Monday, February 12, 2018

व्यक्त व्हा,रिलॅक्स व्हा आणि नाती जपा


     'व्हॅलेंटाईन डे'चे फॅड गेल्या काही वर्षात आपल्याही देशात वाढू लागले आहे. आजची तरुणाई या निमित्ताने आपल्या मनातल्या भावना शब्दबद्ध करायला आणि ते आपल्या आवडत्या मुलीला,मुलाला  सांगायला म्हणजे  व्यक्त करायला आतुर झाला आहे. मुलीही आपल्या स्वप्नातला राजकुमार शोधण्याचा प्रयत्न करू लागल्याने आणि पहिल्यासारखे मुलींना बंधनाचा धाक नसल्याने आता त्याही अगदी मोकळेपणाने वागू लागल्या आहेत. त्यामुळे हा दिवस तरुण आणि तरूणी यांच्यासाठी महत्त्वाचा वाटू लागला आहे. काहींना तर या प्रेमाच्या या दिवसाने पुरते वेड लावून ठेवले आहे .

      अगदी ठरवून या दिवशी कुणी प्रेमात पडत नाही. परंतु, वर्षभर याची जय्यत तयारी सुरू असते. गुलाबाची फुले, गिफ्ट्स, भेटकार्ड, भेटवस्तू काय द्यायचा या गोंधळात तरुणाई गिफ्टशॉपमध्ये दिसते. खरेतर वर्षभर प्रेमाचे दिवस असतात पण व्हॅलेन्टाईन डेची गोष्टच वेगळी आहे. हा दिवस साजरा करत असताना  खरे तर इतिहास काय हे समजून घेण्याचीही गरज आहे. प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेन्टाईन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. भारतात या दिवसाची सुरुवात अलिकडची असली तरी संपूर्ण जगात या दिवसाचा उत्साह रोमांचकारी असतो. याचे कारण म्हणजे आता युवापिढीसह प्रौढांचाही सहभाग वाढत आहे. हे जरी कारण असले तरी 'प्रेम' या शब्दाची जादूच या उत्साहाचे मुख्य कारण आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हा दिवस व्हॅलेन्टाईन डे म्हणूनच का साजरा केला जातो, याचे एक मुख्य कारण म्हणजे 'संत व्हॅलेन्टाईन'.! 
     लग्न केल्यानंतर पत्नी आणि कुटुंब यांच्यात गुंतल्यामुळे पुरुष सैन्यात भरती होत नाही. देशहितापेक्षा त्यांना कुटुंबाचे हित महत्त्वाचे वाटते. त्यामुळे कुणीही लग्न करायचे नाही, असा फतवा काढणार्‍या राजा केलेडियसच्या रोममध्ये संत व्हॅलेन्टाईन हे प्रेमिकांसाठी प्रेषित होऊन आले. त्यांनी प्रेमिकांना समजावून त्यांना एकत्र आणत त्यांचे लग्न लावून देण्याचे महान कार्य केले. मात्र, या सत्कार्यासाठी संत व्हॅलेन्टाईन यांना आपल्या जीवावर उदार व्हावे लागले. राजा केलेडियस यांनी त्यांना फाशी दिली. त्यामुळे अशा प्रेमिकांना एकत्र आणण्यासाठी मृत्यू स्वीकारणार्‍या व्हॅलेन्टाईन यांच्या स्मरणार्थ हा दिवस 'व्हॅलेन्टाईन डे' म्हणून साजरा केला जातो.. 
     प्रेम हे जन्म व मृत्यूमधील एक निर्थक प्रवास अर्थपूर्ण करणारा अडीच अक्षरी शब्द आहे. याच प्रेमाने जग जिंकता येते असे म्हणतात ते काही उगीचच नव्हे! प्रेम हे व्यक्त करता येते आईच्या ममतेतून..भावा-बहिणीच्या निर्मळ नात्यातून.. मैत्रीच्या बंधातून..पण, या नात्याहून एक वेगळे नाते असते तो म्हणजे प्रियकर-प्रेयसीचे प्रेम! हेच प्रियकर-प्रेयसी 'व्हॅलेन्टाईन डे'ला उत्स्फूर्तपणे आनंद लुटत असतात. मात्र, आज प्रेमाच्या नावाखाली चाललेला खेळ खंडोबा बघून मन थक्क होते.राधा-कृष्ण, सावित्री-सत्यवान, लैला-मजनू, हिरा-रांजा यांच्या प्रेमासोबत आजच्या तरुण-तरुणींच्या प्रेमाची कुठेच तुलना करता येत नाही. त्यांच्या प्रेमाच्या तुलनेत कुठेच साम्य आढळून येत नाही.  आज आतल्या प्रेमापेक्षा शारीरिक आकर्षणाला अधिक प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे प्रेमाची खरी परिभाषा आजच्या तरुणाईला पूर्णपणे समजलेली वा उमगलेली नाही, असेच म्हणावे लागेल. आपल्या अस्तित्वाची जाणीव करू न देणे हा  प्रेमातला एक भाग आणि दुसर्‍याचे अस्तित्व हिरावून न घेणे हा दुसरा भाग आहे.
     फूल आवडते तेव्हा स्वत:साठी तुम्ही ते तोडून घेता, पण जेव्हा तुमचे फुलावर प्रेम असते तेव्हा तुम्ही ते तोडत नाही तर त्याची निगा राखता. प्रेमाची आणखी एक गंमत म्हणजे, राग दाखवल्याशिवाय कळत नाही म्हणजे आपण शांत राहिलो तर आपला आतला राग कधीच समोरच्याला कळत नाही. 
