Saturday, March 31, 2018

मुलांच्या हातात शस्त्रे


     आजची मुलं एकादी कृती करताना मागचा पुढचा विचारच करताना दिसत नाही. आई-बापाचे तर ते ऐकतच नाही. मग शाळेत शिक्षकांचे तर काय ऐकणार? शिक्षक काही दरडावून बोलला तर त्याला उलट आणि उद्धट उत्तरे दिली जातात. मुलं एवढी बेफिकिर का झाली आहेत,कळायला मार्ग नाही. अर्थात याला संस्कारच कमी पडले आहेत. आजचा तरुण तर खिशात पिस्तुल,चाकूसारखी शस्त्रे घेऊन फिरतो आहे. या तरुणांना स्वामी विवेकानंदपेक्षा दाऊद जवळचा वाटू लागला आहे. त्यामुळे अगदी गावोगावी गुंड प्रवृत्ती वाढत चालली आहे. कुठे काही खुट्ट झाले तरी तलवारी, काठ्या-कुर्हाडी, दगड-धोंडे घेऊन हे एकच कल्ला करताना दिसतात. क्षणात भितीने गाव, शहर बंद! शस्त्रे बाळगलेले तरुण सतत कुठे ना कुठे पोलिसांच्या तावडीत सापडत आहेत. मात्र त्यांचे पुढे काय झाले, याचा पत्ता नाही. त्यांना शिक्षा झाल्याचे ऐकिवात येत नाही. त्यामुळे साहजिकच अशा गुंड प्रवृत्तीच्या तरुणांची पिढी गल्लोगल्लीत वाढताना दिसत आहे. वाढती बेकारी, चैन करायची सवय यामुळे या प्रवृत्तीकडे युवकांचा ओढा वाढत चालला आहे. याला राजकारणी लोक खतपाणी घालत आहेत. आणखी काही वर्षांनी प्रत्येकालाच स्वत:चा जीव वाचवण्यासाठी पिस्तुल वापरावे लागेल की काय, अशी भिती वाटू लागली आहे. याकडे वेळीच आवर घालण्याची आवश्यकता आहे. आपल्या देशात बिहार,उत्तर प्रदेशात सर्वाधिक शस्त्रे परवानाधारकांची संख्या अधिक आहे. तिथे फार मोठी असुरक्षितता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातदेखील शस्त्रे परवाण्यासाठी सातत्याने अर्ज होताना दिसत आहे. ही धोक्याची घंटा आहे.

     आपल्या देशात शस्त्र परवानाधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना परदेशात मात्र शस्त्र बंदी करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना शांतता हवी आहे. गेल्या फेब्रुवारीमधीलच घटना! अमेरिकेतल्या पार्कलँड,फ्लोरिडाच्या शाळेतील एकोणवीस वर्षांच्या निकोलस क्रूजने चौदा मुलांना बंदुकीच्या गोळ्यांनी मारून टाकले. आपल्या देशातही शाळांमध्ये अशा घटना घडत आहेत. परदेशात तर अशा घटना सातत्याने घडत आहेत. आता तिथले लोक अशा घटनांना इतके कंटाळले आहेत की, त्यांना शस्त्रांवर बंदी घालण्याची मागणी करावी लागत आहे. त्यांचे आता एक स्वप्नच आहे की, जग सारे बंदूकमुक्त व्हावे. सध्या या घोषणा अमेरिकेत जागोजागी गाजत आहेत. विशेष म्हणजे अशा घोषणा देत रस्त्यावर उतरणार्यांमध्ये किशोर वयीन मुलांची संख्या अधिक आहे. वॉशिंग्टन डी सी, लांस एंजिलस, न्यूयॉर्क इत्यादी मोठमोठ्या शहरांमध्ये मोठमोठी निदर्शने होत आहेत. तिथे ही निदर्शने पाहणारे म्हणतात की, इतकी मोठी निदर्शने वियतनाम युद्धाच्या दिवसांतल्या निदर्शानांचे स्मरण करून देतात. या निदर्शनांमध्ये पार्कलँड फ्लोरिडामध्ये घडलेल्या बंदूक कांडातून वाचलेले लोकदेखील सहभागी झाले होते. अमेरिकेतल्या लोकांचे म्हणणे असे की, शस्त्रांचा हा विरोध आम्ही आता घरांघरांत घेऊन जाणार आहोत. आणि आम्ही आता अशा लोकांना निवडून देणार, जे शस्त्रांवर बंदी घालतील. आतापर्यंत ज्यांना ज्यांना निवडून दिले, ते आम्हाला वाचवू शकत नाहीत.
     दुर्दैवाची गोष्ट अशी की, ज्या शाळेत संस्कार शिकवला जातो किंवा दिले जातात, त्याच पवित्र शाळांमध्ये हिंसेच्या घटना घडत आहेत. कुठलेही सरकार असेल किंवा कुठल्याही पक्षाचे सरकार, ते अशा प्रकारची हिंसा रोखण्यात अपयशी ठरले आहेत. या मोर्चात अगदी नऊ-नऊ वर्षांची मुलंदेखील सहभागी होती. मार्टिन लुथर किंग ज्युनिअर यांची नऊ वर्षांची नातदेखील सहभागी होती. योलांडा रीनी किंग म्हणते की, आता खूप झाले. माझे स्वप्न आहे की, हे जग बंदूकमुक्त व्हायला हवे. या निदर्शनात अभिनेता जॉर्ज क्लूनी, मिडियाची मोठी हस्ती ओपरा विनफ्रे, प्रसिद्ध दिग्दर्शक स्पीलबर्ग आणि अनेक प्रसिद्ध लोकांनी भाग घेतला होता.
     अमेरिकेत शस्त्रे बनवणारे आणि त्यांचे समर्थन करणारे यांची लॉबी इतकी बळकट आहे की, सरकारेदेखील त्यांच्यापुढे विवश होताना दिसतात. अमेरिकेतील परिस्थिती अशी आहे की, मुलं आपल्या दप्तरात रिवाल्वर घेऊन जातात आणि पाहिजे त्यावेळा आपल्या सहकार्यावर हल्ला करतात. याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात पार्कलँड,फ्लोरिडाच्या शाळेमध्ये 19 वर्षांच्या निकोलस क्रूज या किशोरवयीन मुलाने चौदा वर्षांच्या मुलांना गोळ्या झाडून मारले.यात आणखी तीन मोठे लोक मारले गेले.
     शाळांमध्ये अशा प्रकारच्या घडणार्या घटना मोठ्या भीतीदायक आहेत. अमेरिकेत आई-वडीलदेखील मुलांच्या सुरक्षिततेबाबत वेळोवेळी आपली चिंता व्यक्त करीत असतात. पण सरकारे आणि राजकीय पक्ष शोक व्यक्त करण्यापलिकडे काहीच करताना दिसत नाहीत. आपल्या देशात शाळांमध्ये घडणार्या घटना चिंताजनक आहेत.पण आपल्या इथे अमेरिकेसारखी नेहमी अशा प्रकारे मुले शस्त्रे घेऊन शाळेत जात नाहीत. मात्र हिंसा वाढत चालली आहे, यात शंका नाही. अशा किती घटना आपल्याला रोज ऐकायला मिळतात, की आपल्यासोबत एकाद्या मुला-मुलीला खूपच किरकोळ गोष्टींवर त्याच्या सहकारी किंवा मित्रांना मारून टाकतात.  गुरुग्राममध्ये एका मुलाला त्याच्याच शाळेत शिकणार्या किशोरवयीन मुलाने परीक्षा पुढे ढकलली जावी म्हणून मारून टाकले. आणखी एका मुलीने दुसर्या मुलांसोबत असाच प्रकार करण्याचा प्रयत्न केला.
     तंत्रज्ञानाने जिथे मुलांना जगाशी जोडले,तिथे ज्ञानाचे दरवाजे उघडले गेले. मात्र हेच तंत्रज्ञान त्यांना हिंसा आणि यौन अत्याचाराचे धडेही देऊ लागले आहे. मोठ्या संख्येने मुले पॉर्न आणि अशाप्रकारच्या साइट्स पाहात आहेत, जे त्यांना यौन गुन्हेगारीसाठी प्रेरित करत आहे. मुंबईत एका नऊ वर्षांच्या मुलाने एका लहान मुलीसोबत दुष्कर्म केले होते. त्याला त्याच्या गुन्ह्याचा अर्थदेखील माहित नसावा. मुले अशा प्रकारच्या मारामार्या किंवा अत्याचार का करत आहेत, यावरदेखील अगदी खोलवर संशोधन किंवा अभ्यास होताना दिसत नाही. अमेरिकेत मुले आणि किशोरवयीन मुले ज्या प्रकारची काळजी व्यक्त करताना दिसतात , त्या प्रकारे कमीत कमी आपण मोठी माणसे तरी अशा घटनांमधून बोध घेऊ शकतो, कारण आपल्याकडे परवाना घेतलेली हत्यारे नसतीलही,पण देशी कट्टे आणि बंदुका मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे याला आळा घालण्याची आपली फार मोठी जबाबदारी आहे.

