Wednesday, February 28, 2018

रोज नवे नवे ... हवे हवे


·   
ऋतू कूस पालटतोय..
आता ऋतू कूस पालटतो आहे. वातावरणातील बदलाच्या या काळात हवेत परागकणांचं प्रमाण वाढतं. श्‍वसनासंबंधीचे विकार असणार्‍यांना याचा त्रास होऊ शकतो. यासंबंधीची लक्षण लक्षात घ्यावीत.
* वातावरणातील बदलामुळे श्‍वासनलिकेची संवेदनशीलता वाढते. श्‍वासनलिका आकुंचन पावून श्‍वसनाच्या विकारांना निमंत्रण मिळू शकतं. 
* या काळात लहान मुलं आणि ज्येष्ठांना फुफ्फुसासंबंधीचे विकार जडण्याची शक्यता असते. 
* आपल्या देशात सीओपीडी आणि दम्याच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतात जवळपास पाच कोटी लोक दम्याच्या विकारानं ग्रस्त आहेत. या काळात विशिष्ट प्रकारच्या रोगजंतूंचा हवेतील वावर वाढतो. यामुळे सीओपीडीनं ग्रस्त रुग्णांना त्रास होण्याची शक्यता असते. 
* वातावरणातील बदलामुळे शरीराच्या तापमानातही चढ-उतार होतात. यामुळे अँलर्जी तसंच दम्याच्या रुग्णांना त्रास होण्याची शक्यता असते. साहजिक या काळात दम्याच्या रुग्णांनी जास्त काळजी घ्यायला हवी. या काळात फ्लूचे जंतूही वातावरणात ठाण मांडून बसलेले असतात. त्यामुळे सर्दी, ताप असे विकारही डोकं वर काढतात. त्यावर वेळीच उपचार घ्यावेत.
आधी तपासणी, मग खरेदी
अंतर्वस्त्रांची खरेदी घाईघाईने उरकण्याकडे अनेकंचा कल असतो. याच गडबडीत ब्रा खरेदी केली जाते. मात्र बरेचदा अयोग्य मापाची आणि फिटिंगची ब्रा घेतली जाते. हे टाळायचं असेल तर काही मुद्दे लक्षात घ्यायला हवे.
* स्तनाचा आकार मोठा भासवायचा असेल तर पॅडेड ब्रा हा चांगला पर्याय ठरतो. एक्स्ट्रा सपोर्ट आवश्यक वाटत असेल तर अंडरवायर ब्रा खरेदी करा. स्पोर्टस्, जीम अथवा अन्य अँथलेटिक क्रीडाप्रकारांशी संबंधित असाल तर या खेळताना स्पोर्टस ब्रा वापरणं हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. नवजात बाळाचं संगोपन करणार्‍या माता फिडिंग ब्रा खरेदी करू शकतात.
* अंतर्वस्त्रांची विक्री करणार्‍या खास दुकानातूनच ही खरेदी करा. ब्रा ची ऑनलाईन खरेदी शक्यतो टाळा. तुम्हाला ब्रँड, साईज आणि पॅटर्नची खात्री असेल तरच हा पर्याय निवडा.
* आवडलेला पॅटर्न घालून बघताना खोल श्‍वास घ्या. यावेळी तुम्हाला त्रास झाला नाही तर तो पॅटर्न तुमच्यासाठी योग्य असल्याचं निर्देशित होईल.
* ब्रा चं फिटिंग तपासण्यासाठी दोन्ही बाजूंनी हलून बघा, खाली वाकून बघा. कपसाईज योग्य असल्याची खात्री करा आणि नंतरच खरेदी करा.
हॉस्टेलनिवासी होताना..
उच्च शिक्षण अथवा नोकरी-व्यवसायानिमित्त आपल्या गावाबाहेर, शहराबाहेर राहण्याची वेळ येते तेव्हा हॉस्टेलमधील निवास हा सर्वात श्रेयस्कर मार्ग ठरतो. पण हा निवास सुखकर ठरावा, आरोग्याच्या दृष्टीने पुरक ठरावा यासाठी काही बाबींची दखल घ्यायला हवी. हॉस्टेलवासियांनी कोणते नियम पाळावे, जाणून घेऊ या..
* मित्रांच्या वस्तू वापरू नका. टूथब्रश, शेव्हिंग किट, टॉवेल, प्रसाधनं, कपडे शेअर केल्याने इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
* पलंग, गाद्या, उशा, अंतर्वस्त्र स्वच्छ ठेवा. खोली स्वच्छ ठेवा. घाण, कचरा साठणार नाही याची काळजी घ्या.
* काही विद्यार्थी हॉस्टेलमधील कुसंगतीमुळे विविध व्यसनांच्या आहारी जातात. धूम्रपान, मद्यपान, तंबाखूमुळे आरोग्याशी संबंधित अनेक तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे व्यसनांपासून लांबच रहायला हवं.
