Thursday, February 8, 2018

(बालकथा) बिरबल बनला साधू


      एकदा बादशहा अकबराने बिरबलावर नाराज होऊन त्याला देशाबाहेर हाकलून लावलं. बिरबलला जाऊन दोन-तीन दिवस झाले नाहीत, तोच त्याची बादशहाला उणीव जाणवायला लागली. बादशहाने त्याचा सगळीकडे शोध घेतला, पण बिरबल काही सापडला नाही.
     काही दिवसांनी दरबारात एक साधू आला. या साधूची बुद्धिमान साधू म्हणून मोठी कीर्ती होती. संपूर्ण विश्‍वात त्याचा इतका बुद्धिमान शोधूनही सापडणार नाही, अशी चर्चाही ऐकायला मिळत होती. बादशहा त्याची परीक्षा घ्यायच्या उद्देशाने म्हणाला, 'माझ्या  दरबारातले नवरत्न आपल्याला  काही प्रश्‍न विचारतील. त्याची बरोबर उत्तरे दिलीत तर आपल्याला दरबारातले उच्च  स्थान बहाल करण्यात येईल. आणि उत्तरं चुकली तर आपल्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात येईल.'

     साधू म्हणाला, ' बादशहा, मला पदाचा कसलाच मोह नाही. शिवाय मी कोणी मोठा ज्ञानी नाही. परंतु, उत्तर देण्याचा आवश्य प्रयत्न करीन. '
     सगळ्यात अगोदर  टोडरमल उभा राहिला आणि त्याने पहिला प्रश्‍न विचारला,'माणसाचा  सगळ्यात चांगला मित्र कोणता?' साधूने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिले, ' त्याचा विवेक.' दुसरा प्रश्‍न अबुल फजलने विचारला,' सांगा बरं, सर्वात अवघड गुढ कोणतं ते?' उत्तर आलं,' स्त्रीचं मन.'
 तानसेनने तिसरा प्रश्‍न विचारला,' सर्वात मधुर संगीत कोणतं?' साधूचं उत्तर तयार होतं,' ईश्‍वरी आराधनेसाठी गायलं जातं ते.'
     चौथा प्रश्‍न विचारला राजा मानसिंहने,' हवेपेक्षाही अधिक वेगाने कोण धावतं?' साधूने उत्तर दिलं,' माणसाचं मन.' आणि शेवटचा प्रश्‍न विचारला तो खुद्द बादशहा अकबरनं. त्यानं विचारलं,' सांगा, राज्य चालवताना कोणत्या गुणाची आवश्यकता आहे?'
     साधूने तात्काळ उत्तर दिलं,' चलाखी.'
     बादशहा जाम खूश झाला. इतक्यात साधूने बादशहाला प्रश्‍न केला, “ तुमची एखादी इच्छा असेल तर मला सांगा, मी ती तात्काळ पूर्ण करेन.
     यावर बादशहा उदास झाला. त्याला बिरबलाची आठवण आली. तो म्हणाला,” आम्हाला बिरबलला भेटायचं आहे.
     साधूने लगेच आपली दाढी-मिशी उतरवली. दरबारी पाहतात तर समोर बिरबल उभा. बिरबलला पाहताच, बादशहाला अत्यानंद झाला. त्याने लगेच बिरबलला मिठी मारली.  

No comments:

Post a Comment