Friday, March 16, 2018

ज्यांनी आपल्याला हसायला शिकवले...


     आपल्या भारत देशात असे अनेकजण हसवणारे होऊन गेले,ज्यांनी आपल्या चतुरपणा आणि हजरजबाबीपणामुळे फक्त आपल्या विरोधकांवर मात केली नाही,तर राजा आणि समाजाला एक संदेशदेखील दिला. यांच्या काही कथा नि:संशय काल्पनिक आहेत,पण खरोखरच ते लोकांचे मनोरंजन करायचे. शिकवण द्यायचे. ही माणसे केवळ हसणारे किंवा हसवणारे नव्हते तर खूप मोठे विद्वान आणि दूरदृष्टीचे होते. ते आपल्या हजरजबाबीपणामुळे सत्य समोर आणायचे. आपण जाणून घेऊया अशा हसत आणि हसवत असणार्या काही महानायकांना!
तेनालीराम
सोळाव्या शतकात विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेव राय यांच्या दरबारी कविंमध्ये तेनालीराम यांचे नाव सगळ्यात वरचे होते.ते त्यांच्या अष्ठ दिग्गजमधील एक होते. त्यांना रामलिंग किंवा रामलिंगम या नावानेही ओळखले जायचे.

लहानपणीच रामलिंगम अगदी चंचल आणि हजरजबाबी होते.एकदा त्यांच्या शाळेत एक अधिकारी शाळा तपासायला आले. त्यांनी मुलांच्या बुद्धीचा स्तर जाणून घेण्यासाठी विचारले, ‘ तुमच्यापैकी सर्वात हुशार कोण आहे?’
वर्गात संपूर्ण शांतता पसरली.तेव्हा रामलिंगम म्हणाला,’ मी वर्गातला सर्वात हुशार विद्यार्थी आहे.’
त्यांनी रामलिंगमला अनेक प्रश्न विचारले. योग्य उत्तरे मिळाल्याने ते म्हणाले,’’ ‘ तू तुझ्या आयुष्यात खूप मोठी प्रगती करशील आणि मोठे स्थान प्राप्त करशील.’
तेनाली नावाच्या गावात रामलिंगम शिकू लागला,वाढू लागला. त्यांनी संस्कृत आणि तेलगूचा गाढा अभ्यास केला. त्यांनी आपला हजरजबाबीपणा आपल्या काव्यप्रतिभेत विकसित केला. ज्यावेळेला त्यांचा विवाह झाला, त्यावेळेला त्यांना त्यांच्या उपजिवीकेची काळजी वाटायला लागली.त्यांनी ऐकलं होतं की, राजा कृष्णदेवराय विद्वानांचा मोठा सन्मान करतात.
रामलिंगम पहिल्यांदा राजगुरु ताताचारींना भेटले. राजगुरूंनी त्यांची प्रतिभा पाहिली. त्यांनी विचार केला की, जर हा दरबारात आला तर आपले महत्त्व कमी होईल. मग त्यांनी रामलिंगमला टाळायला सुरुवात केली.
एक दिवस रामलिंगम दरबारातले दुसरे एक विद्वान नंदी तिम्मना यांना भेटले. ते त्यांच्या हजरजबाबीपणाच्या शैलीत कविता ऐकून चकित झाले. त्यांनी आपली शाल जी राजा कृष्णदेव रायने दिली होती,ती त्यांना भेट दिली.
दुसर्यादिवशी रामलिंगम ती शाल खांद्यावर टाकून दरबारात पोहचले. राजा एका अनोळख्या माणसाला आपण दिलेली शाल घेऊन दरबारात आल्याचे पाहून आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले,’ ‘ ही शाल तुला कोणी दिली?’
तेव्हा रामलिंगम यांनी सगळा प्रकार एका सुंदर अशा कवितेत कथन केला. राजा कृष्णदेव राय यांना आनंद झाला आणि त्यांनी रामलिंगम यांना आपल्या दरबारात स्थान दिले.
शेखचिल्ली
आणखी एक आपल्याला खळाळून हसवणारी व्यक्ती म्हणजे शेखचिल्ली. त्यांचे नाव ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर एकाद्या मूर्ख व्यक्तीचा चेहरा समोर येतो. त्यांचे किती तरी किस्से प्रसिद्ध आहेत. पण वास्तवात शेखचिल्ली एक सुफी संत होते. आणि ते मोगल शहंशाह शाहजहांचा सर्वात मोठा मुलगा दारा शिकोहचे आध्यात्मिक गुरू होते. त्याचे नाव अब्दुर्रहीम अब्दुल करीम ऊर्फ अब्दुर्रजाक होते.