Friday, March 30, 2018

जिल्हा न्यायालयांमध्ये 9 हजार जागांची भरती

     देशात आणि आपल्या राज्यात बेरोजगारांची मोठी फौज निर्माण होत आहे. डॉक्टर,इंजिनिअर, शिक्षण कृषी विभागासह अनेक क्षेत्रात लाखो तरुण नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही 75 हजार नोकर्या उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले आहे. अर्थात ही संख्या फारच तोकडी आहे. पण सुरुवात झाली म्हणायला काय हरकत आहे. फडणवीस यांनी दिलेल्या बातमीनंतर राज्यातल्या जिल्हा न्यायालयात 9 हजार जागा भरण्यात येणार असल्याची बातमी आली आहे. राज्यातल्या विविध जिल्हा न्यायालयांमध्ये लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई पदाच्या जागांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 एप्रिल आहे. तरुणांनी याची नोंद घ्यायला हरकत नाही.

इघुलेखक पदासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता 10 वी, 100 शब्द प्रति मिनिट लघुलेखन, इंग्रजी टंकलेखनाचा 40 शब्द प्रति मिनिट अशी आहे. कनिष्ठ लिपिक पदासाठी 10 वी उत्तीर्ण, इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट व मराठी 30 शब्द प्रति मिनिट व संगणक प्रशिक्षणाचा कोर्स उत्तीर्ण होण्याची पात्रता आहे. याशिवाय शिपाई, हमाल, पहारेकरी पदासाठी किमान 7 वी उत्तीर्ण, चांगली शरीरयष्टी अशी अट घालण्यात आली आहे.
या परीक्षेसाठी खुल्या गटासाठी 28 मार्च 2018 रोजी किमान 18 ते कमाल 28 वर्षे वयोमर्यादा असून ओबीसीसाठी तीन वर्षॅ तर मागास वर्गासाठी 5 वर्षांची वयात सवलत आहे. या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क नाही आणि महत्त्वाचे म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याची परीक्षा होईल. ही भरती मुंबई (492 जागा), नगर दिवाणी व सत्र न्यायालय (310), पुणे (643), नगर (490), अकोला (182), औरंगाबाद (458),बुलडाणा (138), परभणी (200),जालना (356),नागपूर (356), वर्धा (148), नाशिक (236), वाशीम (148), गोंदिया (240), चंद्रपूर (240), उस्मानाबाद (180), रायगड (234), बीड (187), कोल्हापूर (258), सातारा (300), सांगली (268), ठाणे (447), सिंधुदूर्ग (72), सोलापूर (246), अमरावती (246), रत्नागिरी (220) यासह दीव,दमण, गडचिरोली, सिल्व्हासा या ठिकाणीही भरती होणार आहे. याबाबत अधिक माहिती आपल्याला <https://bhc.gov.in/bhcrecruitment/>  या संकेतस्थळावर जाऊन पाहता येणार आहे.

जि.. आणि पं..ची विशेष सभांच्या मागणी चाप
अलिकडच्या काही वर्षांत जिल्हा परिषद म्हणा किंवा पंचायत समितीमध्ये विशेष सभा बोलावण्याची मागणी करण्याचे  फॅड चांगलेच वाढले आहे. अर्थात यामुळे विरोधकांना काय फायदा होतो, माहित नाही,पण यामुळे वेळ मात्र नक्की वाया जातो. विशेष सभा बोलवण्यासाठी आजकाल जुजबी कारणेही पुढे केली जात आहे. मात्र यावर राज्य शासनाने तोडगा काढायचे ठरवले आहे. अशा मागण्यांना आळा घालण्यासाठी 1961 च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातच सुधारण्याचा निर्णय ग्रामविकास खात्याने घेतल्याची बातमी आली आहे. या सुधारणेनंतर विशेष सभेच्या मागणीसाठी एक पंचमांश (40 टक्के) असलेला नियम बदलून त्यात आता किमान दोन पंचमांश ( 40 टक्के) अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
सध्या राज्य सरकारच्यावतीने राज्यातल्या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितींची मते जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. तत्पूर्वीच ग्रामविकास खात्याच्यावतीने हे विधेयक नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मंजूर केले आहे. आता या विधेयकाचे कच्चे प्रारुपही प्रसिद्ध झाले आहे. तेच प्रारुप अंतिम करण्यासाठी जिल्हा परिषदांची मते मागविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या नव्या तरतुदीसाठी 1961 च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील कलम 111 मधील पोटकलम तीन आणि त्यामधील परतुकांमध्ये बदल केला आहे. पोटकलम तीनमध्ये विशेष सभेच्या मागणीबाबतची तरतूद आहे. प्रचलित तरतुदीनुसार जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्यांपैकी किमान एक पंचमांश (20 टक्के) सदस्यांनी मागणी करणे अनिवार्य आहे. त्यात आता बदल करून दोन पंचमांश (किमान 40 टक्के) सदस्यांनी मागणी करणे आवश्यक आहे.

Wednesday, March 28, 2018

कर्नाटकची निवडणूक भाजप-काँग्रेससाठी प्रतिष्ठेची!


     शेवटी एकदाचे कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले म्हणायचे! अगोदरच चर्चेत असलेल्या राज्यात काँग्रेस आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हवा तापवून ठेवलेली असताना निवडणुकीची तारीख पेपरफुटीप्रमाणे अगोदरच फुटल्याने या चर्चेत आणखी भर पडली आहे. निवडणूक आयोगाने तारीख जाहीर करण्याअगोदरच भाजप आणि काँग्रेसच्या गोटातून निवडणूक आणि मतदानाची तारीख सोशल मिडिया आणि माध्यमांसमोर आली. आता निवडणूक आयोगाने याची चौकशी करण्याची घोषणा केली आहे. अर्थात यातून काय हाताला लागणार, हे आपल्याला माहितच आहे. घोषणेनुसार 225 सदस्य असलेल्या कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी एका दणक्यात म्हणजेच एका टप्प्यात 12 मे ला मतदान होणार आहे आणि 15 मे ला मतमोजणी असणार आहे. एका जागेसाठी एंग्लो-इंडियन समुहाच्या सदस्याला नामनिर्देशित केले जाते.

     कर्नाटक निवडणूकीची तारीख अगोदर फुटल्याने सध्या चर्चा रंगली असली तरी यापूर्वीच अनेक कारणांनी इथली हवा तापलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे केंद्रिय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कर्नाटक फेर्या वाढल्या आहेत. अनेक कामांचा शुभारंभही केला गेला. त्यामुळे गेल्या वर्षभरात इथले राजकीय वातावरण गरमागरम झाले आहे. आता तर निवडणुकीची तारीखच जाहीर झाल्याने हालचाली गतिमान झाल्या नसतील तर नवलच! कर्नाटक राज्याचा केंद्रिय स्तरावर मोठा दबदबा राहिला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जशी चर्चिली गेली तशी, या राज्याची निवडणूकसुद्धा अखंड भारतभर चर्चेचा विषय बनली आहे. उत्तर प्रदेश देशातले सर्वात मोठे राज्य आणि केंद्राच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याकारणाने हे राज्य भारतीय राजकारणाच्या निशाणावर कायमच राहिले आहे. त्याचबरोबर कर्नाटकदेखील आपल्या राजकीय महत्वाकांक्षेसोबत वेगळेच महत्त्व घेऊन पुढे आले आहे. इथे काँग्रेस आणि भाजपची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
     आता लोकसभा निवडणुकीला जवळपास फक्त एक वर्षच उरले आहे. त्याअगोदर राजस्थान आणि मध्यप्रदेश विधानसभेचा निवडणुका होणार आहेत. कर्नाटकचे अचानक महत्त्व वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे निवडणुका जाहीर व्हायच्या आधीपासून इथले राजकीय वातावरण पेटले होते. केंद्रात अगदी पक्की ठाण मांडून बसलेली भाजप आणि देशभरातून आपला गाशा गुंडाळत येत असलेली काँग्रेस इथे मात्र अगदी भक्कमपणे एकमेकांसमोर उभी राहिली आहे. भाजपला काँग्रेसमुक्त भारत करण्यात या राज्याचा वाटा मोठा हातभार लावणारा ठरणार असल्याने भाजपने सर्वात अगोदर या राज्याकडे अधिक लक्ष केंद्रित केले. गेल्या वर्ष-दीड वर्षात नरेंद्र मोदी यांचा वावर या राज्यात सातत्याने वाढला होता. दक्षिण भारतात फक्त कर्नाटकच्या रुपाने काँग्रेस तग धरून आहे. या राज्यावर कब्जा केला की, भाजपचे स्वप्न अक्षरश: पूर्ण होणार आहे. या दक्षिण भारतातल्या सर्वात मोठ्या राज्यावर दोन्हीही राजकीय पक्ष टपून बसले आहेत. सध्या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. इथे कुठलाही राजकीय पक्ष सलग दहा वर्षे राज्य करू शकला नाही. कर्नाटकचे लोक दरवर्षी आलटून-पालटून सत्ता देत आले आहेत. परंतु, यंदाची परिस्थिती जरा वेगळी आहे. इथे भाजपला सत्तेवर येण्यासाठी महत्प्रयास करावे लागणार आहेत, अशी परिस्थिती आहे.
इथले राजकारण टिपू सुलतान यांच्या नावावरून सुरू झाले आणि आता लिंगायत समाजाच्या ध्रुविकरणावर येऊन थांबले आहे. काँग्रेसच्या सिद्धरामय्या यांनी लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचे ठरवून तशी शिफारस केंद्राकडे केली आहे. भाजपच्या पारंपारिक जवळच्या लिंगायतांमध्ये फूट पाडण्याच्या या राजनीतीमुळे भाजप गोटात अस्वस्थतता पसरली आहे. माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांची जेडी-एस पार्टी तिसर्या आघाडीची भूमिका पार पाडणार आहे. 
     नोटबंदी, जीएसटीसारख्या निर्णयाचा भजपला इथेदेखील फटका बसेल, असे बोलले जात आहे. असे असले तरी दोघांनाही ही निवडणूक सोप्यातली नाही. त्यामुळे कुणीही ही निवडणूक हलक्याने घेणार नाही. कारण सत्ताधारी काँग्रेसनेदेखील गेल्या दोन वर्षात कामांचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे राजनीती कौशल्य पणाला लागणार आहे. कर्नाटकची विधानसभा निवडणूक झाली की, राजस्थान आणि मध्यप्रदेशची विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीचा परिणाम या दोन राज्याच्या निवडणुकांवर तर होणार आहेच शिवाय पुढच्या वर्षी होणार्या लोकसभेच्या निवडणुकीवरदेखील याचे पडसाद उमटणार आहेत. त्यामुळे दोन्हीही राजकीय पक्ष हम भी कुछ कम नहीं असा आविर्भाव दाखवत एकमेकांशी दोन हात करायला मैदानात उतरणार, यात काही शंका नाही.

