Tuesday, March 27, 2018

विज्ञान संशोधनासाठी सकारात्मक वातावरणाची गरज


     गेल्या कित्येक दशकभरात देशात एकही असा वैज्ञानिक शोध लागलेला नाही, ज्यामुळे देशाची विशेष अशी ओळख विज्ञानक्षेत्रात निर्माण व्हावी. आपण आजदेखील 1930 मध्ये रमण प्रभाव शोधासाठी भारतीय शास्त्रज्ञ सी.व्ही. रमण यांना मिळालेल्या नोबेल पुरस्कारावरच समाधान मानत आहोत. आनंद साजरा करत आहोत. देशात मूलभूत विज्ञान आणि शोध संदर्भातील परिस्थिती काही चांगली नाही. पंतप्रधान काही महत्त्वाच्या व्यासपीठांवर असा विश्वास देतात की, सरकार देशात शोध आणि संशोधनासाठी वातावरण तयार करेल. पण वास्तव असे की, देशातल्या विज्ञानाच्या मूलभूत विकासासाठी अजूनदेखील खास अशी राष्ट्रीय नीती बनवण्यात आलेली नाही. विज्ञानासाठी बजेटदेखील फारच कमी असते. दरवर्षी भारतीय विज्ञान काँग्रेस संमेलनात सरकारच्यावतीने विज्ञानासाठी बजेटमध्ये जीडीपीच्या दोन टक्के रक्कम खर्च करेल, असे आश्वासन दिले जाते. मात्र ते पाळले जात नाही. या खेपेलादेखील जीडीपीच्या एक टक्क्याच्या आसपास रकमेची तरतूद केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच इंफाळ येथे झालेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या व्यासपीठावर असा दावा केला आहे की, 2030 पर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा जगात पहिल्या तीन देशांमध्ये समावेश होईल. पण खरे वास्तव असे की, विज्ञान क्षेत्रात भारताला भारताला सर्वात वरच्या उंचीवर आणायचे असेल तर आपल्याला खालच्या स्तरावर बरेच काही करावे लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पहिल्यांदा आपल्या देशात वैज्ञानिक शोध, अविष्कार आणि संशोधनासाठी वातावरण तयार करावे लागणार आहे. शिवाय देशातला विज्ञानाचा कमकुवत मूलभूत पाया  दुरुस्त करावा लागणार आहे.

