Saturday, December 8, 2012

ई- मतदान स्वागतार्ह


     मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी राज्यात २0१४ च्या निवडणुकीत 'ई- मतदान' पद्धत अमलात आणण्याचा राज्य निवडणूक आयोग प्रयत्न करीत असल्याची बातमी वाचनात आली. आहे. याचे स्वागत करायला हवे. लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रिया महत्त्वाची आणि अनिवार्य आहे. इथे बहुमताला प्राधान्य आहे. मतदार मतदानाचे आपले कर्तव्य बजावताना त्याला येणार्‍या अडचणीचा, समस्यांचा विचार होणे आवश्यक आहे. मतदारांमध्ये मतदान करण्याविषयी कमालीची अनास्था आहे. अर्थात त्याला अनेक कारणे असली तरी  मतदान प्रक्रियेत सुलभता आल्यास कोणताही मतदार यापासून वंचित राहणार नाही. मतदान केंद्रावर जाऊन रांगेत उभारून मतदान करण्यापेक्षा घरी बसून अथवा जिथे कोठे असेल तेथून मोबाईल किंवा संगणकावरून मतदान करता येत असेल, यासारखी सोयीची आणखी दुसरी कुठली सोय असणार नाही. याचा विचार राज्य निवडणूक आयोग करत आहे, ते स्वागतार्ह म्हटले पाहिजे.
     मतदानाची घटत चाललेली टक्केवारी   वाढविण्यासाठी 'ई- मतदान' हा चांगला पर्याय हो ऊ शकेल, यात अजिबात शंका नाही. कारण  या पद्धतीचा वापर केल्याने मतदारांना घरी बसून मोबाईल किंवा संगणकावरून मतदान करता येईल. तथापि, या पद्धतीत काही धोकेही आहेत. आणि हे लोकशाही घटनेसाठी घातक आहेत. कारण उमेदवार मतदारांच्या घरी जाऊन प्रलोभने दाखवू शकतात आणि  तेथेच समक्ष मतदान करून घेऊ शकतात  किंवा दहशत निर्माण करूनही  ते मतदारांकडून बाहेरच्या बाहेर मतदान करून घेऊ शकतात.  त्यामुळे 'ई- मतदान' प्रक्रियेत उमेदवारांकडून येणारे प्रलोभन, दडपण हे प्रकार कसे टाळता येतील, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.  माहिती- तंत्रज्ञान विभाग, त्यातले तज्ज्ञ यांच्या विचारातून यावर उपाय शोधला जाऊ शकतो. 
       0१४ च्या निवडणुकीत हा प्रयोग राज्यात पहिल्याप्रथम राबवण्यात येणार आहे. यातल्या पहिल्या टप्प्यात जे मतदार मतदान केंद्रावर येऊ शकत नाहीत असे, वृद्धाश्रमातील वृद्ध, रुग्णालयातील रुग्ण व निवडणुकीच्या कामात असलेल्या विविध विभागांच्या कर्मचार्‍यांसाठी या पद्धतीचा वापर करण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या अध्यक्षा नीला सत्यनारायण यांनी म्हटले आहे. यानिमित्ताने 'ई-वोटिंग' ची सुरूवात होतेय आणि ही पुरोगामी महाराष्ट्राच्यादृष्टीने चांगलीच बाब म्हटली पाहिजे. वास्तविक, अशा प्रकारच्या 'ई- वोटिंग' चा वापर परदेशात अगोदरच सुरू आहे. आपल्या देशात तूर्तास शहरी भागात राबवायला काहीच अडचण नाही. अर्थात काही समस्या उद्भवणार आहेत, त्याचे निराकरण होत राहिल. यंत्रणा राबविल्याशिवाय त्यातल्या त्रुटी अथवा दोष समजून येत नाहीत. त्यामुळे ई-मतदान प्रक्रियेचे स्वागत करायला काहीच हरकत नाही.             

No comments:

Post a Comment