Tuesday, March 27, 2018

उन्हाळ्यात अशी घ्या डोळ्यांची काळजी!

     यंदाचा उन्हाळा मोठा भयंकर आहे. अजून उन्हाळ्याचे दोन महिने बाकी असताना सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. वेधशाळेदेखील यंदाचा उन्हाळा तीव्र असण्याची शक्यता व्यक्त केली होतीच,त्यानुसार सध्या त्याचा प्रत्यय येत आहे. यंदा सगळीकडे पावसाने समाधान दिले असल्याने विदर्भ,मराठवाडा सोडला राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. मात्र वातावरणातला बदल उष्णतेची लाट घेऊन येत आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा असह्य असणार आहे. साहजिकच आपल्याला आपल्या शरीराची आणि अवयवांची काळजी करायलाच हवी. उन्हाचा पारा चढत चालल्याने त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होण्याची शक्यता अधिक आहे. उन्हाळ्यात डोळ्यांच्या तक्रारी सुरू होतात. त्या दूर ठेवण्यासाठी नागरिकांना उन्हात फिरताना डोळ्यांची काळजी घ्यायला हवी आहे.

     आपल्या डोळ्यांना आपल्या शरीराचा सुरक्षा कॅमेरा म्हणतात. या अवयवाची योग्य काळजी न घेतल्यास माणूस परावलंबी होऊ शकतो. बाहेर फिरण्याशिवाय पर्याय नसलेल्यांनी डोळ्यांची निगा राखायला हवी आहे. डोळ्यांच्या संसर्गावर वेळीच उपचार घ्यायला हवा आहे. उन्हामुळे अनेक तक्रारी वाढतात. साधारणपणे उष्ण वार्यामुळे डोळ्यांची अॅलर्जी, जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. धूळ,उष्णता, सुकलेले गवतकण यांच्यामुळे तक्रारी  वाढतात. ॅलर्जीमुळे डोळे खाजवणे, लाल होणे, लालसरपणा दिसणे, पाणी जाणे, कचरा गेल्यासारखे वाटणे, जळजळ होणे अशा तक्रारी येतात. सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे मोतीबिंदू, काचबिंदू, पडदा कमजोर होणे आणि डोळे कोरडे पडणे अशा तक्रारी या उन्हाळ्याच्या दिवसात उदभवतात.
     उन्हात फिरताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी महत्त्वाचे म्हणजे शक्यतो ब्रँडेड कंपनीचा गॉगल वापरायला हवा. चेहरा,डोके झाकले जाईल अशा पद्धतीने रुमाल, दुपट्टा बांधावा. तहान लागल्यास शक्यतो लिंबू पाणी पिल्यास फायदा होईल. दिवसातून किमान दोन ते तीन वेळा चेहरा, डोळे गार पाण्याने स्वच्छ धुवण्याची गरज आहे. आहारात जीवनसत्त्व अ असलेले पदार्थ ठेवल्यास उत्तम! एक्य असल्यास घरी रिकाम्या वेळी डोळ्यांवर काकडीच्या चकत्या ठेवाव्यात.डोळे गार होण्यास मदत होते.
     उन्हाळ्यात काही गोष्टी टाळणेही महत्त्वाचे आहे. यात शक्यतो भर उन्हात बाहेर जाणे टाळायला हवे. एसीतून उठून एकदम कडक उन्हात फिरू नका. टीव्ही, कॉम्प्युटरसमोर सलग दोन तासाम्पेक्षा अधिक बसणे टाळायला हवे. डोळ्यांत जळजळ, लालसरपणा आल्यास घरच्याघरी उपचार करण्याचा मोह टाळायला हवा. रिस्क घेऊ नका. तसे काही वाटल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यायला विसरू नका.

विज्ञान संशोधनासाठी सकारात्मक वातावरणाची गरज


     गेल्या कित्येक दशकभरात देशात एकही असा वैज्ञानिक शोध लागलेला नाही, ज्यामुळे देशाची विशेष अशी ओळख विज्ञानक्षेत्रात निर्माण व्हावी. आपण आजदेखील 1930 मध्ये रमण प्रभाव शोधासाठी भारतीय शास्त्रज्ञ सी.व्ही. रमण यांना मिळालेल्या नोबेल पुरस्कारावरच समाधान मानत आहोत. आनंद साजरा करत आहोत. देशात मूलभूत विज्ञान आणि शोध संदर्भातील परिस्थिती काही चांगली नाही. पंतप्रधान काही महत्त्वाच्या व्यासपीठांवर असा विश्वास देतात की, सरकार देशात शोध आणि संशोधनासाठी वातावरण तयार करेल. पण वास्तव असे की, देशातल्या विज्ञानाच्या मूलभूत विकासासाठी अजूनदेखील खास अशी राष्ट्रीय नीती बनवण्यात आलेली नाही. विज्ञानासाठी बजेटदेखील फारच कमी असते. दरवर्षी भारतीय विज्ञान काँग्रेस संमेलनात सरकारच्यावतीने विज्ञानासाठी बजेटमध्ये जीडीपीच्या दोन टक्के रक्कम खर्च करेल, असे आश्वासन दिले जाते. मात्र ते पाळले जात नाही. या खेपेलादेखील जीडीपीच्या एक टक्क्याच्या आसपास रकमेची तरतूद केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच इंफाळ येथे झालेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या व्यासपीठावर असा दावा केला आहे की, 2030 पर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा जगात पहिल्या तीन देशांमध्ये समावेश होईल. पण खरे वास्तव असे की, विज्ञान क्षेत्रात भारताला भारताला सर्वात वरच्या उंचीवर आणायचे असेल तर आपल्याला खालच्या स्तरावर बरेच काही करावे लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पहिल्यांदा आपल्या देशात वैज्ञानिक शोध, अविष्कार आणि संशोधनासाठी वातावरण तयार करावे लागणार आहे. शिवाय देशातला विज्ञानाचा कमकुवत मूलभूत पाया  दुरुस्त करावा लागणार आहे.

