Friday, February 9, 2018

स्वच्छ भारत,समृद्ध भारत


     स्वच्छतेचे महत्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने  देशावरील हगणदारीचे किटाळ दुर करण्यासाठी संपूर्ण देशात स्वच्छता अभियान राबवले जात आहे. त्याकरिता जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे. यासाठी  सरकारतर्फे मदत दिली जात आहे. घरोघरी शौचालय असावे असा आग्रह धरला जात आहे, पण सरकारने दिलेला मदतीचा हात झिडकारून काही ग्रामीण भागात अजूनही  उघड्यावर बसुन हागणदारीची प्रथा कायम ठेवली जात आहे. काहींना ही कुप्रथा मोडायची  नाही.यात त्यांचे काय भले आहे ठाऊक नाहीत,पण ते दुसऱ्यांच्या जीवावर उठले आहे. त्यांच्यामुळे गाव हागणदारीमुक्त होत नाहीत आणि गावातली रोगराईची साथ हटत नाही. त्यामुळे अशा लोकांना गाववाल्यांनीच धडा शिकवायला हवा. 

     उघड्यावर शौच्यास करणार्‍यांकरिता मवाळ धोरण बदलण्याची वेळ आली आहे. अशा गावांमध्ये शासनस्तरावर कठोर पावले उचलणे गरजेचे झाले आहे. सरकारी स्वस्त धान्याची मदत उदरभरणाकरिता असून, शासन शौचालय बांधण्याकरिता मदत देत असतानाही त्या संधीचा उपयोग कुणी करणार नसेल तर ही मंडळी सर्व शासकीय सवलती बंद करण्याची वाट पाहत आहे काय? काही लोक अशिक्षितपणाचा बुरखा पांघरून स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यांना वेळीच लगाम लावणे आवश्यक आहे. स्वच्छ अन्न ही मानवी गरज असतांना उघड्यावरील घाणीवर बसुन आलेल्या माश्या या अनेक प्रकारच्या आजारांना आमंत्रित करतात, हे कळायला आपल्याला किती वेळ लागणार आहे? खरे तर ग्रामस्थ आता तितके दुधखुळे राहिले नाहीत. स्वत:भोवती अनेक आजार निर्माण करून सरकारला वेळोवेळी जबाबदार धरणार्‍यांनी थोडे स्वत:लाही विचारले पाहिजे की, मी किती स्वच्छ राहतो? परिसर किती स्वच्छ ठेवतो.?
     दुरदर्शन वाहिन्यांचे जाळे ग्रामीण भागासह संपूर्ण भारतात पसरले आहे. एका लहान बालमित्रासह अमिताभ बच्चन उघड्यावर शौच्यास बसणार्‍यांच्या विरोधात जनजागृती करून देश स्वच्छ कसा राहील याबद्दल प्रयत्नरत आहे. या जाहिरातीवर शासनाचा कोट्यवधी रुपये खर्च होतो. तोही तुमच्या आमच्या खिशातूनच कर रूपाने जातो. तरीही आपण उघड्यावरची घाण ही आपली शान समजतो. जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व ग्रामीण भाग येत असल्याने पंचायत समिती सदस्य व ग्राम पंचायत सदस्यांना जबाबदारीने वागण्याकरिता शासनाचे आदेश दिले पाहिजे. हगणदारीमुक्तीसाठी एक निश्‍चित मुदत दिेली पाहिजे.शौचालय बांधण्याची मुदत संपल्यानंतर ग्रामपंचायतीला कुणी उघड्यावर दिसल्यास त्याचे रेशन कार्ड रद्द करण्याची कारवाई करायलाही हरकत नाही. त्याचे नियोजन राखण्याकरिता शासनाने रेशन कार्ड जप्तीचे अधिकार एका विशिष्ट अधिकार्‍याला द्यावे व अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेला जबाबदार ठरवावे. या हगणदारीचा बट्याबोळ करण्याचा कळस तर असाही झाला आहे की, शौचालय बांधुनही काही लोक त्याचा उपयोग न करण्यास बहादुरी समजतात. बहुतांश जागी सार्वजनिक शौचालये बांधलेली आहे. पण त्यांची स्थिती अतिशय वाईट आहे. काहींचे दरवाजे काढुन नेले आहेत तर काहींच्या सिटा घाणीने भरलेल्या आहेत. पाण्याचा वापर नाही. फक्त एकमेकांवर दोषारोपण करण्यातच धन्यता मानली जाते. असे प्रकार होत असल्याने हगणदारीमुक्ती ही निरोगी आयुष्याकरिता आवश्यक आहे हे समजेपर्यंत आरेाग्यावर गंभीर परिणाम होतील. ही निव्वळ हटखोरी असून एका चांगल्या संकल्पनेला मुजोरीने प्रतिसाद मिळत नसेल तर देशाबद्दल चांगला विचार कुणी आणि केव्हा होणार? हक्काकरिता मोर्चे काढावे, उपोषण करावे, राजकीय पोळय़ा भाजण्याकरिता कार्यकर्त्यांना बळी पाडावे. स्वत:च्या इच्छेखातर जनभावना चिथावून आंदोलन करावे याशिवाय राजनेत्यांना रस्त्याच्या दुतर्फा असलेली हगणदारी दिसतच नाही काय? त्यांची शहरात असलेली ऐषारामी घरे, निवडणुकींच्या तोंडावर आठवणारी ग्रामीण भागातील मते हाच दृष्टिकोन असल्याने राजकीय नेते हगणदारीची घाणेरडी प्रथा बंद करण्याकरता कुठलीही मोहिम राबवित असल्याचे दिसत नाही. 
     पाकिस्तान, चीन ही शेजारी राष्ट्रे बोलूनचालूनच शत्रुराष्ट्रे आहेत पण अदृश्य रूपाने आर्थिक व सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी हगणदारी त्यापेक्षाही मोठी शत्रु आहे हे आपल्या बांधवांना कळत कसे नाही, याचेच आश्चर्य वाटते.छोट्याछोट्या राष्ट्रांनी मोठमोठय़ा बिमार्‍या देशातून स्वच्छतेच्या लढय़ातून हद्दपार केल्या आहेत. कुत्र्याच्या उघड्यावरच्या विष्टेला कुत्रामालक स्वत: स्वच्छ करतो असे विदेशात घडते. पण आपल्या देशात कुत्र्यासह स्वत: उघड्यावर घाण करणारे असंख्य लोक आहेत. मग देशात स्वच्छता राहील तरी कशीे! गरज स्वार्थ भावनेची नसून राष्ट्रभावनेची आहे. माझ्या कृतीमधून माझा देश, माझे कर्तव्य पार पाडले जात नसेल तर तर मी चांगला नागरिक कसा बनू शकतो, हा विचार होईलच कसा?
      आपला देश, आपले शहर, आपले गाव, आपले खेडे चांगले आरशासारखे स्वच्छ करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा. शेवटी आरसा मानवानेच निर्माण केला आहे ना? मग गावाच्या काळ्याभोर रस्त्याला हगणदारीची किनार देऊन आपल्या गावाचा आपला आरसा आपणच का मलीन करायचा? पहा स्वच्छ करून आपला आरसा.निरोगी घरात लक्ष्मी कशी सुखाने नांदते बघा. आपले घर म्हणजे आपला देशच आहे,त्यामुळे सगळ्यांनी देशाच्या स्वच्छतेसाठी हातभार लावायला हवा.

No comments:

Post a Comment