Wednesday, February 28, 2018

रोज नवे नवे ... हवे हवे


·   
ऋतू कूस पालटतोय..
आता ऋतू कूस पालटतो आहे. वातावरणातील बदलाच्या या काळात हवेत परागकणांचं प्रमाण वाढतं. श्‍वसनासंबंधीचे विकार असणार्‍यांना याचा त्रास होऊ शकतो. यासंबंधीची लक्षण लक्षात घ्यावीत.
* वातावरणातील बदलामुळे श्‍वासनलिकेची संवेदनशीलता वाढते. श्‍वासनलिका आकुंचन पावून श्‍वसनाच्या विकारांना निमंत्रण मिळू शकतं. 
* या काळात लहान मुलं आणि ज्येष्ठांना फुफ्फुसासंबंधीचे विकार जडण्याची शक्यता असते. 
* आपल्या देशात सीओपीडी आणि दम्याच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतात जवळपास पाच कोटी लोक दम्याच्या विकारानं ग्रस्त आहेत. या काळात विशिष्ट प्रकारच्या रोगजंतूंचा हवेतील वावर वाढतो. यामुळे सीओपीडीनं ग्रस्त रुग्णांना त्रास होण्याची शक्यता असते. 
* वातावरणातील बदलामुळे शरीराच्या तापमानातही चढ-उतार होतात. यामुळे अँलर्जी तसंच दम्याच्या रुग्णांना त्रास होण्याची शक्यता असते. साहजिक या काळात दम्याच्या रुग्णांनी जास्त काळजी घ्यायला हवी. या काळात फ्लूचे जंतूही वातावरणात ठाण मांडून बसलेले असतात. त्यामुळे सर्दी, ताप असे विकारही डोकं वर काढतात. त्यावर वेळीच उपचार घ्यावेत.
आधी तपासणी, मग खरेदी
अंतर्वस्त्रांची खरेदी घाईघाईने उरकण्याकडे अनेकंचा कल असतो. याच गडबडीत ब्रा खरेदी केली जाते. मात्र बरेचदा अयोग्य मापाची आणि फिटिंगची ब्रा घेतली जाते. हे टाळायचं असेल तर काही मुद्दे लक्षात घ्यायला हवे.
* स्तनाचा आकार मोठा भासवायचा असेल तर पॅडेड ब्रा हा चांगला पर्याय ठरतो. एक्स्ट्रा सपोर्ट आवश्यक वाटत असेल तर अंडरवायर ब्रा खरेदी करा. स्पोर्टस्, जीम अथवा अन्य अँथलेटिक क्रीडाप्रकारांशी संबंधित असाल तर या खेळताना स्पोर्टस ब्रा वापरणं हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. नवजात बाळाचं संगोपन करणार्‍या माता फिडिंग ब्रा खरेदी करू शकतात.
* अंतर्वस्त्रांची विक्री करणार्‍या खास दुकानातूनच ही खरेदी करा. ब्रा ची ऑनलाईन खरेदी शक्यतो टाळा. तुम्हाला ब्रँड, साईज आणि पॅटर्नची खात्री असेल तरच हा पर्याय निवडा.
* आवडलेला पॅटर्न घालून बघताना खोल श्‍वास घ्या. यावेळी तुम्हाला त्रास झाला नाही तर तो पॅटर्न तुमच्यासाठी योग्य असल्याचं निर्देशित होईल.
* ब्रा चं फिटिंग तपासण्यासाठी दोन्ही बाजूंनी हलून बघा, खाली वाकून बघा. कपसाईज योग्य असल्याची खात्री करा आणि नंतरच खरेदी करा.
हॉस्टेलनिवासी होताना..
उच्च शिक्षण अथवा नोकरी-व्यवसायानिमित्त आपल्या गावाबाहेर, शहराबाहेर राहण्याची वेळ येते तेव्हा हॉस्टेलमधील निवास हा सर्वात श्रेयस्कर मार्ग ठरतो. पण हा निवास सुखकर ठरावा, आरोग्याच्या दृष्टीने पुरक ठरावा यासाठी काही बाबींची दखल घ्यायला हवी. हॉस्टेलवासियांनी कोणते नियम पाळावे, जाणून घेऊ या..
* मित्रांच्या वस्तू वापरू नका. टूथब्रश, शेव्हिंग किट, टॉवेल, प्रसाधनं, कपडे शेअर केल्याने इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
* पलंग, गाद्या, उशा, अंतर्वस्त्र स्वच्छ ठेवा. खोली स्वच्छ ठेवा. घाण, कचरा साठणार नाही याची काळजी घ्या.
* काही विद्यार्थी हॉस्टेलमधील कुसंगतीमुळे विविध व्यसनांच्या आहारी जातात. धूम्रपान, मद्यपान, तंबाखूमुळे आरोग्याशी संबंधित अनेक तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे व्यसनांपासून लांबच रहायला हवं.
* लेट नाईट पार्टी, गप्पा किंवा सोशल मीडियावर अँक्टिव्ह राहून रात्रीची जागरणं टाळा. याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
* रस्त्यावरचे पदार्थ खाऊ नका. जंक फूड टाळा.
* अभ्यास करताना किंवा अड्डयावर जमल्यावर चहाचे प्याले रिचवले जातात. पण चहा प्रमाणातच प्या. चहाच्या अतिप्रमाणामुळे अँसिडिटी, झोप न येणं, भूक न लागणं अशा समस्या उद्भवतात.
* फळं, सुकामेवा,चणे, शेंगदाणे असे पदार्थ जवळ ठेवा.
* दररोज व्यायाम करा. योगा करा. मेडिटेशन करा.
* मित्रमंडळींसोबत रहा. एकटेपणामुळे येणारी नकारात्मकता टाळा.
प्रदर्शनांचे आयोजन करा
प्रदर्शनांचे आयोजन करणं हे एक्झिबिशन डिझायनरचं कसब असतं. सध्याच्या जगात एक्झिबिशन डिझायनर ही करिअरची नवी वाट आहे. ठिकठिकाणी ऑटो, टेक्नॉलॉजी, दागिने, कृषी अशी वेगवेगळ्या क्षेत्रांमधली प्रदर्शनं भरवली जातात. त्याच्या आयोजनात एक्झिबिशन डिझायनरची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. 
एक्झिबिशन डिझायनर बनण्यासाठी तुमच्याकडे संवादकौशल्य असायला हवं. उत्तम कल्पनाशक्ती असणंही गरजेचं आहे. एक्झिबिशन डिझायनर म्हणून काम करणार्‍या व्यक्ती प्रशिक्षित असतात. वेगवेगळ्या डिझाइन्सशी त्यांचा कायमच संपर्क येत असतो. स्टॉल्सची रचना, मैदानाचा आकार तसंच प्रदर्शनातील सजावटीचा त्यांना बारकाईने विचार करावा लागतो. सौंदर्य स्पर्धा, संगीताची मैफल, पुरस्कार सोहळे अशा थीमवर आधारित कार्यक्रमांचे सेट्स उभे करणे, कला प्रदर्शनांसाठी सुयोग्य दालन निवडून वातावरण निर्मिती करणे याची जबाबदारी एक्झिबिशन डिझायनरची असते. आज सगळीकडे सतत प्रदर्शनं भरत असतात. त्यामुळे एक्झिबिशन डिझायनर्ससाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या निमित्ताने करिअरचं वेगळं क्षेत्र युवकांना खुणावतंय. संवादकौशल्य, नवतंत्रज्ञानाचा खुबीने वापर करण्याची तयारी, नवं शिकत राहण्याची इच्छा असणारे युवक या क्षेत्रात करिअरचा विचार करू शकतात.
लबाड मांजर
एका माणसाने आवडीने मांजर पाळलं होतं. ते त्याचं खूप लाडकं होतं. पण एकदा याच मांजराने मालकाचा आवडता पोपट मारून खाल्ला. तेव्हा मालकाने, मांजराला मारून टाकीन, असं रागानं म्हटलं. ते ऐकताच मांजर इतकं घाबरलं की, देवाने या प्रसंगातून वाचवलं तर पुढे आपण कधीही, कोणताही पक्षी मारून खाणार नाही अशी प्रतिज्ञाच करून टाकली. थोड्या वेळाने दरबाराच्या खिडकीतून एक वटवाघूळ आत आलं. ते पाहून या मोह उत्पन्न करणार्‍या प्रसंगी नेमकं कोणत्या प्रकारचं वर्तन करावं हा प्रश्न मांजराला पडला. एकीकडे भूक आणि दुसरीकडे प्रतिज्ञाभंग होण्याची भीती अशा पेचात ते सापडलं असता भूक भागवण्याची एक युक्ती त्याला सापडली. वटवाघूळाकडे पाहून ते मनाशीच म्हणालं, 'हा पक्षी आहे असं मानलं तर केलेल्या प्रतिोप्रमाणे याला हात लावण्याचा अधिकार मला नाही पण याच्या तोंडाचं उंदराच्या तोंडाशी इतकं साम्य आहे की, याला मारून खाण्याचा अधिकार मला आहे. कारण तो उंदीर आहे असं समजून मी खाईन.' इतकं बोलून मांजराने वटवाघळाला खाऊन टाकलं.
तात्पर्य : स्वार्थ साधण्याची वेळ आली की लबाड लोक युक्तीने मूल्य गुंडाळून ठेवतात.

