"हर्ष, मी
जरा बाजारात जाऊन फळं घेऊन येते. तू घराबाहेर पडू नकोस.घरीच बसून अभ्यास करत
बस." आई हर्षला म्हणाली.
हर्ष म्हणाला,"आई,फळंच तर आणायची आहेत ना! मी
आणून देईन ना तुला.तू घरीच थांब,घरातली कामं कर. मी असा जातो
आणि असा येतो."
आई त्याच्याकडे कौतुकाने पाहात
हसून म्हणाली,"बाळा, तू
अजून इतका मोठा झाला नाहीस की,बाजारात जाऊन फळं खरेदी करून
आणावीत. आजकाल सगळा फसव्यांचा धंदा सुरू आहे. तुला पाहिल्यावर तर ते तुला चांगलेच
ठकवतील. सडलेली,नासकी,खराब फळे तुझ्या
गळ्यात मारतील. आपण कितीही हुशारी दाखवण्याचा प्रयत्न केला तरी ते आपल्या डोळ्यांत
हातोहात धूळ फेकतात."
"तू आजिबात काळजीत करू नकोस,आई ! मी लगेच जातो आणि ताजी ताजी, रसरशीत फळं आणतो
की नाही बघ." हर्ष काहीसा हट्ट करीत म्हणाला.
त्याने आईकडून पैसे घेतले.
पिशवी घेतली आणि लगेच बाहेर पडला. काही वेळातच बाजारात पोहचला. स्टेट बँकेजवळच
फळांचा बाजार भरला होता.काही दुकाने लागली होती तर काही हातगाडे होते. तो एका
हातगाडीजवळ गेला आणि त्याने विचारले," आंबे कसे दिलेत,काका?"
"शंभर रुपये डझन!"
फळविक्रेता म्हणाला.
हर्षने थोडा विचार केला आणि
म्हणाला,"काका, मला
खराब आंबे हवेत."
हे ऐकून फळवाल्याला आश्चर्य
वाटलं. त्याने न समजल्यागत म्हटले," तुला नेमके काय म्हणायचे आहे?"
हर्ष म्हणाला,"काका, यातले सगळे खराब आंबे बाजूला
काढा." एवढे ऐकून फळवाला लगेच ढिगातले खराब आंबे बाजूला करू लागला. सगळे खराब
आंबे बाजूला केल्यावर फळवाला म्हणाला,"मुला, हे बघ,खराब आंबे! किती हवेत तुला?"
"काका, आता
या चांगल्या आंब्यातले निवडून दोन डझन आंबे द्या." हर्ष गालातल्या गालात हसत
म्हणाला.
हर्षचे बोलणे ऐकून संतापलेला
फळवाला ओरडला,"हा काय मूर्खपणा चालवला
आहेस तू?"
"यात कसला मूर्खपणा ,काका. मी तर तुमच्याकडून शंभर रुपये दराने आंबे खरेदी करत आहे. पैसे कुठे
कमी करा म्हटलोय मी!" हर्ष अगदी समजूतदारपणे म्हणाला.
तिथे दोन-चार ग्राहक उभे
होते.ते त्या दोघांचे संभाषण ऐकत होते.त्यातला एकजण म्हणाला,"हा मुलगा तर बरोबरच बोलतोय.खराब आंबे थोडेच विकत घेणार
आहोत आम्ही!" फळवाला ज्या मुलाला मूर्ख समजत होता,तोच त्याच्यापेक्षा हुशार निघाला.शेवटी त्याने हर्षला दोन डझन आंबे मोजून
दिले.
हर्षने त्याला शंभराच्या दोन
नोटा दिल्या आणि म्हणाला,"कसं काय काका,बरोबर आहे ना माझं?"
घरी पोहचल्यावर त्याने त्याच्या
आईला आवाज दिला,"हे घे आई, ताजे ताजे आंबे!"
"अरे हर्ष, मला
माहीत आहे,तू कसले ताजे आंबे आणले असशील. नक्की तूझ्या
गळ्यात मारली असतील खराब आंबे." आई बडबडत स्वयंपाक घरातून बाहेर आली. तिने
आंब्यांची पिशवी हातात घेतली आणि त्यात डोकावून पाहिले,तर
खरेच ताजे,रसरशीत आंबे होते. आंबे पाहून ती चकीत झाली.
"बाळा,खरेच
छान आंबे आणलेस.परवा तुझ्या बाबांनी आंबे आणले होते,त्यातले
बरेच आंबे नासके निघाले." आई म्हणाली.
"आई,मी लहान
बच्चा असलो तरी अकलेने कच्चा नाही हं! मी यासाठी एक मस्त आयडिया वापरली आणि ताजे
ताजे आंबे विकत घेतले." असे म्हणून त्याने काय कल्पना लढवून आंबे आणले,तो किस्सा त्याने आईला सांगितला.
No comments:
Post a Comment