Saturday, March 3, 2018

दोष नेमका कुणाचा?


     आपल्या देशात सध्या काय चालले आहे, समजायला तयार नाही. मद्यसम्राट विजय मल्ल्या भारतातल्या बँकांना चुना लावून गेला,त्यापाठोपाठ रांगच लागली आहे. ललित मोदी नंतर निरव मोदी हा हिरे व्यापारी बँकांना ठकवून परदेशात पळून गेला आहे. स्वत:ला भारताचे रक्षक म्हणवणारे मोदी यांनी भारतातला आणि भारताबाहेरचा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदीचे हत्यार उपसले. पण सर्वसामान्यांना त्रास होण्याशिवाय बाकी काहीच त्यांच्या हाताला गवसले नाही. एवढे मोठे नियंत्रण बँकांभोवती असताना निरव मोदी हा बँकांना ठकवून गेलाच कसा हा मोठा प्रश्न आहे. 11 हजार कोटी रुपये ही फक्त प्राथमिक माहिती आहे. हा मोदी नेमका कितीचा चुना आपल्यातल्या पंजाब बँकेला लावून गेला, हे अजून उघड व्हायचे आहे. अशा अनेक उद्योगपतींनी,व्यापार्यांनी बँकांना मातीत घातले आहे.पण तरीही त्यांचे कोणी काही करू शकत नाही.पण आपल्याच भारतातला शेतकरी एक दोन लाख थकवला तर बँका लगेच त्यांच्या मालमत्तेवर टाच आणून त्याला बेघर करतात. त्यामुळे आपल्या देशात नेमके काय चालले आहे, हे कळायला मार्ग नाही.

     आपला देश तर भ्रष्टाचाराच्याबाबतीत आघाडीवरच आहे. न खाऊंगा और ना खाने दुंगा म्हणणार्यांच्या या देशात हा भ्रष्टाचार दिवसेंदिवस फोफावतच चालला आहे. शिवाय अशा भ्रष्टाचारांना शिक्षा झाल्याचे ऐकिवातही नाही. लाचखोर मोकाट सुटले आहेत, चोर- लुटारू दिवसाढवळ्या हैदोस घालत आहेत. सगळे मिळून देशाला आणि जनतेला लुबाडण्याची जणू संधीच शोधत आहेत. काहीजण एसीबी वा सीबीआयच्या जाळ्यात अडकत असले तरी त्यापैकी बरेचसे मोठया शिताफीनेबा-इज्जतनिर्दोष सुटत आहेत. निरपराधांचा बळी घेणारे व कोट्यवधींची माया घशात घालणारे समाजात मात्र उजळ माथ्याने मिरवत आहेत. वाळू तस्कर सरकारी आधिकार्यांचाच जीव घेत सुटले आहेत. आपल्या देशात फारच भयंकर घडू लागले आहे. पोलिसांच्या कानशिलात कोणीही भरबाजारात वाजवू लागला आहे. पोलिसांचा वचक संपल्याचे आणि त्यांच्या भ्रष्टाचाराच्या अब्रुची लक्तरे भर बाजारात वाळू घालण्याच्या या घटना आहेत. यातून कोणी बोध कुणी घेणार आहे की नाही? आजची युवा पिढी यातच गुरफटू लागली आहे.
     पुढार्यांच्या नादाला लागून आणि चैनीला सोकावलेल्या य तरुणांना त्यांच्या भल्याचे काही सांगण्याची आवश्यकता आहे,पण त्यांना सांगणार कोण? सगळेच एकाच माळेचे मणी आहेत. देशातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन व्हावे, असे प्रत्येक नागरिकाला मनापासून वाटते. भ्रष्टाचार निपटून काढण्याची भाषा लोकप्रतिनिधी करताना दिसतात.पण त्यांच्याकडूनच अशा भ्रष्टाचाराला खतपानी घातले जाते, हे कित्येकदा उघड झाले आहे.पण आपल्या देशातला भ्रष्टाचार कसा संपणार?  अशावेळी देशातील वाढत्या भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी विशेष कायदा करण्याची गरज मागे सर्वोच्च न्यायालयानेही  व्यक्त केली होती. लाचखोर अधिकार्यांना बडतर्फ करण्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे विधानसभेत केली होती, पण त्याचे पुढे काय झाले कळलेच नाही. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्यासाठी कायद्याची चौकट अपुरी पडत आहे, हे स्पष्ट दिसत आहे. भ्रष्ट बाबू व राजकारण्यांना ताळ्यावर आणण्यासाठी त्यांची संपत्ती जप्त करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले आहे.
      सगळ्यांनाच  भ्रष्टाचाराविषयी चीड आहे. म्हणूनच भ्रष्टाचाराची परिसीमा गाठलेल्या मनमोहनसिंह सरकारला लोकांनी आपल्या मतपेटीद्वारा घरी बसवण्याचे काम केले. नरेंद्र मोदी सरकारला आता चार वर्षे होताहेत.त्यांच्याकडून फार मोठी अपेक्षा लोकांनी केली होती.पण त्याचा पुरता भ्रमनिराश झाल्याचेच दिसत आहे. आपल्या देशातले कुठलेच सरकारी खाते भ्रष्टाचारापासून लांब नाही. आरटीओच नव्हे तर सर्वच सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार व लाचखोरीचा कर्करोग खोलवर भिनला आहे. सरकारी बाबू व राजकारणी मिळून भ्रष्टाचाराचा राक्षस पोसत आहेत. राजकारणात आलेले नवखे कार्यकर्ते निवडून आल्यावर अल्पावधित श्रीमंत होतात. प्रगत महाराष्ट्रातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात लाचखोरांना पकडण्याचे प्रमाण बर्यापैकी वाढले आहे. परंतु रंगेहाथ पकडले जाऊनही 75 टक्के लाचखोर निर्दोष कसे सुटतात,हाच मोठा प्रश्न आहे. मध्यंतरी महाराष्ट्रात आरटीओमधील एजंटगिरीला आळा घालण्याचा प्रयत्न झाला; पण सरकारला नाईलाजाने एजंटबंदीचा हा निर्णय मागे घ्यावा लागला
     भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी आरटीओसह सर्वच सरकारी सेवा    'ऑनलाईन’  करण्याचा सपाटा सुरू आहे. मात्र कारभारात पारदर्शकता आणण्याच्या प्रयत्नांनाखोघालण्यात सरकारी बाबू तरबेज आहेत. गुन्हेगारी जगतात वरदराजन, दाऊद, करीमलालासारख्या डॉन मंडळींची कमतरता नाही. परंतु सरकारी नोकरीत सरकार आणि जनतेची लूट करणारेव्हाईट कॉलरडॉनही कमी नाहीत. ऑनलाईन सेवांवर भर दिला जात आहे; पण बदल्यांची हप्तेवसुली कोणाकोणाकडे पोहोचते, याची कधी चौकशी झाली का? सरकारी कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. बँकांच्या एटीएममध्ये तिसर्या डोळ्याची नजर आहे. ते डोळे फोडून लुटारू केवळ रात्रीच्या अंधारातच नव्हे तर दिवसाढवळ्याही हातसफाई करत आहेत. तंत्र-यंत्र कितीही पुढे गेले तरी खादाड प्रवृत्तींच्या शिताफीला पायबंद बसलेला नाही. हा दोष नेमका कुणाचा म्हणायचा?

No comments:

Post a Comment