Monday, March 26, 2018

(बालकथा) सर्वात प्रकाशमान वस्तू


    एक दिवस तेनालीराम दरबारात बसला होता. एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा चालली होती. पण अचानक तेनालीरामला डुलकी लागली. त्याला पाहून सगळे दरबारी हसू लागले. महाराजांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून देत मंत्री म्हणाले, “ महाराज,तेनालीराम आता म्हातारा झाला आहे. त्याला निवृत्त करायला हवे.”
     ऐकून राजा कृष्णदेवराय खरोखरच गंभीर झाले. दुसर्या दिवशी राजा म्हणाला, “  खूप दिवसांपासून माझ्या मनात एक प्रश्न आहे. मला जाणून घ्यायचं आहे, या जगात सर्वात प्रकाशमान वस्तू कोणती आहे? जर आपल्यापैकी कुणी याचे योग्य उत्तर दिले तर आपण तेनालीरामला निरोपाचा नारळ देऊन टाकू. ”

     यावर दरबारातल्या तेनालीराम विरोधकांना तर उखळ्या फुटल्याच, शिवाय प्रश्नाचे उत्तर द्यायला अनेकजण अतुर झाले.
     मंत्री म्हणाले, “ महाराज, जगात चांदीपेक्षा प्रकाशमान आणखी कोणती वस्तू असूच शकणार नाही. ”  राजपुरोहित म्हणाले, “  महाराज, दूधच सर्वात प्रकाशमान आहे. ” कोणी जाईचे तर कोणी जुईचे फूल प्रकाशमान असल्याचे सांगितले. मात्र, यावर राजा कृष्णदेवराय यांचे समाधान झाले नाही. त्यांनी तेनालीराम विचारले. तेनालीराम म्हणाला, “  महाराज, याचे उत्तर मी उद्या देईन. ”
    दुसर्या दिवशी तेनालीरामने चांदीची दागिने, थोडे दूध आणि जाई-जुईची फुले मागवली. नंतर त्याने एका मोठ्याशा खोलीत फरशीवर या सर्व वस्तू ठेवायला सांगितले. दरवाजे,खिडक्या सर्व बंद करायला सांगून पडदेही लावायला सांगितले. तेनालीराम सर्व व्यवस्था लावल्यावर खोली बाहेर आला. दरवाजा बंद केला. आणि म्हणाला, “  महाराज, आता या लोकांना आत जाऊन आपापल्या वस्तू घेऊन यायला सांगा. ”
     मंत्री,पुरोहित आणि काही सदस्य आत गेले. बाहेरून दरवाजा लावण्यात आला. आत गेलेल्या लोकांना काहीच दिसेना.कुणाच्या दुधाच्या भांड्यावर पाय पडला. सगळे दूध सांडले. कुणाचा पाय चांदीच्या पायावर पडला. दागिने मोडून गेले. जाई-जुईची फुले कुणाच्या पायांत कुस्करली गेली. सगळेच चकित झाले. एकमेकावर ओरडू लागले. त्यांच्या वस्तू त्यांना जशा होत्या तशा मिळाल्याच नाहीत. तेवढ्यात तेनालीरामने खोलीची वरची एक खिडकी उघडली. आनि खोलीभर प्रकाश झाला. सगळ्या वस्तू अगदी स्वच्छ दिसायला लागल्या.
    आता तेनालीराम म्हणाला, “  महाराज, माझे उत्तर आता तुम्हाला समजलेच असेल. जगात सर्वात प्रकाशमान वस्तू दूध,चांदी किंवा जाई-जुईची फुले नाहीत तर सूर्याचा प्रकाश आहे. यामुळे फक्त ही खोलीच प्रकाशमान होत नाही तर संपूर्ण जग प्रकाशमान होते. ”
     उत्तर ऐकून राजा कृष्णदेवराय आनंदाने उठला आणि तेनालीराम जाऊन मिठी मारली. राजा दरबारी मंडळींना म्हणाला, “  समजले का, आम्हाला तेनालीराम का आवडतो ते! ”

2 comments: