Sunday, March 25, 2018

जिथे गाडी जात नाही,तिथे बनवले शौचालय


     तीस वर्षांपूर्वी यावेळेला पी.जी.सुधा यांच्या पतीचे निधन झाले, त्यावेळेला वाटलं होतं की आता त्यांचं आयुष्यच संपलं. त्यावेळेला सुधा यांचं वय 25 च्या आत होतं. ऐन तारुण्यात त्यांच्या वाट्याला विधवेचं आयुष्य आलं होतं.लोक म्हणायचे, कुणास ठाऊक,काय व्हायचं या एकटीचं?

     काही दिवस असेच गेले. मग सुधाने विचार केला, किती दिवस आपण दुसर्याच्या आश्रयाखाली जगायचं. दुसर्यांचं ओझं होऊन किती दिवस राहायचं. स्वाभीमानानं जगण्याचा निश्चय करून ही केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यात राहणार्या महिलेने कामाच्या शोधात घर सोडलं. ती फारशी शिकलेली नव्हती. त्यामुळे नोकरी मिळणं कठीण जात होतं. खूप संघर्ष केल्यानंतर वन विभागात गार्डची नोकरी मिळाली. पण तिच्या नातेवाईकांना ही नोकरी पसंद नव्हती. वन विभागात काम करायचं म्हणजे जंगली प्राण्यांचा सामना करणं आणि खतरनाक अशा तस्करांशी लढणं. सगळेच म्हणाले, दुसरं कोणतं तरी काम शोध. की नोकरी तुझ्यासाठी योग्य नाही. मात्र सुधाने कुणाचेच ऐकले नाही. ज्यावेळी ती पहिल्यांदा ड्युटीवर पोहचली,त्यावेळी तिचे सहकारी तिच्याकडे विचित्र अशा नजरेने पाहात होते. जणू ते म्हणत होते, ही एकटी महिला कशी बरं जंगलाची राखण करणार? पण सगळ्या शंका-कुशंकांना नजरेआड करत ती आपल्या कामाला लागली. खरोखरच जंगलाची राखण जोखमीची होती. जागोजागी धोके होते. प्रत्येक घटकेला जंगली प्राण्यांचा धोका होता. याशिवाय तस्करांची भीती होती.
     त्यांची केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातल्या कुट्टामपुजा जंगलात नेमणूक केली होती. दाट जंगलात शिकारी लोकांवर लक्ष ठेवणं मोठं जोखमीचं होतं. मोठं आव्हान होतं. त्यांच्या कडक गस्तीमुळे मात्र तस्कर बिथरले. त्यांना त्यांचे काम करायला अवघड जाऊ लागलं. परंतु, आदिवासी गाववाल्यांनी नि:श्वास टाकला. सुधा यांच्यावर आदिवासी लोकांच्या रक्षणाची जबाबदारीदेखील होती. ही जबाबदारी त्यांनी मोठ्या खुबीने पार पाडली. त्यामुळे त्या आदिवासींच्या आवडत्या बनल्या. आदिवासी लोक त्यांना आपल्या घरचीच समजून आपल्या तक्रारी,प्रश्न घेऊन त्यांच्याकडे जाऊ लागल्या. सुधादेखील मोठ्या काळजीने त्यांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायच्या. जी प्रकरणे त्यांना सोडवता येत नव्हती, ती त्या आपल्या वरिष्ठांच्या माध्यामातून सोडवायचा प्रयत्न करायच्या. सुधा सांगतात की, मी नेहमीच माझ्या कामावर फोकस ठेवायची. मी कधीच असा विचार केला नाही की, आपण महिला आहोत. माझ्यासाठी ड्युटीचा अर्थ होता ड्युटी!