वाढवा सामान्यज्ञान
१) एफओबीचं विस्तारित रूप काय?
२) चिली या देशाची राजधानी कोणती?
३) रशियातील गवताळ प्रदेशात राहणार्‍या कोझ्ॉक जमातीचा व्यवसाय कोणता?
४) कळसूबाई डोंगरात उगम पावणारी, पूर्ववाहिनी नदी कोणती?
५) अग्निजन्य खडकांना दुसर्‍या कोणत्या नावाने ओळखलं जातं?
     उत्तर : १) फ्री ऑन बोर्ड २) सॅन्टिएगो ३) पशुपालन 
४) प्रवरा ५) ज्वालामुखी खडक

आजचा मेन्यू
बेसनाची वांगी
साहित्य : अर्धा किलो लहान आकाराची वांगी, दोन वाट्या रवाळ बेसन,अर्धी वाटी दाण्याचे किंवा तीळाचे कूट, मूठभर कोथिंबीर, लाल तिखट, आवडीप्रमाणे, काळा मसाला किंवा गरम मसाला २ टिस्पून, मीठ, हिंग, हळद, चिंचेचा दाट कोळ, चवीपुरती साखर किंवा गूळ, तेल.
कृती: वांगी धुवून, पुसून अगदी कोरडी करून घ्या. वांग्याला एक चीर द्यायची आहे पण ती देताना देठाच्या थोडे खाली सुरुवात करून, टोकाकडचा गोलाकार सुरू व्हायच्या आधीच थांबायचे आहे ( आपल्याला वांगे उकलू द्यायचे नाही.) ही चीर पण फार खोलवर न देता, वांग्याच्या जाडीच्या अध्र्या पयर्ंतच द्यायची आहे. या चिरेत अर्धी चिमूट मीठ भरून घ्या ( असे केल्याने वांगे नीट शिजते.) पसरट पातेल्यात थोडे तेल तापवून ही वांगी रचा आणि झाकण ठेवून एक दोन वाफा येऊ द्या. पण पूर्ण शिजवू नका. वांगी बाहेर काढून घ्या व त्याच पातेल्यात आणखी थोडे तेल टाकून हिंग हळदीची फोडणी करून त्यावर चिरलेली कोथिंबीर कोरडी होईस्तो परतून घ्या. त्यावर बेसन घालून तेही खमंग परतून घ्या. मग त्यात बाकीचे जिन्नस व मीठ घालून आच बंद करा. वांगी आणि बेसन जरा निवले की एकेक वांगे भरायला घ्या. वांगे शिजलेले असल्याने ते आतून मऊ झालेले असते व त्यात बोटाने थोडा खळगा करता येतो. त्या खळग्यात बेसनाचे मिर्शण दाबून भरा. ( आपण न शिजलेल्या वांग्यात भरू शकू त्यापेक्षा बरेच जास्त भरता येते.) आता परत थोडे तेल तापवून त्यात ही वांगी रचा. मंद आचेवर शिजू द्या. वांग्याला जे पाणी सुटेल, त्यात बेसन भिजते आणि शिजतेही. बेसन उरले असेल तर तेही वांग्यासोबत परता.

Sunday, February 25, 2018

लोकप्रतिनिधींचे जातीचे राजकारण आणि भ्रष्टाचार


     आज निवडून यायला काय लागतं? 50 टक्के जातीची माणसं आणि 50 टक्के पैसा! या गोष्टी ज्याला जमतात,तो कुठल्याही ठिकाणी निवडून येतो. पण प्रश्न त्याच्या पुढचा आहे. ज्यांनी आपल्याला साथ दिली,त्या आपल्या जातभाईंचा,नातेवाईकांचा सत्तेच्या खुर्चीवर बसल्यावर विचार करावा लागणार आहे. स्वत: बरोबर त्यांचाही विकास साधावा लागणार आहे.त्यामुळे त्यांना सरकारी कामांचे कंत्राट देऊन त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न आपल्या देशात होताना दिसत असल्याचे एका सर्व्हेक्षणातून सामोरे आले आहे. आपल्या देशातले रस्ते म्हणजे विकासाच्या रक्तवाहिन्या आहेत.मात्र आज त्यांची विदारक अवस्था पाहिल्यावर यासाठी दिलेल्या पैशांचे काय झाले, असा प्रश्न पडतो. पण नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेमुळे आमदारांचा भ्रष्टाचार समोर आला आहे. ग्रामीण भागातल्या रस्त्यांची जी आज बिकट परिस्थिती झाली आहे,त्यामागे आमदारांचा भ्रष्टाचार आहे,कारण आमदार मंडळी रस्त्यांच्या कामांची कंत्राटे आपल्या जातवाल्या लोकांनाच देतात. 2001 ते 2013 दरम्यान आमदारांनी आपल्या अधिकाराचा वापर करत आपल्या जातभाई लोकांना जवळपास 3 हजार 592 कोटींची कंत्राटे दिली आहेत. विशेष म्हणजे या भ्रष्टाचारामुळे काही ठिकाणी रस्त्यांची कामेच झाली नाहीत. तर काही फक्त कागदावरच राहिली. अशा 500 रस्त्यांसाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या (पीएमजीएसवाय) माध्यमातून पैसे दिले गेले पण रस्ते बनले नाहीत.

