Sunday, March 18, 2018

महिलांनो, गप्प बसून चालणार नाही


     ली उन-यू सध्या दक्षिण कोरियात सामाजिक कार्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या सेक्स अत्याचाराविरोधात आवाज उठवत आहेत. तिथल्या सरकारनेही त्यांना सेक्स अत्याचाराविरोधातल्या सरकारी कार्यक्रमात सामावून घेतले आहे. तिथल्या पिडित महिलांना मोफत कायदेशीर सल्ला देण्याचे काम करतात. मात्र यासाठी त्यांना स्वत: मोठा संघर्ष करावा लागला आहे. यासाठी त्यांना मोठी किंमत चुकवावी लागली आहे. त्यांना मोठा मानसिक धक्का सहन करावा लागला आहे.पण त्या मागे हटल्या नाहीत. शेवटी त्यांच्या संघर्षाचा विजय झाला. त्यांच्या या संघर्षाचा थोडक्यात आढावा...

      दक्षिण कोरियाच्या ली उन-यू ने 1998 मध्ये एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीत आपल्या करिअरला सुरुवात केली. आत्मविश्वास अगदी ठासून भरलेल्या या मुलीने आपल्या मेहनतीच्या आणि योग्यतेच्या जोरावर ऑफिसमध्ये पुरुष सहकार्यांमध्ये आपली अशी खास ओळख निर्माण केली. प्रशिक्षणार्थीपासून करिअरला सुरुवात केलेल्या या मुलीचा करिअरचा ग्राफ सतत वाढत राहिला.
     आपल्या बॉसच्या आदेशाचे पालन करणे आणि पुढे जाऊन जबाबदारी अंगावर घेणे, ही तिची सवयच होती. याचे तिला बक्षीसही मिळाले. 2003 मध्ये कंपनीने तिला इलेक्ट्रिकल अपलायन्सच्या सेल्स टीममध्ये मोठी जबाबदारी दिली.तिला अमेरिका आणि युरोपमध्ये कंपनीचा व्यवसाय वाढवण्याचे लक्ष्य देण्यात आले. लीने हे आव्हान अगदी आनंदाने स्वीकारले. तिचा संपूर्ण फोकस कंपनीच्या विक्री लक्ष्या (सेल्स टारगेट)वर होता. ही जबाबदारी ती अगदी मनापासून पूर्ण करण्याच्या कामाला लागली होती. त्या काळात ती कामाच्या निमित्ताने टूरवर होती. एक सिनिअर ऑफिसर तिच्यासोबत होता. ते वर्ष 2005 चे होते. एके दिवशी अचानक कामाचा बहाणा करून तो अधिकारी तिच्या अगदी जवळ आला. पहिल्यांदा त्याने लीच्या केसांना स्पर्श केला. नंतर मग तो आक्षेपार्य असा वागायला लागला. ती आतून थरथरून गेली. तिने त्याला लांब होण्याचा इशारा दिला,पण त्याने तो जुमानला नाही. ली सांगते, तो खूप बेशर्म होता. तो मला म्हणाला, तुला आपल्या सिनिअरची प्रत्येक गोष्ट ऐकावी लागेल. मी अवाक झाले होते, काय करू समजत नव्हते.
     तिने आपल्या एचआर विभागात त्या अधिकार्याची तक्रार केली. तिला आशा होती की, कंपनी आपल्याला न्याय देईल आणि त्या  अधिकार्याला शिक्षा करेल. पण झाले उलटेच!  तिलाच जबरदस्तीने सात महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. लीचे काही एक ऐकण्यात आले नाही. सुट्टीनंतर तिने पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली. पण आता तिची कंपनीने सेल्स विभागातून समाज कल्याण विभागात बदली केली होती. ली सांगते, मी युरोप आणि अमेरिकेत कंपनीची सेल्सची जबाबदारी सांभाळली होती.परंतु, सेक्स अत्याचाराची तक्रार केल्यावर माझा विभाग बदलण्यात आला.या दरम्यान तिच्या जवळपास सर्वच सहकार्यांना बढती देण्यात आली, मला मात्र सी ग्रुपमध्ये टाकण्यात आले.
