Wednesday, February 21, 2018

जरा यांच्याकडेही लक्ष द्या


     शाळांमध्ये विद्यार्थ्यांद्वारा खुलेआम फायरिंग, कमी वयात मुली गर्भवती होणं, ड्रग्ज आणि अशा अन्य प्रकारच्या नशा करणंसारख्या घटना अमेरिका किंवा अन्य युरोपीय देशांमधल्या शाळांमध्ये सर्रास घडत असतातआता असं वाटायला लागलं आहे की, अमेरिका किंवा अन्य युरोपीय देशातील हिंसात्मक संस्कृती  आपल्या देशामधल्या मुलांमध्ये वाढते आहेआणि आपल्या देशातली मुलं त्या चुकीच्या मार्गाने जात आहे. गुन्हेगारी जगतामध्ये अडकत चाललेलं बालपण आणि अलिकडच्या काळात घडलेल्या घटना पाहता या परिस्थितीला  खरेच आपली मुलं जबाबदार आहेत का आणखी कोणी? मुलांमध्ये वाढत असलेली गुन्हेगारी प्रवृत्तीमागे फक्त एकटा तो जबाबदार नाही तर त्याला अनेक कारणे जबाबदार आहेत. देशातल्या काही शाळांमध्ये घडलेल्या घटना केवळ काळीज चिरून जाणार्या नाहीत तर देशाचे भविष्य समजली जाणारी ही मुलं कोणत्या दिशेने जात आहेत, असा प्रश्न पडतो. शाळेत शिकायला आलेल्या मुलांकडून अशा प्रकारच्या क्रूर,हिंसक घडलेल्या घटना भयंकर आणि त्याहून चिंताजनक वाटाव्या अशा आहेत. अशा प्रकारच्या कल्पनादेखील केल्या गेल्या नाहीत, असे भयंकर प्रकार पाहण्याचे दुर्भाग्य आजच्या लोकांपुढे आले आहे. अर्थात अशा प्रकारच्या घटनांमध्ये अडकलेली मुले कुठे ना कुठे टीव्ही,चित्रपट, सोशल मिडिया आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेली सामग्रीतून प्रभावित झाला आहे, हे स्पष्ट होते.

मुलांसाठी वेळ नाही
     आजच्या आई-वडिलांचे संपूर्ण लक्ष आपल्या मुलाला चांगल्यात चांगले शिक्षण मिळावे आणि त्यांना पाहिजे त्या सुख-सुविधा मिळाव्यात याकडे देताना दिसतात. जे भोग आपल्या वाट्याला आले, ते त्यांच्या वाट्याला येऊ नयेत, अशी त्यांची प्रामाणिक इच्छा असते. मात्र ते हे विसरतात की, मुलाला नेमके काय हवे आहे. त्यांच्याकडे मुलाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. पैसा आहे, श्रीमंती आहे, एवढ्यावरच आपल्या मुलाचे मूल्यमापन होताना दिसत आहे. त्याने चांगले शिकावे,यासाठी वाट्टेल ते करायला आजचा पालक तयार आहे. मात्र त्याची काय आवड आहे, त्याला काय हवं आहे,हे पाहायला आणि त्याच्याकडेचे जाणून घ्यायला पालकांकडे वेळ नाही. त्यामुळे वात्सल्य आणि स्नेह याचे ते भुकेले बनले आहेत. परिणामी त्यांच्यामध्ये असंतुष्टपणा जाणवायला लागला आहे. यामुळे त्यांच्यात नकारात्मक विचार वाढायला लागले आहेत. यामुळे निर्माण झालेली असहिष्णुतता मुलांमध्ये हिंसा वाढवू पाहत आहेत. कित्येकदा आई-वडिलांमध्ये होत असलेले नित्याचे वाददेखील त्याला कारणीभूत आहेत. 
सिनेमा,टीव्ही आणि इंटरनेट
आजच्या मुलांचा सर्वाधिक वेळ हा टीव्ही,मोबाईल,व्हिडिओ गेम्समध्ये जात आहे. या माध्यमातून त्यांची मजल गुन्हेगारी शोज किंवा अडल्ट कंटेटपर्यंत सहजपणे जाते. आई-वडिलांजवळ आपल्या मुलाची दिनचर्या काय आहे,हे जाणून घ्यायलादेखील वेळ नाही. ते बिनधास्तपणे टीव्ही,लॅपटॉपवर काहीही पाहायला तयार असतात. इंटरनेट सेवा आज फारच स्वस्तात उपलब्ध झाली आहे. कमी दरात पुष्कळ डेटा पुरवण्याचे काम कंपन्या करताना दिसतात. साहजिकच मुले काहीही पाहताना दिसतात. यामुळे अगदी लहान वयात कुठलीही गोष्ट मिळवायचीच , असा हट्ट त्यांच्यात वाढताना दिसत आहे.
वाढते विभक्त कुटुंब
     आता समाजात विभक्त कुटुंबांचा प्रसार वाढतो आहे. एकत्र कुटुंब पद्धतीत घरातल्या वडिलधार्या लोकांचा मुलांवर धाक होता. पण आज विभक्त कुटुंबांमध्ये मुलांना संस्कार देण्यात आपण कमी पडत आहोत. एकटेपणा, मानसिक तणाव आणि आई-वडिलांच्या आशा- आकांक्षा आदी कारणांमध्ये मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. आजच्या परिस्थिती लोक एक किंवा दोन पुरेत याकडे अधिक प्रमाणात लक्ष देत असल्याने प्रत्येक कुटुंबात एक किंवा दोन मुलेच अथवा मुली आढळून येताना दिसतात. एकटा-दुकटा असल्या कारणाने मुलाचे लाडही फार होऊ लागले आहेत. वर्गात आपल्या मुलाला शिक्षकांनी मारले तर लगेच त्याच्या अंगावर पालक धावून जातात. मुलगा शिकू दे अथवा नसू दे,पण माझ्या मुलाला मारायचं नाही, असा पवित्रा पालक घेताना दिसतात. मुलगा घरात-घराबाहेर एकटा असल्याने तो काय करतो याकडे आई-बाबांचे अजिबात लक्ष नसते. साहजिकच मुले संगतीने किंवा एकलकोंडेपणामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळताना दिसतात.
आजचे शिक्षण जबाबदार
     शिक्षणाचे मंदिर म्हणून ओळखल्या जाणार्या शाळांमध्ये अशा प्रकारच्या घटना वाढत आहेत,याला आपली शिक्षण व्यवस्थादेखील कारणीभूत आहे. स्पर्धेच्या या जगात मुलांवर फक्त यश मिळवण्याचे दडपण दिले जात आहे. अशा वेळेला त्याच्या पदरी अपयश आले तर तो आपले धैर्य आणि संयम गमावून बसतो. शिक्षकांकडून आपल्या आई-वडिलांना आपली तक्रार केली जाईल,याची भीती असते. ही भीतीदेखील हिंसक मानसिकतेला जन्म देते.
     म्हणजे आपल्या देशात आई-वडिलांकडे आपल्या मुलासाठी वेळ नाही. शिक्षकांच्या मनात त्यांना समजून घेण्याची काळजी नाही. त्यातच शिक्षकांच्या अंगावर इतकी मोठी अशैक्षणिक कामे टाकण्यात आली आहेत की, त्यांना ती सोडवून मुलांकडे लक्ष द्यावे,यासाठी संधी दिली जात नाही. कारण सतत काही ना काही कामे शिक्षकांच्या बोकांडी मारली जात असतात. शाळांमधून मूल्यशिक्षण हद्दपार झाले आहे. मुलांना घरात ना संस्कार ना बाहेर समाजात. त्यामुळे मुले अगदी मनमानीप्रमाणे वागताना दिसतात. त्यांना चांगल्या-वाईटाचा फरकच कळेनासा झाला आहे. त्यांच्यात फक्त हट्टीपणा, दुराग्रहीपणा वाढताना दिसत आहे.  देशातल्या शाळांमध्ये घडलेल्या काही घटनांमुळे चिंताजनक भविष्याच्या दिशेने इशारा केला जात आहे. वेळीच आपण याकडे लक्ष दिले नाहीत,तर आपल्याला आणि देशाला फार मोठी किंमत चुकवावी लागणार आहे.
     मुलांना वाटेवर आणण्याकरिता आई-वडिल,समाज, शाळा आणि शासन या सगळ्यांनी आपापली जबाबदारी सांभाळली पाहिजे. आई-वडिलांनी आपला कितीही व्यस्त कार्यक्रम असला तरी काही वेळ काढून मुलांकडे लक्ष दिले पाहिजे. त्याचे मन समजून घेतले पाहिजे. त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलून त्याच्या मनाची व्यथा जानून घेतली पाहिजे. टीव्ही,मोबाईल,व्हिडिओ गेम्स यांनी त्यांच्या मनाचा ताबा घेतला आहे. मैदानी खेळाला प्राधान्य देताना टीव्ही,क़ॉम्प्युटर,गेम्स यासाठी ठरवून वेळ द्यायला हवा. सध्या अभ्यास महत्त्वाचा आहे तर अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, हे त्यांच्यात बिंबवले पाहिजे.
     काही पालक मुलांदेखत टीव्ही पाहत असतात. मुलाला समोर बसवून आपण टीव्ही पाहत बसणे योग्य नाही. मुलावर संस्कार कसे होणार? आई-वडिलांचे अनुकरण मुले करीत असतात. त्यामुळे पहिल्यांदा आई-वडिलांनी टीव्ही पाहण्याचा बंद करावा. पाहिला तर घरातल्या सर्वांनी मिळून पाहावा, असा कार्यक्रम ठराविक वेळापर्यंत पाहायला हरकत नाही. त्यात अधिक गुंतून जाता कामा नये. टीव्ही, सोशल मिडियामध्ये नकारात्मक गोष्टींची पेरणी अधिक होताना दिसत आहे. त्याकडे कुठल्या मर्यादेपर्यंत पाहायला हवे, याची जाणीव मुलांना वेळोवेळी करून द्यायला हवी. टीव्हीवर,लॅपटॉप,मोबाईलवर मुले नेमकी काय पाहतात, याकडेही जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे.मुलांना शाळेत फक्त यशाचा धडाच शिकवला जातो. अपयश पदरी पडल्यावर त्याचा सामना कसा करायचा, हे शिकवले जात नाही. या गोष्टी शिकवायला हव्यात. अलिकडे मुलांना नापास करायचे नाही, असा सरकारी फतवा निघाल्याने सध्याची परिस्थिती फारच वाईट झाली आहे, याचा प्रत्यय यायला लागला आहे. मुलांमध्ये खिलाडूवृत्ती बिंबवली पाहिजे.
     मुलांना पालकांनी त्यांनी मागितलेल्या गोष्टी लगेच देता कामा नये. त्यामुळे त्यांना त्याची किंमत कळत नाही. तहान लागल्यावर लगेच पाणी मिळाल्यावर तहानेचे महत्त्व कळत नाही. तहान लागल्यावर पाण्याचा शोधाशोध करायला लागल्यावरच त्याला त्याची किंमत कळते. तसे वस्तूंचे आहे. मुलाला लागणार्या वस्तूची गरज किती आहे, याची कल्पना त्याला यायला हवी आहे.

देशात घडलेल्या काही प्रमुख घटना
11 डिसेंबर 2007
गुरुग्रामच्या युरो इंटरनॅशनल स्कूलमध्ये आठवी इयत्तेत शिकणार्या विद्यार्थ्याने आपल्याच सहकारी मित्राचा- अभिषेक त्यागीचा गोळी घालून खून केला. दोन दिवसांपूर्वी दोघांच्यात वाद झाला होता.
9 फेब्रुवारी 2012
चेन्नईतल्या सेंट मॅरीज एंग्लो इंदियन हायर सेंकडरी स्कूलमध्ये रागावल्याने नाराज झालेल्या नववी इयत्तेच्या 15 वर्षाच्या विद्यार्थ्याने शिक्षिकेचा चाकूने भोसकून खून केला.
8 सप्टेंबर 2017
गुरुग्रामच्या रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये 11 वीच्या वर्गात शिकणार्या विद्यार्थ्याने दुसरीत शिकणार्या प्रद्युम्नचा शौचालयात चाकूने वार करून खून केला. तो परीक्षा आणि पीटीएम टाळू इच्छित होता.
26 ऑक्टोबर 2017
दिल्लीतल्या एका शाळेत 14 वर्षाच्या सातवी इयत्तेत शिकणार्या विद्यार्थ्याला त्याच्याच वर्गात शिकणार्या विद्यार्थ्याने धक्का दिला,त्यामुळे भिंतीला धडकल्याने त्याचा जीव गेला. तो विद्यार्थी पिडित विद्यार्थ्याला चिडवायचा.
15 नोव्हेंबर 2017
दिल्लीतल्या एका सरकारी शाळेच्या बाहेर किरकोळ कारणावरून वादविवाद झाला.नंतर नववीच्या विद्यार्थ्याने त्याचा खून केला.
17 जानेवारी 2018
इखनौच्या ब्राइटलँडकॉलेजमध्ये पहिलीचा विद्यार्थी ऋत्विकला बाथरुममध्ये बंद करून सातवीच्या विद्यार्थीनीने चाकूने वार करून खून केला. तिला शाळेला सुट्टी हवी होती.
20 जानेवारी 2018
हरियाणातील यमुनानगर येथील स्वामी विवेकानंद शाळेत कमी उपस्थिती असल्याने काढून टाकल्याने चिडून जाऊन 12 वीच्या विद्यार्थ्याने -शिवांशने प्राचार्य रितु छाबडा यांचा गोळी घालून खून केला.
1 फेब्रुवारी 2018
उत्तर-पूर्व दिल्ली क्षेत्रातल्या करावल नगराच्या सादतपूर येथील जीवन ज्योती पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणार्या 14 वर्षाच्या विद्यार्थ्याला-तुषारला त्याच्या तीन सहकार्यांनी बेदम मारहाण करून मारून टाकले. त्याचा मृतदेह शौचालयात आढळून आला.
याशिवाय सहकार्यांकडून बलात्कार, शारीरिक शोषण, अपहरण,मारहाणसारख्या घटनादेखील शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून घडत आहेत.

No comments:

Post a Comment