* लेट नाईट पार्टी, गप्पा किंवा सोशल मीडियावर अँक्टिव्ह राहून रात्रीची जागरणं टाळा. याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
* रस्त्यावरचे पदार्थ खाऊ नका. जंक फूड टाळा.
* अभ्यास करताना किंवा अड्डयावर जमल्यावर चहाचे प्याले रिचवले जातात. पण चहा प्रमाणातच प्या. चहाच्या अतिप्रमाणामुळे अँसिडिटी, झोप न येणं, भूक न लागणं अशा समस्या उद्भवतात.
* फळं, सुकामेवा,चणे, शेंगदाणे असे पदार्थ जवळ ठेवा.
* दररोज व्यायाम करा. योगा करा. मेडिटेशन करा.
* मित्रमंडळींसोबत रहा. एकटेपणामुळे येणारी नकारात्मकता टाळा.
प्रदर्शनांचे आयोजन करा
प्रदर्शनांचे आयोजन करणं हे एक्झिबिशन डिझायनरचं कसब असतं. सध्याच्या जगात एक्झिबिशन डिझायनर ही करिअरची नवी वाट आहे. ठिकठिकाणी ऑटो, टेक्नॉलॉजी, दागिने, कृषी अशी वेगवेगळ्या क्षेत्रांमधली प्रदर्शनं भरवली जातात. त्याच्या आयोजनात एक्झिबिशन डिझायनरची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. 
एक्झिबिशन डिझायनर बनण्यासाठी तुमच्याकडे संवादकौशल्य असायला हवं. उत्तम कल्पनाशक्ती असणंही गरजेचं आहे. एक्झिबिशन डिझायनर म्हणून काम करणार्‍या व्यक्ती प्रशिक्षित असतात. वेगवेगळ्या डिझाइन्सशी त्यांचा कायमच संपर्क येत असतो. स्टॉल्सची रचना, मैदानाचा आकार तसंच प्रदर्शनातील सजावटीचा त्यांना बारकाईने विचार करावा लागतो. सौंदर्य स्पर्धा, संगीताची मैफल, पुरस्कार सोहळे अशा थीमवर आधारित कार्यक्रमांचे सेट्स उभे करणे, कला प्रदर्शनांसाठी सुयोग्य दालन निवडून वातावरण निर्मिती करणे याची जबाबदारी एक्झिबिशन डिझायनरची असते. आज सगळीकडे सतत प्रदर्शनं भरत असतात. त्यामुळे एक्झिबिशन डिझायनर्ससाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या निमित्ताने करिअरचं वेगळं क्षेत्र युवकांना खुणावतंय. संवादकौशल्य, नवतंत्रज्ञानाचा खुबीने वापर करण्याची तयारी, नवं शिकत राहण्याची इच्छा असणारे युवक या क्षेत्रात करिअरचा विचार करू शकतात.
लबाड मांजर
एका माणसाने आवडीने मांजर पाळलं होतं. ते त्याचं खूप लाडकं होतं. पण एकदा याच मांजराने मालकाचा आवडता पोपट मारून खाल्ला. तेव्हा मालकाने, मांजराला मारून टाकीन, असं रागानं म्हटलं. ते ऐकताच मांजर इतकं घाबरलं की, देवाने या प्रसंगातून वाचवलं तर पुढे आपण कधीही, कोणताही पक्षी मारून खाणार नाही अशी प्रतिज्ञाच करून टाकली. थोड्या वेळाने दरबाराच्या खिडकीतून एक वटवाघूळ आत आलं. ते पाहून या मोह उत्पन्न करणार्‍या प्रसंगी नेमकं कोणत्या प्रकारचं वर्तन करावं हा प्रश्न मांजराला पडला. एकीकडे भूक आणि दुसरीकडे प्रतिज्ञाभंग होण्याची भीती अशा पेचात ते सापडलं असता भूक भागवण्याची एक युक्ती त्याला सापडली. वटवाघूळाकडे पाहून ते मनाशीच म्हणालं, 'हा पक्षी आहे असं मानलं तर केलेल्या प्रतिोप्रमाणे याला हात लावण्याचा अधिकार मला नाही पण याच्या तोंडाचं उंदराच्या तोंडाशी इतकं साम्य आहे की, याला मारून खाण्याचा अधिकार मला आहे. कारण तो उंदीर आहे असं समजून मी खाईन.' इतकं बोलून मांजराने वटवाघळाला खाऊन टाकलं.
तात्पर्य : स्वार्थ साधण्याची वेळ आली की लबाड लोक युक्तीने मूल्य गुंडाळून ठेवतात.