     त्यांच्या प्रामाणिक कामावर वन अधिकारी जाम खूश होते. त्यांना 2006 मध्ये सर्वश्रेष्ठ फॉरेस्ट गार्डचा पुरस्कार मिळाला. त्यांची गणना धाकड कर्मचार्यांमध्ये होऊ लागली. 2016 मध्ये केरळसमोर स्वच्छता अभियानांतर्गत राज्याला खुले शौचमुक्त बनवण्याचे लक्ष्य होते. ज्यावेळेला राज्याने टॉयलेट बनवण्यासाठी टेंडर प्रसिद्ध केले, तेव्हा एकही ठेकेदार या भागात काम करण्यास राजी नव्हता. वास्तविक विस्तृत अशा जंगलात टॉयलेट (शौचायल) बनवणे तसे मोठे आव्हान होते. कठीण होते. अशा वेळेला तत्कालिन जिल्हाधिकारींना पी.जी.सुधा यांची आठवण आली. सुधा या कामासाठी राजी झाल्या. त्यांनी तीन महिन्याच्या आत 500 टोयलेट बांधून घेण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. सुधा सांगतात, शौचालयांची निर्मिती ही काही मोठी गोष्ट नव्हती,पण जंगली प्रदेशात त्यासाठी लागणारे साहित्य इच्छित स्थळी पोहचवणे मोठे कठीण काम होते. तिथे रस्ते नव्हते. ट्रक जात नव्हते. त्यामुळे ठेकेदार या जंगलातल्या लोकांसाठी शौचालय बांधायला तयार नव्हते.
     त्यांनी निश्चय केला की, आपण स्वत: शौचालयाचे साहित्य गावांपर्यंत पोहचवायचे. त्यांच्याजवळ वीट, सिमेंट आणि टॉयलेट शीट पोहचवण्याची कोणतीच सुविधा नव्हती. मजूरदेखील इतके भारी साहित्य वाहून न्यायला तयार नव्हते. पण सुधांनी निश्चयच केला होता, यासाठी काही तरी करायला हवेच! आपण हार पत्करायची नाही. सुधा यांनी बैलगाडी आणि नावेतून टॉयलेटचे साहित्य वाहून नेले. या दरम्यान त्यांनी आपल्या सहकार्यांचा आणि मजुरांची जिद्द तुटू दिली नाही. एकदा तर टॉयलेटच्या साहित्यांनी भरलेली नाव उलटली. संपूर्ण साहित्य भिजले,खराब झाले. पण तरीही त्यांनी आपला धीर सोडला नाही. कुठे कुठे बैलगाडीने साहित्य पोहचवणे कठीण होते. रस्त्यात कित्येकदा एका बैलगाडीतून साहित्य उतरून दुसर्या गाडीत चढवावे लागे. अशा बिकट परिस्थितीला त्यांना सामोरे जावे लागले. या मॅरेथान कामांत त्यांना कित्येकदा कित्येक किलोमीटर पायी चालावे लागले आहे. सुधा सांगतात आम्हाला नेहमी 15 ते 20 किलोमीटर अंतर पायी चालावे लागायचे. अशा वेळेला जंगली हत्तींचा धोका होता. आम्ही ऊन,वारा,पाऊस यांचा सामना करत अभियान पूर्ण केले.
     ज्यावेळेला शौचालये बांधली जाऊ लागली, तेव्हा गाववाल्यांना मोठं आश्चर्य वाटलं. ही वस्तू त्यांच्यासाठी नवी होती.  अगोदर त्यांना जंगली प्राण्यांचा धोका अंगावर घेऊन बाहेर शौचालयाला जावं लागायचं, पण आता त्यांची घरातच ही शौचची सोय झाल्याने मोठा आनंद झाला. सुधा सांगतात, जंगल प्रदेशात जागेचा कोणता प्रश्न नव्हता. मात्र शौचाला बाहेर जायला धोका होता. आता त्यांची या धोक्यातून सुटका झाली. अभियान पूर्ण झाल्यावर अधिकारी वर्ग दौरा करायला निघाले. या प्रदेशातल्या गावांमध्ये पक्की शौचालये बांधून पूर्ण होती. हे पाहून सुधा यांचे मोठे कौतुक झाले.2016 मध्ये केरळ राज्य हागणदारी मुक्त झाला. या यशात सुधा यांचेही मोठे योगदान राहिले आहे. सरकारने त्यांना ओपन डिफेकेशन फ्री अभियान अॅवार्ड देऊन सन्मानित केले. याशिवाय सर्वश्रेष्ठ वन विभाग अधिकारी पुरस्कारदेखील मिळाला.

1 comment:

  1. पी.जी. सुधा यांच्या धाडसाचे कौतुक करावे. तेवढे कमीच. लेख छान आहे. सर.

    ReplyDelete