Thursday, March 1, 2018

रोज नवे नवे ... हवे हवे


उचकी का लागते
उचकी लागल्यानंतर कोणीतरी आठवण काढत असेल, अशा खुळ्या समजात असाल तर वास्तव समजून घ्या. छाती आणि पोट यांच्यामध्ये एक स्नायूंचा पडदा असतो. या स्नायूला मेंदूचे आदेश पोहोचविण्यासाठी फ्रेनिक नावाची नस असते. या पडद्याला वारंवार उद्दिपन मिळाले अथवा फ्रेनिक नसेमुळे वारंवार उद्दिपन झाले तर उचकी लागते. काही शारीरिक विकारांमुळे उचकी येते तर काही मानसिक रोगही यास कारक ठरत असतात. शरीरात आम्ल आणि अल्कली यांच्या प्रमाणातील बदल उचकीस कारक ठरतो.
 बोधकथा
काळजी 
एक श्रीमंत सावकार उपदेश देणार्‍या संतांच्या शोधार्थ निघाला असताना वाटेत एक महाराज बसलेले दिसले आणि त्याने आपली व्यथा त्यांना सांगितली. आपण सात पिढय़ांसाठी कमवून ठेवले आहे पण आठवी पिढी काय करणार, याची काळजी असल्याचे त्याने सांगितले. यावर साधूने तांदळाची पिशवी डोंगरावरील म्हातारीला नेऊन देण्यास सांगितले. त्याप्रमाणे तांदूळ घेऊन श्रीमंत म्हातारीच्या झोपडीत गेला तेव्हा ती भजनात दंग होती. श्रीमंताने तांदूळ देताच ती म्हणाली, 'मी मागितले होते का? त्या साधुला जाऊन सांग, अजून दोन दिवस पुरतील एवढे तांदूळ आहेत माझ्याकडे.' त्यावर श्रीमंत म्हणाला, 'तिसर्‍या दिवसासाठी होतील राहू दे.' ती म्हणाली, 'माझ्या तिसर्‍या दिवसाची चिंता तुलाही नको आणि त्या साधुलाही नको.' हे ऐकून श्रीमंत पिशवी घेऊन परतला आणि परत जायला निघाला असता महाराजांनी हाक मारली, 'अरे! विवंचना घेऊन आला होतास ना? मी तुला त्यातून सोडवणार आहे.' तेव्हा श्रीमंत म्हणाला, 'महाराज मला उत्तर मिळाले. तिसर्‍या दिवसाच्या तांदळाची चिंता न करणारी म्हातारी सुखी रहात असेल तर मी का नाही?'
तात्पर्य : वृथा काळजी करू नये.
 आजारापासून मुक्तता 
विष्ठा आणि मूत्र याद्वारे शरीरातील अनावश्यक आणि विषारी घटक बाहेर काढण्याची एक यंत्रणा कार्यरत असते. पण पचनसंस्था योग्य पद्धतीने कार्यरत नसेल तर यात बाधा येते. बद्धकोष्ठतेसारख्या समस्या पुढे येतात. बद्धकोष्ठता हा फक्त पचनसंस्थेशी संबंधत विकार नाही तर यामुळे शारीरिक तसेच मानसिक विकारही जडतात. म्हणूनच यावर तातडीने उपचार व्हावेत. अनेक कारणांमुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते. पण ती वारंवार निर्माण होऊ लागल्यावर किंवा यामुळे शरीरात जंतूसंसर्ग होऊ लागल्यावरच याचे गांभीर्य लक्षात येते. वाढते वय, गर्भारपण, आहारात फायबरची कमतरता, पाणी कमी पिणे, बैठे काम, शारीरिक हालचालीचा अभाव, मधुमेह किंवा रक्तदाबविषयक समस्या, चॉकलेट तसेच दुग्धजन्य पदार्थांचे अतिरिक्त सेवन, मानसिक आजार यामुळे बद्धकोष्ठता निर्माण होते. याला चुकीची जीवनशैलीही कारणीभूत आहे. बद्धकोष्ठतेची लक्षणे दिसल्यास तातडीने उपाययोजना करणे गरजेचे ठरते. त्यासाठी आहारात फायबरयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवावे. गव्हाचा दलिया, पूर्ण धान्य, कोंडायुक्त पदार्थ खावेत. भरपूर व्यायाम आणि शारीरिक हालचालींवर भर द्यावा. पाण्याचे प्रमाण वाढवावे. व्यायाम करावा.