वाढवा सामान्यज्ञान
१) एफओबीचं विस्तारित रूप काय?
२) चिली या देशाची राजधानी कोणती?
३) रशियातील गवताळ प्रदेशात राहणार्‍या कोझ्ॉक जमातीचा व्यवसाय कोणता?
४) कळसूबाई डोंगरात उगम पावणारी, पूर्ववाहिनी नदी कोणती?
५) अग्निजन्य खडकांना दुसर्‍या कोणत्या नावाने ओळखलं जातं?
     उत्तर : १) फ्री ऑन बोर्ड २) सॅन्टिएगो ३) पशुपालन 
४) प्रवरा ५) ज्वालामुखी खडक

आजचा मेन्यू
बेसनाची वांगी
साहित्य : अर्धा किलो लहान आकाराची वांगी, दोन वाट्या रवाळ बेसन,अर्धी वाटी दाण्याचे किंवा तीळाचे कूट, मूठभर कोथिंबीर, लाल तिखट, आवडीप्रमाणे, काळा मसाला किंवा गरम मसाला २ टिस्पून, मीठ, हिंग, हळद, चिंचेचा दाट कोळ, चवीपुरती साखर किंवा गूळ, तेल.
कृती: वांगी धुवून, पुसून अगदी कोरडी करून घ्या. वांग्याला एक चीर द्यायची आहे पण ती देताना देठाच्या थोडे खाली सुरुवात करून, टोकाकडचा गोलाकार सुरू व्हायच्या आधीच थांबायचे आहे ( आपल्याला वांगे उकलू द्यायचे नाही.) ही चीर पण फार खोलवर न देता, वांग्याच्या जाडीच्या अध्र्या पयर्ंतच द्यायची आहे. या चिरेत अर्धी चिमूट मीठ भरून घ्या ( असे केल्याने वांगे नीट शिजते.) पसरट पातेल्यात थोडे तेल तापवून ही वांगी रचा आणि झाकण ठेवून एक दोन वाफा येऊ द्या. पण पूर्ण शिजवू नका. वांगी बाहेर काढून घ्या व त्याच पातेल्यात आणखी थोडे तेल टाकून हिंग हळदीची फोडणी करून त्यावर चिरलेली कोथिंबीर कोरडी होईस्तो परतून घ्या. त्यावर बेसन घालून तेही खमंग परतून घ्या. मग त्यात बाकीचे जिन्नस व मीठ घालून आच बंद करा. वांगी आणि बेसन जरा निवले की एकेक वांगे भरायला घ्या. वांगे शिजलेले असल्याने ते आतून मऊ झालेले असते व त्यात बोटाने थोडा खळगा करता येतो. त्या खळग्यात बेसनाचे मिर्शण दाबून भरा. ( आपण न शिजलेल्या वांग्यात भरू शकू त्यापेक्षा बरेच जास्त भरता येते.) आता परत थोडे तेल तापवून त्यात ही वांगी रचा. मंद आचेवर शिजू द्या. वांग्याला जे पाणी सुटेल, त्यात बेसन भिजते आणि शिजतेही. बेसन उरले असेल तर तेही वांग्यासोबत परता.

No comments:

Post a Comment