     2007 मध्ये तिने मानवाधिकार आयोगाकडे या प्रकरणाची तक्रार केली. पण तरीही कंपनीचे वागणे काही बदलले नाही. मग तिने 2008 मध्ये कोर्टात केस दाखल केली. तिला इथेही मोठा झटका बसला,कारण तिची केस घ्यायला कुठला वकिलच तयार नव्हता. ली सांगते,कंपनी इतकी शक्तीशाली होती की, कोणताच वकिल तिच्याविरोधात लढायला तयार झाला नाही. शेवटी लीलाच स्वत:ची केस स्वत:च लढावी लागली. या केसने तिला वकिल बनवले. या दरम्यान तिच्यावर केस मागे घेण्यासाठी दबाव यायला लागले. धमक्या यायला लागल्या.  कंपनीने दावा केला की, लीसोबत कुठल्याही प्रकारचा सेक्स अत्याचार झालेला नाही. ली सांगते, माझ्यासोबत कुणीच सहानुभूती दाखवली नाही. उलट तिलाच धमकी देण्यात आली की, तिने तक्रार मागे घेतली नाही तर कंपनीच माझ्यावर केस दाखल करेल.हे सगळे मोठे भितीदायक होते. मला मोठा धक्का बसला.
     या दीर्घ कायद्याच्या लढाईदरम्यान  ती पूर्णपणे एकटी पडली. वडिलांचा मृत्यू झाला. स्वत: डिप्रेशनची शिकार झाली. मानसिक दबावामुळे तिची बोलण्याच्या क्षमतेवरदेखील परिणाम झाला. ली सांगते, ऑफिसमधले लोक, शेजारी आणि सगळे मित्र,सगळे लांब गेले.  मोठा मानसिक दबाव पडला माझ्यावर! माझ्या मेंदूवर याचा इतका वाईट परिणाम झाला की, माझा आवाजच बंद झाला. मला दवाखान्यात दाखल करण्यात आले. माझे करिअर बरबाद झाले.
     शेवटी 2010 मध्ये तिच्या संघर्षाचा विजय झाला. कोर्टाने तिच्या बाजूने निकाल दिला.कोर्टाने आदेश दिला की, कंपनीने सेक्स अत्याचाराबाबत कारवाई करायचे सोडून उलट अत्याचारित महिलेला त्रास दिला. यामुळे तिला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. ज्यावेळेला हा आदेश सुनावला जात होता, त्यावेळेला मी कोर्टात उभी राहून रडत होते. कोर्टाच्या आदेशानुसार आरोपी ऑफिसर आणि कंपनीने मोठी भरपाई दिली. ली सांगते, भरपाईत मला मोठी रक्कम मिळाली,पण गोष्ट पैशांची नव्हती. महत्त्वाचे हे होते की,कोर्टाने माझी बाजू योग्य असल्याचे मानले. या निर्णयामुळे देशातल्या अनेक महिलांना हिंमत मिळाली. ऑफिसमध्ये तोंड दाबून अत्याचार सहन करणार्या महिला तक्रार द्यायला पुढे सरसावल्या.
     कोर्टाच्या निकालानंतर शेकडो लोकांनी लीचे अभिनंदन केले. दुसर्या कंपन्यांमध्ये तिच्यासारखाच अत्याचाराचा दंश सहन करणार्या महिलांनी तिच्याशी संपर्क साधला. सरकारवरदेखील याचा परिणाम झाला. सरकारने सेक्स अत्याचाराच्या प्रकरणात कायदा कडक करण्याची घोषणा केली. ली सांगते, ज्या लोकांनी माझ्याशी संबंध तोडले होते, ते पुन्हा माझ्याकडे आले आणि म्हणू लागले,तूच योग्य होतीस. काही महिलांनी मला विचारले की, त्यांनी ऑफिसात होणार्या शोषणापासून सुटका कशी करून घ्यावी? केस जिंकल्यावरदेखील ली गप्प बसलेली नाही. तिचा संघर्ष सुरूच आहे. सेक्स अत्याचाराच्या विरोधात अमेरिकेत सुरू झालेल्या मी-टू अभियानाचा परिणाम दक्षिण कोरियातही दिसू लागला आहे. लीची केस देशातल्या महिलांसाठी दिशादर्शक ठरला आहे. ली आता आपल्या देशातल्या सेक्स अत्याचाराविरोधात चाललेल्या सरकारी कार्यक्रमानुसार पिडित महिलांना मोफत कायदेशीर सल्ला देण्याचे काम करत आहे.

No comments:

Post a Comment