एक गरीब शेतकरी होता.त्याला
राजू नावाचा एक मुलगा होता. शेतकऱ्याने त्याला शिकायला शहरात पाठवले.एका वर्षाने
राजू गावात परत आला.वडिलांनी विचारलं,"राजू, तू कोणती विद्या शिकून आला आहेस?"
राजू म्हणाला," बाबा,मला बेडकांची भाषा
कळते."
हे ऐकून शेतकऱ्याला फार वाईट
वाटले. तो मनाशी म्हणाला,याने विनाकारण आपले एक वर्ष वाया
घालवले. काही महिने सुट्टी घालवल्यावर शेतकऱ्याने पुन्हा राजूला शिकायसाठी शहरात
पाठवले. एका वर्षाने पुन्हा राजू गावी आला.यावेळेला तो कुत्र्यांची भाषा शिकून आला
होता. शेतकऱ्याने विचार केला, 'जनावरांची भाषा शिकून याला
याचा काय फायदा होणार?'
शेतकऱ्याने आता राजूला
शेताच्या कामाला जुंपले. पण काही दिवस गेल्यावर शेतकऱ्याला वाटले, राजूला शिकवण्याची गरज आहे. त्याला शेतात कामाला लावून
उपयोगाचे नाही. म्हणून त्याने राजूला पुन्हा शिकायला शहरात पाठवले.तिसऱ्यावेळेला
तो माशांची भाषा शिकून आला. आता शेतकऱ्याची खात्री झाली की, राजू काही शिकणार नाही. शेवटी हतबल होऊन त्याने राजूला शेतीच्या कामाला
लावून टाकले.
एक दिवस राजू शेतात काम करीत
असताना त्याला दोन प्रवाशी तिथल्या मार्गावरून जाताना दिसले. राजधानीत राजाची निवड
होणार होती. ते दोघे त्यात सहभाग घ्यायलाच निघाले होते. ते राजूला पाहून थांबले.
त्याच्याकडून पाणी मागून घेतले. थोड्या गप्पा झाल्या. त्यांनी राजूलाही आपल्यासोबत
विनंती केली. त्यांना आणखी एका साथीदाराची गरज होतीच. तो लगेच जायला तयार झाला.
तिघेही राजधानीच्या दिशेने
निघाले. चालता चालता दुपार झाली. वाटेत त्यांना तहान लागली.ते एका तळ्याजवळ पाणी
प्यायला थांबले. तळ्यात काही बेडकं होती. त्यांना पाहून बेडकं टरटरली. राजू
त्यांची भाषा समजू शकत होता. बेडकांची भाषा ऐकून त्याला फार आनंद झाला.ते तिघेही
पोट भरून पाणी प्याले. थोडा वेळ विश्रांती घेऊन ते पुढच्या मार्गाला लागले.
आता रात्र व्हायला आली होती.
कुठे तरी मुक्काम करणे भाग होते. ते जवळच असलेल्या एका गावात पोहचले. तिथं त्यांना
एक भाड्याची खोली मिळाली. मात्र त्या खोली मालकाची आई आजारी असल्याचे
त्यांना समजले. राजू मालकाकडे गेला आणि म्हणाला,"काही काळजी करू नका,मालक!मी तुमच्या आईंना बरे
करतो." असे म्हणून राजू लगेच त्या तळ्याकडे गेला,जिथे
ते दुपारी थांबले होते. तिथून त्याने थोडे पाणी घेतले. ते पाणी त्याने आजीला
पाजले. ती लगेच खडखडीत बरी झाली. बेडकांनी हेच राजूला आपल्या भाषेत सांगितले होते.
दुसऱ्यादिवशी मालकाने जाताना राजूला खूपसे पैसे दिले.
त्यांचा पुन्हा प्रवास सुरू
झाला. एका धर्मशाळेत पोहचायला त्यांना संध्याकाळ झाली. जेवण केल्यावर ते तिघे
खोलीत आपल्या अंथरुणावर लवंडले. तोच कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज आला. तो जोरजोराने
भुंकत होता. राजू म्हणाला," आपल्या धर्मशाळेत एक चोर लपला
आहे.तो रात्री इथला दरवाजा उघडणार आहे आणि मग त्याचे साथीदार इथल्या प्रवाशांना
लुटणार आहेत."
राजूच्या दोन्ही मित्रांनी
तिथल्या सगळ्या प्रवाशांना सावध केले. रात्री चोर आत शिरले,तेव्हा सगळ्या प्रवाशांनी मिळून त्यांना पकडले आणि त्यांना
चांगलेच झोडपून काढले. सर्वच प्रवाशांनी राजूच्या ज्ञानाचे कौतुक केले.
तिसऱ्यादिवशी तिघे चालता चालता एका नदीवर पोहचले. नदीत मासे पोहत होते. दोघा
मित्रांनी राजूला विचारले,"काय म्हणताहेत मासे?"
" मासे म्हणतात की , या यात्रेकरूंपैकी एक राजा निवडला जाणार आहे." राजू म्हणाला.
तिघांनाही आनंद झाला. त्यांना
राजूसारख्या बुद्धिमान साथीदाराचा अभिमान वाटत होता. ते पुन्हा पुढच्या प्रवासाला
निघाले. ते दिवस मावळण्याअगोदर राजधानीत पोहचले. तिथे राजूच्या
हुशारीच्या बातम्या अगोदरच पोहचल्या होत्या.राजधानीतल्या लोकांनी राजूला आपला राजा
म्हणून निवडले. दोन्हीही मित्रांना याचा फार आनंद झाला.कारण त्यांना वाटत होतं की, राजूसारखा बुद्धिमान माणूसच राजा बनायला हवा.
राजूच्या वडिलांना ही बातमी
समजली तेव्हा, तर त्यांच्या आनंदाचा पारावरच उरला
नाही.त्यांना समजून चुकले की, हे सगळे राजूच्या विद्येचे फळ
आहे, जे त्यांना फालतू,बेकार वाटत
होते. आता त्यांच्या लक्षात आले की, विद्या किंवा ज्ञान
कोणत्याही प्रकारचे असो ते शेवटी ज्ञानच असते. ते कधीच बेकार जात नाही.
No comments:
Post a Comment