Wednesday, February 7, 2018

कुशल मनुष्यबळ आणि श्रीमंतांचे स्थलांतर


     आपल्या देशात कुशल मनुष्यबळाची वानवा नाही,पण त्यांच्या कामाचे इथे चीज होत नाही. त्यांना हव्या तशा सोयीसुविधा उपलब्ध होत नाही. देशप्रेम म्हणून भारतातच राहून देशातल्या लोकांची सेवा करावी, असे वाटणार्या या कुशल लोकांना शासकीय पातळीवर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.कुठली गोष्ट सरळ्याने होत नाही.खाबुगिरीने तर देशाची बदनामी अख्ख्या जगात करून टाकली आहे. त्यामुळे अनेक कुशल तरुण असतील किंवा शास्त्रज्ञ,त्यांना आपल्या कामाची, ज्ञानाची देशाला किंमतच नाही, असे म्हणून ही मंडळी परदेशात स्थलांतर करतात. काही लोक इतरांच्या भारतातल्या अनुभवाचा धांडोळा घेऊन तिथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतात. काहीजण परदेशात संधी मिळाल्यावर पैसा महत्त्वाचा समजून परदेशच आपला देश समजून तिथेच राहतात.त्यामुळे आपल्या देशातल्या कुशलतेचा लाभ आपल्या देशाला न होता,त्याचा फायदा इतर देशांना होतो आणि पर्यायाने हे देश आणखी प्रगती करत यशोशिखर गाठतात. आपण मात्र जिथल्या तिथे थांबलो असल्याचे दिसते.ही खरे तर आपल्या देशाची शोकांतिका आहे.

     परदेशात गेलेल्या लोकांचा आपल्या देशाला उपयोग व्हावा आणि त्याने यासाठी परदेशातले शिक्षण पूर्ण करून मायदेशी परतावे म्हणून आपल्या देशातल्या सत्ताधारीमंडळीकडून फारसे प्रयत्न झालेले दिसत नाही. त्यांना देशात लागणार्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्याबाबतीत तर न बोललेच बरे! याबाबत आपला देश किती गांभिर्य घेतो आहे,याची कल्पना येईल. आता तर आपल्या देशातले अतिश्रीमंत लोकदेखील परदेशात जाऊन स्थायिक होऊ लागले आहेत. गेल्या काही वर्षात ही आकडेवारी वाढतच चालल्याने ही गोष्ट मोठी चिंता करण्यासारखी गोष्ट आहे, हे धान्यात घेतले पाहिजे.न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार गेल्यावर्षी भारतातील सात हजार कोट्यधीशांनी आपले बस्तान परदेशात बसवले आहे. 2015 मध्ये हीच आकडेवारी चार हजार होती. त्यात तब्बल 3 हजारांनी वाढ झाली आहे. या अहवालात 2017 मध्ये चीनमधील दहा हजार अतिश्रीमंत लोक अन्य देशात जाऊन स्थायिक झाल्याचे म्हटले आहे. आपल्या देशाचा चीन नंतर दुसरा क्रमांक आहे.
     चीन आणि भारत या देशांव्यतिरिक्त अन्य देशांपैकी तुर्कस्थानमध्ये सहा हजार,ब्रिटन-फ्रान्समध्ये प्रत्येकी चार हजार, रशियात तीन हजार अतिश्रीमंत व्यक्ती परदेशात स्थायिक झाल्या आहेत. स्थलांतराच्या कलानुसार भारतातील सर्वाधिक संपत्ती असणार्या व्यक्तींची पसंती अमेरिका, संयुक्त अरब अमिराती,कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडला आहे. तर चीनमधले अतिश्रीमंत लोक अमेरिका,कॅनडा आणि ऑस्ट्रेलियात जाण्याचे प्रमाण अधिक आहे. ज्या देशातले लोक स्थलांतरित आहेत,ते लोक त्यांच्या देशातले जीवनमान सुधारल्यावर पुन्हा माघारी परततील, असा विश्वास अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. अतिश्रीमंत व्यक्तींचा सर्वात जास्त ओघ 2017 मध्ये ऑस्ट्रेलियात होता. याठिकाणी दहा हजार धनवानांचे स्थलांतर झाले आहे. सलग तीन वर्षे अमेरिकेला पाठीमागे टाकून ऑस्ट्रेलियाने हा मान मिळवला आहे.
     न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार श्रीमंत देशांमध्ये भारत सहाव्या क्रमांकावर आहे. देशाची एकूण मालमत्ता आठ हजार 230 अब्ज डॉलर एवढी आहे. तसेच देशात तीन लाख 30 हजार 400 अतिश्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची वैयक्तिक मालमत्ता दहा लाख डॉलर आहे. या गटात जगात भारताचा नववा क्रमांक आहे. देशात 20 हजार 739 कोट्यधीश आहेत. भारतीय अब्जाधीशांची संख्या 116 असून अमेरिका आणि चीननंतर भारत यात तिसर्या क्रमांकावर आहे. जगातील 70 टक्के संपत्तीही एक टक्के लोकांच्याकडे आहे. तीच परिस्थितीत आपल्या देशाचीही आहे. आपला देश महासत्ता बनण्याकडे वाटचाल करीत असल्याचे म्हटले असले तरी प्रत्यक्षात आपल्या देशातले अतिश्रीमंत आणि बुद्धीवान,कुशल लोक परदेशात जाऊन स्थायिक होत असताना देश महासत्ता होण्याचा दावा, कशाच्या आधारावर केला जात आहे कळत नाही.
     देशात महागाई आवाक्याच्या बाहेर जात आहे.पेट्रोल-डिझेलचे भाव लोकांचे आर्थिक कंबरडे मोडत आहे. रोजगार मिळत नसल्याने तरुण अस्वस्थ बनला आहे. त्यातच आहे त्या सरकारी नोकरीतील पदे गोठवण्याचे काम चालले आहे. महाराष्ट्राने सध्या 30 टक्के सरकारी विविध कार्यालयातील पदांवर संक्रांत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचार्यांमध्येही भितीचे सावट पसरले आहे. कुठल्याच विभागात भरती प्रक्रिया होत नसल्याने तरुण वर्ग पार बावचाळून गेला आहे. उद्याला आपले भविष्य काय आहे,याचा विचार सध्या त्यांच्या डोक्यात आहे.
   
