काल करे सो आज कर,
आज करे सो अब।
पल में प्रलय होएगी,
बहुरि करोगे कब॥
जितक्या काही महान व्यक्ती होऊन गेल्या, त्यांनी संत कबीरदास यांचा हा दोहा आत्मसात केला असल्याचे दिसते. अशा या महान व्यक्तींमध्ये महाभारतातल्या दानशूर कर्णाचाही समावेश होतो. चला, जाणून घेऊ, या महादानी कर्णाच्या आयुष्यातला असाच एक छोटासा प्रसंग!
एकदाची गोष्ट. कर्ण आपल्या दरबारात बसला होता. तो कसल्याशा कामात दंग होता. इतक्यात त्याच्या दरबारात एक याचक आला. त्याने हात फैलावत कर्णाकडे दान मागितले. कामात असलेल्या कर्णाने याचकाचा आवाज ऐकला. लगेच त्याने आपल्या डावा हात वर उचलला आणि आपल्या गळ्यातला हार काढला आणि याचकाच्या हातात दिला. कर्णाची ही कृती एक दरबारी पाहात होता. तो लगेच कर्णाजवळ आला आणि प्रश्न उपस्थित करत म्हणाला,"महाराज, क्षमा असावी. पण डाव्या हाताने दान द्यायचं नसतं, हे आपल्याला ठाऊक असतानाही आपण त्या हाताने दान दिलंत. असा हा अधर्म आपल्या हातून कसा काय घडला?"
कर्णाने उत्तर दिलं," याचकाने मला दान मागितलं. त्यावेळेला माझ्याजवळ गळ्यातल्या हाराव्यतिरिक्त काहीही नव्हतं. माझा उजवा हात कामात गुंतलेला होता. मी माझा उजवा हात कामातून मोकळा करून दान देण्याचा विचार केला असता तर कदाचित वेगळं घडलं असतं. कदाचित माझा विचार बदलला असता आणि मी त्याला माझा हार देऊ शकलो नसतो. पलभरात काय घडेल, हे कोणाला सांगता येत का? त्यामुळे माझ्या मनात विचार आल्या आल्या, त्याची अंमलबजावणी केली आणि माझ्या डाव्या हाताने हार काढून दान दिला."
महान व्यक्ती क्षणाक्षणाला किती महत्त्व देत होते, याचा हा एक उत्तम नमुना. विचार आला की, क्षणात त्याची अंमलबजावणी करणार्या व्यक्तीला जीवनातील सर्वोच्च उंची गाठणं काही अवघड नाही. म्हणूनच लक्षात ठेवा मित्रानों, कल करे सो आज कर, आज करे सो अब...। वेळच्या वेळी काम करणार्याला कधीच कुठला मानसिक त्रास होत नाही. कामे वेळच्या वेळी करणारा कधी सुखी असतो.
No comments:
Post a Comment