विज्ञान प्रयोगातून चांगला समजतो.
शिवाय सततच्या प्रयोगातून हाताला आणखी काही नवे नवे गवसत असते.
त्यामुळे विज्ञान हा विषय पुस्तक वाचून शिकविता येत नसून तो तर अनुभवाने
शिकविणे गरजेचे आहे. यासाठी आपल्या देशातील शिक्षण पद्धतीत आमूलाग्र
बदल होणे गरजेचे आहे. विज्ञान या विषयाला अनुभवांपासून दुरावता
येणार नाही. हा विषय पूर्णपणे अनुभवांशी निगडीत आहे. वर्गात शिक्षकाने किंवा पालकांनी अधोरेखित करुन दिलेले एखादे उत्तर पाठ करुन
परीक्षेत ते उतरविणे ही आपल्याकडची रूढ पद्धत अत्यंत चुकीची आहे. परीक्षांना देण्यात येणार्या अवाजवी महत्त्वाचा हा परिणाम
आहे. शाळांमध्ये विज्ञानाचा अभ्यास हा प्रत्यक्ष प्रयोग करुनच
शिकविला गेला पाहिजे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना विज्ञान
शिक्षणात आवड निर्माण होणार नाही. या सर्वासाठी आपल्या शिक्षण
पद्धतीचा साचा बदलणे गरजेचे आहे. यासाठी विद्यापीठ, राज्य शासन, शिक्षण मंडळे, शैक्षणिक
संस्था तसेच परीक्षा बोर्डाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. परीक्षा
मंडळांनी केवळ ठराविक साच्यातच परीक्षा घेण्याची पद्धत योग्य नाही, त्यात काळानुरुप बदल करणे गरजेचे आहे.
शाळेत शिकविताना शिक्षकांनी सर्वप्रथम
‘मी माझ्या समोर असलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा हुषार आहे. त्यांना काय कळतं, माझा अनुभव जास्त आहे.’ हा अहंभाव मनातून काढून टाकला पाहिजे. तरच तो शिक्षक
विद्यार्थ्यांना हा विषय व्यवस्थित शिकवू शकतो. विज्ञान हा विषय
सैधांतिक आहे. यामुळे यातील सिद्धांत समजणे गरजेचे आहे,
आणि हे सिद्धांत समजण्यासाठी प्रयोगाद्वारे शिक्षण देणे गरजेचे आहे.
शाळांनी, शैक्षणिक संस्थांनी विविध उपक्रम राबविणे
गरजेचे आहे. देशात विज्ञान शिक्षण पद्धतीवर अनेक प्रयोग सुरु
असून ते अत्यंत लहान स्वरुपात आहेत. शाळा, महाविद्यालयातील काही शिक्षक शिकविण्याच्या पद्धतीत निरनिराळे प्रयोग करत असतात.
मात्र त्या प्रयोगांना व्यापक स्वरुप येण्याची गरज आहे.
इथे एक उदाहरण देणे महत्त्वाचे
ठरेल. एका शिक्षक विद्यार्थ्यांने त्याच्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी
भौतिकशास्त्राचे धडे देण्याचा नवा प्रयोग केला. बर्याचदा विद्यार्थी प्रश्न वा एखादी समस्या सोडविताना
गोंधळतात यामागचे कारण म्हणजे त्यांच्या डोक्यात असलेली सूत्रे वापरण्याची पद्धत.
मग जर विद्यार्थ्यांनाच प्रश्न तयार करायला सांगून
तो सोडविण्यास सांगितला तर विद्यार्थ्यांना त्याचा नक्की फायदा होईल. या विचाराने त्या शिक्षकाने एक महिना विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या व्यतिरिक्त
अशाप्रकारचे प्रशिक्षण दिले. त्याचा परिणाम इतका चांगला झाला
की विद्यार्थ्यांचे भौतिकशास्त्राचा पाया पक्का झाला व त्यांच्या मनातील त्या विषया
संदर्भातील भीती पूर्णत: दूर झाली. अशाप्रकारचे
प्रयोग विविध ठिकाणी झाले पाहिजे तरच आपली शिक्षण पद्धती सुधारेल आणि आपला देश खर्या अर्थाने विज्ञानाधिष्ठ होईल.