     वैज्ञानिक शोध आणि संशोधनाच्याबाबतीत जगातले अनेक छोटे देश आपल्या पुढे निघून गेले आहेत. ‘रमण प्रभाव’ शोधानंतर आम्ही त्यावर आणखी शोध लावू शकलो नाही. रमन स्कॅनरचा विकास दुसर्या देशांनी केला. हे अपयश नाही तर आणखी काय? एका अहवालानुसार जागतिक स्तरावर शोधनिबंधांच्या प्रकाशनाच्याबाबतीतही भारत, चीन आणि अमेरिकेच्या किती तरी मागे आहे. अमेरिकेत दरवर्षी भारतापेक्षा दहापट अधिक आणि चीनमध्ये सातपट अधिक शोधनिबंध प्रकाशित होत असतात. ब्राझिलमध्येदेखील आपल्यापेक्षा तीनपट अधिक शोधनिबंध प्रकाशित होत असतात. शोधपत्रांच्या प्रकाशनामध्ये जागतिक स्तरावर आपला हिस्सा हा फक्त दोन टक्के आहे. शोध आणि विकास यांवर भारत आपल्या जीडीपीच्या फक्त 0.88 टक्के खर्च करतो. हाच आकडा अमेरिकेचा 2.8, चीनचा 1.9, ब्रिटनचा 1.8, रशियाचा 1.1 टक्के आहे. भारतात प्रत्येक दहा हजार लोकांवर फक्त चार वैज्ञानिक शोध लावणारे आहेत. अमेरिका आणि ब्रिटेन या दोन्ही देशांमध्ये हा आकडा 46 चा आहे. रशियामध्ये 58 आणि चीनमध्ये 18 असा आहे.
     विज्ञान आणि तंत्रज्ञान यांमध्ये जगभरात भारत 21 व्या क्रमांकावर आहे. या रँकिंगच्या आधारावर कोणता देश वैज्ञानिक शोधांमध्ये किती भागिदारी घेत आहे,याचा अंदाज येतो. ही भागिदारी शोध आणि संशोधन निबंधांवर निश्चित केला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये एकाद्या देशाचे योगदान वैज्ञानिक व तंत्रज्ञान विषयांमध्ये पीएचडी करणार्या संख्यांच्या आधारावरही मोजले जाते. याबाबतीत भारताची परिस्थिती फारच वाईट आहे. आपल्याजवळ सीएसआयआरसारख्या संस्था आहेत. कित्येक स्तरावर संशोधन केंद्रे आहेत. काही विद्यापीठांमध्ये विज्ञान विभागदेखील आहेत. परंतु, सीएसआयआरचा एक सर्व्हे सांगतो की, दरवर्षी जे तीन हजाराच्या आसपास शोधनिबंध तयार होतात, त्यांमध्ये नवा विचार असा काही नसतो. वैज्ञानिक आणि वैज्ञानिक संस्था यांच्या कार्यकुशलतेवरच  वैज्ञानिक शोधनिबंधांचे प्रकाशन आणि पेटंट अवलंबून आहे. मात्र या दोन्ही बाबतीत मोठी घट आली आहे. देशाची परिस्थिती अशी आहे की, या आधुनिक युगातदेखील ‘विज्ञान’ सामान्य लोकांपासून फारच दूर आहे. आम्ही अजूनही सामान्य लोकांमध्ये वैज्ञानिक चेतनाचा विकास करू शकलो नाही. यामुळेच देशात अंधश्रद्धेचा बोलबाला असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात अंधश्रद्धेची मुळे खोलवर रुजली आहेत.
     आज आवश्यकता आहे ती, लोकांमध्ये वैज्ञानिक विचार निर्माण करण्याची! देशाच्या विकासात विज्ञानाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. आणि प्रत्येक नागरिकाला विज्ञानाशी जोडल्याशिवाय सर्वांगिण अशक्य आहे. विज्ञान प्रसाराची दिशेने केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना फारच मोठे काम करावे लागणार आहे. समाजातल्या सर्व स्तरापर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञान पोहचणे आवश्यक आहे. डिझिटल कनेक्टिविटीबरोबर विज्ञानाची मूलभूत समज विकसित करण्यासाठी एका तंत्राची आवश्यकता आहे. या तंत्राचा विकास महत्त्वाचा आहे. देशात शोध आणि संशोधनासाठी वातावरण तयार झाल्यावरच मेक इन इंडिया चे स्वप्नदेखील पूर्ण होणार आहे. यामुळे आपण तंत्रज्ञान क्षेत्रातदेखील पूर्णपणे आत्मनिर्भर होऊ शकणार आहे.
     विज्ञानाची चर्चा नेहमी मोठ्या वैज्ञानिक उपलब्धतेपर्यंतच मर्यादित राहते. आज सगळ्यात आवश्यकता आहे, ती देशातील विज्ञान शिक्षणाची अवस्था कशी सुधारायची? आणि दुसरे म्हणजे लोकांच्या समस्यांच्या निराकरणामध्ये  विज्ञानाचा सहभाग किंवा उपयोग कसा वाढेल, हे पाहणे महत्त्वाचे आहे.देशातल्या विज्ञानाच्या शिक्षणासाठी शाळा स्तरावर प्रयोगशाळांची मोठी कमतरता आहे. प्रयोगातूनच विज्ञान समजून घेता येणार आहे.फक्त वाचून काहीच साध्य होणार नाही. प्रयोगाशिवाय विज्ञान असा विचारसुद्धा होऊ शकत नाही. ही प्रवृत्ती मोठी घातक आहे. शाळेनंतर येणारा महाविद्यालयीन स्तरदेखील असाच आहे. इथेही फारसे चांगले चालले आहे, असे नाही. याकडे तात्काळ लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या खेपेला विज्ञान काँग्रेसचा मूळ विषय होता- विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यापासून लांब असलेल्या लोकांना तिथंपर्यंत पोहचण्यासाठीचा रस्ता सोपा बनवणे.म्हणजेच वैज्ञानिक समुहाचे लक्ष अशा नव्या शोधांवर असायला हवा, जो सामान्य लोकांचे आयुस्य बदलेल.
     कुठल्याही देशाची प्रगती विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात शिक्षण आणि संशोधनामध्ये सातत्याने होणार्या वाढीवर अवलंबून आहे. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी आपल्याला संशोधन आंतरराष्ट्रीय मानकांनुरुप असायला हवे. आता परिस्थिती अशी आहे की, सरकार फक्त सरकारी संस्थांना प्रोत्साहन देते. त्यांनाच आर्थिक मदत करते. खरे तर मूलभूत संशोधन विकासासाठी सरकारला खासगी विद्यापीठांदेखील सहाय्य करण्याची आवश्यकता आहे. त्यांना सोबत घेऊन जायला हवे आहे. चांगल्या खासगी संस्थांना आर्थिक मदतसुद्धा करण्याची गरज आहे. यामुळे तेदेखील देशाच्या विकासात हातभार लावू शकतील. आपल्याला ही गोष्ट विसरून चालणार नाही की, उच्चशिक्षण क्षेत्रात आज 95 टक्के खासगी संस्था आहेत, आणि फक्त पाच टक्के सरकारी संस्था आहेत. देशातील आधारभूत विज्ञानाच्या विकासासाठी आपल्याला सरकारी संस्थाम्बरोबरच खासगी क्षेत्रातदेखील भागिदारी वाढवायला हवी आहे. आज गरज आहे ती, विज्ञान विषयात गांभिर्याने एक राष्ट्रीय नीती बनवण्याची आणि त्यावर काम करण्याची! विज्ञान विषयात पीएचडी मिळवल्यानंतरही बेरोजगारीचा डंख शोधाच्या शक्यतेला मारून टाकतो. विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावण्यासाठी,त्याकडे आकर्षित करण्यासाठी, विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना आणि शोधप्रशिक्षणार्थी लोकांना रोजगाराची गॅरंटी देण्याबरोबरच अशी काही पावलं उचलावी लागतील की, देशात वैज्ञानिक शोध आणि आविष्काराचे एक सकारात्मक वातावरण बनायला हवे.

No comments:

Post a Comment