     कविश्रेष्ठ मंगेश पाडगावकरांनी म्हटल्याप्रमाणे, 'प्रेम हे प्रेम असतं..तुमचं आमचं सेम असतं.!' यासारखे सर्वांचे प्रेमसारखे वाटत असले तरी त्याची अनूभूती ही हवीहवीशी वाटणारी व हेलकावे देणारी असते. एकांगी प्रेम तर कधी-कधी जीवघेणेही ठरते. प्रेमात जो तरला तो विजयी योद्धा..अन् प्रेमात जो बुडाला (प्रेमभंग झालेला) तो कपाळ करंटाच.. त्यावेळी जीवनातली सर्व दु:ख एकवटून त्याच्या झोळीत एकाचवेळी पडत असतात. 
एक दिवस एका प्रियकर चिमण्याने प्रेयसी चिमणीला विचारले,
''तू मला सोडून कधीच उडून जाणार नाही ना.'' त्यावर चिमणी म्हणाली,
''जर मी उडून जाण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तू मला पकडून ठेव.!''
चिमणा पुन्हा म्हणाला,
''मी तुला पकडू तर शकेन गं पण मिळवू शकणार नाही.'' हे शब्द ऐकताच चिमणीच्या डोळ्यात पाणी आले. मग चिमणीने चिमण्याचे आपल्यावरचे प्रेम बघून आपणास नेहमीच चिमण्यासोबत राहाता यावे यासाठी आपले पंखच छाटून टाकले. ती चिमण्याला म्हणाली
''आता तर मी नेहमीच तुझ्यासोबत असेन आता उडून जाण्याचा प्रश्नच नाही'' काही दिवस असेच गेले. एक दिवस खूप सोसाट्याचा वारा आला.. तेव्हा स्वत:चा जीव वाचविण्यासाठी चिमणा उडू लागला. उडताना चिमणा चिमणीला म्हणाला
''स्वत:ची काळजी घे गं''असे म्हणून उडून गेला.. बिचार्‍या चिमणीने आपले पंख छाटून घेतल्याने तिला उडता येत नव्हते. थोड्या काळानंतर वादळ शांत झाले तेव्हा तो चिमणा तिथे परत आला..बघतो तर काय चिमणी मृतावस्थेत आढळली. तिने मरताना झाडाच्या एका पानावर लिहून ठेवले होते..
''एकदा तरी तुला सोडून मी कसे काय उडणार.? किंवा तुला सोडून मी उडणार नाही असे जरी म्हटले असते ना तर कदाचित मी वादळ यायच्या आधीच नसती रे मेली..!'' 
     या कथेतून बरंच काही शिकण्यासारखे आहे. यासारखे फसवे प्रेम करणारे व त्यात गुरफटलेले प्रेमवीरही आपणास आपल्या भोवताल, आपल्या समाजात बघायला मिळतात. त्यामुळे अशा प्रेमापासून कोसो दूर राहणे कधीही बरे.  आज ती आपली होत नाहीत म्हणून तिला कोणाचे होऊ द्यायचे नाही , असे म्हणत आपल्या आवडत्या माणसाचाच जीव घेतला जातो.यात आता मुलीदेखील मागे नाहीत. मुलीही आता आपल्या प्रियकराचा जीव घ्यायला लागल्या आहेत. काही कारणाने दोघे एकत्र येऊ शकले नाही तरी दुसऱ्याला सुखात पाहणे ,यात फार मोठा त्याग आहे. हा त्याग फक्त खरा प्रेमीक करू शकतो. त्याग करणारी माणसे मोठी होतात. हा त्याग आपल्या माणसासाठी महत्त्वाचा आहे. एक गोष्ट इथे महत्त्वाची आहे,ती म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या मणासारख्या होत नसतात. माणसाच्या आयुष्यात जगताना संघर्ष करावा लागतो.काही गोष्टींचा त्याग करावा लागतो, अशा वेळी आपल्याला आवडणार्या गोष्टींचा त्याग महत्त्वाचा आहे. ही गोष्ट आजच्या तरुणाईला समजावून सांगणे आणि त्यांनी समजावून घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी  तरुणाईने प्रेम हे आंधळे होऊन करण्यापेक्षा डोळसपणे करायला शिकायला हवे आहे. प्रेमात पडण्यापेक्षा प्रेमात पाडायला शिकायला हवे आहे. व्हॅलेंटाईन यांनी प्रेमी  जनांसाठी आपल्या जीवाचा त्याग केला, तसा त्याग सुद्धा आपली आवडती व्यक्ती आपली झाली नाही,म्हणून स्वतः ला किंवा समोरच्याला संपवणे योग्य नाही.आपल्या आवडत्या माणसाचे हित जोपासण्यातच दोघांचे भले आहे.  आजचा दिवस व्यक्त होण्याचा आहे. मनातल्या भावना व्यक्त  केल्या की मन रिलेक्स राहते. समोरून उत्तर काहीही येवो, ते खिलाडूवृत्तीने स्वीकारले पाहिजे. व्यक्त झाल्याने एक नवीन नाते तयार होते. मग ते प्रेमी-प्रेमिकाचे असेल किंवा निव्वळ मैत्रीचे असेल अथवा अन्य कोणतेही असेल त्याचा मनापासून स्वीकार करायला हवा. एकमेकांच्या भावनेचा आदर करायला शिकले पाहिजे.

No comments:

Post a Comment