Friday, March 23, 2018

एक अधर्म जीवनभराचे पुण्य नष्ट करते

     आपण नेहमी पाहत असतो की, आपल्या आजूबाजूला काही ना काही चुकीचं घडत असतं. पण आपण काहीच करू शकत नाही. आपल्याला वाटत असतं की, या पापात आपण भागीदार नाही.  मात्र मदत करण्याची परिस्थिती असतानादेखील आपण काहीही न केल्याने आपणदेखील त्या पापाचे धनी किंवा भागीदार बनले जातो. आपला एक अधर्म क्षण संपूर्ण जीवनात कमावलेले पुण्य नष्ट करून टाकतो. याचे उदाहरण स्पष्ट करण्यासाठी एक उदाहरन दिले जाते, ते श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्यातल्या एका संवादाचे! यात धर्मपरायण अशा भीष्म पितामह आणि गुरु द्रोणाचार्य यांचा वध का करण्यात आला याचा विचार पुढे येतो तेव्हा एक अधर्म किंवा एक पाप अथवा एक चूक आपल्या आयुष्यातील संपूर्ण चांगल्या गोष्टींवर पाणी फिरवते.

     अर्थात आपल्याला चांगला माणूस म्हणून घ्यायला बरीच वर्षे लागतात,पण वाईट म्हणून घ्यायला एक क्षण किंवा एक चूक पुरेशी आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आजच्या घडीला वाईटाचा अधिकाधिक उदोउदो चालला आहे आणि तेच लोकांना भावत आहे, हा भाग वेगळा असला तरी चांगल्या आचरणाला धरून राहणं, आजच्या घडीला अवघड आहे, हे कबूल करायलाच हवे. आज सोशल मिडिया असो किंवा टीव्हीची बातम्यांची किंवा अन्य चॅनेल्स असोत,यात ज्यांचा अधिक सहभाग असतो, तो खरे तर आपल्या आयुष्यात वाईट गोष्टच केलेला असतो. मात्र सगळा फोकस त्याच्यावर अधिक केला जातो. त्याच्या संपूर्ण जीवनाचाच पाढा वाचला जात असतो. खर्‍या अर्थाने व्हिलन असलेल्या माणसाला हिरोच करून टाकलेला असतो. आज परिस्थिती बदलली असली तरी अशा लोकांचा अंत मात्र शेवटी त्याच्या अधर्मावरच अवलंबून असतो.
     श्रीकृष्ण ज्यावेळेला महाभारताचे युद्ध करून परततो, तेव्हा रुक्मिणी त्याच्यावर संतापून म्हणते, तुम्ही युद्ध केलं ते ठीक केलंत,पण तुम्ही द्रोणाचार्य आणि भीष्म पितामहसारख्या धर्मपरायण लोकांचादेखील वध केलात?, हे तुम्ही बरोबर केलं नाहीत.यावर श्रीकृष्ण म्हणाला, देवी, तू म्हणतेस ते बरोबर आहे. या दोन्ही धर्मपरायण  लोकांनी आयुष्यभर जीवन धर्माचे पालन केले,परंतु त्यांच्या केलेल्या एका पापामुळे त्यांनी केलेल्या संपूर्ण पुण्यावर पाणी पडले. हे ऐकून आश्‍चर्यचकीत झालेली रुक्मिणी विचारते, या दोघांनी काय पाप केले होते? श्रीकृष्ण म्हणाला, ज्यावेळेला भरलेल्या दरबारात द्रोपदीचे वस्त्रहरण केले जात होते,त्यावेळेला हे दोघेही उपस्थित होते. आणि वयाने मोठे असल्याकारणाने त्यांनी दु:शासनाला असे करण्यापासून रोखू शकत होते. परंतु दोघेही त्यावेळेला गप्प राहिले आणि अजाणतेपणी त्यांनी अधर्माला साथ दिली. त्यांच्या या एका पापापुढे धर्मनिष्ठा लहान पडली,फिकी पडली. त्यामुळे मलाही धर्माचे पालन करताना त्यांच्या वधात पांडवांना साथ द्यावी लागली.
     माणसाने असंख्य चुका केल्या काय किंवा एक चूक केली काय, त्याचा त्याला फटका बसणारच! अधर्माने वागणार्‍याला शिक्षाही भेटणारच! मग त्याने अधर्म एकदा करो अथवा अनेकदा! 

No comments:

Post a Comment