 कुशल मनुष्यबळ आणि श्रीमंत लोक परदेशात स्थलांतर करीत असेल तर या देशात नेमके राहणार कोणते लोक? एकाद्या शाळेतील हुशार मुले दुसर्या शाळेत गेल्यावर त्या शाळेचा दर्जा काय राहणार, असा सवाल जसा शिक्षकांना पडतो, तसाच प्रश्न यामुळे जाणकारांना पडल्यास नवल नाही. आपल्या देशात उद्योजक,व्यावसायिक यांच्याकडून राजकीय,गुंड लोकांकडून खंडणी मागण्याचा प्रकारदेखील वाढला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष पक्षनिधीसाठी या लोकांच्या मागे लागतात. अर्थात ही श्रीमंत मंडळी खंडणी किंवा देणगी देताना स्वत:चा लाभ मात्र करून घेतात. राजकीय पक्षदेखील सत्तेवर आल्यावर त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून उद्योजक,व्यावसायिक यांचे भले करून देतात. यात त्यांच्या पदरचे काही जात नाही. जनतेची संपत्ती उदार मनाने अशा लोकांना देऊन आपले घर तर भरून घेतातच शिवाय श्रीमंतांच्या तिजोरीतही संपत्तीची भर घालतात. त्यामुळे श्रीमंत आणखी श्रीमंत बनत चालला आहे.
     सध्याचे सत्ताधारी मोदी सरकार आणि यापूर्वीची सरकारे या स्थलांतराकडे लक्षच दिले नाही. त्यामुळे परदेशात कायमचे स्थलांतर होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे आपल्या देशाचे किती नुकसान होत आहे,याचा अंदाजच घेतला जात नाही. हा प्रकार असाच चालू राहिला तर आपल्या देशात मग काय फक्त कचराच शिल्लक राहणार का? आणि या कचर्याचे शेवटी करायचे काय? आधीच आपण इतर देशांकडून इलेक्ट्रोनिक वगैरे कचरा आयात करत आहोतच.त्यात भारतातला या निर्बुद्ध कचर्याची भर. त्यामुळे आपला देश कचर्यांचा देश म्हणून ओळखला जावा, असे राजकारण्यांना वाटते की काय कोण जाणे! आपल्या देशातल्या कुशल मनुष्यबळाचा लाभ आपल्या देशाला व्हायला नको का? श्रीमंत लोक आपला देश सोडून गेल्यावर त्यांचे उद्योग,त्यांचे व्यवसाय हेदेखील उद्या एक ना एक दिवस ते बंद करून तिकडे सुरू करतील. त्यामुळे आपल्या देशात आणखी बेरोजगारी वाढणार आहे. लोकांच्या नोकर्या जाणार आहेत. काही वर्षांनी मोठी भयावह परिस्थिती निर्माण होईल, याकडे कोणी लक्ष देणार आहे की नाही?

No comments:

Post a Comment