नंदनवनात एका झाडावर पोपटाचं घरटं होतं. त्यात पोपट, पोपटीण आणि त्यांचं बाळही राहत होतं. बाळ फारच लहान होतं. त्याला अद्याप पंखही फुटले नव्हते. पोपट आणि पोपटीण आळीपाळीने अन्नाच्या शोधार्थ जंगलात जात. ते पिलाला अजिबात एकटे सोडत नसत.
एकदा पोपट अन्नाच्या शोधात बाहेर गेला होता. मागे राहिलेल्या पोपटीणनेही विचार केला की, आपणही खायसाठी काही तरी आणावं. आपण लवकर परतू. तिने इकडे-तिकडे पाहिले आणि उडाली. पोपटीणने जसे घरटे सोडले, तसे झाडाच्या खोडात दबा धरून बसलेला साप सरसर करत घरट्याच्या दिशेने निघाला. त्याच्या तोंडाला पाणी सुटले होते. कित्येक दिवसाची प्रतीक्षा आज फळाला येत होती.
तो पिलाजवळ पोहचणार तोच, पोपट आणि पोपटीण तिथे पोहचले. सापाला तिथे पाहिल्यावर दोघांचीही भीतीने गाळण उडाली. पोपटीणला तर रडूच कोसळले. ती मोठमोठ्याने आक्रोश करू लागली. पण पोपट तिला धैर्याने पण शांतपणे म्हणाला, " ही वेळ घाबरून जाण्याची नव्हे तर हिंमतीने संकटाचा सामना करण्याची आहे."
मग त्यांनी अजिबात वेळ न दवडता सापावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्याने साप पुरता गांगरून गेला. त्याला काय करावे कळाले नाही. स्वतः ला सांभाळता न आल्याने तोल जाऊन तो झाडावरून खाली पडला.
शिकार हातची निसटल्याने सापही चवताळला होता. तो पुन्हा झाडावर चढू लागला. पण दोघांनी त्याच पाठ सोडली नाही. त्याला चोचीने टोच्या मारून पार घायाळ करून टाकले. त्यांच्या हल्ल्यापुढे त्याचा निभाव लागला नाही. तो अर्धमेल्या झाला. थोड्या वेळाने तो मरून पडला. पोपट आणि पोपटीण दोघांनीही मग सुटकेचा नि:श्वास सोडला.
No comments:
Post a Comment