     वैज्ञानिक शोध आणि संशोधनाच्याबाबतीत जगातले अनेक छोटे देश आपल्या पुढे निघून गेले आहेत. ‘रमण प्रभाव’ शोधानंतर आम्ही त्यावर आणखी शोध लावू शकलो नाही. रमन स्कॅनरचा विकास दुसर्या देशांनी केला. हे अपयश नाही तर आणखी काय? एका अहवालानुसार जागतिक स्तरावर शोधनिबंधांच्या प्रकाशनाच्याबाबतीतही भारत, चीन आणि अमेरिकेच्या किती तरी मागे आहे. अमेरिकेत दरवर्षी भारतापेक्षा दहापट अधिक आणि चीनमध्ये सातपट अधिक शोधनिबंध प्रकाशित होत असतात. ब्राझिलमध्येदेखील आपल्यापेक्षा तीनपट अधिक शोधनिबंध प्रकाशित होत असतात. शोधपत्रांच्या प्रकाशनामध्ये जागतिक स्तरावर आपला हिस्सा हा फक्त दोन टक्के आहे. शोध आणि विकास यांवर भारत आपल्या जीडीपीच्या फक्त 0.88 टक्के खर्च करतो. हाच आकडा अमेरिकेचा 2.8, चीनचा 1.9, ब्रिटनचा 1.8, रशियाचा 1.1 टक्के आहे. भारतात प्रत्येक दहा हजार लोकांवर फक्त चार वैज्ञानिक शोध लावणारे आहेत. अमेरिका आणि ब्रिटेन या दोन्ही देशांमध्ये हा आकडा 46 चा आहे. रशियामध्ये 58 आणि चीनमध्ये 18 असा आहे.
     विज्ञान आणि तंत्रज्ञान यांमध्ये जगभरात भारत 21 व्या क्रमांकावर आहे. या रँकिंगच्या आधारावर कोणता देश वैज्ञानिक शोधांमध्ये किती भागिदारी घेत आहे,याचा अंदाज येतो. ही भागिदारी शोध आणि संशोधन निबंधांवर निश्चित केला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये एकाद्या देशाचे योगदान वैज्ञानिक व तंत्रज्ञान विषयांमध्ये पीएचडी करणार्या संख्यांच्या आधारावरही मोजले जाते. याबाबतीत भारताची परिस्थिती फारच वाईट आहे. आपल्याजवळ सीएसआयआरसारख्या संस्था आहेत. कित्येक स्तरावर संशोधन केंद्रे आहेत. काही विद्यापीठांमध्ये विज्ञान विभागदेखील आहेत. परंतु, सीएसआयआरचा एक सर्व्हे सांगतो की, दरवर्षी जे तीन हजाराच्या आसपास शोधनिबंध तयार होतात, त्यांमध्ये नवा विचार असा काही नसतो. वैज्ञानिक आणि वैज्ञानिक संस्था यांच्या कार्यकुशलतेवरच  वैज्ञानिक शोधनिबंधांचे प्रकाशन आणि पेटंट अवलंबून आहे. मात्र या दोन्ही बाबतीत मोठी घट आली आहे. देशाची परिस्थिती अशी आहे की, या आधुनिक युगातदेखील ‘विज्ञान’ सामान्य लोकांपासून फारच दूर आहे. आम्ही अजूनही सामान्य लोकांमध्ये वैज्ञानिक चेतनाचा विकास करू शकलो नाही. यामुळेच देशात अंधश्रद्धेचा बोलबाला असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात अंधश्रद्धेची मुळे खोलवर रुजली आहेत.
     आज आवश्यकता आहे ती, लोकांमध्ये वैज्ञानिक विचार निर्माण करण्याची! देशाच्या विकासात विज्ञानाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. आणि प्रत्येक नागरिकाला विज्ञानाशी जोडल्याशिवाय सर्वांगिण अशक्य आहे. विज्ञान प्रसाराची दिशेने केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना फारच मोठे काम करावे लागणार आहे. समाजातल्या सर्व स्तरापर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञान पोहचणे आवश्यक आहे. डिझिटल कनेक्टिविटीबरोबर विज्ञानाची मूलभूत समज विकसित करण्यासाठी एका तंत्राची आवश्यकता आहे. या तंत्राचा विकास महत्त्वाचा आहे. देशात शोध आणि संशोधनासाठी वातावरण तयार झाल्यावरच मेक इन इंडिया चे स्वप्नदेखील पूर्ण होणार आहे. यामुळे आपण तंत्रज्ञान क्षेत्रातदेखील पूर्णपणे आत्मनिर्भर होऊ शकणार आहे.
     विज्ञानाची चर्चा नेहमी मोठ्या वैज्ञानिक उपलब्धतेपर्यंतच मर्यादित राहते. आज सगळ्यात आवश्यकता आहे, ती देशातील विज्ञान शिक्षणाची अवस्था कशी सुधारायची? आणि दुसरे म्हणजे लोकांच्या समस्यांच्या निराकरणामध्ये  विज्ञानाचा सहभाग किंवा उपयोग कसा वाढेल, हे पाहणे महत्त्वाचे आहे.देशातल्या विज्ञानाच्या शिक्षणासाठी शाळा स्तरावर प्रयोगशाळांची मोठी कमतरता आहे. प्रयोगातूनच विज्ञान समजून घेता येणार आहे.फक्त वाचून काहीच साध्य होणार नाही. प्रयोगाशिवाय विज्ञान असा विचारसुद्धा होऊ शकत नाही. ही प्रवृत्ती मोठी घातक आहे. शाळेनंतर येणारा महाविद्यालयीन स्तरदेखील असाच आहे. इथेही फारसे चांगले चालले आहे, असे नाही. याकडे तात्काळ लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या खेपेला विज्ञान काँग्रेसचा मूळ विषय होता- विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यापासून लांब असलेल्या लोकांना तिथंपर्यंत पोहचण्यासाठीचा रस्ता सोपा बनवणे.म्हणजेच वैज्ञानिक समुहाचे लक्ष अशा नव्या शोधांवर असायला हवा, जो सामान्य लोकांचे आयुस्य बदलेल.
     कुठल्याही देशाची प्रगती विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात शिक्षण आणि संशोधनामध्ये सातत्याने होणार्या वाढीवर अवलंबून आहे. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी आपल्याला संशोधन आंतरराष्ट्रीय मानकांनुरुप असायला हवे. आता परिस्थिती अशी आहे की, सरकार फक्त सरकारी संस्थांना प्रोत्साहन देते. त्यांनाच आर्थिक मदत करते. खरे तर मूलभूत संशोधन विकासासाठी सरकारला खासगी विद्यापीठांदेखील सहाय्य करण्याची आवश्यकता आहे. त्यांना सोबत घेऊन जायला हवे आहे. चांगल्या खासगी संस्थांना आर्थिक मदतसुद्धा करण्याची गरज आहे. यामुळे तेदेखील देशाच्या विकासात हातभार लावू शकतील. आपल्याला ही गोष्ट विसरून चालणार नाही की, उच्चशिक्षण क्षेत्रात आज 95 टक्के खासगी संस्था आहेत, आणि फक्त पाच टक्के सरकारी संस्था आहेत. देशातील आधारभूत विज्ञानाच्या विकासासाठी आपल्याला सरकारी संस्थाम्बरोबरच खासगी क्षेत्रातदेखील भागिदारी वाढवायला हवी आहे. आज गरज आहे ती, विज्ञान विषयात गांभिर्याने एक राष्ट्रीय नीती बनवण्याची आणि त्यावर काम करण्याची! विज्ञान विषयात पीएचडी मिळवल्यानंतरही बेरोजगारीचा डंख शोधाच्या शक्यतेला मारून टाकतो. विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावण्यासाठी,त्याकडे आकर्षित करण्यासाठी, विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना आणि शोधप्रशिक्षणार्थी लोकांना रोजगाराची गॅरंटी देण्याबरोबरच अशी काही पावलं उचलावी लागतील की, देशात वैज्ञानिक शोध आणि आविष्काराचे एक सकारात्मक वातावरण बनायला हवे.

Monday, March 26, 2018

(बालकथा) सर्वात प्रकाशमान वस्तू


    एक दिवस तेनालीराम दरबारात बसला होता. एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा चालली होती. पण अचानक तेनालीरामला डुलकी लागली. त्याला पाहून सगळे दरबारी हसू लागले. महाराजांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून देत मंत्री म्हणाले, “ महाराज,तेनालीराम आता म्हातारा झाला आहे. त्याला निवृत्त करायला हवे.”
     ऐकून राजा कृष्णदेवराय खरोखरच गंभीर झाले. दुसर्या दिवशी राजा म्हणाला, “  खूप दिवसांपासून माझ्या मनात एक प्रश्न आहे. मला जाणून घ्यायचं आहे, या जगात सर्वात प्रकाशमान वस्तू कोणती आहे? जर आपल्यापैकी कुणी याचे योग्य उत्तर दिले तर आपण तेनालीरामला निरोपाचा नारळ देऊन टाकू. ”