     अमेरिकेच्या प्रिंसटन विद्यापीठ आणि फ्रान्सच्या पॅरिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या एका अभ्यासामधून ही बाब समोर आली आहे. हा अभ्यास बिल्डिंग कनेक्शनस: पॉलिटिकल करप्शन एंड रोड कंस्ट्रक्शन इन इंडिया या नावाने करण्यात आला आहे. मार्च 2018 च्या जर्नल ऑफ डेवलपमेंट इकॉनॉमिक्समध्ये याचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आहे. प्रिंसटन येथील वुडरो विल्सन स्कूल ऑफ पब्लिक, एंड इंटरनॅशनल अफेयर्समध्ये कार्यरत असलेले प्रोफेसर जॅकब एन. एापिरो यांच्या नेत्वृत्वाखाली भारतातल्या रस्त्यांवर हा शोध घेण्यात आला आहे. या संशोधनासाठी त्यांनी पंतप्रधान ग्राम सडक योजनेचा अभ्यास केला आणि त्या आकडयांचा वास्तविकतेशी मेळ घालण्यात आला. अभ्यासकांनी यासाठी राजकीय भ्रष्टाचाराला जबाबदार धरले आहे. यासाठी त्यांनी जवळपास 90 हजार रस्त्यांचा अभ्यास केला आहे. या भ्रष्टाचारामुळे जवळजवळ 8 लाख 57 हजार ग्रामीण जनतेला थेट नुकसान पोहचले आहे.
     या रस्त्यांच्या कामातला भ्रष्टाचार कॅगच्या रिपोर्टमध्येदेखील प्रकाशित करण्यात आला आहे. 2016 च्या एका कॅगच्या रिपोर्टनुसार एप्रिल 2010 ते मार्च 2015 दरम्यान रस्ता निर्मितीसाठी मिळालेल्या 63 हजार 878 कोटी रुपयांपैकी फक्त 7 हजार 735 कोटी रुपये खर्च झाले आहेत. हे फक्त 19 राज्यांमधले आकडे आहेत. फक्त 9 राज्यांमधील गावे पूर्णपणे रस्त्यांनी जोडली गेली होती. सात राज्यांमध्ये रस्त्यांची निर्मिती झाली,पण ती पूर्णपणे गावांशी जोडली गेली नाहीत.
     या अभ्यासात महत्त्वाची एक महत्त्वाची बाजू समोर आली आहे. यात 75 टक्के ठेकेदारांची अडनावे एकसारखी आहेत. आमदारांच्या आडनावाशी ती जुळणारी नावे असून निवडणुकीपूर्वी मात्र या ठेकेदारांची आडनावे फक्त चार ते सात टक्के होती. पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या भ्रष्टाचारातील पुरावे गोळा करण्यासाठी अभ्यासकांनी विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांच्यासंबंधातले आकडे तपासले. त्यांनी नवा आमदार निवडून आल्यावर या योजनेत त्या लोकप्रतिनिधीच्या आडनावाशी साधर्म्य सांगणार्या ठेकेदारांकडे किती कामे स्थानांतरित करण्यात आली, याची माहिती त्यांनी  काढली. या पंतप्रधान ग्रामसडक योजनेची सुरुवात 2000 मध्ये झाली होती. या योजनेतून 1 लाख 30 हजार 974 गावे डिसेंबर 2017 पर्यंत जोडली गेली आहेत. या योजनेपूर्वी देशातल्या 8 लाख 25 हजार गावांना 40 टक्केदेखील योग्य प्रकारचे रस्ते नव्हते. त्याचबरोबर बाजार, नोकर्या आणि आरोग्य-शिक्षणसंबंधित संधीही उपलब्ध नव्हत्या.
     अर्थात यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला आहे,तो म्हणजे या कामांचे वाटप करताना लोकप्रतिनिधींचा थेट संबंध आला नाही. हे सर्व निर्णय नोकरशाहीला घ्यावयाचे होते. सर्वसामान्यपणे लोकप्रतिनिधी आणि नोकरशाही यांच्यातील जातीय आणि स्थानीय ओळखीच्या आधारावर जवळीक निर्माण होते. याचा लाभ उठवत लोकप्रतिनिधी आपल्या जातभाईतल्या लोकांना ही कंत्राटे देण्यासाठी आपल्या प्रभावाचा वापर करताना दिसतात. निवडणूक जिंकणारा नेता आणि नोकरशहा यांची आडनावे समान असल्याने योजनांमध्ये भ्रष्टाचार अधिक असल्याची शक्यताही पुढे आली आहे. या सगळ्याचा अर्थच असा की, ज्या जातीचा लोकप्रतिनिधी त्या जातीचा ठेकेदार हे समिकरण बनून गेले आहे. त्यात संबंधित विभागाचा अधिकारीही त्याच जातीचा असेल तर मग सोन्याहून पिवळे! भ्रष्टाचाराचे कुरण व्हायला वेळ लागत नाही.
     हा अभ्यास फक्त एका योजनेतला आहे,परंतु प्रातिनिधिक आहे. कारण सर्वच विभागात असा प्रकार चालतो. अधिकार्यांकडे थेट न जाता त्या अधिकार्याची जात शोधली जाते आणि त्यानुसार लोकप्रितिनिधी निवडला जातो. लोकांना काम कसे पटकन होईल, याची कल्पना आलेली आहे. काम कसे करून घ्यायचे, हे आता लोकांना सांगावे लागत नाही. त्यामुळे अशा प्रकारची एक साखळी निर्माण होते.
आपल्या देशातून जाती-पातीचे उच्चाटन होण्याऐवजी ते आणखी घट्ट होत चालल्याचीच ही लक्षणे आहेत. आज प्रत्येकजण स्वार्थ पाहताना दिसत आहे. इथे देशाच्या हिताचा, विकासाचा विचार करण्याचा प्रश्नच नाही. ही लक्षणे चांगली नाहीत. हां, ही गोष्ट आपण समजू शकतो की, लोकप्रतिनिधी आपल्या बगलबच्च्यांना कामे मिळवून देऊ शकतात. आपल्याला विजयी करण्यात ज्यांचा हातभार लागला, त्यांना आपल्या माध्यमातून काही तरी मिळवून देण्याचा त्यांचा हेतू काही वाईट नाही,मात्र कामच करायचं नाही. फक्त पैसे उचलायचे हे बरोबर नाही. आपल्या लोकांना काम मिळवून देताना दिलेली कामे चांगल्या प्रकारे,नियमाप्रमाणे झाली आहेत की नाही, हे पाहणे लोकप्रिनिधींचे काम आहे. या कामांमुळेच लोकप्रतिनिधींची प्रतिमा तयार होते. लोकांच्या नजरेत सगळ्या गोष्टी येत असतात. अति तेथे माती ठरलेलीच आहे.

शेतीला प्रतिष्ठा आणि शेतकऱ्याच्या पोराला पोरगी कधी मिळणार?


     'माझा शेतकरी बाप उभ्या जगाचा पोशिंदा' स्वतः ही शेती करणारा युवक मोठ्या अडचणीत सापडला आहे. लग्नाळू मुलगी त्याला नाकारताना दिसत आहे. तर शेतकऱ्याला प्रतिष्ठा नसल्याने त्याला कुठेच कसली किंमत राहिली नाही. त्यामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. उभ्या जगाला पोसणारा हा शेतकरी मात्र इथे उपराच आहे. त्याला प्रतिष्ठा कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. आपल्या देशातील शेतकऱ्याची अवस्था फारच केविलवाणी झाली आहे. उद्योजक धार्जिणे सरकार देशातल्या शेतकऱ्यांकडे पाहायलाच तयार नाही. मोदी सरकार आपली चार वर्षे सत्ता भोगून उलटल्यावर शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करायचे आश्वासन देत आहे. ते देत असताना कुठलाही कृती कार्यक्रम आखण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकरी दुप्पट उत्पन्न कसे मिळवणार हे त्यांचे त्यांनाच माहीत! पण् इकडे शेतकऱ्यांचा मात्र जीव जात आहे. भरपाई कुठली वेळेवर मिळत नाही. कर्जमाफीचीही अवस्था तशीच! त्यामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

