Saturday, December 1, 2012

बालकथा अति घाई, मती गुंगवी

     घोडा पूर्वी दुसर्‍या वन्य प्राण्यांप्रमाणे जंगलातच राहत होता. मोठे हिंस्त्र प्राणी अन्य जनावराबरोबर घोड्यांचीही शिकार करत.  एकदा वाघ पाठी लागल्याने घोडा गावाच्या दिशेने पळून आला. वाटेत एका शेतकर्‍याला भेटला. त्याच्याजवळ जात म्हणाला, शेतकरीदादा, माझ्या मागे वाघ लागला आहे. तो मला फाडून खाईल. मला वाचव."
घोड्याची दीनवाणी अवस्था पाहून शेतकर्‍याला त्याची दया आली. शेतकरी म्हणाला," मित्रा, अजिबात काळजी करू नकोस. तू मदत मागितली आहेस ना, मग नक्की मिळेल. वाघापासून तुझे रक्षण केले जाईल. वाघ तुझे काहीही बिघडवणार नाही. पण, तुला यासाठी माझ्या काही अटी मान्य कराव्या लागतील."
     आपल्या जीविताची हमी मिळाल्यावर घोड्याला फार मोठे हायसे वाटले. तो मागचा-पुढचा विचार न करता पटकन होकार देत म्हणाला," मला काय काम करावं लागेल, दादा?" मात्र त्याच्या चेहर्‍यावर किंचित भीतीची छटा होती.
     "तुला मी सांगेल तसं वागावं आणि करावं लागेल." शेतकरी म्हणाला.
     "दादा, तू सांगशील तसं वागेन. बस्स! मला तेवढा त्या क्रूर वाघापासून वाचव."
     शेतकर्‍याने त्याच्या गळ्याला दोरी बांधली आणि त्याला घरी घेऊन आला. " आता इथे तू अगदी सुरक्षित आहेस. मी तुला  ज्यावेळी बाहेर घेऊन जाईन, त्यावेळी तुझ्या पाठीवर स्वार होईन. मी तुझ्यासोबत असल्याने वाघ तुला काहीही करण्याची  हिंमत करणार नाही."
     बरं दादा, पण मला इथे काही खायला मिळणार की नाही ?" घोडा.
     "अलबत, माझ्या मित्रा! मी तुला रोज हिरवं, कोवळं आणि मऊ-लुललुशीत गवत आणि चना आणून खायला घालीन." शेतकरी म्हणाला.
      शेतकर्‍याची ही गोष्ट ऐकून घोडा आनंदला.  जीव वाचणार असेल आणि  खायलाही मनाजोगे, चांगले खुराक मिळणार असेल तर कशाला हवी, जंगलातली भीतीदायक भटकंती!  घोडा खूश झाला. शेतकर्‍याने त्याला लगाम घातला. पाठीवर खोगीर टाकले. आणि त्यावर स्वार झाला.
     आता या आपल्या नव्या जीवनशैलीने घोडा समाधान पावला. पण हळूहळू मात्र त्याला आपण कोठे येऊन फसलो, असे वाटू लागले. त्याने मनोमन विचार केला, मी इथे सुरक्षित नक्कीच आहे. पण स्वतंत्र नाही. मी माझं संरक्षण मिळवलं, परंतु स्वातंत्र्य गमावलं. मला हा सौदा फारच महागात पडला. पण आता घोडा विवश होता.
मी एका शेतकर्‍याच्या भीतीमुळे मागचा-पुढचा कसलाही विचार न करता अटी मान्य केल्या. खरेच! मी जर का त्यादिवशी न घाबरता धीरानं,  विचारपूर्वक निर्णय घेतला असता, तर ही गुलामी पदरात पडली नसती. बिच्चारा! आता काय करणार होता? आणि   शेवटी त्या दिवसापासून घोडा माणसाचा गुलाम  बनला.

2 comments:

  1. आपण आजच्या काळातील इसाप आहात.
    एक आधुनिक इसापनीती वर पुस्तक येऊ दे .

    ReplyDelete
    Replies
    1. कमेंटससाठी आभारी आहे. लिहित राहायचं. लिहिता लिहिता तेही घडून जाईल. पुनश्चः एकदा आभार.

      Delete