     यावर दरबारातल्या तेनालीराम विरोधकांना तर उखळ्या फुटल्याच, शिवाय प्रश्नाचे उत्तर द्यायला अनेकजण अतुर झाले.
     मंत्री म्हणाले, “ महाराज, जगात चांदीपेक्षा प्रकाशमान आणखी कोणती वस्तू असूच शकणार नाही. ”  राजपुरोहित म्हणाले, “  महाराज, दूधच सर्वात प्रकाशमान आहे. ” कोणी जाईचे तर कोणी जुईचे फूल प्रकाशमान असल्याचे सांगितले. मात्र, यावर राजा कृष्णदेवराय यांचे समाधान झाले नाही. त्यांनी तेनालीराम विचारले. तेनालीराम म्हणाला, “  महाराज, याचे उत्तर मी उद्या देईन. ”
    दुसर्या दिवशी तेनालीरामने चांदीची दागिने, थोडे दूध आणि जाई-जुईची फुले मागवली. नंतर त्याने एका मोठ्याशा खोलीत फरशीवर या सर्व वस्तू ठेवायला सांगितले. दरवाजे,खिडक्या सर्व बंद करायला सांगून पडदेही लावायला सांगितले. तेनालीराम सर्व व्यवस्था लावल्यावर खोली बाहेर आला. दरवाजा बंद केला. आणि म्हणाला, “  महाराज, आता या लोकांना आत जाऊन आपापल्या वस्तू घेऊन यायला सांगा. ”
     मंत्री,पुरोहित आणि काही सदस्य आत गेले. बाहेरून दरवाजा लावण्यात आला. आत गेलेल्या लोकांना काहीच दिसेना.कुणाच्या दुधाच्या भांड्यावर पाय पडला. सगळे दूध सांडले. कुणाचा पाय चांदीच्या पायावर पडला. दागिने मोडून गेले. जाई-जुईची फुले कुणाच्या पायांत कुस्करली गेली. सगळेच चकित झाले. एकमेकावर ओरडू लागले. त्यांच्या वस्तू त्यांना जशा होत्या तशा मिळाल्याच नाहीत. तेवढ्यात तेनालीरामने खोलीची वरची एक खिडकी उघडली. आनि खोलीभर प्रकाश झाला. सगळ्या वस्तू अगदी स्वच्छ दिसायला लागल्या.
    आता तेनालीराम म्हणाला, “  महाराज, माझे उत्तर आता तुम्हाला समजलेच असेल. जगात सर्वात प्रकाशमान वस्तू दूध,चांदी किंवा जाई-जुईची फुले नाहीत तर सूर्याचा प्रकाश आहे. यामुळे फक्त ही खोलीच प्रकाशमान होत नाही तर संपूर्ण जग प्रकाशमान होते. ”
     उत्तर ऐकून राजा कृष्णदेवराय आनंदाने उठला आणि तेनालीराम जाऊन मिठी मारली. राजा दरबारी मंडळींना म्हणाला, “  समजले का, आम्हाला तेनालीराम का आवडतो ते! ”

बोगस ग्रामपंचायतीवर साडेतीनशे कोटी उधळले?


     राजकीयदृष्ट्या अत्यंत जागृत आणि संवेदनशील असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यात गेली अठ्ठावीस वर्षे बारामती या नावाने बोगस ग्रामपंचायत चालवली जाते आणि त्यावर आतापर्यंत सुमारे साडेतीनशे कोटी रुअपयांची उधळण करण्यात आली, हे प्रकरणच मुळी मोठे धक्कादायक आणि संतापजनक आहे. एका माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या सततच्या प्रयत्नामुळे बारामती ग्रामपंचायत बोगस झाल्याचे उघड झाले आणि ग्रामविकास मंत्रालय आता संबंधित चार अधिकार्यांवर कारवाईचा बडगा उभारणार आहे. इतकी वर्षे ही ग्रामपंचायत बिनभोबाट चालली,याचा अर्थ संगनमताने केलेला सरकारी पैशांचा गैरव्यवहार आहे. खरे तर याची दखल राज्य सरकारने गांभिर्याने घ्यायला हवी आणि दोषींवर कडक कारवाईही व्हायला हवी. आधीच आपल्या देशात बोगस प्रकार विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घडत असताना अख्खे गावच बोगस निघावे,हा प्रकार मोठा चकित करणारा आहे.

     बारामती शहराच्या हद्दीबाहेर बारामती नावाची ग्रामपंचायत गेली अठ्ठावीस वर्षे चालवली जात आहे. बारामतीच्या तहसीलदारांनीदेखील या नावाची कोणतीही ग्रामपंचायत अस्तित्वात नसल्याचे त्याचबरोबर इमारत मालमत्ता रजिस्टर नसताना आणि महसुली गाव नसल्याचे स्पष्ट केले आहे. असे असताना त्यावर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे.यात राज्यातील सार्वजनिक बांधकाम, समाजकल्याण, ग्रामविकास, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,पंचायत विभाग, अर्थ विभाग या सार्या विभागांनीही निधी दिला आहे. निधी खर्च झाला आहे. सगळे बिनभोबाट चालले आहे. हे काम काही एकट्या दुकट्याचे नाही. या गावाला विविध माध्यमातून आलेल्या निधीचा गैरव्यवहार साहजिकच संगनमताने झाला आहे म्हणायला वाव आहे. बारामती म्हटले की आपल्याला राजकीयदृष्ट्या सतर्क आणि जागृत तालुका आहे, हे चटकन लक्षात येते. हा दिव्याखालचा अंधार थक्क करणारा आहे. जागृत अशा जिल्ह्यात आणि तालुक्यात असे प्रकार घडत असतील तर अन्य ठिकाणची काय परिस्थिती असेल, हे खरे तर सांगायची गरज नाही. मागे ऑक्टोबर 2010 मध्ये राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने राज्यातल्या शाळांमधला मुलांचा बोगस पट शोधून काढण्यासाठी मोठी मोहीम राबवली होती. यात बोगस पट तर आढळून आलाच पण कित्येक बोगस शाळादेखील आढळून आल्या. शाळा आहे पण इमारत नाही, ठावठिकाणा नाही, विद्यार्थी नाहीत, शिक्षक नाहीत आणि शिक्षकांचा पगार आणि अनुदान मात्र नियमितपणे दिले जाते, हे उघड झाले.
     आपल्या राज्यात विहीर चोरीला जाते, याचा अर्थ विहीर बोगसच! ग्रामीण भागात शेतीसाठी विविध प्रकारचे अनुदान दिले जाते. शेत तळे, गोठा,बचत गट वगैरे! अशी किती तरी बोगस प्रकरणे आपल्या राज्यात आणि देशात घडत आहेत. बोगस प्रकरणे करून बँका लुटण्याचा प्रकार तर सर्रास घडत आहे. अर्थात असा जेव्हा प्रकार कोणी करतो, तेव्हा तो करणारा कोणी एकटा नसतो. संघटीतरित्या शासनाला लुबाडण्याचा प्रकार केला जातो. आणि याला सामिल सरकारातील लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी त्याला सामिल असतात. त्याशिवाय शासनाला किंवा बँकांना लुटण्याचा प्रकार घडत नाही. सगळ्या बाजूने देशाला लुटण्याचाच प्रकार सुरू आहे. एकदा निवडून गेलेला लोकप्रतिनिधी पाच वर्षात गडगंज होतो.त्याच्याकडे एवढ्या कालावधीत पैसा येतोच कुठून? लोकप्रतिनिधींनी खरे तर समाजसेवा आणि देशसेवा करणे अभिप्रेत आहे,पण इथे घडते उलटेच. जनतेच्या भल्यासाठी ही मंडळी निवडून दिली गेलेली असतात.पण निवडून गेल्यावर उलटा नमस्कार लोकांना करावा लागतो.
     बारामती ग्रामपंचायत बोगस आहे, हे सिद्ध करून दाखवायला माहिती अधिकार कार्यकर्त्याला महत्प्रास करावे लागले आहेत. पोपट धवडे हा कार्यकर्ता गेली आठ वर्षे सातत्याने धडपड करतो आहे. विशेष म्हणजे त्याने अशा प्रकारची कोणतीही ग्रामपंचायत अस्तित्वात नसताना त्यावर 350 कोटी खर्च करून गैरव्यवहार केला आहे, असा दावा केला होता. यासाठी त्याने मंत्रालय स्तरापर्यंत पाठपुरावा आणि उपोषण केले होते. पण तरीही त्याला कोणी दाद दिली नाही. त्याच्या आंदोलनातून आणि पाठपुराव्यातून एकाही अधिकार्यावर कारवाई झाली नसल्याचे या कार्यकर्त्याने पंचायत राज समितीपुढे निदर्शनास आणून दिले होते. हे प्रकरण 2015 मध्ये पहिल्यांदा नागपूर आधिवेशनात चर्चेला आले. चालू अधिवेशनात तब्बल 22 आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला.तेव्हा कुठे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे चार अधिकार्यांवर कारवाई करण्यास तयार झाल्या आहेत. या प्रकरणाची मूळासकट चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हायला हवी आहे. संबंधितांवर कारवाई झाली तरच अशा प्रकरणांना आळा बसणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने हा विषय गांभिर्याने घेण्याची गरज आहे.

Sunday, March 25, 2018

जिथे गाडी जात नाही,तिथे बनवले शौचालय


     तीस वर्षांपूर्वी यावेळेला पी.जी.सुधा यांच्या पतीचे निधन झाले, त्यावेळेला वाटलं होतं की आता त्यांचं आयुष्यच संपलं. त्यावेळेला सुधा यांचं वय 25 च्या आत होतं. ऐन तारुण्यात त्यांच्या वाट्याला विधवेचं आयुष्य आलं होतं.लोक म्हणायचे, कुणास ठाऊक,काय व्हायचं या एकटीचं?

