Friday, March 2, 2018

आर्यन,वडिल आणि भाकरी


(आर्यनच्या वडिलांची ही कथा आहे,ज्यांनी आर्यनला असा संदेश दिला,ज्यामुळे तो जीवनात मोठी उंची गाठू शकला.)
     आर्यन आपल्या ऑफिसमधल्या कर्मचार्यांना काही तरी सांगत होता. तेवढ्यात त्याला त्याच्या जीवनातला एक अनुभव सांगावासा वाटला. तोम्हणाला, माझे बालपण फार हालाखीत गेले. माझी आई दुसर्यांच्या घरची धुणी-भांडी करत होती आणि वडिल मजुरी करत होते. पण त्यांनी मला माझ्या शिक्षणासाठी कधीच काही पडू दिले नाही. रात्रीच्या जेवणावेळी आम्ही भाकरीला मीठ लावून चुलीवर शेकून खायचो. कधी भाकरीला जॅम लावून मिळायचे, कधी तूप.

या आर्यनच्या बोलण्यावर सगळे हसू लागले. आर्यन पुढे बोलू लागला. एके दिवशी भाकरी चुलीच्या आरावर भाजत असताना भाकरी जरा जास्तच करपली. मी सगळे पाहात होतो. आता ही भाकरी कोण खाणार? कारण भाकरी जास्तच काळी पडली होती. पण वडिलांवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही.त्यांनी ती भाकरी उचलली. त्यावर थोडा जॅम लावला आणि मोठ्या आनंदाने खाऊ लागले. आई त्यांना म्हणाली, ही थोडी करपलीय. वडिल म्हणाले, मला करपलेली भाकरी आवडते. याला मोठी चव असते.
आई तिथून गेल्यावर मी बाबांना म्हणालो,खरेच तुम्हाला करपलेली भाकरी आवडते? यावर वडील म्हणाले,तुझी आई दिवसभर खूप काम करते. आज ती फारच थकलेली दिसते. आणि आज एक दिवस करपलेली भाकरी खाल्ली म्हणून काही बिघडणार नाही. पण तुझी आई मात्र शांतपणे झोपून जाईल. आपल्यामुळे कोणी उपाशी राहिले, याची तिला काळजी असणार नाही. मग ते म्हणाले, आपल्या सर्वांमध्ये काही ना काही कमतरता आहे,उणीव आहे. सगळेच चुका करतात. पण आपण त्या चुका उगाळत बसण्यापेक्षा त्या सुधारण्याचे काम करायला हवे. त्याच्या चांगल्या कामांचे कौतुक करायला हवे. कोणी चुकले असले तरी त्याला आपण सगळ्यांनी मिळून ताकद द्यायला हवी. त्यामुळे एक चांगला भविष्यकाळ निर्माण होईल.
वडिलांची ती गोष्ट माझ्या मनात फिट्ट बसली. आणि आजतागायत ती गोष्ट मी माझ्या आयुष्यात आजमावत असतो. आता त्या गरिबीतून निघून मी आज या कंपनीचा सीईओ आहे.पण आज जे यश मिळाले आहे, याला कारण म्हणजे मी तुमच्या कधी चुका काढत नाही. तर तुमच्यातले कौशल्य शोधतो आणि प्रोत्साहित करण्याच्या संधी शोधतो.त्यामुळेच माझी कंपनी आज देशातल्या यशस्वी कंपन्यांपैकी एक आहे.
तात्पर्य- दुसर्याच्या उणिवा न काढणे ही मोठेपणाची निशाणी आहे.

No comments:

Post a Comment