     शेतीत पिकते तेव्हा भाव मिळत नाही आणि पिकत नाही तेव्हा खायचे वांदे होतात. मुलांची लग्नं जमत नाहीत. काही गावात करावे पोट भरावे म्हटले तर रोजगार नाही. शासनाच्या मनरेगासारख्या योजना भ्रष्टाचाराने पुरत्या बरबटून गेल्या आहेत . त्यामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. आता शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येचे लोण देशभर पोचले असून, ती आजची सर्वांत मोठी सामाजिक समस्या ठरली आहे. काही शेतकरी शेती परवडत नसल्याने, त्यांची मुले शेतीला रामराम ठोकत आहेत. स्वःतच्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी काहीतरी करायला पाहिजे, म्हणून त्यांचे खेड्याकडून शहराकडे स्थलांतर वाढत आहे. स्थलांतरित कुटुंबांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्याच्या समस्या वेगळ्याच आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्नच जमत नसून, त्यातूनही अनेक सामाजिक प्रश्न उभे राहत आहेत.     
    कोणताच बाप शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देण्यास तयार होताना दिसत नाही. उपवर मुलीलाही शेतकरी नवरा नको आहे. आर्थिकदृष्ट्या उद्‍ध्वस्त शेतकऱ्याला सामाजिक प्रतिष्ठाही लाभताना दिसत नाही, ही बाब गंभीर म्हणावी लागेल. खरे तर न परवडणारी शेती करून शेतकरी देशाची भूक भागवतोय, हे विसरून चालणार नाही; आणि म्हणूनच सर्व समाज आणि शासन यांनी शेतकऱ्याचे जगणे सुसह्य, सुखाचे करण्याच्या दृष्टीने प्रयत्न वाढवायला हवेत. याची जाणीव शासनाला कुणीतरी करून देण्याची आवश्यकता आहे.
     शेतकऱ्यांचे खडतर जगणे आणि त्यांचे मरणही (आत्महत्या) इथल्या व्यवस्थेला आव्हान देत आहे. शेती नीट पिकत नाही, पिकली तर विकत नाही, विकले तर योग्य भाव मिळत नाही. जो काही भाव मिळतो त्यातून शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाहदेखील नीट होत नाही. अशा वेळी शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य याची प्रचंड हेळसांड होते. या परिस्थितीतून पोशिंद्याला वर काढणे, हे शासनाचे आद्यकर्त्यव्य असायला हवे. परंतु शासन दरबारी सर्वांत दुर्लक्षित कोण असेल तर तो शेतकरी आहे. मागचे वर्ष (2017) हे शेतकऱ्यांची आंदोलने, मोर्चांनी गाजले. शेतकऱ्यांचा भडकलेला असंतोष शांत करण्यासाठी काही घोषणा झाल्या. परंतु त्यांचीही नीट अंमलबजावणी नाही. शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावून शेतीला प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची असेल, तर शेतीत गुंतवणूक वाढवावी लागेल. शेतीला सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन उत्पादित मालास रास्त भावाचे नियोजन हवे; आणि तो कोणत्याही परिस्थितीत मिळालाच पाहिजे, अशी व्यवस्थाही उभी करावी लागेल. ग्रामीण भागातील तरुणांच्या हाताला काम उपलब्ध करून द्यावे लागेल. परवडणारी शेती आणि कमावता तरुण, असे ग्रामीण भागाचे चित्र पालटल्याशिवाय शेतकऱ्यांचे जगणे सुसह्य होऊन शेतीलाही प्रतिष्ठा लाभणार नाही, हे लक्षात घेऊन शासनाने वेळीच जागे होऊन उपाययोजना करायला हव्यात. नाही तर शेतकरी मृत्यूला कवटाळत राहतील, काही शेती सोडून परांगदा होतील. मग तुम्हा आम्हाला पोसणार कोण? असा गंभीर प्रश्न निर्माण होईल. शासनाने वेळीच शेतकऱ्याची दुर्दशा नाहीशी करायला हवी आहे.

मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी झटायला हवे


      प्रत्येक राज्याची स्वतंत्र भाषा आहे. तामीळनाडू राज्यात तर आपली राष्ट्रभाषा म्हटली जाणार्या हिंदीला कोणी विचारतच नाही. कोणी हिंदीमध्ये विचारले तर काहीच उत्तर मिळत नाही. तिथला तामिख अभिमानी म्हणतो, ’तामील में बोलो या तो इंग्रजी मे.’ खरे तर भारतातल्या प्रत्येक राज्याला त्याच्या भाषेमुळेच ओळख आहे. जसे पंजाबी पंजाब राज्यात,बंगाली बंगाल राज्यात, गुजराथी गुजरात राज्यात, तेलगू तेलंगणा मध्ये. मग महाराष्ट्रात मराठी हवी तशी का बोलली जात नाही?आपण मराठीचा अभिमान का बाळगत नाही? त्यामुळेच आपली मराठी भाषा राजभाषा तर झाली नाहीच,पण ती ज्ञानभाषाही होत नाही,हे आपले दुर्दैव नाही काय?