 त्वचेची काळजी 
आता दोस्त लोकही त्वचेची पुरेशी काळजी घेऊ लागलेले आहेत. वेगवेगळ्या क्रिम्सचा वापर करू लागलेले आहेत. पण सगळी काळजी घेऊनही काही वेळा पिंपल्स, ब्लॅक हेड्ससारख्या समस्यांचा ससेमिरा कमी होत नाही. वेगवेगळ्या लोशन्सचा मारा करूनही प्रश्न सुटत नाहीत. अशा वेळी यामागील कारणांचा शोध घ्यायला हवा. अशाच त्वचेला मारक ठरणार्‍या काही गोष्टी ज्याबद्दल जाणून घेणे इष्ट ठरेल. 
* रात्री चेहरा आणि केसांमधले तेल उशीला लागते. या उशीशी आपला सतत संपर्क येत असतो. उशीचे अभ्रे वारंवार धुतले नाहीत तर चेहर्‍याला संसर्ग होतो आणि पिंपल्ससारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
* सतत मोबाईलचा वापर होत असेल तर त्यावरील बॅक्टेरियांचा त्वचेशी संपर्क होऊन संसर्गाचा धोका वाढतो.
* दाढी केल्यानंतर आफ्टर शेव्हचा वापर केला जातो. पण बर्‍याच कंपन्या उत्पादनात अल्कोहोलचा वापर करतात. अशा आफ्टर शेव्हच्या वापरानंतर चेहर्‍याला खाज सुटते. पुरळ उठतात.
* डोळ्यावरून काढल्यावर गॉगल डोक्यावर किंवा मानेवर ठेवला जातो. यावेळी घामातले बॅक्टेरिया गॉगलवर जमा होतात. गॉगल पुन्हा घातल्यानंतर बॅक्टेरियांमुळे चेहर्‍याला इन्फेक्शन होऊ शकते. यामुळे ब्लॅक हेड्स, पिंपल्ससारख्या समस्याही डोकं वर काढतात.
* हेल्मेटचा जास्त वापर असल्यास किंवा स्वच्छता न राखल्याने यात बॅक्टेरिया वाढतात. हे अस्वच्छ हेल्मेट घातल्याने संसर्ग होतो.
 व्हाईट ऑन व्हाईट
 उन्हाळा सुरू झाला आहे. या दिवसात पेस्टल शेड्सचा जलवा बघायला मिळतो. अशातच जीन्स या लोकप्रिय प्रकारातही पांढरा अथवा हलका रंग अँड करायला हरकत नाही. उन्हाळ्यात पांढर्‍या रंगाच्या जीन्स कॅरी करणे हा उत्तम पर्याय ठरतो. व्हाईट स्नीकर्स आणि बॅग्जनंतर आता व्हाईट जीन्सची चलती आहे. त्यातच पांढर्‍या रंगामुळे शरीराला थंडावा मिळतो. अशी जीन्स कोणत्या प्रकारच्या टॉपसोबत उठून दिसेल याबाबतच्या टिप्स..
* व्हाईट ऑन व्हाईट हे कॉम्बनेशन छान दिसते. व्हाईट जीन्ससोबत बोल्ड पिंट्रवाले टॉप्स कॅरी करा. पांढर्‍या रंगाचे टॉप्स निवडा. व्हाईट बेसवर बोल्ड डिझाइन्स उठून दिसतील.
* व्हाईट जीन्स आणि कोणत्याही रंगाचा फ्लोरल टॉप शोभून दिसेल. ब्लू, ब्लॅक, रेड, नेव्ही ब्लू, येलो असे रंगांचे असंख्य पर्याय तुमच्याकडे आहेत.
