Sunday, March 25, 2018

(बालकथा) बिट्टूचा आनंद


     बिट्टू आता उंबरठ्यावर उभा राहून तिच्या काही मैत्रिणींना शाळेला जाताना पाहात होती. तेवढ्यात आजीने आवाज दिला, ‘‘ बिट्टू, जरा डाळ झाली का बघ आणि चुलीवरून उतरव. ’’
बिट्टू पळतच आली आणि तिने चमच्या घेऊन डाळ पाहिली,मग चुलीवरचे पातेले उतरवून खाली ठेवले. मग तिने आवाज दिला, ‘‘ दादा, नाष्टा तयार झालाय, चल खावून घे. ’’

‘‘ थँकू बिट्टू! ’’ असे म्हणून तो नाष्टा करू लागला.
थँकू ऐकून ती हसली आणि म्हणाली, ‘‘लवकर खाऊन आणि शाळेला जा. बघ तो पम्या आणि दाम्या कधीचे गेले. तू काय सुट्टीच्या टायमाला जाणार का? ’’
‘‘ अगं नाही गं,बिट्टू! बघ मी सायकलने त्यांच्या अगोदर पोहचेन. ’’ लल्ल्या म्हणाला.
‘‘ अरे व्वा! अशी काय तुझी सायकल हेलिकॅप्टर लावून गेली का? ’’ बिट्टू  मान हलवत म्हणाली.
‘‘ होय बिट्टू! माझी तर सायकलच हेलिकॅप्टर आहे. ’’ लल्ल्या हसून म्हणाला. तोच आजी नाटकी राग आणत म्हणाली, ‘‘ लय हेलिकॅप्टर बनवू नकोस सायकलला, नाही तर कुठे तर धाडदिशी पडशील आणि बत्तीशी रस्त्यावर पडेल. ’’
लल्याला आजीने बोलल्यावर बिट्टू अगदी मनमोकळेपणानं हसली. लल्याला पण नाष्टा करता करताच खाली मान घालून हसू लागला. बिट्टूला हसताना पाहून आजीला राग आला, ती म्हणाली, ‘‘ तुला काय झालं खिदळायला? चल, तिकडे कपडे ठेवले आहेत, धुवून टाक ते! ’’
‘‘ हो आजी, लगेच धुते. ’’ असे म्हणून बिट्टू कपडे धुवायला निघून गेली. बिट्टूला असं रागावलेलं लल्ल्याला आवडलं नाही, पण तो काय करणार होता. नाष्टा करून, दप्तर घेऊन निघाला शाळेला! वाटेत विचार करत राहिला, ‘बिट्टू दिवसभर काम करते. सगळं घर झाडते, भांडी घासते, कपडे धुते, शेण काढते तरीही बिचारीला बोलले जाते. आता मी असे होऊ देणार नाही.’
संध्याकाली ज्यावेळेला तो शाळेतून घरी आला, तेव्हा बिट्टू पाणी भरत होती. त्याला पाहून ती पळतच आली आणि मान हलवतच म्हणाली, ‘‘तुला माहित आहे का दादा, आज मी आपल्यासाठी गाजराचा हलवा केलाय. ’’
लल्ल्या हसला. तेवढ्यात आतून आईचा आवाज आला, ‘‘ बिट्टू, त्याच्याशी काय गप्पा मारतेस,पहिल्यांदा त्याला खायला तर दे. ’’
‘‘ हो आई, आत्ता आले! ’’ असे म्हणून ती लल्लासाठी हलवा आणायला गेली.
एवढ्यात लल्लाने दोन-तीन पुस्तके दप्तरातून काढली. दोन-तीन वह्या काढल्या. त्या कॉटवर ठेवल्या. मग तो एक पिशवी शोधू लागला. तेवढ्यात बिट्टूने हलवा आणून त्याच कॉटवर ठेवला आणि म्हणाली, ‘‘ अरे दादा, आज मी तुझ्या आवडीचा हलवा बनवला आहे, आणि तू अजून हातसुद्धा धुतले नाहीस. ’’
‘‘ आता आलो. ’’ असे म्हणून तो आपल्या कामाला लागला. थोड्या वेळाने त्याचे जुने दप्तर घेऊन आला. त्यात वह्या आणि पुस्तके ठेवली. बिट्टूने विचारले, ‘‘हे काय करतोयस दादा? ’’
एवढ्यात तिथे आई आणि आजीदेखील आल्या. लल्ला म्हणाला, ‘‘ बिट्टू, ही पुस्तके घेऊन तू शाळा शिकायला येणार आहेस. ’’
‘‘ काय! काय म्हणतोयस लल्ल्या तू? ’’ आजी आश्चर्याने एवढेच बोलू शकली. बिट्टू तर त्याच्या तोंडाकडेच पाहू लागली. आई तर पाहातच राहिली. ‘‘ हो आजी, मी गुरुजींशी बोललो आहे.ते बिट्टूचे नाव शाळेत घालायला तयार झाले आहेत. शाळेत बिट्टूलादेखील फी बसणार नाही. माझ्याप्रमाणेच हिलाही शाळेचा गणवेश,पुस्तके मोफत मिळणार आहेत. तीन पुस्तके तर गुरुजींनी दिलीसुद्धा! ’’ असे म्हणत त्याने दप्तरातली पुस्तके काढून दाखवली.
आई तर काहीच म्हणाली नाही. पण आजीला मात्र राग आला होता. ती म्हणाली, ‘‘ ही पण शाळेत चालल्यावर घरातली कामं कोण करणार? ’’
‘‘ आजी, आम्ही दोघं मिळून सकाळची कामं करू. राहिलेली कामं शाळेतून आल्यावर करू. ’’ लल्ला म्हणाला तसा आजीचा आवाज बंद झाला. ती काहीच बोलू शकली नाही. आई मात्र हसली.
बिट्टूला दादाच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. ती अगदी काळजीपूर्वक त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत होती. आता ती आश्वस्त झाली आनि आजीला म्हणाली, ‘‘ आजी, आम्ही सकाळी लवकर उठू आणि तुमची सगळी कामे करू. मग मी दाद्याबरोबर शाळेला जाऊ ना? ’’
आजीने तिच्या मासूम,भोळ्या चेहर्यावर शिकण्याची इच्छा पाहिली. तिलाही नाही म्हटले तरी आतून ढवलून आले. ती तिच्याजवळ जाऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. आणि म्हणाली, ‘‘ तुला शिकायचं आहे ना? मग जा, उद्यापासूनच शाळेला जा. ’’
आजीने एवढे म्हणताच तिने तिला घट्ट मिठी मारली. आईनेदेखील मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. सगळ्यांचे प्रेम पाहून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. मग ती लल्लाजवळ गेली आणि त्याला मिठी मारत म्हणाली, ‘‘ थँकू दादा! ’’
हे ऐकून सगळे मोठ्याने हसू लागले.

No comments:

Post a Comment