परदेशात नव्याने रुढ झालेल्या रचनावादाचा
आपण पुरस्कार केला पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या स्वयंकल्पनांना
वाव दिला पाहिजे. शिक्षक वारंवार मी सांगतो तेच बरोबर आहे असे
म्हणत जर विद्यार्थ्यांची कल्पकता मारत असेल तर, विज्ञानाच्या
अभ्यासात विद्यार्थ्यांना रुची वाटणे कठीण आहे. रचनावादाच्या
सिद्धांतामध्ये प्रत्येकाच्या कल्पनेला वाव देण्यात येतो. त्यानुसार
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अथवा त्यांच्या कल्पनेला शिक्षकांनी वाव दिला पाहिजे.
विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळू शकते. आपल्याकडे रचनावाद रुजलेलाच नाही, विशेष म्हणजे तो अनेकांना
माहितीदेखील नाही. विद्यार्थ्यांच्या तसेच पालकांनी आपल्या मुलांच्या
चुका समजून घेणे आवश्यक आहे. मुलं त्यांच्यापाशी असलेल्या अनुभवातून
अंदाज बांधत असतात आणि त्यातून त्यांची कृती होत असते. त्यांच्या
चुकीचे मूळ शोधून जर त्यांना त्याचे स्पष्टीकरण दिले तर त्यांची खर्या अर्थाने प्रगती होईल.
सर्वात
महत्त्वाचे म्हनजे विज्ञान शिक्षणाचा साचा बदलण्याची गरज आहे.
विज्ञानाचा अभ्यास बदलण्यासाठी विज्ञानाच्या पुस्तकांचा साचाही बदलणे
आवश्यक आहे. पुस्तकांमध्ये प्रात्यक्षिकांवर भर देण्यात आला पाहिले.
अलिकडे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातर्फे 1 ली ते 5 वीच्या पाठयपुस्तकांमध्ये बदल करण्याचे काम सुरु
आहे. ते लवकरात लवकर विद्यार्थ्यांसमोर आले पाहिजे. प्रयोगाच्या आधारे पाठयपुस्तके लिहिली गेली पाहिजेत. याचे प्रयत्न काही ठिकाणी सुरु आहेतच. नॅशनल कौन्सिल
फॉर एज्युकेशन रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग सेंटरने काढलेली नवीन पाठयपुस्तके
विज्ञानाच्या अभ्यासासाठी अनुकुल असून त्या आधारावर महाराष्ट्र शासनाने पाठयपुस्तकांची
निर्मिती करायला हवीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाळांमध्ये प्रयोग
साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हायला हवे. अलिकडच्या महणजे
2004 सालापासून राज्यातल्या माध्यमिक शाळांना वेतनेत्तर अनुदान बंद करण्यात
आले आहे. त्यामुळे या शाळांमधील विज्ञान साहित्य गायब झाले आहे.
जुन्याच मोडक्यातोडक्या साहित्यावर जेमतेम प्रयोग घेतले जात आहेत.
ही परिस्थिती बदलायला हवी आहे. शिक्षकांचा शिकविण्याचा दृष्टिकोन
बदलण्यासाठी काही पावले उचलताना त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण मिळायला हवे आहे.
माणसाच्या दैनंदिन जिवनातील विज्ञानाचे
महत्त्व दिवसेंदिवस वाढत जात असल्याने विज्ञान साक्षरता निर्माण होणे गरजेचे आहे.
आपल्याला देशाची बौद्धिक, सांस्कृतिक प्रगती करायची
असेल तर शिक्षणाचे संयोजन करणे अपरिहार्य आहे. आज विज्ञान व तंत्रज्ञान
हे प्रत्येकाच्या दृष्टीने महत्त्वाचे झाले आहे. त्याचबरोबर या
माध्यमातून फसवाफसवीचे प्रमाणही वाढले आहेत. त्यामुळे विज्ञान
साक्षरता पसरणे गरजेचे आहे. येत्या काही वर्षांमध्ये विज्ञान
आयुष्यातील अविभाज्य घटक बनणार आहे. त्यामुळे विज्ञान शिक्षण
क्रमप्राप्त होणार आहे. याचे गांभीर्य जाणून 1968 मध्येच कोठारी कमिशनने विज्ञान शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आहे. सर्वाची बुद्धिमत्ता समान स्तरावर मानून अभ्यासक्रम बनविण्यात येतो याचा अर्थ
असा आहे की, प्रत्येकाला विज्ञान येऊ शकते. विज्ञान शिक्षणाची गोडी वाढवायची असेल तर शिक्षण पद्धतीत बदल घडविणे गरजेचे
आहे. त्यासाठी सर्वानी एकत्र येणे गरजेचे आहे. यात पहिल्यांदा सरकारने पुढाकार घ्यायला हवा आहे.
No comments:
Post a Comment