खरं तर आज देशात
आधुनिकीकरणाच्या नावावर महाविद्यालयीन तरुण-तरुणी 'फ्रेन्डशिप
डे' व 'व्हॅलेन्टाईन डे' साजरा करतात, एवढेच नव्हे तर हाच उत्सव पुढे रेव्ह
आणि दारू पाटर्य़ा आयोजित करण्यापर्यंत जातात. संस्कृती ही निसर्गाने किंवा देवाने
दिलेली देणगी नाही. समाज सदस्य म्हणून मानवाने संस्कृती साकार केली आहे. संस्कृती
हे मानवी समाजाचे अद्वितीय लक्षण आहे. प्राणी समाज आणि मानवी समाजात भेद कोणता?
असा प्रश्न कोणी उपस्थित केला तर त्यास संस्कृती हे उत्तर आहे.
प्राणी समाजात संस्कृतीचा अभाव आहे. मानवी समाजाची संस्कृती समाजा इतकीच प्राचीन
आहे. आपल्या आजूबाजूच्या निसर्गात जसा बदल आढळतो तसा बदल मानवी समाजदेखील सतत
बदलता आहे. कोणताही मानव समाज स्थिर नव्हता, नाही व राहणारही
नाही. आजची पिढी बदलत आहे, आमच्या काळी असं नव्हतं! असे
जुनीपिढी नवीन पिढीला पाहून म्हणते तेव्हा त्यांचा रोष समाजातील बदलाकडेच असतो.
भारतीय समाजव्यवस्थेत मूलभूत
असे सामाजिक परिवर्तन घडवून आणणारी महत्त्वाची प्रक्रिया म्हणून पाश्चिमात्यकरणाकडे
पहिले जाते. पाश्चातीकरण म्हणजे पाश्चात्त्यांची भाषा, केशभूषा, वेशभूषा, करमणूक यापुरतीच र्मयादित असलेली वाटली तरी ही संकल्पना अतिशय
गुंतागुंतीची व व्यापक आहे. भारतीय संस्कृती अलौकिक आहे, तिला
दहा हजार वर्षांपेक्षा जास्त वारसा लाभला आहे. आपली संस्कृती अत्यंत समृद्ध व
वैभवशाली आपल्याला अभिमान वाटावा अशीच आहे. खरं तर संस्कृती ही आचार, संस्कार आणि एकूणच जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण यातूनच अस्तित्वात येते.
आपल्या भारतीय संस्कृतीची आचरण पद्धती संपूर्ण जगाने अनुकरण करावे इतकी आदर्श आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये नात्यांची वीण घट्ट विणलेली आहे. त्यामुळेच तर ही संस्कृती
सातासमुद्रापार गौरविली जात आहे.
विश्वात अशी एकही संस्कृती नाही की, जिला इतका प्रचंड वारसा मिळाला आहे. भारतीय संस्कृती मानवाला प्रेम शिकवते,
त्याच बरोबर कर्तव्य समृद्धीसाठी प्रेरणा देते. तसेच त्यागाची शिकवण
देते. भारतीय संस्कृतीने मानवाला पशुतुल्य जीवनातून मनुष्य जीवन जगायला शिकवले.