* व्हाईट जीन्ससोबत डेनिम टॉप कॅरी करता येईल. हा कूल ऑप्शन आहे. या लूकला अँक्सेसरीजने खुलवता येईल. कॅप, ब्रेसलेट, ट्रेंडी नेकलेस असे बरेच काही कॅरी करता येईल.
* व्हाईट जीन्ससोबत गडद रंगाचे टॉप्सही कॅरी करता येतील. हे कॉम्बिनेशन दिवसा आणि रात्रीही शोभून दिसेल.
 केस का गळतात?
 अनारोग्य असेल तर केस गळतात त्याचप्रमाणे त्वचेवरील लवही कमी होऊ लागते. शरीरावरील केस कमी होण्याची काही कारणं आहेत. 
उदा. एस्ट्रोजनची पातळी वाढली तर केसांची झपाट्याने वाढ होते. म्हणूनच गरोदरपणी एस्ट्रोजनची पातळी अधिक असताना महिलांचे केस वाढतात आणि बाळंतपणानंतर ही पातळी कमी होताच केस गळू लागतात. मासिक पाळी संपल्यानंतरही केसगळती सुरू होते. थायरॉईड ग्रंथींचे काम बाधित झाल्यास त्वचेवरील केस कमी होतात. या सर्व लक्षणांकडे बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
 वाढवा सामान्यज्ञान
 १) यूएईचे विस्तारित रूप कोणते
२) १५ नोव्हेंबर १९९७ रोजी कोणाच्या हस्ते बहुउद्देशीय विनाशिका नौका आयएनएस नौदलात दाखल झाली
३) पंतप्रधान अटलबहारी वाजपेयी यांनी तिसर्‍यांदा पंतप्रधान पदाची शपथ कधी घेतली
४) गोध्रा रेल्वे हत्याकांडाची चौकशी कोणी केली?
५) कोणत्या राजाने दक्षिण भारतात मुघल सत्ता पसरवली?
उत्तर : १) युनायटेड अरब अमिरात २) अँडमिरल विष्णू भागवत ३) १३ ऑक्टोबर १९९९ ४) न्या.जी.टी.नानावटी ५) अल्लाउद्दीन खिलजी
 विनोद
 काय हवं?
 एकदा एक तरुण हॉॅटेलमध्ये जातो. तो काहीसा भांबावलेला असतो. हे पाहून तिथला वेटर विचारतो,'साहेब काय आणू? साधा डोसा, मसाला डोसा, पेपर डोसा..?' 
तरुण : सध्या मला फक्त आडोसा देऊ शकतोस का हे बघ. कारण एकाच वेळी दोन मैत्रिणी शोधत इथे येत आहेत आणि आत्ता मी तिसरीबरोबर आहे.
 आजचा मेन्यू
ओल्या काजूची भाजी
 साहित्य : जिन्नस, पाव किलो सोललेले ओले काजूगर, २ कांदे, २ बटाटे, १ टोमॅटो, अर्धा ओला नारळ किसून, लसुण, आले, गरम मसाला पावडर, तिखट, हळद, मीठ, कोथिंबीर, तेल.
पाककृती : काजूगर रात्री कोमट पाण्यात भिजत घालून सकाळी सोलावेत. बटाट्याची साले काढून तुकडे करावेत. प्रथम कढईत तेल टाकून जीरे-मोहरी, कांदा, लसुण व टोमॅटो टाकून चांगले परतवून घेणे. चांगले शिजल्यावर त्यात सोललेले काजू व बटाट्याचे तुकडे टाकून त्यात आवडीनुसार तिखट, हळद, मीठ व पाणी घालून शिजू द्यावेत. नंतर भाजलेल्या कांदा-खोबर्‍याचे वाटप करून ते त्यामध्ये घालावे व पुन्हा चांगले शिजवून घ्यावेत. उकळ्या आण्याव्यात. उतरताना गरम मसाला पावडर घालावी व एक उकळी आणावी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून उतरावे.


No comments:

Post a Comment