रक्तदान हेच जीवनदान' हे वाक्य आपण अनेकदा वाचलंय. पण गैरसमजांमुळे आपण रक्तदान
करायला धजावत नाही. आजवरच्या आयुष्यात आपण कितीदा रक्तदान केलंय, हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर नकारात्मकच असेल. भारत हा सर्वाधिक
लोकसंख्या असलेला जगातला दुसर्या क्रमांकाचा देश आहे. पण देशभरात तीन दशलक्ष रक्ताच्या
बाटल्यांची कमतरता असल्याची आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेने जारी केली होती.
भारतीयांच्या दृष्टीने ही लाजीरवाणी बाब म्हणता येईल. भारतात दर वर्षी १२ दशलक्ष
रक्ताच्या बाटल्यांची गरज असते. ही गरजही आपण पूर्ण करू शकत नाही.
रक्तदानाबाबतच्या उदासीनतेची अनेक कारणं आहेत. जागरूकतेचा अभाव, गैरसमज, चुकीची माहिती, सुविधांची
वानवा अशी काही कारणं यामागे आहेत. आता ही परिस्थिती बदलता येईल का? रक्तदान करण्याची इच्छा असणार्या अनेकांना याची नेमकी प्रक्रिया माहित
नसते. अशा लोकांना मार्गदर्शन करता येईल का? बंगळूरूची 'खून' ही संस्था हे कार्य करतेय. चेतन एम. या १६
वर्षाच्या तरुणाने ही संस्था स्थापन केलीये.
रुग्णालयं, ब्लड बँक यांसारखे रक्त मिळण्याचे सगळे मार्ग बंद झाले की 'खून' मदतीला धावून येते. थोडं रक्त दिलं तरी
अशक्तपणा येत नाही. मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना रक्ताच्या कमतरतेमुळे अनेकांचे
मृत्यू होतात, ही बाब चेतनला पटत नव्हती. रक्ताची कमतरता दूर
करण्याच्या ध्येयाने त्याला पछाडलं. यातूनच 'खून'ची स्थापना झाली. 'मानवी शरीरात मुबलक प्रमाणात
उपलब्ध असलेलं रक्त न मिळाल्याने कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होऊ नये', हेच या संस्थेचं घोषवाक्य आहे.
रक्तदान करण्याची इच्छा
असलेल्यांनी 'खून'कडे
नावनोंदणी करायची. रक्ताची गरज भासली की त्यांना संपर्क केला जातो. रक्तदान केलं
जातं. रुग्णाच्या रक्तगटाचं रक्त मिळविण्यासाठी काही हजार रुपये मोजावे लागतात,
ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न 'खून' ही संस्था करतेय. देशातली ५0 टक्क्यांहून अधिक
लोकसंख्या तरुण आहे. यापैकी एक ते दोन टक्के लोकांनी रक्तदान केलं तरी ही कमतरता
दूर होईल. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी खूनकडे नोंदणी करावी, यासाठी आम्ही प्रयत्न करतो, असं चेतन सांगतो. खूनची
टीम विविध कॉलेजांना भेटी देते. 'खून'चं
कार्यक्षेत्र वाढविण्यासाठी चेतन झटतोय. चेतनकडून स्फूर्ती घेऊन रक्तदानाच्या
मोहिमेची सुरुवात झाली तर हे खूनचं मोठं यश असेल.
No comments:
Post a Comment