अस्वलाच्या अंगावर केस नव्हते, त्यावेळची ही गोष्ट आहे. अस्वलाची एक बाग होती. मोठ्या
कष्टाने त्याने ती वाढवली होती.एक दिवस तो बागेत काम करीत असताना कुठूनशा मधमाशा
आल्या. आणि त्याच्या चोहोबाजूने फिरून घोंघावयाला लागल्या. आपल्याला आता या
त्रास देणार,हे त्याला कळून चुकले. त्याने इकडे-तिकडे
पाहिले. त्याला एकादे झुडूप हवे होते,जेणे करून ते उखडून
मधमाशांंना पळवून लावावे. त्याला झुडूप काही सापडले नाही. मग त्याने एक फुलांचे
रोपटे उखडले आणि आपल्या अंगाभोवती फिरवले. त्यासरशी काही मधमाशा त्याच्यात
सापडून दूर कुठे जाऊन पडल्या. ते पाहून बाकीच्या मधमाशा चवताळल्या. त्या॑नी
त्याच्यावर जोराचा हल्ला चढवला.
अस्वल तिथून पळून गेले. पण आता
असे रोजच घडू लागले. मधमाशांच्या रोजच्या हल्ल्याने अस्वल बेजार होऊन गेले.मधमाशा
बागेत यायच्या, फुलांवर बसून मस्तपैकी रस शोषून
घ्यायच्या. काही मधमाशा अस्वलाच्या पाठी लागायच्या,त्याला
त्रास द्यायच्या. तेवढ्यात बाकीच्या मधमाशा फुलांचा रस शोषून घ्यायच्या. त्यांचे
काम झाले की त्या निघून जायच्या.
यामुळे बागेची वाट लागली होती.
फूलं लगेच कोमेजून जायची. बागेची नासधूस व्हायची. अस्वलाने मोठ्या मेहनतीने
बाग लावली होती. त्यामुळे अस्वलाला मोठे वाईट वाटत होते. या अडचणीतून त्याला
कसल्याही परिस्थितीत सुटका करून घ्यायची होती. तो लिंबाच्या झाडाकडे गेला,कारण त्या झाडावरच मधमाशांचे पोळे होते.
"लिंबदादा, मी
फार अडचणीत आहे रे! मला मदत करशील का?"
लिंबाला काहीच कल्पना नव्हती.
तो म्हणाला," अरे मित्रा,काय झालं,तुला कसली मदत हवी आहे?"
यावर अस्वलाने मधमाशांच्या
पोळ्याकडे इशारा केला आणि म्हणाला,"लिंबदादा,या मधमाशांनी मोठा उच्छाद मांडला आहे. या
माझ्या बागेतल्या फुलांचा रस शोषून घेतात.फुलांची नासधूस करतात. मी त्यांना
रोखण्याचा प्रयत्न केला तर माझ्यावरही हल्ला करतात. त्यांनी मला पार
रडकुंडीला आणले आहे."
लिंबाने विचारले," यात मी तुला काय मदत करू शकतो?" अस्वलाला कल्पना आठवली. तो म्हणाला,"तू स्वतःला
जोरजोराने हलव, म्हणजे हे पोळे खाली पडेल आणि त्या
इथून निघून जातील. यामुळे मला त्यांच्या त्रासापासून मुक्तता मिळेल."
पण लिंब कमकुवत होता.त्याने
हलण्याचा प्रयत्न केला,पण हलू शकला नाही.लिंबाने आपली मजबूरी
सांगितली. तो म्हणाला," यावेळेला मी फारच कमकुवत आहे.
मला खत मिळत नाही.खत आणून दे,मग मला ताकद येईल.तेव्हा मग मी
जोरजोराने हलेन आणि मधमाशांचे पोळे खाली पाडेन."
अस्वलला लिंबाची अडचण लक्षात
आली. तो खत आणायला गायीजवळ गेला. ती जवळच्याच एका मैदानात बसली होती. अस्वल
म्हणाले,"ताई,तू
मला मदत करशील का?"
गाय खूप दयाळू होती.तिने
अस्वलला विचारले,"हां, का
नाही!सांग बरं मी तुझी काय मदत करू शकते."
यावर अस्वल म्हणाले," माझ्या बागेत मधमाशांनी उच्छाद मांडला आहे. मला
त्यांच्यापासून सुटका करून घ्यायची आहे.मी लिंबदादाला सांगितले की, तू जोराने हललास तर मधमाशांचे पोळे खाली पडेल आणि त्या तिथून निघून
जातील.पण लिंबदादा कमकुवत आहे. त्याला खताची आवश्यकता आहे.म्हणून खत घ्यायला
तुझ्याकडे आलो आहे.तू मला खत दे. ते मी लिंबदादाला देईन. त्याच्याने लिंबाला
ताकद येईल आणि तो जोराने हलेल.मधमाशांचे पोळे खाली पडेल आणि मग मधमाशा तिथून निघून
जातील. माझी बाग सुरक्षित राहील."