     काही दिवस असेच गेले. मग सुधाने विचार केला, किती दिवस आपण दुसर्याच्या आश्रयाखाली जगायचं. दुसर्यांचं ओझं होऊन किती दिवस राहायचं. स्वाभीमानानं जगण्याचा निश्चय करून ही केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यात राहणार्या महिलेने कामाच्या शोधात घर सोडलं. ती फारशी शिकलेली नव्हती. त्यामुळे नोकरी मिळणं कठीण जात होतं. खूप संघर्ष केल्यानंतर वन विभागात गार्डची नोकरी मिळाली. पण तिच्या नातेवाईकांना ही नोकरी पसंद नव्हती. वन विभागात काम करायचं म्हणजे जंगली प्राण्यांचा सामना करणं आणि खतरनाक अशा तस्करांशी लढणं. सगळेच म्हणाले, दुसरं कोणतं तरी काम शोध. की नोकरी तुझ्यासाठी योग्य नाही. मात्र सुधाने कुणाचेच ऐकले नाही. ज्यावेळी ती पहिल्यांदा ड्युटीवर पोहचली,त्यावेळी तिचे सहकारी तिच्याकडे विचित्र अशा नजरेने पाहात होते. जणू ते म्हणत होते, ही एकटी महिला कशी बरं जंगलाची राखण करणार? पण सगळ्या शंका-कुशंकांना नजरेआड करत ती आपल्या कामाला लागली. खरोखरच जंगलाची राखण जोखमीची होती. जागोजागी धोके होते. प्रत्येक घटकेला जंगली प्राण्यांचा धोका होता. याशिवाय तस्करांची भीती होती.
     त्यांची केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातल्या कुट्टामपुजा जंगलात नेमणूक केली होती. दाट जंगलात शिकारी लोकांवर लक्ष ठेवणं मोठं जोखमीचं होतं. मोठं आव्हान होतं. त्यांच्या कडक गस्तीमुळे मात्र तस्कर बिथरले. त्यांना त्यांचे काम करायला अवघड जाऊ लागलं. परंतु, आदिवासी गाववाल्यांनी नि:श्वास टाकला. सुधा यांच्यावर आदिवासी लोकांच्या रक्षणाची जबाबदारीदेखील होती. ही जबाबदारी त्यांनी मोठ्या खुबीने पार पाडली. त्यामुळे त्या आदिवासींच्या आवडत्या बनल्या. आदिवासी लोक त्यांना आपल्या घरचीच समजून आपल्या तक्रारी,प्रश्न घेऊन त्यांच्याकडे जाऊ लागल्या. सुधादेखील मोठ्या काळजीने त्यांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायच्या. जी प्रकरणे त्यांना सोडवता येत नव्हती, ती त्या आपल्या वरिष्ठांच्या माध्यामातून सोडवायचा प्रयत्न करायच्या. सुधा सांगतात की, मी नेहमीच माझ्या कामावर फोकस ठेवायची. मी कधीच असा विचार केला नाही की, आपण महिला आहोत. माझ्यासाठी ड्युटीचा अर्थ होता ड्युटी!
     त्यांच्या प्रामाणिक कामावर वन अधिकारी जाम खूश होते. त्यांना 2006 मध्ये सर्वश्रेष्ठ फॉरेस्ट गार्डचा पुरस्कार मिळाला. त्यांची गणना धाकड कर्मचार्यांमध्ये होऊ लागली. 2016 मध्ये केरळसमोर स्वच्छता अभियानांतर्गत राज्याला खुले शौचमुक्त बनवण्याचे लक्ष्य होते. ज्यावेळेला राज्याने टॉयलेट बनवण्यासाठी टेंडर प्रसिद्ध केले, तेव्हा एकही ठेकेदार या भागात काम करण्यास राजी नव्हता. वास्तविक विस्तृत अशा जंगलात टॉयलेट (शौचायल) बनवणे तसे मोठे आव्हान होते. कठीण होते. अशा वेळेला तत्कालिन जिल्हाधिकारींना पी.जी.सुधा यांची आठवण आली. सुधा या कामासाठी राजी झाल्या. त्यांनी तीन महिन्याच्या आत 500 टोयलेट बांधून घेण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. सुधा सांगतात, शौचालयांची निर्मिती ही काही मोठी गोष्ट नव्हती,पण जंगली प्रदेशात त्यासाठी लागणारे साहित्य इच्छित स्थळी पोहचवणे मोठे कठीण काम होते. तिथे रस्ते नव्हते. ट्रक जात नव्हते. त्यामुळे ठेकेदार या जंगलातल्या लोकांसाठी शौचालय बांधायला तयार नव्हते.
     त्यांनी निश्चय केला की, आपण स्वत: शौचालयाचे साहित्य गावांपर्यंत पोहचवायचे. त्यांच्याजवळ वीट, सिमेंट आणि टॉयलेट शीट पोहचवण्याची कोणतीच सुविधा नव्हती. मजूरदेखील इतके भारी साहित्य वाहून न्यायला तयार नव्हते. पण सुधांनी निश्चयच केला होता, यासाठी काही तरी करायला हवेच! आपण हार पत्करायची नाही. सुधा यांनी बैलगाडी आणि नावेतून टॉयलेटचे साहित्य वाहून नेले. या दरम्यान त्यांनी आपल्या सहकार्यांचा आणि मजुरांची जिद्द तुटू दिली नाही. एकदा तर टॉयलेटच्या साहित्यांनी भरलेली नाव उलटली. संपूर्ण साहित्य भिजले,खराब झाले. पण तरीही त्यांनी आपला धीर सोडला नाही. कुठे कुठे बैलगाडीने साहित्य पोहचवणे कठीण होते. रस्त्यात कित्येकदा एका बैलगाडीतून साहित्य उतरून दुसर्या गाडीत चढवावे लागे. अशा बिकट परिस्थितीला त्यांना सामोरे जावे लागले. या मॅरेथान कामांत त्यांना कित्येकदा कित्येक किलोमीटर पायी चालावे लागले आहे. सुधा सांगतात आम्हाला नेहमी 15 ते 20 किलोमीटर अंतर पायी चालावे लागायचे. अशा वेळेला जंगली हत्तींचा धोका होता. आम्ही ऊन,वारा,पाऊस यांचा सामना करत अभियान पूर्ण केले.
     ज्यावेळेला शौचालये बांधली जाऊ लागली, तेव्हा गाववाल्यांना मोठं आश्चर्य वाटलं. ही वस्तू त्यांच्यासाठी नवी होती.  अगोदर त्यांना जंगली प्राण्यांचा धोका अंगावर घेऊन बाहेर शौचालयाला जावं लागायचं, पण आता त्यांची घरातच ही शौचची सोय झाल्याने मोठा आनंद झाला. सुधा सांगतात, जंगल प्रदेशात जागेचा कोणता प्रश्न नव्हता. मात्र शौचाला बाहेर जायला धोका होता. आता त्यांची या धोक्यातून सुटका झाली. अभियान पूर्ण झाल्यावर अधिकारी वर्ग दौरा करायला निघाले. या प्रदेशातल्या गावांमध्ये पक्की शौचालये बांधून पूर्ण होती. हे पाहून सुधा यांचे मोठे कौतुक झाले.2016 मध्ये केरळ राज्य हागणदारी मुक्त झाला. या यशात सुधा यांचेही मोठे योगदान राहिले आहे. सरकारने त्यांना ओपन डिफेकेशन फ्री अभियान अॅवार्ड देऊन सन्मानित केले. याशिवाय सर्वश्रेष्ठ वन विभाग अधिकारी पुरस्कारदेखील मिळाला.

वाढती व्यसनाधिनता चिंताजनक     आपल्या देशात विशेषत: महाराष्ट्रात वाढत असलेली व्यसनाधिनता मोठा चिंतेचा विषय आहे. अगदी लहानसान शाळकरी मुलंदेखील दारू,सिगरेट, गुटखा-माव्याचे व्यसन करत आहेत. तरुणांविषयी तर बोलण्याचीच सवय राहिलेली नाही. व्यसन करतानाच त्याचे जाहीरपणे चर्चितचर्वण करण्यालादेखील ही पिढी अजिबात कचरत नाही. आपण काल एवढी पिली,पण अजिबात चढली नाही... मी रोज एवढ्या पुड्या खातो... असे बिनधास्त ही मंडळी चारचौघात बोलताना दिसतात. उद्याचा भविष्य म्हणून या लोकांकडे पाहिले जाते,पण ही पिढी मात्र उद्याचे स्वत:चे भविष्य तर मातीमोल करीत आहेच शिवाय देशालाही मागे खेचण्याचे काम करत आहेत. भारत देश प्रगतीकडे झुकत असल्याचे आपण म्हणत असलो तरी महासत्ता वगैरे आपला देश होणार, अशा ज्या वल्गना केल्या जात आहेत, त्या फुकाच्याच केल्या जात असल्याचे दिसत आहे. बरे मुळात आपल्या महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये गुटखा-मावासारख्या तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आहे. पण तरीही या वस्तू प्रत्येक गावात चौकाचौकातल्या पानटपरीवर सहज मिळतात. कायदे करायचे,पण त्यांची अंमलबजावणी करायची नाही, हेच आपण या अंमलबजावणी करण्याची ज्यांच्याकडे जबाबदारी आहे,त्यांच्याकडून पाहायला मिळत आहे.

