Monday, February 5, 2018

आपुलीच प्रतिमा होते..


   
 प्रेमात पडणे चांगले की वाईट याबाबत दुमत असू शकते, पण स्वत:च्याच प्रेमात पडणे कसे धोकादायक ठरू शकते, हे मात्र तरुणाईच्या 'सेल्फी' च्या फॅडने सिद्ध केले आहे. स्वत:ची प्रतिमा स्वत:च काढण्याच्या या छंदाने तरुणाईला चांगलेच पछाडले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या बातम्या वृत्तपत्रात नेहमीच प्रकाशित होतात. गेल्या दहा वर्षांत जवळपास अनेकांच्या हाती स्मार्टफोन आला आणि या 'सेल्फी' नावाच्या भूताने सार्‍यांनाच पछाडले. स्मार्टफोन स्वत:च्या समोर धरून हाताने किंवा सेल्फी स्टीकने स्वत:चीच छबी टिपायची, ती इतरांपेक्षा हटके असावी, त्यात काहीतरी थरार असावा, असल्या भन्नाट कल्पना मूळातच डोक्यात असलेल्या तरुणाईला त्यामुळे जगण्याचा, टाईमपासचा एक नवा मार्ग सापडला, पण या वेडापायी अनेकांना अकाली मरण पत्करावे लागले. अशा अनेक घटना रोज आपल्या सभोवताली घडताहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईच्याच नाहूर स्टेशनजवळ एका १४ वर्षांच्या मुलाचा सेल्फीच्याच नादात बळी गेला होता. ट्रेनच्या टपावर चढून या बहाद्दराने 'सेल्फी' काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी ट्रेनच्या तब्बल २५ हजार व्होल्ट्सच्या विजेचा झटका बसून त्याचा अक्षरश: कोळसा झाला. काय आहे हे वेड? तेही वयाच्या १४ व्या वर्षी? कुठे चाललोय आपण? कधी डोंगराच्या उंच कड्यावरून तर कधी निबिड अरण्यात, कधी चालत्या गाडीच्या टपावर तर कधी फेसाळलेल्या समुद्राच्या लाटांसोबत, रेल्वे ट्रॅक, रहदारीचा रस्ता, उंच इमारती, टेरेस, प्राणी संग्रहालय, होडी, डोंगरातल्या कडेकपारी अशा कोणत्याही स्थळाकाळाचा विधीनिषेध न बाळगता वाट्टेल तिथे सेल्फी काढली जाते. सोशल मीडिया. व्हॉटस प, फेसबुकने या तरुणाईच्या 'सेल्फी'ला आणखी प्रोत्साहित केले, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. 'सेल्फी' काढून तो मित्रांच्या ग्रुपवर, फेसबुकवर टाकून, त्यावर लाईक्सचा पाऊस, लोकप्रियतेच्या खोट्या प्रतिमेत अडकलेला 'सेल्फी' त्यात आणखीनच अडकत जातो. एखादा उधाणलेला समुद्र आ वासून उभा असताना त्याच्याकडे पाठ करून 'सेल्फी' काढण्यातला आनंद आपल्या घरच्यांना कायम दु:खाच्या खाईत लोटू शकतो, याचे भान तरुणाईला असणे अत्यंत गरजेचे आहे. स्वत:च्या प्रतिमेत अडकायला हरकत नाहीच; पण त्यामुळे आपण इतरांच्या जिवाला घोर लावतो आहोत, एवढा साधा कॉमनसेन्स का वापरला जात नाही तेच कळत नाही. 

No comments:

Post a Comment