एका झाडावर पक्ष्यांची वस्ती होती. ते सगळे अनेक दिवसांपासून तिथे राहत होते. सगळ्यांचे एकमेकांशी एका कुटुंबाप्रमाणे नाते जुळले होते. कोणी एखादा संकटात सापडला, तर सगळे त्याच्या मदतीला धावून जायचे. अथवा कोणी काही खास वेचून आणले तर ते आपापसांत वाटून खायचे. अशा प्रकारे मोठ्या आनंदात दिवस चालले होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याला जोमदार सुरुवात झालेली होती. पाऊस जोराचा पडत होता. मधेच थंडगार वारा सुटायचा. त्यामुळे सगळ्यांनाच त्याचा त्रास व्हायचा. एक दिवस जोराचा पाऊस सुरू होता. चिंब भिजल्यावस्थेत एक माकड झाडाखाली आले. भिजल्यानं कुडकुडत असलेल्या माकडाला पाहून एक चिमणी म्हणाली," तू तुझं स्वतःच घर का बांधत नाहीस?" झाडातून अचानक आवाज आल्याने माकडाने चमकून वर पाहिले. एक चिमणी आपल्या घरट्याबाहेर डोके काढून दयेने माकडाकडे पाहात होती. तो चिमणीला म्हणाला," वेडपट कुठली? आपल्या कामाशी काम राखावं. नसत्या कुणाच्या भानगडीत पडू नये." आणि मग तो स्वतःशीच बडबडू लागला. " काय दिवस आले आहेत? ही एवढीशी चिमणी मला शहाणपणा शिकवते आहे. " त्याला तिचा भयंकर राग आला. 'याचा तिला धडा शिकवायलाच हवा. आत्ताच तिचा जीव घेतो.''
मग तो चिमणीला म्हणाला," मला अडचणीत पाहून तुला दु:ख वाटायचं कारणच काय? ज्याला कुणाला सल्ल्याची गरज असते, त्याला सल्ला द्यावेत, हे तुला कुणी शिकवलं नाही काय? तू तुझा सल्ला तुझ्याजवळच ठेव आणि तुला सल्ला द्यायचाच असेल तर जे घाबरट लोकांना द्यायचे. मला नाही." असे म्हणत पटकन माकड झाडावर चढले. त्याने तिचे घरटे मोडून तोडून टाकले. त्यामुळे म्हटल जातं की, सल्ला देण्यापूर्वी सावधानता बाळगायला हवी. कारण मूर्ख माणूस सल्ल्यांना जुमानत तर नाहीच, शिवाय आपल्याला नुकसान पोहचवतो.