Saturday, February 3, 2018

(बालकथा) देव कुठे आहे?


     फार फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. पश्चिम बंगालमधल्या मागास भागात एक ऋषी राहत होते. ते मोठे धार्मिक होते. त्यांच्याकडे अनेक शिष्य शिक्षण घेत होते.
ते रोज आश्रमाबाहेर एका झाडाखाली बसून आपल्या शिष्यांना उपदेश करत.त्यांचा एक शिष्य मदन त्यांना नेहमी एक प्रश्न विचारायचा,"गुरुजी, देव कुठे आहे?" आणि ऋषी नेहमीचेच उत्तर द्यायचे," तू तुझ्या आजूबाजूला पहा. तू पाहिलं नाहीस का?"
पण मदनला काही कळायचं नाही.
शेवटी एक दिवस मदन म्हणाला,"गुरुजी, आपण  मला नेहमी सांगता की, देवाला तूझ्या आजूबाजूला पाहा.पण मी सगळीकडे पाहत आलो आहे,परंतु आजपर्यंत मला कुठेच देव पाहू शकलो नाही."
ऋषी हसले आणि म्हणाले,"मदन,देव सर्वत्र आहे. तो प्रत्येक वस्तूत, प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. तो तुझ्यात आहे,माझ्यात आहे. तो प्रत्येक प्राण्यात आहे,फुलातदेखील आहे. फक्त तू लक्षपूर्वक पहा,तुला तो नक्की दिसेल."
ऋषींचे बोलणे ऐकून त्याला आश्चर्य वाटले,पण त्याने आजूबाजूला लक्षपूर्वक पाहण्याचा निश्चय केला.
त्या दिवशी संध्याकाळी मदन घरी निघाला होता. वाटेत तो ऋषींच्या बोलण्यावर  विचार करत होता.
देव माझ्यात आहे,त्यांच्यात आहे. सगळीकडे आहे. हे कसे शक्य आहे?
अचानक त्याच्या मागे कसला तरी गोंधळ ऐकू आला. तो घाबरला. त्याने मागे वळून पाहिले तर त्याला एक पिसाळलेला हत्ती त्याच्या दिशेने धावत येत होता. त्याने मदनला पाहिले आणि त्याच्यावर हल्ला करण्यासाठी पुढे येऊ लागला.
माहूत ओरडत होता,"बाजूला हो,हत्ती पिसाळलेला आहे.बाजूला हो."
देव सगळीकडे आहे.म्हणजे तो हत्तीमध्येही आहे. देव माझ्यातही आहे म्हटल्यावर तो मला दुखापत कसा करेल.त्यामुळे हत्ती मला जखमी करणार नाही." असा विचार करून तो तसाच वाटेत उभा राहिला.
काही क्षणात हत्ती त्याच्याजवळ पोहचला. त्याने मदनला उचलून हवेत भिरकावून दिले. सुदैवाने मदन लाकडाच्या भुशाच्या ढिगाऱ्यावर जाऊन पडला.त्याला थोडेसेच खरचटले.
हत्तीने त्याच्यावर हल्ला का चढवला. त्याला काहीच कळेना. तो मोठ्या गोंधळात पडला.
दुसऱ्यादिवशी सकाळी रोजच्या प्रमाणे मदन ऋषींना भेटायला गेला. त्याने कालचा घडलेला सारा प्रसंग त्यांना सांगितला.पुढे म्हणाला,"गुरुजी, आपण तर मला सांगितले होते की, देव सर्व वस्तूंमध्ये आहे.तो हत्तीमध्येही आहे तर त्याने माझ्यावर हल्ला का चढवला ?"
ऋषी हसले आणि म्हणाले," देव हत्तीमध्ये आहे, हा तुझा विचार योग्य आहे. पण तू विसरलास की, त्या माहुतामध्येही देव आहे आणि तो तुला वाटेतून बाजूला व्हायला सांगत होता."
ते पुढे म्हणाले," तो तुला ओरडून सांगत होता,हत्ती पिसाळलेला आहे. मग तू त्याचे का ऐकले नाहीस?"
मदनला पुढे काय बोलावे कळेना. शेवटी त्याने यातून बोध घेतला. त्याला समजून चुकले की, देव सर्वत्र आहे आणि सर्व काही त्याच्या मर्जीनूसार होते. हत्ती त्याच्यावर हल्ला करू इच्छित होता आणि त्याने तो केला. माहूत त्याला मदत करू इच्छित होता. त्यामुळे त्याने आपल्याला सावध केले. तरीही आपण वाटेत उभे राहिलो. माहुताचे त्याने ऐकले नाही आणि तो जखमी झाला.
त्याला आता समजून चुकले की, कोणतेही काम  विचारपूर्वक करायला हवे

No comments:

Post a Comment