     सलाम बॉम्बे किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या काही मोजक्या संघटना महाराष्ट्रात या विषयावर काम करत आहेत. नरेंद्र दाभोळकर यांच्या अंनिसने अलिकडेच जवळपास शंभर गावांचा सर्व्हे केला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात राज्यात व्यसनाधिन लोक असल्याचे आढळून आले आहे. व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचातर्फे अंनिसने राज्यातील या शंभर गावांचे सर्व्हेक्षण करताना मद्य,तंबाखू,गुटखा,सिगरेट, अफू, गांजा, ड्रग्ज या सगळ्याच व्यसनांच्या प्रकाराला हात घातला. त्यांचा हा सर्व्हे मोठा धक्कादायक आणि चिंताजनक आहे. राज्यात व्यसनाचे बळी पडलेल्या लोकांची संख्या जवळपास चार कोटी आहे. व्यसनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या आहे. 3 लाख 53 हजार 584. या व्यसनामुळे सुमारे 45 हजार कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. राज्यात सुमारे साडेबारा लाख मध्यविक्रेत्यांची संख्या आहे. विशेष म्हणजे व्यसनाधिन झालेला वयोगटात तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आणखी एक चिंता करण्यासारखी गोष्ट म्हणजे या व्यसनाधिन वर्गात 25 टक्के महिलादेखील आहेत.
     आपण विचार केल्यावर काही गोष्टी निश्चित होतात, त्या म्हणजे व्यसनामुळेच कौटुंबिक कलह, महिलांवरील अत्याचार घडतात. याचे प्रमाण जवळपास 60 टक्के आहे. पोलिसांचे दुर्लक्षदेखील याला कारणीभूत असून सुमारे 62 टक्के अवैध दारू आणि गुटखा विक्री फक्त पोलिसांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे होते. 20 टक्के याला राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधीही जबाबदार आहेत. या सर्व्हेक्षणात घरटी एक व्यक्ती व्यसनाधिन असल्याचेही समोर आले आहे. ही गोष्ट फारच गंभीर असून शासनाने यासाठी कृती कार्यक्रम आखून व्यसनाला बळी पडत असलेल्या तरुणांना बाहेर काढणे आवश्यक आहे.
     राज्यात अलिकडच्या काही वर्षात सरकारी भरती झालेली नाही. डी.एड.,बी.एड.सारखे व्यावसायिक शिक्षण घेतलेले लाखो तरुण नोकरीच्या शोधात भटकताना दिसतात. नोकरी नसल्याने ही मंडळी निराश झालेली नसतात. मनाने कोलमडलेली दिसतात. आपल्या भवितव्याबाबत चिंतेत असलेले तरुण डिप्रेशनमध्ये जातात. शेतकर्यांच्या आत्महत्या काही थांबलेल्या नाहीत,पण नोकरी मिळत नसल्यानेही तरुण मरण जवळ करताना दिसत आहेत. अशा तरुणांना खरे तर सुशिक्षित भत्ता देऊन त्यांना तात्पुरता दिलासा देण्याची आवश्यकता आहे.
   
 फारशी शाळा न शिकलेले, बांधकाम सेंट्रींग,गवंडी काम,मजुरी करणारे अशी मंडळीदेखील योग्य मार्गदर्शानाअभावी अशा व्यसनाला बळी पडल्याचे दिसून येत आहे. काही तरुण कामधंदा न करता केवळ धाकधपटशा करून निवांत जीवन जगण्याचा फार्म्युला वापरताना दिसतात. काही तरुण राजकीय झेंड्याखाली, लोकप्रतिनिधींकडे रोजंदारीवर काम करताना दिसतात. अर्थात ज्याच्याकडे कामाला आहेत, अशी मंडळी त्यांना अभय देताना अनेक वाईट कामे करून घेतात. साहेब आपलेच आहेत, असे म्हणत काही लोक समाजाला अक्षरश: लुबाडत असतात. मोठ्या घरचा नोकर म्हटले तरी रुबाब हा तर असतोच. त्यामुळे इतर लोक दचकून असतात आणि याचाच ही मंडळी फायदा घेत राहतात.
अशा व्यसनाधिन लोकांच्या घरचे मोठे प्राब्लेम असतात. या प्राब्लेम असलेल्या लोकांना समाजात इज्जत, मानपान मिळत नाही.उलट अशा लोकांच्या अतिव्यसनाचा काही लोक भलताच फायदा घेतात. संबंधितांना लुबाडतात. त्याच्याविषयी तक्रार दाखल करून त्याला पुन्हा छळायला सुरुवात करतात. यामुळे अनेक अनैतिक गोष्टी घडतात. हे टाळण्यासाठी शासनानेच तालुका पातळीवर असे व्यसन केंद्रे सुरू करायला हरकत नाही. वेळोवे़ळी व्यसनी आणि त्यांच्या जवळच्या लोकांना  मदत मिळणे आवश्यक आहे. यातून मार्ग काढण्यासाठी खरे तर लोकप्रतिनिधींनी अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

(बालकथा) बिट्टूचा आनंद


     बिट्टू आता उंबरठ्यावर उभा राहून तिच्या काही मैत्रिणींना शाळेला जाताना पाहात होती. तेवढ्यात आजीने आवाज दिला, ‘‘ बिट्टू, जरा डाळ झाली का बघ आणि चुलीवरून उतरव. ’’
बिट्टू पळतच आली आणि तिने चमच्या घेऊन डाळ पाहिली,मग चुलीवरचे पातेले उतरवून खाली ठेवले. मग तिने आवाज दिला, ‘‘ दादा, नाष्टा तयार झालाय, चल खावून घे. ’’

‘‘ थँकू बिट्टू! ’’ असे म्हणून तो नाष्टा करू लागला.
थँकू ऐकून ती हसली आणि म्हणाली, ‘‘लवकर खाऊन आणि शाळेला जा. बघ तो पम्या आणि दाम्या कधीचे गेले. तू काय सुट्टीच्या टायमाला जाणार का? ’’
‘‘ अगं नाही गं,बिट्टू! बघ मी सायकलने त्यांच्या अगोदर पोहचेन. ’’ लल्ल्या म्हणाला.
‘‘ अरे व्वा! अशी काय तुझी सायकल हेलिकॅप्टर लावून गेली का? ’’ बिट्टू  मान हलवत म्हणाली.
‘‘ होय बिट्टू! माझी तर सायकलच हेलिकॅप्टर आहे. ’’ लल्ल्या हसून म्हणाला. तोच आजी नाटकी राग आणत म्हणाली, ‘‘ लय हेलिकॅप्टर बनवू नकोस सायकलला, नाही तर कुठे तर धाडदिशी पडशील आणि बत्तीशी रस्त्यावर पडेल. ’’
लल्याला आजीने बोलल्यावर बिट्टू अगदी मनमोकळेपणानं हसली. लल्याला पण नाष्टा करता करताच खाली मान घालून हसू लागला. बिट्टूला हसताना पाहून आजीला राग आला, ती म्हणाली, ‘‘ तुला काय झालं खिदळायला? चल, तिकडे कपडे ठेवले आहेत, धुवून टाक ते! ’’
‘‘ हो आजी, लगेच धुते. ’’ असे म्हणून बिट्टू कपडे धुवायला निघून गेली. बिट्टूला असं रागावलेलं लल्ल्याला आवडलं नाही, पण तो काय करणार होता. नाष्टा करून, दप्तर घेऊन निघाला शाळेला! वाटेत विचार करत राहिला, ‘बिट्टू दिवसभर काम करते. सगळं घर झाडते, भांडी घासते, कपडे धुते, शेण काढते तरीही बिचारीला बोलले जाते. आता मी असे होऊ देणार नाही.’
संध्याकाली ज्यावेळेला तो शाळेतून घरी आला, तेव्हा बिट्टू पाणी भरत होती. त्याला पाहून ती पळतच आली आणि मान हलवतच म्हणाली, ‘‘तुला माहित आहे का दादा, आज मी आपल्यासाठी गाजराचा हलवा केलाय. ’’
लल्ल्या हसला. तेवढ्यात आतून आईचा आवाज आला, ‘‘ बिट्टू, त्याच्याशी काय गप्पा मारतेस,पहिल्यांदा त्याला खायला तर दे. ’’
‘‘ हो आई, आत्ता आले! ’’ असे म्हणून ती लल्लासाठी हलवा आणायला गेली.
एवढ्यात लल्लाने दोन-तीन पुस्तके दप्तरातून काढली. दोन-तीन वह्या काढल्या. त्या कॉटवर ठेवल्या. मग तो एक पिशवी शोधू लागला. तेवढ्यात बिट्टूने हलवा आणून त्याच कॉटवर ठेवला आणि म्हणाली, ‘‘ अरे दादा, आज मी तुझ्या आवडीचा हलवा बनवला आहे, आणि तू अजून हातसुद्धा धुतले नाहीस. ’’
‘‘ आता आलो. ’’ असे म्हणून तो आपल्या कामाला लागला. थोड्या वेळाने त्याचे जुने दप्तर घेऊन आला. त्यात वह्या आणि पुस्तके ठेवली. बिट्टूने विचारले, ‘‘हे काय करतोयस दादा? ’’
एवढ्यात तिथे आई आणि आजीदेखील आल्या. लल्ला म्हणाला, ‘‘ बिट्टू, ही पुस्तके घेऊन तू शाळा शिकायला येणार आहेस. ’’
‘‘ काय! काय म्हणतोयस लल्ल्या तू? ’’ आजी आश्चर्याने एवढेच बोलू शकली. बिट्टू तर त्याच्या तोंडाकडेच पाहू लागली. आई तर पाहातच राहिली. ‘‘ हो आजी, मी गुरुजींशी बोललो आहे.ते बिट्टूचे नाव शाळेत घालायला तयार झाले आहेत. शाळेत बिट्टूलादेखील फी बसणार नाही. माझ्याप्रमाणेच हिलाही शाळेचा गणवेश,पुस्तके मोफत मिळणार आहेत. तीन पुस्तके तर गुरुजींनी दिलीसुद्धा! ’’ असे म्हणत त्याने दप्तरातली पुस्तके काढून दाखवली.
आई तर काहीच म्हणाली नाही. पण आजीला मात्र राग आला होता. ती म्हणाली, ‘‘ ही पण शाळेत चालल्यावर घरातली कामं कोण करणार? ’’
‘‘ आजी, आम्ही दोघं मिळून सकाळची कामं करू. राहिलेली कामं शाळेतून आल्यावर करू. ’’ लल्ला म्हणाला तसा आजीचा आवाज बंद झाला. ती काहीच बोलू शकली नाही. आई मात्र हसली.
बिट्टूला दादाच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. ती अगदी काळजीपूर्वक त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत होती. आता ती आश्वस्त झाली आनि आजीला म्हणाली, ‘‘ आजी, आम्ही सकाळी लवकर उठू आणि तुमची सगळी कामे करू. मग मी दाद्याबरोबर शाळेला जाऊ ना? ’’
आजीने तिच्या मासूम,भोळ्या चेहर्यावर शिकण्याची इच्छा पाहिली. तिलाही नाही म्हटले तरी आतून ढवलून आले. ती तिच्याजवळ जाऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. आणि म्हणाली, ‘‘ तुला शिकायचं आहे ना? मग जा, उद्यापासूनच शाळेला जा. ’’
आजीने एवढे म्हणताच तिने तिला घट्ट मिठी मारली. आईनेदेखील मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. सगळ्यांचे प्रेम पाहून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. मग ती लल्लाजवळ गेली आणि त्याला मिठी मारत म्हणाली, ‘‘ थँकू दादा! ’’
हे ऐकून सगळे मोठ्याने हसू लागले.