असे म्हटले जाते की, शेखचिल्ली यांनी सर्वात अगोदर मोगल शासनाच्या अंताची भविष्यवाणी केली होती. त्यांनी दारा शिकोहला सांगितले होते की, जे काम करायचे आहे, ते त्याने आपल्या आयुष्यात लवकरात लवकर करावे. त्यामुळे दारा शिकोह याने आपण जीवंत असतानाच आपल्या गुरुचा,उस्तादचा मकबरा तयार करायला सांगितला होता. हरियाणातील कुरुक्षेत्राच्या थानेसर येथे शेखचिल्ली यांचा मकबरा आहे. हा मकबरा फारच सुंदर आहे. मकबर्याची मुख्य इमारत ताजमहालसारखी संगमरवराने बनवली गेली आहे. दारा शिकोह इथे येऊन आपल्या उस्तादांकडून शिक्षण घ्यायचा.
बिरबल
मोगल सम्राट अकबर याच्या दरबारात नऊ महान व्यक्ती होत्या,ज्यांना अकबरने नवरत्नांची उपाधी दिली होती.या नवरत्नांमध्ये बिरबल सर्वात प्रमुख होते. ते फक्त कवी किंवा मनोरंजन करणारे नव्हते तर मोगल सल्तनतचे वजीरे आजम होते. अकबराच्या सर्वात विश्वसनीय लोकांमध्ये त्यांची गणना होत असे.
बिरबलाचे खरे नाव महेशदास भट्ट होते. त्यांचे प्रमुख काम सैन्य आणि प्रशासन व्यवस्था पाहण्याचे होते.सम्राट अकबराचे ते सर्वात प्रिय मित्र होते. त्यांच्या बुद्धी कौशल्य आणि चतुरपणावर ते बेहद्द प्रभावित होते.
महेशदासचा जन्म मध्यप्रदेशातील सिद्धी जिल्ह्यातल्या घोघरा नावाच्या गावात झाला होता. ते मोठे आधुनिक विचाराचे गृहस्थ होते. याच कारणामुळे त्यांनी प्रांतीय भाषेशिवाय फारशी भाषादेखील शिकून घेतली होती. ते एक कवी आणि लेखक होते.त्यांच्या चतुरपणाच्या आणि बुद्धिमत्तेच्या कथा सम्राट अकबरपर्यंत पोहचल्या. त्यांनी त्यांना मोगल दरबारात बोलावून घेतले आणि बिरबल नाव दिले.
अकबर बिरबलच्या हजरजबाबीपणाचे दिवाने होते. ज्या ज्यावेळेला दरबारात गंभीर विषयावर चर्चा होई, त्या त्यावेळेला दरबारातला गंभीरपणा घालवण्यासाठी बिरबल असे काही बोलून जात की, त्यामुळे दरबारातला ताण निघून जाई.
पण बिरबलची खरी ओळख एक बुद्धिमान प्रशासक म्हणूनच होती. ते कुशल योद्धा होते.त्यांनी अनेक स्वार्या यशस्वी करून दाखवल्या आहेत. सम्राट अकबरने त्यांना राजाची उपाधी बहाल केली होती. अफगान युद्धात जैन खां सरदारला मदत करण्यासाठी अकबरने बिरबलला पाठवले होते.कतलांग दरी पार करताना लपून बसलेल्या अफगान विरोधकांनी धोक्याने बिरबलाची हत्या केली.
म्हणतात की, सम्राट अकबर यांना ही बातमी कळली तेव्हा ते दोन दिवस दरबारात आले नव्हते आणि काही दिवस अन्न-पाणीसुद्धा घेतले नव्हते. आजदेखील अकबर-बिरबलाचे किस्से-कथा मोठ्या आवडीने वाचल्या आणि ऐकल्या जातात.
गोनू झा
ज्याप्रमाणे उत्तर भारतात बिरबल आणि दक्षिण भारतात तेनालीरामच्या हजरजबाबीपणाच्या कथा प्रसिद्ध होत्या, त्याप्रमाणे गोनू झा संपूर्ण मिथिला प्रदेशात प्रसिद्ध होते. ते तेराव्या शतकात मिथिलाचा राजा हरिसिंहच्या दरबारात कवी होते.तेनालीरामप्रमाणेच गोनू झा यांचे दरबारात अनेक विरोधक होते. ते वेगवेगळी षडयंत्रे रचत आणि त्यांना रामोहरम करण्याचा प्रयत्न करत.पण गोनू झा आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांना पुरून उरत. त्यांच्या शत्रूंचा दरबारात पराभव तर व्हायचाच पण तितकेच ते दरबाराचे हास्यपात्रही व्हायचे.