      मराठी बांधवांना मराठीचा अभिमान दिसत नाही. विकीपिडियासारखे किंवा गुगलसारख्या माहित कोषात आपल्याला मराठीची वानवाच दिसते. एकाद्या विषयाची किंवा एकाद्या वस्तूची माहिती मिळवायची तर आपल्याला इंग्रजीतूनच मिळवायला लागते. मराठीतून फारशी माहिती उपलब्ध नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा शिक्षणमंत्री विनोद तावडे विकिपिडियावर काम करायला मराठी माणसांना सांगतात पण कोणीच मनावर घेत नाही. खुद्द महाराष्ट्र शासनच याबाबतीत उदासिन आहे. त्यांनीच खरे तर यासाठी पुढाकार घ्यायला हवा आहे. यासाठी एकादी यंत्रणा उभी करून कामाला लावण्याची आवश्यकता आहे. पण आडातच नाही तर पोहर्यात कोठून येणार, असा प्रश्न आहे.
     आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या राज्यातल्या मराठी शाळांची दैनावस्था!  राज्यामध्ये मराठी शाळेची मोठ्या प्रमाणात गळती. मराठीचे चांगले शिक्षण नसणे, मराठी शाळांना अनुदान नसणे हा मराठी भाषेवर प्रथम आघातच म्हटला पाहिजे. आता तर महाराष्ट्र सरकार शाळाच बंद करायला निघाले आहे. कंपन्यांना प्रोत्साहन देऊन मराठी शाळा बंद पाडण्याचा आत्मघातकी निर्णय कसा बरे मराठीला उर्जितावस्था आणेल? एकिकडे  मराठी भाषेच्या इमारती बघा व दुसरी कडे कान्व्हेंट शाळा बघा. मुलांना मराठी शाळेत प्रवेश देण्याविषयी पालकांमध्ये अनुत्साह दिसून येत आहे. त्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा ओढा, आकर्षण वाटू लागले आहे. हे कोणी करून दिले तर आपणच! मराठी शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत असताना फक्त सरकारच्या नाकर्तेपणामुळे पालक आपल्याला पाल्याला इंग्रजी शाळेत घालत आहेत.   आपल्याच मुलाला नावे ठेवल्यावर आणि त्याला पोषण आहार न देता , कुपोषित ठेवल्यावर कोणी आपला मुलगा अंगात जीवदेखील नसलेल्या मराठी शाळेत कोणी घालेल का? खासगी शाळांमधला शिक्षक सुटाबुटात दिसते. त्याला खायला अन्न नसले तरी तो बेडकासारखा फुगलेला दिसतो. बारावी,पदवीधरचे शिक्षण घेतलेले युवक तिथे शिक्षक म्हणून काम करतात. पाच-दहा हजारात काम करतात. तिथला डामडौल तेवढा इथल्या पालकांना आकर्षित करतो. पण त्यामुळे पालक,विद्यार्थी त्यात फसतात. पण कोणी सांगत नाही तिथली परिस्थिती! आपण खड्ड्यात पडलोय तर दुसर्यालाही त्यात पाडायचे, असा आपला पाय ओढायचा आपला धर्म! यातून आपण कधी बोध घेणार? कधी मराठीचा अभिमान बाळगून तिच्या उद्धारासाठी झटणार? असेच चालू राहिले तर मराठीला वैभवशाली दिवस कधी पाहायला मिळणार?
     खरे तर मराठी शाळेत प्रवेश देण्याविषयी उत्साहाविषयी पोषक वातावरणाची निर्मिती करणे हे तर शिक्षण मंत्र्यानी करायला हवे. इंग्रजीला जवळ घेताना मराठीला झिडकारून चालत नाही. माय मरो आणि मावशी उरो, असाच काहीसा प्रकार सुरू आहे. हे कुठे तरी थांबायला हवे. आईचा अभिमान,गर्व कुठे दिसूनच येत नाही. मराठी लेखक आणि मराठी पुस्तकांची मोठी परवड सुरू आहे. मराठी लेखकाची पुस्तके प्रकाशित होत नाही. सरस्वतीपुजकाकडे लक्ष्मी नांदत नाही. त्यामुळे त्यांची अवहेलना होत आहे. त्यांना प्रतिष्ठा नाही. त्यांना मानाचे स्थान मिळवून द्यायचे असेल तर  मराठी लेखकांची पुस्तके प्रकाशित होण्यासाठी प्रकाशनाकडून व शासनाकळून प्रोत्साहन मिळायला हवे. खेड्यापाड्यात मराठी बोलली जाते, पण सीमेजवळची गावे भ्रमित असतात. या गावांमध्ये दोन्ही भाषांची सरमिसळ होऊन नवीनच भाषा तयार झाली आहे. वास्तविक इथे फार मोठी कामगिरी शासनाला करायला हवी आहे. इथे मराठी टिकली,जोपासली पाहिजे, यासाठी विशेष प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. कन्नड, तेलगू, हिंदी या भाषा बंगरुळु, तेलंगाना, छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यांच्या सीमेजवळच्या गावात प्रभावित आहेत. तेथील ग्रामस्थांना मराठी भाषेच्या प्रभावात आणने हे महत्त्वाचे कार्य आहे.
     मराठी वाचन संस्कृतीला खीळ बसलेली आहे याचे कारणगाव तिथे ग्रंथालयया जुन्या घोषवाक्याची अंमलबजावणी झालेली नाही. बरेचशी गावे आहेत तिथे ग्रंथालय नाहीत. तुटपुंजे अनूदान, ग्रंथालय सेवकांना वेतन न मिळने,नवीन ग्रंथालयांना मान्यता न मिळणे, दर्जात्मक सुविधांचा अभाव, संगणकीकरणांचा अभाव, इत्यादी कारणे असू शकतात. त्यामुळे वाचन संस्कृती वृद्धींगत होत नाही. काही ग्रामीण भागातील वाचनालये किंवा ग्रंथालये अनुदान लाटण्या इतपतच उरली आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मराठी धड नाही,धड इंग्रजी धड नाही, अशी पिढी उदयास येऊ लागली आहे. याच्याकडून कोणती अपेक्षा ठेवायची असा प्रश्न आहे.
     अडाणी पालकांना इंग्रजीचे आकर्षण वाढू लागले आहे. मोबाईल खेळणारी आजची पिढी त्याच्यावर इंग्रजी शिकतेय, असा भ्रम पालकांचा झाला आहे. त्यामुळे पालकही मुलांना महागडा स्मार्ट फोन देऊ लागला आहे. पण त्या मोबाईलमुळे मुला-मुलींची आजची अवस्था फारच चिंताजनक झाली आहे. मोबाईलचा वापर आता अभ्यासासाठी नाही तर घरातून पळून जायसाठी होऊ लागला आहे. शिक्षण अर्धवट झालेल्या पालकांची अवस्था फारच बिकट झाली आहे. मातृभाषेतून मुलांचे करिअर होत नाही. या चुकींच्या संभ्रमात पाल्यांचा लोढा इग्रंजी शिक्षणाकडे धाव घेत आहे. एखाद्या झोपडीत राहणारा मुलगा आई-वडिलांशीगुड मॉर्निंग’, ’हाऊ आर यूअसे बोलायला लागला तर त्या पालकांना खूप धन्यता वाटते. माझे मूल खूप प्रगती करताहे, असे वाटते. इंग्रजी भाषा शिकायला हवी यांत वाद नाही परंतु इंग्रजी संस्कृती ही आंगणातून स्वयंपाक खोलीपर्यंत न यावी याची दक्षता घेतली गेली पाहिजे.
     मातृभाषेतून प्रगती शक्य आहे हा विचार मनाला पटतो पण भावनेला पटत नाही, अशी काहीशी अवस्था आपल्या लोकांची झाली आहे. चीन आणि जापानसारख्या देशांनी मातृभाषेत साहित्य निर्माण केले. त्यांना ज्ञानभाषेचा दर्जा दिला भगवतगीता सारखा पवित्र ग्रंथ त्यांनी त्याच्या भाषेत केला. आज इंग्रजीत भगवतगीता, दासबोध, ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ आहेत. आपल्याला मराठीतून सहज उपलब्ध असून आपण ते ग्रंथ वाचत नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळो अथवा न मिळो, ती ज्ञानभाषा होण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. मी माझी स्वाक्षरी मराठीत करील अशी इच्छा अंमलात आणायला हवी. मराठीत रोज थोडे थोडे वाचत आणि लिहित जाईन, असा निश्चय करायला हवा. प्रत्येक मराठी व्यक्तीने मराठी भाषेकरीता वैयक्तीक जबाबदारीने पुढे आल्यास मराठीला सुवर्ण दिवस येतील यात शंका नाही.

Saturday, February 24, 2018

जगद्गुरू संत तुकाराम महाराज


      अखंड, अनाहत कीर्तनामुळे ज्यांची काया ब्रह्मभूत झाली असे साक्षात्कारी सत्पुरूष; जगाच्या कल्याणासाठी स्वत:चा देह कष्टवणारे व जगाला आध्यात्मिक दीक्षा देणारे जगद्गुरू आणि भागवत धर्माचा कळस झालेले संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भिड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदांत तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. 'अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच' (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहे. वारकरी, ईश्‍वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक, सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतातच, तसेच त्यांचे अभंग खेड्यातील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठात आहेत. आजही ही लोकप्रियता 'अभंग' आहे, वाढतेच आहे.

     वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा। इतरांनी वहावा भार माथा।। असे परखड वक्तव्य तुकोबाराय अभिमानाने व्यक्त करतात. तुका तरी सहज बोले वाणी। त्याचे घरी वेदांत वाहे पाणी।। भक्ती -ज्ञान-वैराग्य याने ओथंबलेली संत तुकारामांची अभंगवाणी परब्रह्मच्या अद्वैताची मनोमन पूजा बांधते. ते विटेवरचे सावळे परब्रह्म सगुण साकार होऊन, स्वत:ला तुकोबांच्या 'अभंग-भक्तिरसात' बुडवून घेण्यात धन्यता मानते.
आम्हा घरी धन शब्दांचीच र%े। शब्दांचीच शस्त्रे य} करूं।। असे म्हणत, शब्दांवर प्रभुत्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले, जातिभेदावर टीका केली, श्रीविठ्ठलावरची भक्ती प्रकट केली, अध्यात्माचे सार सांगितले. देश-काळ-लिंग भेदाच्या पलीकडे त्यांची काव्य प्रतिभा झेपावलेली आपल्याला दिसते. ह्यविष्णुमय जग वैष्णवाचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ।। या भूमिकेचा त्यांनी १७ व्या शतकात प्रसार केला. सांप्रदायिक आभिनिवेश बाजूला ठेवून ऐक्यभाव, समता प्रस्थापित केली. 
     भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य यांच्या शब्दकळेत पाझरते. त्यांचे अभंग म्हणजे 'अक्षर वाड्मय' आहे. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.
     एका शुचिष्मंत घराण्यात पुणे जिल्ह्यातील देहू येथे शके १५३0 मध्ये (इ. स. १६0८) वसंत पंचमी (माघ शु. पंचमी) या दिवशी त्यांचा जन्म झाला. नुकतीच इ. स. २00८ या वर्षी त्यांच्या जन्माला ४00 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले आहे. यांच्या घराण्यातील विश्‍वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. त्यांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांच्यावरच होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवडी) यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
तुकोबारायांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात आपत्तीचे तडाखे सहन करावे लागले. अनेक दु:खे सहन करावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली, या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शार्श्‍वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला, परब्रह्मस्वरूप 'श्रीविठ्ठल' त्यांना भेटला.
भामगिरी पाठारी वस्ती जाण केली। 
वृत्ती स्थिरावली परब्रrी।।
सर्प, विंचू, व्याघ्र अंगाशी झोंबले। 
पिडू जे लागले सकळीक।।
पंधरा दिवसामाजी साक्षात्कार झाला।
विठोबा भेटला निराकार।।
या शब्दांत त्यांच्या तपश्‍चर्येचे वर्णन केलेले आढळते.
सतत, अनंत, अथांग विठ्ठलभक्ती आणि ती केवळ अंत:करणात व वाणीत नव्हे, तर कृतीतूनही व्यक्त करणे हेच संत तुकारामांचे जीवन होते. पंढरीची वारी आहे माझ्या घरी। आणिक न करी तीर्थव्रत।। या वचनावरून पंढरपूरचे त्यांच्या जीवनातील स्थान लक्षात येते. पांडुरंग हेच त्यांचे दैवत होते.
     वेद, गीता, भागवत, ज्ञानेश्‍वरी, पुराणांचा त्यांचा अभ्यास होता हे दिसून येते. अस्सल मराठमोळी भाषा हे त्यांच्या रचनांचे मुख्य वैशिष्ट्य होय. वैराग्याच्या कसोटीवरचा आत्मानुभव अनंत गुणांनी त्यांच्या अभंगवाणीत प्रगट झाल्याचा दिसतो. त्यांच्या रचनांतून श्रीविठ्ठलभक्तीसह संत-गुणवर्णन; कर्मठपणा व अंधर्शद्धेवर प्रहार; दांभिक-पाखंडी-खोट्या साधूंवर टीका; विशुद्ध पारमार्थिक जीवन जगण्यासाठीची सूत्रे इत्यादी अनेक विषय समोर येतात. त्यांच्या काही अभंगांच्या एकेका चरणावरूनही एक समृद्ध आशय आपल्यासमोर येतो.
उदाहरणार्थ,
जे का रंजले गांजले। 
त्यांसी म्हणे जो आपुले।।
तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।
संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ। 
नाही तळमळ दु:खलेश।।
तुका म्हणे तोची संत। सोशि जगाचे आघात।।
महापुरे झाडे जाती। तेथे लव्हाळे वाचती।।
ऐसी कळवळयाची जाति। 
करी लाभाविण प्रीती।।
सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे।।
शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी।।
     तुकोबांचे हे अभंग समाजातील सर्व स्तरांत इतके झिरपले आहेत, की असंख्य लोकांच्या मुखांतून त्याचे चरण सहजगत्या बाहेर पडतात. अनेक चरण हे मराठी भाषेतील सुविचारच बनून गेले आहेत. अवघ्या ४१ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी सुमारे ५000 अभंगांची रचना केली. प्रत्येक क्षण त्यांनी भक्तीने व नामसंकीर्तनाने जागविला.
आम्ही जातो आमुच्या गावा। आमुचा राम राम घ्यावा।।, असे म्हणत तसेच,
सकळही माझी बोळवण करा। परतोनि घरा जावे तुम्ही।।
वाढवेळ झाला उभा पांडुरंग। वैकुंठा श्रीरंग बोलावतो।।
आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी । 
सकळा सांगावी विनंती माझी।।
अंत:काळी विठो आम्हासी पावला।
कुडीसहित झाला गुप्त तुका।।
असे म्हणत ते फाल्गून वद्य द्वितीया शके १५७१ मध्ये (इ. स.१६४९) ब्रह्मलीन झाले. (शके पंधराशे एकाहत्तरी। विरोधक्ष नाम संवत्सरी। फाल्गुन वद्य द्वितीया सोमवारी। प्रथम प्रहरि प्रयाण केले।। अशी नोंद आढळते.)
श्रीसंत तुकारामांचे सार्थ वर्णन कवी वामन पंडित यांनी पुढील शब्दांत केले आहे.
जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी। 
म्हणावे कसे हो तया लागी वाणी।।
परब्रह्मरूपी असा जो तुकावा। 
तयाचे तुकी कोण दुजा तुकावा।।

होळी उत्सव


     होळी संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेषत: उत्तर भारतात या सणाचे प्रस्थ जास्त आहे. फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळीच दुसरे नाव म्हणजे हुताशनी पौर्णिमा. होलिकोत्सव,धुलिकोत्सव, रंगोत्सव, शिमगा,दोलायात्रा,कामदहन अशी काही नावे या सणाला आहेत. होळी नंतर दुसर्यादिवशी धुलवड साजरी केली जाते. काही ठिकाणी रंगोत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात होळीनंतर पाचव्यादिवशी रंगपंचमी साजरी केली जातेहा सण आनंदाचा आणि उत्साहाचा आहे. या काळात शेतातली कामे उरकलेली असतात. धनधान्य विकून हातात पैसा आलेला असतो. लोक आनंदात असतातहोळी हा सण शहरात तसेच खेड्या-पाड्यात सगलीकडेच मोठया आनंद आणि उत्साहाने साजरा करतात. होळी आली की होळीसाठी लाकडे गोवर्या गोळा करणारी पोरं गल्ली बोळातून गात सुटतात, टिमकी वाजवत गाणं गात होळीसाठी लोकांकडून मदत मागतात. ’होळी रे होळी पुरणाची पोळीकिंवाहोळीला गोवर्या पाच पाच. डोक्यावर नाच नाच.’ या दिवशी लाकडं-गोवर्या गोळा केल्या जातात. मग घराच्या अंगणांत किंवा चौकात एक मोठी एरंडाची फांदी उभी करतात. त्याच्या भोवती ही गोळा केलेली लाकडं-गोवर्या रचतात. संध्याकाळ झाली की होळी पेटवतात. सवाष्णी, मुलं-मुली, मोठी माणसं सर्वजण या होळीची पूजा करतात. होळीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवतात. जे जुनं आहे, कालबाह्य आहे, अमंगल आहे त्या सर्वांचा जाळून नाश करायचा. नव्याचा चांगल्याचा उदात्ततेचा स्वीकार करायचा हाच होळीचा खरा संदेश आहे. होळी आपल्याला त्याग आणि सर्मपण शिकवते.