Saturday, March 24, 2018

बॉलीवूडने पार केली चीनची भिंत


     ज्यावेळेला जॅकी चैन भारतात आला होता, त्यावेळेला तो म्हणाला होता की, मला भारताबाबत फक्त तीन गोष्टी माहित आहेत. एक- अमिर खान,दुसरी- थ्री इडियटस आणि तिसरी गोष्ट म्हणजे बॉलीवूडचा डान्स. चॅकी चैनच नव्हे तर जगभरातल्या कानाकोपर्यातील लोक भारताला त्याच्या चित्रपटांविषयी अधिक ओळखतात. एक काळ असा होता की, राज कपूर, मिथून चक्रवर्ती यांचे चित्रपट सोवियत संघमध्ये खूप लोकप्रिय होते. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांनीदेखील मध्य आशियामध्ये लोकप्रियता मिळवली होती. आजदेखील भारतीय चित्रपट जगभर पाहिले जातात. शाहरुख खानदेखील युरोपमध्ये खूप लोकप्रिय मानले जातात,पण एक-दोन चित्रपट खास करून राजकपूर यांचे चित्रपट सोडले तर चीन आपल्या चित्रपटांसाठी कधी मोठा बाजार राहिला नाही. परंतु, आता वाटायला लागले आहे की, काळाबरोबर यात बदल होतो आहे. आता आपले बरेच चित्रपट चीनच्या बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची कमाई करताना दिसत आहेतया वर्षी प्रदर्शित झालेला सलमान खानचा बजरंगी भाईजान चित्रपटाने तीन आठवड्यात चीनच्या बॉक्सवर 250 कोटीपेक्षा अधिक कमाई केली आहे. हा काही पहिला चित्रपट नाही की, आपल्या शेजारील देशात रिकॉर्ड ब्रेक कमाई केला आहे. यापूर्वी अमिर खानच्या थ्री इडियट्स,पीके, दंगल आणि सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटांनीदेखील चांगली कमाई केली आहे. अमीर खाननंतर सलमान खानचा बजरंग भाईजान आणि आता बॉलीवूडचा तिसरा कलाकार इरफान खान याचा हिंदी मिडियम हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट 4 एप्रिलला चीनमध्ये झळकणार आहे.

     ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौर्यावर गेले होते,त्यावेळेला तिथल्या राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी त्यांच्यापुढे दंगल चित्रपटाचा उल्लेख केला होता. आता असा प्रश्न उपस्थित होतो की, शेवटी चीनला भारतीय चित्रपट का आवडू लागले आहेत? हे जगजाहीर आहे की, भारत आणि चीन एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. वेळोवेळी दोघांचा संघर्ष हा युद्धावर येऊन ठेपतो. चीन नेहमी भारताला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतो. पाकिस्तानशी सलगी करून त्याला आणि अन्य आपल्या शेजारी देशांना आर्थिक आणि इतर मदत करून आपल्याकडे खेचण्याचा त्याचा सतत प्रयत्न चाललेला असतो. मात्र भारत नेहमी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या प्रामाणिक आणि शिष्टाचाराच्या जोरावर चीनवर मात करत आला आहे. असे असताना चीनमधल्या लोकांमधला बदल आपल्याला धक्कादायक आहे.
     वास्तविक आपल्याकडेही चीन आपला कट्टर शत्रू असला तरी चॅकी चैन लोकप्रिय आहे. त्याच्या चित्रपटाचे अनेक लोक दिवाने आहेत. इथे आपण एक कलाकार म्हणूनच त्याच्याकडे पाहतो. मग तिकडेही असाच दृष्टीकोन असेल तर ती आपल्यासाठी मोठी सुसंधी आहे, असेच म्हणावे लागेल. आपल्या चित्रपटांना तिथे एक मोठा बाजार मिळाला आहे, असे म्हणायलाही जागा आहे. अर्थात यासाठी एवढी घाई करण्याचे कारण नाही,पण आपल्याकडे चित्रपटांचे फार्मुल्ये बदलले आहेत. तोच तोचपणा जाऊन त्यात एक वेगळेपण आले आहे. आपले चित्रपट मनोरंजन करण्याबरोबरच सामाजिक संदेश देण्यात आघाडीवर आहेत. कदाचित चीनमधल्या लोकांना ही गोष्ट आवडत असावी. उदाहरणच द्यायचे तर राजकपूर यांच्या चित्रपटांचे देता येईल. राजकपूर यांच्या चित्रपटांमध्ये सोवियत संघचे लोक स्वत:ला पाहात. तसेच काही प्रमाणात अमीर खानच्या चित्रपटांबद्दल चीनमध्ये होत असावे. थ्री इडियटस हा चित्रपट चीनच्या तरुणांमध्ये फारच लोकप्रिय आहे. दंगलच्या माध्यमातून चीनचा मध्यम वर्गीय  स्वत:ची झलक पाहात असावा. दंगल तिथल्या नऊ हजार चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. दंगल हा चित्रपट चीनमध्ये सर्वातधिक पाहिला गेलेला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात चीनच्या प्रेक्षकांनी आपल्या आयुष्याची झलक पाहिली होती, म्हणजे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, वडील आणि मुले यांचे नाते आणि महिलांना मुख्य प्रवाहात येताना येणार्या अडचणी इत्यादी! सलमान खान याच्या बजरंग भाईजान च्या यशामुळे आणखी एक गोष्ट लक्षात येते ते म्हणजे तिथला प्रेक्षक खास प्रकारचे चित्रपट पाहण्याचा भुकेला आहे. समाजाला संदेश देणारे चित्रपट त्यांना अधिक भावतात.
     काही चित्रपट परीक्षकांचे म्हणणे असे की, चीनमध्ये अमीर खानचे चित्रपट यशस्वी होण्यामागे या चित्रपटाच्या प्रचारासाठी राबवण्यात आलेली खास प्रकारची रणनीती! चीनमधल्या प्रमुख शहरांमध्ये चित्रपटाचा प्रचार करण्यात आला. चीनचे लोक खाण्याविषयी प्रचंड जागरुक आहेत. तिथल्या स्थानिक पक्वानाविषयी आणि तिथल्या सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांशी संपर्क ठेवला गेला. अमीर खानचे यासाठी कौतुकच करायला हवा. अर्थात ही रणनीती तिथल्या अगदी लहान चित्रपटाच्या प्रचारासाठी अवलंबली जाते. पण चित्रपटाचा प्रचार हाच कळीचा मुद्दा होताच पण चित्रपटांच्या यशासाठी आणखीही कारणे आहेतच, असे म्हणायला हवे. बजरंगी भाईजान, बाहुबली द कन्क्लूजन चित्रपटांनाही मोठे यश मिळाले आहे. या निवडक भारतीय चित्रपटांना चीनमध्ये मिळालेले यश पाहिल्यावर असे वाटते की, आपला भारतीय चित्रपट चीनची भिंत पार करण्यात  काही प्रमाणात यशस्वी झाला आहे.