मात्र, आज संस्कृतीला पटणार नाहीत अशी दृश्ये दाखविल्या जाऊन
पाश्चात्य संस्कृतीचे अतिक्रमण अगदी घरापर्यंत पोहोचले आहेत. पाश्चात्य
संस्कृतीचे सणांचे, परंपरांचे अंधानुकरण करण्याची जणू आपल्या
देशात साथच पसरलेली आहे. पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण म्हणजे पाश्चात्तीकरण
होय. डॉ. एम. एन. श्रीनिवासजींनी पश्चात्तीकरणाची व्याख्या करताना म्हटले आहे की,
ब्रिटीशांच्या दीडशे वर्षाच्या राजवटीत पाश्चात्त्य संस्कृती व
सामाजिक प्रभावाने भारतीय समाजात तंत्रज्ञान, सामाजिक संस्था,
विचार व मूल्य या विविध पातळींवर घडून आलेले परिवर्तन म्हणजे पाश्चात्तीकरण
होय. पाश्चात्तीकरण म्हणजे पाश्चिमात्य संस्कृतीचे भारतीयांनी केलेले अनुकरण
होय. दरवर्षी भारतातील तरुण मंडळी खास करून महाविद्यालयीन मंडळी १४ फेब्रुवारी
प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून 'व्हॅलेन्टाईन डे'
साजरा करतात. हा दिवस का साजरा करतात? तर
व्हॅलेंटाईन नावाच्या संताने दोन प्रेमी जीवांचे मीलन घडवून आणले होते. भारतीय
संस्कृतीत प्रेमाला स्थान नाही किंवा प्रेम व्यक्त करण्यास मनाई आहे, असे नाही. खरं तर बंदुकीच्या जोरावर जग जिंकता येत नाही. परंतु, 'प्रेम' या अडीच अक्षरी शब्दात इतकी शक्ती आहे की,
तुम्ही संपूर्ण जगाला आपले करू शकतात. आपण 'प्रेम'
या शब्दाचा फारच संकुचित व वासनात्मक अर्थ घेतो. आई, वडिलांचे आपल्या मुलांवर असते तेही प्रेमच आहे ना!
खरं तर 'व्हॅलेन्टाईन' संताबाबत विरोध नाही.
परंतु, भारतीय संस्कृतीवर होत असलेल्या पाश्चिमात्य
संस्कृतीच्या अतिक्रमणाला विरोध आहे. हे अतिक्रमण थांबायला हवे यासाठी देशातील
युवा शक्तीने पुढाकार घेणे गरजेचे आहे. 'व्हॅलेन्टाईन'
यांनी जे केले ती गोष्ट स्वत: भगवान श्रीकृष्णांनी त्याच्या हजारो
वर्षापूर्वी केली नव्हती का? प्रभू श्रीकृष्णांनी आपला मोठा
भाऊ बलराम याचा प्रखर विरोध असतानासुद्धा महारथी अर्जुन व बहिण सुभद्रा यांचे मीलन
घडवून आणले होते ना ! मग या 'व्हॅलेन्टाईन डे' ला इतके महत्त्व का देतो आपण? हे आपल्या भारतीय
संस्कृतीवर होत असलेल्या अतिक्रमणाविरुद्ध आवाज का उठवत नाही? आपल्या एखाद्या संतांची जयंती, प्रगट दिन, सण परदेशात साजरी करतात काय ते लोक? नाही नं! मग आपण
का परदेशातील सणांना, दिवसांना साजरे करायचे? विरोध करायचा म्हणजे मारझोड, जाळपोळ करणे नाही
शांततेनेदेखील विरोध करता येतो. जवळ-जवळ दोन अडीच दशकांपासून पाश्चात्य देशांकडून
आपल्या भारतात खासगीकरणाच्या बहाण्याने अनेक दिवस आयात करण्यात आले आहेत जसे
फ्रेन्डशिप डे, व्हॅलेन्टाईन डे आणि रोज डेने भारतीय
तरुणांच्या मनात घर केले आहे.
खरं तर भारतात सणांची कमी नाही. परंतु, या नव्या युगात पाश्चात्य देशांचे सण साजरे करण्याचा क्रेज दिवसेंदिवस
वाढत चालली आहे. या दिवसांच्या आड काय घडते? हे नव्याने
सांगण्याची गरज नाही. भारतीय संस्कृती प्रेम आणि शांततेचा संदेश देते. कुठे नेऊन
ठेवली भारतीय संस्कृती माझी? हे म्हणायची वेळ आली आहे. आज
भारतीय संस्कृती टिकून राहावी एवढीच अपेक्षा! पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले
आहे की, जर आम्ही आपणाला स्वत:लाच विसरलो आणि आपल्या उज्ज्वल
इतिहासाला व पूर्वजांच्या उपदेशाला विसरलो, तर नाशाकरिता
दुसर्या बाहेरच्या शत्रूची मुळीच गरज नसते. म्हणूनच आपली वाटचाल ही परंपरेला धरून
असली पाहिजे.
No comments:
Post a Comment