     या होळी बद्दल अनेक लोककथा प्रचलीत आहेत. कोकणात ह्या होळीच्या संदर्भात जी कथा सांगितली जाते ती अशी की, एकदा काय झालं, एका गावांत एक राक्षसीण आली. ती गावांतल्या लहान मुलांची हत्या करू लागली. गावावरच्या ह्या संकटावर काय उपाय करायचा म्हणून सारा गाव एकत्र जमला. त्यांनी काय केले गावाच्या वेशीवर आणि प्रत्येक घराच्या अंगणांत होळ्या पेटवल्या. सार्या  गावांत होळ्या पेटलेल्या पाहताच ती राक्षसीण जरा घाबरलीच तरीही ती पुढे पुढे येऊ लागली. मग लोकांनी नाचायला, बोंबा मारायला, वाद्य वाजवायला, त्या राक्षसीणीला शिव्या द्यायला सुरवात केली. लोक तिच्या भोवती कोंडाळे करून नाचू लागले. तो आवाज , तो दारादारांतला अग्नी, तो लोकांचा राग, त्यांचे बोंबा मारणे हे सर्व पाहून ती राक्षसीण घाबरली तिने त्या गावातून काढता पाय घेतला. राक्षसीण गावातून जाताच लोक त्याच होळी भोवती आनंदाने नाचू लागले. गावाचे संकट दूर करणार्या त्या अग्नी देवतेचे सर्वांनी पूजन केले. तिला गोडाचा नैवेद्य दाखवला. तेव्हापासून कोणत्याही दुष्ट असुरी शक्तीने गावांत, घरांत इतकांच नव्हे तर माणसाच्या मनांत ही प्रवेश करू नये म्हणून होळीची प्रथा रूढ झाली.
     खरे म्हणजे होळीच्या दुसर्या दिवशी त्या शांत झालेल्या होळीची राख अंगाला लावायची, ती कां? तर पुढे सुरू होणारा कडक उन्हाळा सहन व्हावा ह्यासाठी. पण हा चांगला विचार अंगाला चिखल लावायचा, घाण पाणी, एकमेकांच्या अंगावर टाकायचे या आणि अशा ओंगळ कृतीमुळे मागे पडला. आपण ही जे चांगल आहे तेच घ्यायला हवं.पण आपल्या देशात सण आणि उत्सवांचे विडंबन सुरू आहे. त्याच्या नावावर हिडीस प्रकार सुरू आहे. तसा या सणातही सुरू झाला आहे. होळीनंतर दुसर्यादिवशी धुलवड साजरी केली जाते,पण यादिवशी दारू पिऊन धिंगाणा घातला जातो. मटणाच्या पार्ट्या केल्या जातात.
     वास्तविक खरी होळी केली ती आपल्या देश भक्तांनी, विलायती वस्तूंची होळी करून परकीय सत्ता उलथून लावली. घरादाराची प्रसंगी प्राणांची होळी करून राष्ट्रभक्त, देशभक्त ह्यांनी स्वातंत्र्य मिळवले. दुष्ट वासना, दुष्ट कल्पना, अविचारांची होळी करा. मनोमन प्रेम आदर ऐक्य जागवा, ते जपा आणि वाढवा, ही होळीची शिकवण विसरून चालणार नाही.
 होळीमागचे शास्त्र
     आपण साजरा करत असलेल्या सणांना धार्मिक महत्त्व तर असतेच पण शास्त्रीय महत्त्वदेखील असते. होळीदहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते.
होळीच्या दुसर्या दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. या आनंदातच वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. पण या हल्लीच्या काळात किमती लाकडे जाळणे योग्य नव्हे. दुसर्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला सर्मपित करण्याचीही प्रथा आहे.
होळीच्या दुसर्या दिवशी धुलिवंदनाचा सण असतो. एकमेकांना गुलाल लावत रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक असते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव, भांडण, गरिबी-श्रीमंती विसरून एकत्र येतात. आता थंडी गेली असून गरम पाण्याने स्नान करण्याचा ऋतू संपला. आता थंड पाण्याने स्नान करून शकता असे सांगतही होळी येते. यानंतरची रंगपंचमीही सृष्टीचा नवा रंग दर्शवणारी असते.
 जावयाची धिंड काढणारे गाव
     जावईवेडे गाव म्हणून ओळखल्या जाणार्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या विडा गावात धुलिवंदनाच्या दिवशी जावयालासन्मानपूर्वकगाढवावरून मिरवले जाते. ही परंपरा 75 वर्षांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे सर्व जातीधर्माच्या जावयांची याप्रसंगी मिरवणूक काढली जाते. एकदा मिरवलेला जावई पुन्हा मिरवला जात नाही. आजघडीला गावात जावयांची संख्या शंभराच्या पुढे आहे, तरी धुलिवंदनाची चाहूल लागताच गदर्भ धिंडीच्या धसक्याने जावई भूमिगत होतात. असे असले तरी कोणत्याही परिस्थितीत एका जावयाला पकडून परंपरा कायम राखण्यात येथील युवक आतापर्यंत यशस्वी राहिले आहेत. दरवर्षी गदर्भ धिंडीचा मानकरी कोण ठरतो याकडे लोकांचे लक्ष लागून आहे. विडा हे गाव जहागीरदाराचे गाव म्हणून ओळखले जाते. पंच्चाहत्तर वर्षांपूर्वी तत्कालीन जहागीरदार ठाकूर आनंदराव देशमुख यांच्या जावयांची धुलिवंदनाच्या दिवशी गाढवावरून धिंड काढण्यात आली होती. तेव्हापासून जावई धिंड ही गावाची परंपराच होऊन गेली आहे. गावातीलच मुलींशी विवाह केलेले गावजावई, काही घरजावई तर व्यवसायानिमित्त विडातच तळ ठोकून बसलेले जावई अशा एकूण जावयांची संख्या शंभराच्या पुढे गेली आहे.

रोज नवे नवे ... हवे हवे


सतत थकवा जाणवतो?
व्यग्रता जाणवणं, कोणत्याही कामात मन न लागणं, औदासिन्य भेडसावणं, कमालीचा थकवा जाणवणं या आणि अशा तक्रारी वारंवार भेडसावत असतील तर तुम्हाला बर्न आऊटची समस्या असू शकते. या समस्येची लक्षणं जाणून घ्यायला हवी.
* सतत जाणवणारा थकवा शारीरिक, मानसिक किंवा भावनिकही असू शकतो. 
* कोणतेही काम करताना उत्साह वाटत नाही. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेण्याची तसंच आरामाची गरज आहे असं समजावं. 
*अशा वेळी दैनंदिन काम हे ओझं वाटू शकतं. मनात नकारात्मक भावनांनी घर केलं असेल तर गडबडून न जाता स्वतच्या भावनांवर नियंत्रण राखणं गरजेचं असतं. 
* लक्ष केंद्रित होत नसेल, ताण-तणावांमुळे गांगरून गेला असाल तर ही परिस्थिती गंभीर मानसिक विकारांकडे अंगुलीनिर्देश करते, असं समजावं. 

* तुमची शारीरिक क्षमता नष्ट होणं हे काही मोठय़ा आजारांचं लक्षणं असू शकतं. त्यामुळे सर्वप्रथम सगळ्या तपासण्या करून घ्या. आपल्या कामाचं स्वरूप समजून घेऊन प्राधान्यक्रम ठरवा. यामुळे काही प्रमाणात त्रास कमी होतोय का ते पहा. त्रास कमी झाला नाही तर मात्र त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मुलाखतीची पूर्वतयारी
नोकरीचा शोध घेत असताना इंटरव्ह्यू पॅनलसमोर कसं व्यक्त व्हायचं असा प्रश्न पडतो. पण यासाठी काही अँप्स आणि वेबसाईट्सची मदत घेता येईल. अशाच काही अँप्स आणि वेबसाईटविषयी..
* मुलाखतीत विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची तयारी करण्यासाठी '0१ एचआर इंटरव्ह्यू क्वेश्‍चन' हे अँप तुमच्या मदतीला येईल. यात विविध क्षेत्राशी संबंधित प्रश्न आहेत. गुगल प्ले स्टोअरमधून हे अँप डाऊनलोड करता येईल. 
* मुलाखतीला गेल्यावर सर्वप्रथम तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडतो. म्हणूनच अशा ठिकाणी जाताना योग्य पेहराव करावा लागतो. याबाबतची माहिती या साईटवर मिळते. ही साईट तुम्हाला पर्सनल स्टायलिस्टची मदत मिळवून देते. यावर महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळे विभाग आहेत. यासोबतच साईटवर इंटरव्ह्यू टूल्सही आहेत. यामुळे तुम्ही घरबसल्या तयारी करू शकता. 
* व्हिडीओंचा वापर करून तुम्ही मुलाखतीचा सराव करू शकता. हा मॉक इंटरव्ह्यूसारखा प्रकार आहे. प्रश्नांची उत्तरं रेकॉर्ड करता येतात. इथे इंटरव्ह्यूचे काही जुने व्हिडीओ आहेत. तेही तुम्ही बघू शकता. मुलाखतीची भीती वाटत असेल तर या अँप्स आणि साईट्सची मदत घ्या आणि बिनधास्त मुलाखत द्या.