गोनू झा यांचे वडील ज्योतीष होते. दूरदूरुन माणसे त्यांच्याकडून आपले भविष्य जाणून घेण्यासाठी यायचे. एकदा गोनू झा यांनी आपल्या वडिलांना काही धन मागितले. त्यांनी त्याला नकार दिला.गोनू झा एका नाटक मंडळात गेले आणि संन्याशाची वस्त्रे भाड्याने घेतली.
ती वस्त्रे नेसून ते आपल्या घरी आले. संन्याशाने त्यांच्या वडिलांना त्यांच्या भूतकाळातल्या काही घटना सांगितल्या. त्यावर त्यांचे वडील बेहद्द खूश झाले. त्यांनी संन्याशाला खूप अशी धनसंपत्ती दिली. आणखी आपली एक अंगठीदेखील दिली. अशाप्रकारे गावातल्या लोकांनीही त्यांना पुष्कळ असे धन दिले. मग त्यांनी आपले धारण केलेले रूप बाजूला केले. आपल्या वडिलांना सगळी धनसंपत्ती आणि अंगठी बहाल केली. तेव्हा वडील म्हणाले,‘तू तुझ्या वडिलांना फसवलंस?’
गोनू झा म्हणाले,’ ‘बापू, मी पहिल्यांदा घरातच बुद्धीची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यामुळेच मी बाहेर यशस्वी होऊ शकेन!’ वडिलांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि म्हणाले, ‘ तू तुझ्या बुद्धीच्या कलेत यशस्वी होशील.’
गोपाळ भांड
बंगालच्या लोककथांमध्ये गोपाळ भांड यांचे स्थान फार वरचे आहे. असा विश्वास केला जातो की, अठराव्या शतकात गोपाळ भांड नाडियाचा राजा कृष्णचंद्र रॉय यांचा दरबारी कवी होता.त्यांची बुद्धिमत्ता, चतुरपणा आणि हजरजबाबीपणा यामुळे तो राजाच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होता. या कारणामुळेच राजा कृष्णचंद्र रॉय यांच्या महालात आजदेखील गोपाळ भांड यांची प्रतिमा लागलेली दिसते.
गोपाळ भांड पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमध्ये आजही खूपच लोकप्रिय आहेत. त्यांच्या अनेक कथा प्रचलित आहेत. या कथा छोट्या, आकर्षक आणि मार्मिक असतात. या कथांमध्ये ते अन्य दरबारी आणि लोकांचा आपल्या चतुरपणाच्या जोरावर पराभव करतात.
गोपाळ भांड यांचा एक किस्सा आहे- एकदा ते गल्लीतल्या एका मिठाईवाल्याच्या दुकानात गेले.त्यावेळेला दुकानात आपल्या मुलाला बसवून मिठाईवाला आत गेला होता.गोपाळ भांड यांनी दुकानातली मिठाई घेऊन खायला सुरुवात केली.यावर तो मुलगा त्यांच्यावर ओरडला. तेव्हा गोपाळ भांड म्हणाले, ‘ तुझे वडील मला ओळखतात.’
त्या मुलाने त्यांचे नाव विचारले, तेव्हा त्यांनी आपले नाव माशी असल्याचे सांगितले. मुलाने मोठ्याने आपल्या वडिलांना आवाज दिला,’ ‘बाबा, माशी आपली मिठाई खातेय.’
तेव्हा आतून हलवाई ओरडला,‘ खाऊ दे! हे तर रोजचेच आहे.’

No comments:

Post a Comment