पण गायसुद्धा कमकुवत होती.
तिच्यातही ताकद नव्हती. ती दिसायलाही हडखुळी होती. ती म्हणाली," तू मला चारा आणून दिलास तर मी तुला शेणाचे खत
देईन."
अस्वलापुढे दुसरा पर्यायच
नव्हता.त्याला शेणखत हवे होते. तो शेतकऱ्याकडे गेला. शेतकरी जवळच चारा कापत होता.
अस्वलाने त्याला विनंती केली,"शेतकरीदादा,
शेतकरीदादा, मला थोडा चारा देशील का?"
शेतकरी हसला आणि म्हणाला," तू आणि कधीपासून चारा खायला लागलास?"
यावर अस्वल म्हणाले,"चारा मला नकोय. चारा गायीला हवा आहे." असे म्हणून
त्याने सगळा प्रकार शेतकऱ्याला सांगितला.
यावर शेतकरी म्हणाला," मी तुला चारा देऊ शकतो,पण तुला
माझे एक काम करावे लागेल. माझी बायको आजारी आहे. तिला माझ्यासाठी भाकरी घेऊन येता
येत नाही.जर तू घरी जाऊन भाकरी बांधून घेऊन आलास तर मी तुला चारा देईन."
बिचारे अस्वल!करणार तर काय !
निघाला शेतकऱ्याच्या घरी! शेतकऱ्याच्या बायकोला त्याने सर्व प्रकार
सांगितला.तीदेखील खूप दयाळू होती.तिने लगेच भाकरी बांधून दिली. अस्वल भाकरी घेऊन
शेतकऱ्याजवळ आला. शेतकऱ्याने त्याला चारा कापून दिला.
त्याने चारा गायीला दिला.
गायीने त्याला शेणखत दिले. ते घेऊन अस्वल लिंबदादाकडे आला. त्याला म्हणाला,"लिंबदादा, हे खत घे. लवकर ताकद
मिळव आणि या मधमाशांना इथून पिटाळून लाव."
लिंबाने खत घेतले.त्या खतामुळे
त्याला ताकद आली. तो जोराने हलला,पण मधमाशांचे
पोळे काही खाली पडले नाही.मधमाशांचे पोळे खूपच मजबूत होते.
"लिंबदादा, असे
नको, आणखी जोराने स्वतःला हलव."
हे ऐकून मधमाशा सावध
झाल्या.त्या आपापसात म्हणाल्या," या
दृष्टाने आपल्याला इथून पळवून लावण्याचा घाट घातला आहे. याच्यावर हल्ला चढवू आणि
यालाच इथून पळवून लावू."
मधमाशांनी अस्वलावर हल्ला
चढवला. अगोदर अस्वल लोळून लोळून आपले केस कमी करायचा,पण मधमाशा ज्यादिवसांपासून त्याच्यावर हल्ला करायला लागल्या,तेव्हापासून तो लोळायचाच थांबला. त्यामुळे त्याचे केस पुष्कळ वाढले. ते
दाट झाले होते. मधमाशांनी त्याला डंक मारायला सुरुवात केली, पण
दाट केस असल्याने मधमाशांचे डंक त्याच्या कातडीपर्यंत पोहचतच नव्हते. त्यामुळे
त्याच्यावर त्यांच्या हल्ल्याचा काहीच परिणाम होत नव्हता.
इकडे मधमाशांनी बिचाऱ्या
अस्वलावर हल्ला चढवल्याने लिंबाचे झाड भयंकर संतापले. संतापाने लालबुंद झाले आणि
जोरजोराने थरथरू लागले. ते संतापाने जोराचे ओरडले,"दृष्ट मधमाशांनो, सगळेजण एकट्या जनावरावर तुटून
पडता. थांबा, आता तुम्हाला माझा हिसका दाखवतोच.'' असे म्हणून तो जोरजोराने हलू लागला.त्यासाठी त्याने आपली सर्व शक्ती
एकवटली.
आणि झाडावरची पक्ष्यांची सगळी
घरटी खाली कोसळली. मधमाशांचे पोळेदेखील तुटून खाली पडले. झाड जोरजोरात हलू
लागल्याने जोराचा वारादेखील सुटला. त्यामुळे सगळीकडेच हाहाकार माजला. पक्षी पळाले.
मधमाशा कुठच्या कुठे निघून गेल्या. लिंबदादाचा उग्र अवतार पाहून अस्वलदेखील
घाबरले. त्यानेही मग धूम ठोकली.
आता झाडाजवळ कोणीच नव्हतं. आता
लिंब एकटाच शांत उभा होता.
No comments:
Post a Comment