टाळा खारवलेले पदार्थ
आहारात मीठाचे प्रमाण किती असावे याविषयी चर्चा करताना आपण काही मुद्दे अभ्यासले. याविषयी विस्तृत चर्चा करताना अन्य काही मुद्देही लक्षात घ्यायला हवे. आहारात मीठाचे जास्त प्रमाण असेल तर रक्तप्रवाहाचा वेग वाढतो आणि रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त ताण येतो. संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह योग्य दाबाने सुरू राहण्यासाठी मग हृदयाला खूप मेहनत करावी लागते. यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराची समस्या निर्माण होते. तसेच ऑस्टिओपोरोसिस, मूतखडा, अस्थमा आणि गॅस्टिक कॅन्सर असे विकार होण्याची शक्यताही वाढते.
मीठाचे प्रमाण कमी करण्यासाठी चीज, पापड, लोणची, खारवलेले काजू, पिस्ते, वेफर्स, फरसाण, सोया, टोमॅटो, मायोनिज आणि इतर सॉस, ब्रेड, इस्टंट सूप, नूूडल्स, पास्ता असे पदार्थ टाळावेत. पोटॅशियममुळे शरीरातले सोडीयमचे प्रमाण नियंत्रणात राहते. यामुळे केळं, संत्र, पीच, टरबूज, पालक अशी पोटॅशियमचं प्रमाण जास्त असणारी फळं आणि भाज्या खाव्यात. शरीरातलं सोडीयमचं प्रमाण कमी करण्यासाठी पाण्याचं प्रमाण वाढवावं. मांस आणि भाज्या साठवण्यासाठी मीठाच्या पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे हे घटक स्वच्छ धुऊन घ्या.

उन्हाळ्यात त्वचा जपा
उन्हाळा सुरू होताच टॅनिंगचा धोका वाढतो. सतत उन्हात फिरणं असेल तर त्वचा काळवंडेतच शिवाय अन्य समस्याही उत्पन्न होऊ शकतात. शुष्कता, तेज हरपणं, मृत त्वचेचा थर जमा होणं यासारख्या समस्यांमुळे सौदर्य डागाळतं. हे टाळण्यासाठी उन्हाळा सुरू झाल्यावर सौंदर्यरक्षणाचे विशेष उपाय योजायला हवेत. 

* त्वचेची शुष्कता, निस्तेजता टाळण्यासाठी व्हिटॅमिन सीचा पुरवठा गरजेचा असतो. म्हणूनच या दिवसात सायट्रसयुक्त फळांवर भर द्या. त्वचा तेजस्वी दिसण्यासाठी व्हटॅमिन सी युक्त तेल अथवा क्रीमचा मसाजही लाभदायक ठरतो. पिग्मेंटेशन आणि डार्क स्पॉट्सपासून सुटका करून घेण्यासाठी व्हिटॅमिन सी युक्त सिरमचा वापर करा.
* हलक्या स्क्रबिंगद्वारे मृत त्वचेचा थर काढून टाकायला हवा. हा थर निघून जाताच त्वचा सतेज आणि टवटवीत दिसू लागेल.
* या दिवसभरात शक्य तेवढं पाणी प्या. यामुळे त्वचा हायड्रेट राहील.
* उन्हाळ्यात फेशियल करून घेण्याची वारंवारिता वाढवा. या दिवसात ब्लॅक हेडस, व्हाईट हेडस, क्लॉग्ड पोर्स आदी समस्या भेडसावतात. नियमित फेशियल केल्यामुळे त्या दूर होतात.

वेळ वाचवा
कितीही नियोजन केलं तरी वेळ पुरत नाही ही तुमची तक्रार आहे का? वेळ पुरत नसल्यामुळे तुमची चिडचीड होते का? केवळ या कारणामुळे तुम्ही अन्य उपक्रमांमधील सहभागापासून दूर राहता का? या सगळ्यांची उत्तरं होकारार्थी असतील तर एक गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे. ती म्हणजे प्रत्येक व्यक्ती जवळपास ३0 टक्क्यांपेक्षा जास्त वेळ वेगवेगळ्या कल्पनांचा विचार करण्यात घालवत असते. एकप्रकारे कल्पनारंजनातच आपल्या एकूण वेळेचा बराच भाग खर्च होत असतो. म्हणूनच तो वाचवा.

धूर्त कोल्हा
एकदा प्राण्यांच्या राज्यात रोगाची साथ सुरू झाली आणि हजारो प्राणी मरू लागले. हा देवाचा कोप असल्याचं समजून प्रत्येकाने आपली वाईट कृत्यं कबूल करायचं ठरवलं आणि सर्वात मोठा अपराधी ठरेल त्याने देवाला शांत करण्यासाठी बळी जावं असं निश्‍चित झालं. ठरल्या वेळी सगळेजण हजर झाले आणि न्यायाधीश म्हणून कोल्ह्याची निवड केली गेली. प्रथम सिंहाने कबुली दिली, 'मी अनेक निरागस कोकरांना ठार मारलं आहे.' त्यावर न्यायाधीश महाराज म्हणाले, 'एखाद्या सामान्य प्राण्याने अशा गोष्टी केल्या असत्या तर नक्कीच मोठा अपराध ठरला असता. पण महाराजांना इतरांपेक्षा जास्त सवलती असतात. दुसरं म्हणजे त्या मूर्ख बकर्‍या खाणं हा काही अपराध नाही.' या निकालामुळे हिंस्त्र प्राण्यांनी कोल्ह्याची तारीफ केली. 

यानंतर वाघ, चित्ता, अस्वल वगैरे प्राण्यांनीही आपापल्या चुका मान्य केल्या आणि कोल्ह्याने वरीलप्रमाणेच निकाल दिला. शेवटी एक गरीब गाढव म्हणालं, 'मी एका शेतकर्‍याच्या जमिनीतलं हिरवं गवत खाल्लं.' हे ऐकतात न्यायाधीश झालेला कोल्होबा ओरडला, 'अरे पाप्या, तुझ्या पापामुळेच देवाचा कोप झालेला आहे. याला मरणाची शिक्षाच योग्य आहे!
तात्पर्य : बळी तो कान पिळी.


वाढवा सामान्यज्ञान
1)चाबुककाणी हा रोग कोणत्या पिकावर पडतो?
२) कोणती बँक शेतकर्‍यांना दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करते
३) आयोडिन अल्पता विकार नियंत्रण दिवस कधी साजरा केला जातो
४) कशाच्या चौकशीसाठी न्या. जी. शिवराजन समिती नेमण्यात आली होती
५) २00१ च्या जनगणनेच्या वेळचे जनगणना आयुक्त कोण होते?
उत्तर : १) गहू २) भू-विकास बँक ३) २१ ऑक्टोबर ४) सौर पॅनल घोटाळा ५) जे.के.भाटीया

विनोद
बक्षीस!
रंगूबाई : साहेब, फरशी स्वच्छ करताना मला दोन रुपयांचं नाणं सापडलं.
मालक : राहू दे तुझ्याकडे. प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून दिलं आहे असं समज.'
दुसर्‍या दिवशी साहेबांनी रंगूबाईला विचारलं, 'अगं, इथे शंभर रुपयांची नोट दिसली का तुला?'
रंगूबाई 'हो दिसली होती ना. प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून ती ठेवून घेतली.