपणे वयाच्या  63 व्या वर्षी आपल्यातून निघून गेले!- मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment