पुरंदरच्या शेजारीच वज्रगड उभा आहे. पुरंदरच्या
मानाने वज्रगड तसा आकार, विस्ताराने खूपच लहान; पण युद्धशास्त्राच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा. आज्ञापत्रात म्हटले
आहे-'किल्ल्यासमीपदुसरा पर्वत किल्लासमुदायी असो नये.
कदाचित असला तरी सुरंग लावून पाडून गडाचे आहारी आणावा. सुरंगास असाध्य असला तरी
तोही जागा मोकळी न सोडितो बांधोन मजबूत करावा!'. बरोबर
हीच नेमकी परिस्थिती वज्रगडासंदर्भात लागू पडते. वज्रगडाला भक्कम बुरुजात बंदिस्त
असलेले दोन दरवाजे, मारुती मंदीर, पाण्याची टाकी, बालेकिल्ला, रुद्रेश्वर महादेव मंदिर व पाच खणखणीत बुरूज आजही गडफेरीत पाहता
येतात. पण, दुर्दैवाने फारसे कोणी पुरंदर भेटीत वज्रगड
स्वतंत्र गड असूनही पाहत नाही. आज महाराष्ट्रात गडकिल्ले पाहण्याची हौस खूप मोठय़ा
प्रमाणात झाली आहे. पण, अभ्यासू पद्धतीने वेळ काढून
इतिहास जाणून गड फिरणार्यांची तसी वानवा आहे. खरेतर जोडकिल्ले हा दुर्गप्रकार
जोपर्यंत दोन्ही किल्ले आपण एकाच भेटीत पाहत नाही. तोपर्यंत पाहणार्यांच्या ते
लक्षात येत नाही. असो, पुरंदर अनेकवेळा पाहताना मला
जाणवलेली खंत म्हणजे छत्रपती संभाजीराजांचे जन्मस्थान असूनही या गडावर यांचे स्मरण
करणारे स्मारकच काय, तर एखादा माहिती फलकही नाही. तब्बल
नऊ वर्षे अनेक आघाड्यांवर लढणार्या या शिवपुत्राकडे जसे इतिहासकारांनी दुर्लक्ष
केले, तसे शासनानेही केले आहे असे वाटते. सध्या या दोन्ही
गडांच्या माच्यांच्या परिसरात लष्करी छावणीच्या नवीन वास्तूंची भर पडत असून
पुढेमागे हे दोन्ही गड सुरक्षेच्यादृष्टीने पर्यटकांसाठी बंद होतील, असे वाटते. त्यामुळे दुर्गप्रेमींनी हे दोन्ही गड प्राध्यान्याने पाहून
घ्यावेत.
किल्ले पुरंदर-वज्रगड ही दुर्गजोडी आपण शिवचरित्रात
मुरारबाजींच्या पराक्रमाने ओळखतो; पण या घटनेच्या तब्बल १७ वर्षे
अगोदर या खणखणीत जोड किल्ल्यांनी फक्त १८ वर्षे वयाच्या शिवरायांचे युद्ध कौशल्य
डोळे भरून अनुभवले आहे. सिंहगड-भुलेश्वर रांगेच्या पूर्वेस एका उपरांगेवर वसलेली
ही गडजोडी सातार्याहून पुण्याकडे जाताना कापुरहोळ येथून नजरेच्या टप्प्यात येते.
खरेतर सद्य:स्थितीत हा सर्व परिसर नारायणपूरचे दत्त देवस्थान, आधुनिक बालाजी मंदिर या ठिकाणांमुळे गजबजलेला असतो; पण या परिसराचा खरा आत्मा आहे ही प्रसिद्ध दुर्गजोडीच. याच
जोडकिल्ल्यांचा वापर करून आदिलशाही सरदार फत्तेखानाविरुद्ध स्वराज्याची पहिली लढाई
खेळली गेली व ती मराठय़ांनी नियोजनबद्धरीतीने जिंकली. या लढाईचे सर्वांत महत्त्वाचे
वैशिष्ट्य म्हणजे यावेळी संपूर्ण राजकारण व युद्धाचे नियोजन शिवरायांनी लहान वयात
स्वत: केले. ही लढाई शिरवळची सुभान मंगळगढी, सासवड जवळचे
बेलसर व पुरंदरचा पायथा अशा तीन ठिकाणी झाली. या लढाईत आदिलशाही सरदार मुसेखान
मारला गेला. व फत्तेखानाने तर विजापूरला धूम ठोकली; पण या
रणसंग्रामात मोसे खोर्यातले वीर बाजी पासलकर धारातीर्थी पडले. शिवरायांनी
आदिलशाही विरुद्ध लढलेली ही पहिली लढाई असल्याने व त्यात ते विजयी झाल्याने या
युद्धाने ते एका 'छोट्या बंडखोराचे' एका 'सत्ताधिशात' रूपांतर
झाले. या लढय़ाने मावळमधल्या प्रजेवर मोठा प्रभाव पडून शिवरायांचा लौकिक १२ मावळांत
पसरला. हे सर्व युद्धनाट्य घडले ते पुरंदरच्या साक्षीने म्हणून पुरंदर हा
महत्त्वाचा गड ठरतो.
आज पुरंदर-वज्रगडच्या माच्यांचा परिसर भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे. त्यामुळे इथल्या सुरक्षा रक्षकांची परवानगी घेऊनच हे गड शिवप्रेमींना पाहता येतात. पुरंदरवर बिनी दरवाजा, पुरंदरेश्वर महादेव मंदिर, लॉर्ड फ्रेडरिक चर्च, पद्मावती तलाव, वीर मुरारबाजींचा वीरश्रीयुक्त पुतळा, सर दरवाजा, गणेश दरवाजा, प्रचंड बालेकिल्ला, त्यावर केदार टेकडी, राजगादी, खांदकडा, शेंदर्या बुरूज, हत्ती बुरूज, कोकणी बुरूज व फत्ते बुरूज असे दुर्गअवशेष आहेत; पण या सर्व अवशेषांत एक दुर्गअभ्यासक या नात्याने मला बालेकिल्ल्यावरील तेल, तूप साठवायची टाकी अतिशय महत्त्वाची वाटते. कारण अशी टाकी महाराष्ट्रातील हातावर मोजण्या इतक्याच किल्ल्यांवर शाबूत आहे.

No comments:
Post a Comment