भारतीय संस्कृतीत वायू, अग्नी, जल, भूमी
(माती) आणि आकाश या पंचमहाभूतांना पवित्र आणि पूजनीय मानले आहे. निसर्गाने या
पंचमहाभूतांची पर्यावरणीय साखळी निर्माण केली आहे. सूर्यशक्ती अग्नीचेच विशाल रुप
आहे. उन्हाळा सुरू झाला की, सूर्य पृथ्वीच्या जवळ येतो.
तापमान वाढते. वाढत्या तापमानाने हवा तापते. उष्ण वारे समुद्रावरून वाहू लागतात.
आपल्याबरोबर सागरातील पाण्याची वाफ आकाशात नेतात. या वाफेचे ढगात रुपांतर होते.
पावसाच्या रूपाने आपणास गोडे पाणी मिळते. या पाण्याने मातीत वृक्ष वनस्पती फुलतात,
धान्य पिकते, सर्व जीवांना पिण्यासाठी पाणी
मिळते. सर्वांना खायला अन्न मिळते. पंचमहाभूतांची अशी ही परोपकारी पर्यावरणीय
साखळी आहे.वाढती लोकसंख्या, वाढता विकास, वाढती वाहने, वाढते उद्योगीकरण, वाढता चंगळवाद, यामुळे आपण सर्व पंचमहाभूतांना
प्रदूषित करून टाकले आहे. वायूप्रदूषण, जलप्रदूषण आणि आकाश
प्रदूषणाने आपण आपलं सारं विश्व प्रदूषित करून टाकलं आहे. प्रदूषणामुळे वातावरणात
अचानक बदल होत असून, त्याचा परिणाम वेळीअवेळी पाऊस येण्यात व
जलटंचाई होण्यात झाला आहे. याशिवाय माणसांना अनेक नैसगिक संकटांना तोंड द्यावे
लागत आहे. आपण निसर्गसंवर्धन करायला शिकत नाही, पाण्याचा आदर
करायला शिकत नाही. भूमीतलं आणि भूमीवरचं पाणी संपलं,की
वाळवंटीकरणाची प्रक्रिया सुरू होते. आज भारतासह जगातील बहुसंख्य लोकांना
पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. ही जलटंचाई २0५0 सालापर्यंत अधिक भीषण स्वरुप धारण करणार आहे. जगातल्या प्रत्येक चार
माणसांपैकी एकाला पिण्यासाठी पाणी मिळणार नाही. अशुध्द पाणी पिण्याची वेळ
त्याच्यावर येणार आहे.
२0५0 सालात जगाच्या एकूण लोसंख्येपैकी २५ टक्के
लोकसंख्येला पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे. याबाबतचा अहवाल अमेरिकेतील
वॉशिंग्टन येथील पॉप्युलेशन अँक्क्षन इंटरनॅशनल (पीएई) या संस्थेने तयार केला आहे.
या अहवालानुसार जगातील ४३ कोटींपेक्षा जास्त लोकांना गरजेपुरतंही पुरेसं पाणी मिळत
नाही. त्यांना सतत जलटंचाईला तोंड द्यावे लागते. एका बाजूला जगातील लोकसंख्येचा दर
वाढत आहेत तर दुसर्या बाजूला जगातील पाण्याच्या पातळीत मोठय़ा प्रमाणात घट होत
आहे. आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, जेथे कमी पाऊस
पडतो तेथे उन्हाळ्यात जलटंचाई तर जाणवतेच; परंतु जिथे जास्त
पाऊस पडतेा तिथेही जलटंचाई जाणवायला लागली आहे. या सर्व जलटंचाईची कारणे
निसर्गनिर्मित नसून मानव निर्मित आहेत. ती कारणे माणसानेच दूर केली पाहिजेत.
त्यासाठी निसर्गाला न्याय दिला पाहिजे. महाराष्ट्राच्या एकूण ३0७ दशलक्ष हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी ५२ टक्के क्षेत्र अवर्षणप्रवण आहे
तर ८२ टक्के शेती ही लहरी पावसावर अवलंबून आह. एकीकडे धरणाच्या पाण्यातून आलेली
सुबत्ता व त्यातून क्षारपड होत चाललेली जमीन, जमीन म्हणते
जास्त पाणी नको अजिर्ण होत आहे. रासायनिक खते, औषधे नको,
मला रक्तदाब झाला आहे, ऊस-केळी सारखी पिके नको,
मला मधुमेह झाला आहे. आज महाराष्ट्रात ५३ मोठी धरणे आहेत. १९३ मध्यम
धरणे बांधली, २४१८ लघू जलप्रकल्प बांधले. त्यासाठी एकूण
पंचवीस हजार कोटी रुपये खर्च झाले. नव्याने लहान मोठे मिळून १0५५ जल प्रकल्प पूर्णत्वास जात आहेत. एवढे करूनही आपण फक्त १८ टक्के
जमिनीला बारमाही पाणी देवू शकलो. ही महाराष्ट्राच्या जलसिंचनाची परिस्थिती आहे.
भूजलाच्या
अतिउपशावर मार्यदा घालणे हे सर्वात मोठे आव्हान आपणापुढे आहे. यासंदर्भात
गेल्यावर्षी एक चांगली घटना राज्यात घडली. महाराष्ट्र हे भूजज्ला नियमन विधेयक आणणारे
देशातील पहिले राज्य ठरले आहे. धरणाच्या पाण्यावरून पीक पध्दती न ठरता
भुस्तरामध्ये भूजल किती आहे, जमिनीखाली पाणी किती आहे,
यावर पाण्याचे व्यवस्थापन, पिकांचे व्यवस्थापन
करणार आहोत. अलिकडे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आपण समुद्रातील पाण्याच्या
पुनर्वापराची आपण चर्चा करतो आहोत, पण भूजल व भूस्तरावरील
उपलब्ध पाण्याच्या नियोजनाची आणि पीक पध्दतीवर मात्र कोणीही भाष्य करायला तयार
नाही. सर्व राजकीय पक्षांनी आता पाण्याची सांगड मतपेटीशी न घालता पाण्याची सांगड
आता शेतीशी व पिण्याच्या पाण्याशी करणे आहे. यासाठी यावर सर्व पक्षीय एकमत
होण्याची वेळ आली आहे. पाणलोटांचे काम माथा ते पायथा असे शास्त्रशुध्द पध्दतीने
झाले पाहिजे. परंतु त्याकडे लक्ष दिले जात नाही. खोल सलगसमपातळी चर (डीपसीसीटी) चे
काम अगोदर झाले नाही तर ओघळ नियंत्रणाचे काम जाग्यावर राहणार नाही व सिमेंट बांध
मातीने बुजून जातील. पाण्याशिवाय विकास नाही, पाणी हा
विकासाचा आत्मा आहे. हा आत्मा चैतन्यशिल ठेवायचा असेल तर पाण्याची बचत करायला
शिकले पाहिज़े.
No comments:
Post a Comment